#### यु. एस. बी. ने लावली इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग शिक्षणाची वाट #####
हो चक्रावलात ना ? पण हे सत्य आहे. आज इलेक्ट्रोनिक्सच्या क्षेत्रात एव्हढी मोठी संधी आहे पण प्रत्येकाला वाटत कि आय. टी. मध्ये गेलं तरच आपल भलं होईल . आज इलेक्ट्रोनिक्सला एडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पण इलेक्ट्रोनिक्स शिकण्यामध्ये काही इंटरेस्ट उरलेला नाही . ए आय , कंप्युटर गेला बाजार आय टी ला प्रवेश मिळाला नाही म्हणून नाईलाजाने इलेक्ट्रोनिक्सला ऍडमिशन घेतो कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आय. टी. कंपनीत प्लेस होतो . जर नाही झाला तर नंतर सोफ्टवेअरचे कोर्स करतो आणि शेवटी आय. टी. उद्योगात अभिमानाने प्रवेश करतो . एखाद दुसरे विद्यार्थी असतात ज्यांना कोअरमध्ये जायचे असते पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्यांची पूर्वतयारी होत नाही म्हणून नाईलाजाने ते पण शेवटी आय. टी. मध्येच जातात.
आज प्रत्येक क्षेत्रात इलेक्ट्रोनिक्स आहे आणि याचा विचार न करता काही विद्यापीठांनी तर इलेक्ट्रोनिक्सच्या अभ्यासक्रमामध्ये पण आय. टी. ला पुरक ठरणारे विषय टाकण्याचा आणि त्यासाठी इलेक्ट्रोनिक्सचे महत्वाचे विषयांचा बळी देण्याचा मूर्खपणा केला आहे. इलेक्ट्रोनिक्स शिक्षण क्षेत्र आपलं अस्मिता विसरून गेलं आहे . कधी कधी याला कारण का याच एक मजेदार उत्तर मी सांगतो कि इथं सगळी सर्कीटच आहेत . चला विनोदांच बाजूला ठेवू या आणि मूळ विषयाकड परत येउ या .
सर्वसाधारणपणे २००८ ते २०१२ च्या सुमारास इलेक्ट्रोनिक्स शिक्षणाचा अभ्यासक्रम हा अत्युच्य पातळीवर होता .(आताचा म्हणाल तर त्याच्या तुलनेत कचराच आहे ...त्याबद्दल नंतर कधीतरी) आज ज्या गोष्टींचा बोलबाला आहे त्या एम्बेडेड सिस्टीम , व्ही एल एस आय , आय सी डिझाईन , आय ओ टी अशा गोष्टी त्या काळात होत्या आणि महत्वाचे म्हणजे यांचे प्रॅक्टिकल पण अतिशय गंभीरपणे व्हायची. मूलंपण छान प्रोजेक्ट करायची.
पण तेव्हढ्यात एक घोटाळा झाला . सर्व महाविद्यालयात नवीन संगणक येउ लागले आणि या संगणकाना सिरीयल पोर्ट आणि पॅरॅलल पोर्ट यायचं बंद झालं होत . आता यु एस बी पोर्ट येउ लागलं होत . महाविद्यालयात असणाऱ्या ८०५१ मायक्रोकंट्रोलरना प्रोग्राम करण्यासाठी सिरीयल पोर्ट तर एफ. पी. जी. आय. प्रोग्राम करण्यासाठी पॅरॅलल पोर्टची गरज असायची मग आता काय? . मग जुनेच संगणक वापरण चालू होत . ते पण घाईला येउ लागले . कॉलेजची कीट्स हि लवकर बदलता येत नव्हती नुकतीच नवीन घेतली होती आणि एकदा घेतली तर पुढचे दहा वर्षे तरी ती बदलली जात नाहीत . आता आला का प्रॉब्लेम . त्याच वेळी बाजारात यु एस बी ते सिरीयल कन्व्हर्टर पण आले पण त्याची वेगळीच गंमत . त्याचे ड्रायव्हर मॅच व्हायचे नाहीत.कधी कधी एका पी सी वर व्हायचे तर दुसऱ्या पीसी वर चालायचेच नाहीत . त्यामुळे आता जरी प्रोग्राम डाउनलोड झाला तर पुढच्यावेळी होईल अशी शाश्वती नसायची . एकच गोंधळ उडाला. त्यामुळे झाल काय जो मायक्रोकंट्रोलरचा पाया शिकण्यासाठी जो सगळ्यात सोपा ८०५१ मायक्रोकंट्रोलर जो होता त्याची किट्सवरील प्रात्यक्षिक बंद करून त्याला हळूहळू सिम्युलेटर वर शिकवायला सुरुवात झाली . त्याच महत्व कमी करायला सुरुवात झाली.
त्याच्या ऐवजी पी. आय. सी. मायक्रोकंट्रोलरला महत्व जास्त द्यायला सुरुवात झाली अर्थात तो हि महत्वाचा कंट्रोलर आहे पण ते म्हणजे ज्यांना बडबड गीते जमत नाहीत त्याना कालिदासाची महाकाव्ये शिकवण्याचा प्रकार झाला . मुलांना ते काही कळेना . आता कोणी कबुल करणार नाही पण जवळजवळ ९९% शिक्षकांना पण पी आय सी मायक्रोकंट्रोलर येत नाही ( तसा तो सोपा पण नाही आणि पन्नास मार्काच्या अभ्यासक्रमात बसण्याइतका सहज नाही ). मग आता ८ बिट्सचा ८०५१ कळत नाही त्याना ३२ बिट्सचा आर्म कंट्रोलर कसा काय कळणार? ज्यांना पेरिफेरल कसे चालतात हेच कळत नाही तर त्यांना डिजिटल आय.सी. कसे डिझाईन करता येणार? असा एकच गोंधळ उडाला.
आता नवीन बोर्ड जे बाजारात येत आहेत ते चांगले आहेत आणि यु एस बी पोर्ट चांगले चालतात पण मधल्या काळात हळु हळू मायक्रोकंट्रोलर हा विषय शिकवण्याचा आत्मविश्वास इलेक्ट्रोनिक्स शिक्षण क्षेत्र गमावुन बसलं. आता मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिकवण्यातल कौशल्य संपल केवळ पाटी टाकायचं काम उरलं आहे.
एम्बेडेड सिस्टीम ,एफ. पी. जी. ए. प्रोग्रामिंग हे विषय आता ऑप्शनला टाकले जात आहेत . मग आता सांगा जगावर राज्य करणारी एम्बेडेड सिस्टीम ज्याचा मेन चालक मायक्रोकंट्रोलर त्यालाच कसं प्रोग्राम करायचं हे जर शिकलं नाही तर नोकऱ्या कशा मिळणार ?
कळल का यु एस बी मुळे निर्माण झालेला एक मोठा प्रॉब्लेम .......?
तुमची प्रतिक्रिया अवश्य मांडा.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे