Tuesday, September 3, 2024

### कोडिंगचे लॅपटॉप ###

### कोडिंगचे लॅपटॉप ###

 गेले बरेच महिने मी नवीन लॅपटॉप घ्यायचा विचार करत होतो. आपल मोबाईल फोन आणि लॅपटॉप याबद्दल आधीच ठरलं आहे कि मोबाईल फोन हा दर तीन वर्षांनी आणि लॅपटॉप हा दर चार वर्षांनी नवीन घ्यायचा . मोबाईल फोन हा पंधरा हजार रुपये आणि लॅपटॉप हा तीस हजारच्या आतच घ्यायचा . 

आता सध्या वापरत होतो तो लॅपटॉप २०१८ मध्ये घेतला होता . त्यावर इलेक्ट्रोनिक्स आणि मेकॅनिकलसाठी लागणारी सगळी सॉफ्टवेअर अजूनही गुण्यागोविंदाने चालत होती तरीपण वाटलं नवीन घ्यावा . आता नवीन घ्यायचं म्हणजे शोधाशोध आली . वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मी वर्कशॉप घेत असतो त्यामुळे बऱ्याच प्रकारचे लॅपटॉप दिसतात मग  मुलांनाच विचारायचो कितीला घेतला? . प्रत्येकजण सत्तरहजारच्या वरचीच किंमत सांगायचा . 

गेल्या  दोन वर्षात साठ  हजाराच्या खाली किमतीचा लॅपटॉप घेतलेला  कुणीही  भेटला नाही त्यातच मध्यंतरी चीनमधून आयात बंद केल्याने लॅपटॉपच्या  किंमत वाढल्या असही कळल होत . आजकाल पेपरमध्ये पण ज्या जाहिराती येतात त्यामध्येपण  ऐंशी हजाराच्यावरच लॅपटॉपच्या  किमती असतात . आता काय करायचं? कसतरी पन्नास हजार पर्यंत बजेट वाढवलं पण कुठला लॅपटॉप घ्यायचा ते  सुचेना .

 शेवटी पोराला म्हटलं एखादा पन्नासच्या खाली चांगला लॅपटॉप शोधून काढ  . त्याला विचारल्यावर त्याने झटदिशी नेटवरून शोधून काढलं आणि म्हणाला सध्या १६ जीबी राम आणि ५१६ जीबी एस एस डी मेमरीचा लॅपटॉप ४०००० च्या खाली मिळतोय आणि त्यान शोधून पण काढलं कि कुठे मिळतोय? . मग त्याला घेउनच मी शोरूम ला गेलो . 

तिथ गेल्यावर लगेच आमच एका सेल्समनने स्वागत केलं . मग माझ्या मुलांकडे पहात  विचारलं लॅपटॉप कोडिंगला पाहिजे का ? अर्थात आम्ही होय म्हटल्यावर तो एका बाजूला घेउन गेला . लय भारी भारी लॅपटॉप दाखऊ लागला . सगळे ऐंशी हजाराच्या आसपासच्या किमतीचे होते . मला परत टेन्शन, माझी चुळबुळ सुरु झाली  . सेल्समन माझ्याकडे  बघतच नव्हता त्याच लक्ष्य माझ्या मुलाकडे होत आणि मुद्दा कोडिंग वरून गेमिंग वर आला आणि हे लॅपटॉप  गेमिंगसाठी कसे भारी आहेत ते सांगू लागला . कमी कमी करत त्याने ६५००० हजारच्या पर्यंतचे लॅपटॉप दाखवायला सुरुवात केली .

 मला हे कळेना कि कोडिंगसाठी गेमिंग लॅपटॉप कशाला पाहिजे . मग मी मुलाला त्याने शोधून काढलेल्या  लॅपटॉपविषयी विचारायला सांगितलं मग काय ? सेल्समनच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला  त्याने दुसरा सेल्समन बोलावलं आणि आमच्याबरोबर पाठवला . एका कोपऱ्यात हे लॅपटॉप ठवले होते .अगदी यांची रेंज १८००० रुपये पासुन सुरु होत होते. सध्या मी वापरत असलेल्या लॅपटॉपपेक्षा चागले फीचर्सअसणारा लॅपटॉप अगदी पंचवीस हजाराच्या आत येत होता .

