Tuesday, September 29, 2015

देवा गणराया......................

 देवा गणराया , तू आल्यापासुन एक गोष्ट सांगायची होती पण सांगायचा धीरच झाला नाही. आज आमच्या राज्यावर दुष्काळाने थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतात चिमणीला प्यायला पाणी नाही. जमिनीला पडलेल्या भेगा पाहुन  काळीज पीळवटायला लागलय. वाटल आता माझ्या मागणीपेक्ष्या त्त्यांच्यावर तुझी कृपा होणे गरजेचे आहे. पण कालचाच facebook वरचा प्रसंग पाहिला आणि आता राहवत नाही म्हणुन हे सांगतो.
हे विघ्नहर्त्या, आज जी अवस्था शेतीची आहे त्याच्याहि पेक्षा भयाण  अवस्था शिक्षणाची आहे. एक पिक नाही पिकल तर वर्ष वाया जात  पण  आज जो शिक्षणाचा खेळखंडोबा चालला आहे त्याची त्याला जर वेळीच आवर नाही घातला तर आमच्या किती  पिढ्या वाया जातील याची कल्पनाच करवत नाही.
हे लंबोदरा, अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या पिल्लाला मदत करण्याची मनाई, त्या पिल्लाच्या आईलाही निसर्गानं केलेली आहे, यात निसर्गाची निष्ठुरता नसते तर त्या पिलाला संकटाला सामना करणेची ताकद आणि अनुभव देणे हा असतो. संघर्ष हेच जीवन आहे याचा प्रथम प्रात्यक्षिक अनुभव इतक्या लहान वयात घेउनच ते जगात येत. जर त्या पिलाच्या आईने त्याचा कळवला येउन  निसर्गाला धुडकावल तर......
पण निसर्गाचा पायाभूत हा नियम आमच्या तथाकथित उच्च विद्याविभुषित शिक्षण शास्त्रज्ञाना    समजत नाही, त्यांना त्यात निष्ठुरता वाटते. मुलांना रागवु नका,काही बोलू नका, त्यांना  जास्त अभ्यास देऊ नका. त्यांच्या कलानं घ्या. त्यांना  परीक्षा नको,त्यांना गृहपाठ नको. असे अनेक मत आजचे शिक्षण शास्त्रज्ञ करत आहेत. याचा खूप मोठा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत आहे.
हे विनायका , पीक लावलेवर योग्यवेळी त्यामध्ये विरळणी हि करावीच लागते आणि विरळणी करताना निर्कृष्ट रोप हे काढुनच टाकाव लागत  त्यामागे त्याचा उद्देश पीक चांगल याव हा असतो. उपलब्ध जागा ,खाद्य या गोष्टी उरलेल्या पीकाला व्यवस्थित मिळावी हा असतो. त्याप्रमाणे नापास न करता सरसकट सर्वाना पास करत नेल्यामुळे आज एक अंधाधुंदी माजली आहे . ज्यावर कुणालाही बोलायला वेळ नाही आणि बोलायची इच्छा हि नाही. याचा खूप मोठा परिणाम उद्या आमच्या देशावर होणार आहे. नापास होण हि सुधारणेसाठी असणारी संधी आहे , स्वत:ची कुवत जाणुन घेउन वेळीच दुसरा मार्ग पकडण्यासाठी मिळालेली सूचना आहे हे लक्ष्यात न घेता आम्ही नापास हि शिवी करून टाकली,एक कलंक करून टाकला आणि त्या कलंकापासून दूर पळावे यासाठी अनेक बरेवाईट मार्ग अवलंबले.
हे एकदंता, जर पाश्चात्य शिक्षण पद्धती चांगली असती तर आज त्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारताकडे भिकाऱ्यासारखे बघावे लागले नसते. हे लोकांना कळत कसे नाही. त्यांनी डमरू हालवायचा आणि आम्ही मग माकडासारख्या उड्या मारणार, मग तेच आम्हाला certificate देणार मग आम्ही ते मिरवणार ...... बर हा डमरू त्यांनी हलवावा म्हणुन आम्हीच त्यांना गाऱ्हाणे घालणार,त्यासाठी वर पैसे देणार आणि त्यांच्या  अनंत उपकारांच्या ओझ्याखाली स्वत: ला गाडून घेणार . हे कधी आम्हाला कळणार? . आजच्या जगातील चालू असणारा याहूनी मोठा आणि हास्यास्पद विनोद काय? लाज वाटते देवा आमची बुद्धी कुठे गहाण पडली आहे?
हे सुखकर्त्या, तसं पाहिलं तर शेतकरी आणि शिक्षक एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक पोटाची भूक भागवतो आणि दुसरा मनाची . तंत्रज्ञानाच्या भाषेतच सांगायचं  म्हणजे एक हार्डवेअरची काळजी घेतो  आणि दुसरा सोफ्टवेअरची. जे नियम शेतीला लागु होतात तेच शिक्षणाला.
नवीन प्रकारची बियाण मार्केटला आली आहेत त्याचा उपयोग करून पिक एकदाच घेता येत, पिक चांगल येत पैसाही चांगला मिळतो पण त्या पिकाचा उपयोग बीजासाठी होत नाही , ती बीज नपुसंक असतात. त्याप्रमाणेच घाऊक बाजार पेठेसाठी तयार केलेली  नपुसंक बुद्धिमत्ता असणारी एक पिढीच या देशात निर्माण झाली आहे. यांना स्वत:ची बुद्धिमत्ता हि नाहीच . आपल मत काय आहे हे न सांगता पाश्चात्य देशातला अमुक अमुक काय सांगतो त्यावर यांची बुद्धिमत्ता ठरते .
ज्याप्रमाणे नगदी पिकांच्या नादाला लागुन शेतीच वाटोळ झालंय त्याचप्रमाणे पैशाच्या नादाला लागुन त्याप्रमाणे अभ्यासक्रम तयार करून शिक्षण क्षेत्राचं वाटोळ झाल आहे.
हे दुख:हर्त्या, ज्याप्रमाणे आज मुलांना  शेतकरी व्हायला नको आहे ,त्याप्रमाणे उद्योजक व्हायला नको आहे.
त्यामुळे आज लाख निर्माण होतात  पण लाखाचे पोशिंदे तयार होत नाहीत.  विद्यार्थी किती   उद्योजक झाले हे पाहण्याऐवजी  किती नोकर   झाले याची  टिमकी  वाजवण्यातच धन्यता मानली जाते. परिणामी बेकारांच्या झुंडीच्या झुंडी आज फिरत आहेत.
आज दुष्काळामुळ शेतकरी आत्महत्या करतात. उद्या भरमसाठ बेकारी वाढलेवर जी अवस्था होईल त्याची कल्पनाही सहन करता येत नाही. इथे तरुण बेकार आत्महत्या करणार नाहीत तर तलवारी घेउन रस्त्यावर फिरतील. चार घासासाठी मुडदे पडतील आणि जर आताच शिक्षण पद्धतीवर विचार नाही केला तर येत्या काही वर्षातच हे चित्र दिसेल.
मुलांच्या कौशल्याचा विकास व्हावा , त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावा यासाठी प्रात्यक्षिकावर भर द्यावयाचे सोडून इ – लर्निगचे नवीन खूळ काढले आहे. नवनवीन अभ्यासक्रम आणि सरतीर्फिकेटचा भडीमार झाला आहे. पायाभुत शिक्षणाचा कुणी विचारच करत नाही. सारे प्रयोग चालले आहेत. प्रयोग , प्रयोग आणि प्रयोग,
आमच्या देशातील बुद्धिमत्तेचा वापर देशासाठी न करता त्यांना दुसऱ्या देशातील उद्योजकाची चाकरी करायला पाठवायचे आणि त्यांच्या मालकांना आपल्या देशात व्यवसाय करायला बोलवायचे मला वाटते हा जो मोठा विनोद आहे तो तुला पुढच्या वर्षीपर्यंत हसायला पुरेसा आहे.
देवा परमेश्वरा तसं सांगायचं खूप आहे खुप काही लिहिले आहे पण त्यातील काही मुद्दे मी तुला सांगत आहे.,

हे बुद्धीच्या देवा, शेतकऱ्यावर तर तू कृपा करच पण थोडी कृपा आमच्या शिक्षण क्षेत्रावरहि कर हि विनंती.