 हे सर्व चालल असताना एक साध कुटुंब आल . अठरा एकोणीस वर्षाच पोरग सोबत पंचवीस  वर्षाच पोरग, आई वडील आणि सोबत वडिलांचा मित्र असावा. ते आत आलेवर लगेच मघाचा सेल्समन त्यांचेकडे गेला.. त्यांना विचारलं कि  लॅपटॉप कुणाला पाहिजे ,तर लॅपटॉप त्या एकोणीस वर्षाच्या मुलाला पाहिजे होता. तो इंजीनियरिंग करत होतो . दुसऱ्या वर्षात शिकत होता... मग काय त्याला सावज मिळालं . दुसरा मुलगा हा त्याचा भाऊ होता आणि सध्या तो आय टी मध्ये होता . कोडिंग वरून विषय गेमिंगवर आला आणि शेवटी नव्वद हजाराच्या पुढचा झगमगीत लायटिंग दिसणारा लॅपटॉपघेउन लगेच गेले.... आणि मला महाग लॅपटॉप गुपित कळल ,खुपच वाईट वाटलं .

आजकाल लोकांच्या हातात पैसा बऱ्यापैकी  खेळायला लागला आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनाची महाविद्यालयाचा सुकाळ झाला आहे त्यामुळे मेरीट हि पद्धत बंद होत चालली आहे. आजकाल  एडमिशन पण लगेच मिळतात .एकदा अडमिशन घेतलं कि इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला पोरग गेलं कि त्याची लॅपटॉपसाठी पिरपिर सुरु होते. पालकाना पण कौतुक वाटत आणि आपलं पोरग अभ्यासात माग पडू नये म्हणून मुकाटपणे त्यांने दाखवेल तो   लॅपटॉप गपगुमान घेऊन देतात. खरच एव्हढ्या महागड्या लॅपटॉपची गरज असते का?

बऱ्याच वेळा लॅपटॉप हा एकदा चांगला  घेतला कि पुढ पाच सहा वर्षे बघायला नको असंही त्याचं मार्केटिंग केलं जात . तस बघायला गेल तर तीन वर्षात तंत्रज्ञान इतकं बदलेलं असत कि  एकदाच महागडा लॅपटॉप घेण्याऐवजी दर तीन वर्षांनी दोन स्वस्त लॅपटॉप घेण कधीही परवडत .

आज ज्यावेळी मी ट्रेनिंग घेत असतो तर अगदी गावाकडच्या विद्यार्थ्याकडेपण लॅपटॉप असतो. किबहुना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासाठी लॅपटॉप हा अनिवार्यच झाला आहे पण खरंच मुलांना लॅपटॉप वापरता येतो का ? अगदी शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्याला सुद्धा लॅपटॉप वापरता येत नाही . अगदी कंप्युटर इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याना सुद्धा विंडोज किती बिट्सची आहे , ऑपरेटिंग सिस्टीम कशी टाकावी ? अगदी डिस्क पार्टिशन कस कराव इतकीही माहिती नसते . 

आज पाहिल्यासारखे  लॅपटॉप मेंटेन करण एव्हढ अवघड राहिलेले नाहीत पण   महागडा लॅपटॉप घेतला आहे म्हणून त्याला इतकं जपलं जात कि त्याच्यावर काही प्रयोग केले जातच नाहीत . अगदी त्याच्या कि बोर्डवरच कव्हर तीन वर्षानंतर पण तसच असत म्हणजे लॅपटॉपचा वापर जास्त केला जात नाही. 

२०१० पूर्वी मुलांच्या  लॅपटॉप मध्ये सोफ्टवेअर , पिक्चर आणि टेक्निकल पुस्तकांचा भरणा  असायचा   . त्यानंतर हळूहळू सोफ्टवेअर आणि टेक्निकल  पुस्तके कमी होउ लागली आणि aptitude परीक्षा आणि मोटिव्हेशनल पुस्तकांची संख्या वाढू लागली , हार्ड डिस्कचा साठवणूक क्षमता वाढू लागलेने  पिक्चर हि  वाढू लागले. २०१५ नंतर टेक्निकल पुस्तके कमी झाली आणि यु ट्युब च्या व्हिडीओ, ओ टी टी वरच्या वेब सेरीज  आणि त्याचबरोबर गेम्सचा भरणा वाढू लागला .लॅपटॉप हे शिकण्याच साधन कमी झालं आणि  मनोरंजनाच साधन झालं. 

आज जर पाहिलं (बघा जरा सहज सर्वे करून ) तर बऱ्यापैकी लॅपटॉपवर गेमिंगची सोफ्तवेअर  आणि वेब सेरीज यांचाच भरणा दिसतो. अलीकडे लॅपटॉप हा शिकण्यासाठी कमी आणि गेमिंग साठीच घेण्याच प्रमाण वाढलं आहे .

कोडिंग च्या नावाखाली गेमिंगचे  लॅपटॉप घेण्यामध्ये पालकांच्या पैशाची नासाडी होत चालली आहे .

तुमची प्रतिक्रिया अवश्य मांडा.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे

No comments:

Post a Comment