Friday, November 30, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २४ )


***  शिकनं हार्ड करणार सॉफ्ट स्कील ट्रेनिंग  ***
आजकाल अभियांत्रिकीच्या प्रत्येक महाविद्यालयात या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगच्या भुताने धुमाकूळ माजवला आहे. प्रत्येक महाविद्यालयात आजकाल हा परवलीचा शब्द झाला आहे . देशाच्या भावी अभियंत्याच्या अंगी कौशल्यनिर्मिती करणे ऐवजी त्याला झकपक राहणे आणि फाडफाड इंग्लिश बोलणे याला खूपच महत्व आल आहे. मान्य आहे या गोष्टीही महत्वाच्या आहेत पण त्याला किती महत्व द्याव यालाही मर्यादा आहेत. बऱ्याच ठिकाणी तर प्रात्यक्षीकापेक्षाहि सॉफ्ट स्कील  ट्रेनिंगच्या तासाला जास्त महत्व आल आहे.
या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या चाचण्या , वेगवेगळी प्रशिक्षणे विद्यार्थ्यांच्या माथी मारली जात आहेत. काही ठिकाणी या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगच्या नावावर पैसे उकळले जात आहेत. शहरी मुलांची मने या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगसाठी थोडीफार तयार झालेली असतात पण जी ग्रामीण मुले असतात त्यांची खूपच कुचंबणा होते. कित्यकांचा तर या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगच्या भडीमारामुळे आत्मविश्वास कमी होतो तर काहींच्या मनात आयुष्यभरासाठीचा न्यूनगंड निर्माण होत आहे.
विद्यार्थ्यांना विषय समजला तर त्यांची त्या विषयातील गोडी वाढेल. परिणामी त्यांना त्या विषयाच्या प्रात्यक्षिकामध्ये रुची वाढेल . ते वेगवेगळे प्रयोग करतील , त्यामुळे त्यांचे कौशल्यात वाढ होईल आणि जर  विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढले तर आपोआपच त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांच्या देहबोलीत आपोआपच बदल होईल. हे साध सोप सूत्र लक्षात घेतले पाहिजे.


अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला हार्ड स्कील आल पाहिजे म्हणजे त्याला कामाच ज्ञान पाहिजे पण ते न पाहता त्याच सॉफ्ट स्कील पाहणारे एच. आर.  म्हणजे खर तर धन्य मानलं पाहिजे  अर्थात त्यांनाही अभियांत्रिकीचा विद्यार्थी हा अभियांत्रिकी कामासाठी नको तर हाय टेक कारकुनी कामासाठी  पाहिजे असतो . त्यामुळे कारकून निवडीचे निकष इथे लागले आहेत हेच कुणाच्या लक्षात येत नाही. Aptitude test म्हणजे नैसर्गिक कल चाचणी होय आणि या चाचण्या पार करणेसाठी सुद्धा प्रशिक्षण देणारे बाजारात आले आहेत. अशान नैसर्गिक कल बदलणार आहे का ?  देहबोली हि प्रत्येक देशाप्रमाणे बदलते. ती त्या देशाची संस्कृतीवर अवलंबून असते आणि काहीही येत नसताना जाणूनबुजून देहबोलीच्या सहाय्याने आव आणायला लावणे म्हणजे शुद्ध फसवणूक नाही का? ज्या ग्रुप डिस्कशन चा एव्हडा उदोउदो केला जातो ,आपल्या मुलांना काम करायला जायचं आहे कि तोंड पाटीलकी करायला ? खरंच कशाचा कशाला ताळमेळ नाही.
आजकाल हसॉफ्ट स्कील ट्रेनिंगची एक मोठी बाजारपेठच उदयास आलेली आहे.दर वर्षी बाजारात वेगवेगळे हे सॉफ्टस्कील गुरु नवनवीन फंडे बाजारात आणतात. ठीक आहे व्यवस्थापना  च्या विद्यार्थ्यांना हे आवश्यक आहे आणि त्यांचेसाठी हे उत्तमच आहे पण अभियान्त्रिकीच्या विद्यार्थ्यांनाहीयाची थोडीफार गरज आहे पण याचा अतिरेक हा टाळला पाहिजे . यामध्ये पैसे तर वाया जात आहेच पण त्याबरोबर विद्यार्थ्यांचा अनमोल वेळही.
अभियंत्याला यंत्राशी खेळ करायला शिकवायचं सोडून हि पोपटपंची आणि जगण मेंगळट करायला शिकवणाऱ्या या सॉफ्ट ट्रेनिंगच खूळ कधी निघणार आहे हे देव जाणे ?

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.com या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .

चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०


Sunday, November 25, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २३ )


*** ग्रेडिंग सिस्टीम ( श्रेणी पद्धत ): अभियांत्रिकी शिक्षणाची कमी होणारी संवेदनशीलता ***

अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीमध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धतीतील बऱ्याच प्रथा आलेल्या आहेत त्या मधीलच एक प्रथा ( कि कुप्रथा) आली आहे त्यातीलच एक म्हणजे ग्रेडिंग सिस्टीम. रुपयाच जस अवमूल्यन होत तस अभियांत्रिकी शिक्षणाच अवमूल्यन करणारी एक नवीन पद्धत . अभियांत्रिकी शिक्षणात योग्य मापनाचे धडे हे प्रत्येक शाखेला दिलेले असतात. मापनामध्ये मापाची संवेदनशीलतेच महत्व प्रत्येक शाखेला शिकवलेलं असत. जितक अचूक माप , तितकं अचूक मुल्यांकन आणि मापाची  अचूकता  हि  संवेदनशीलतेवर असते . हे पायभूत ज्ञान ज्यांना कळल त्यांना ग्रेडिंग सिस्टीममधला फोलपणा नक्कीच दिसून येईल.
ग्रेडिंग पद्धतीमध्ये मार्कांचे पट्टे केले जातात आणि त्या पट्ट्याना  ग्रेड दिली जाते . विद्यार्थ्याला मिळालेले मार्कस हे कुठल्या पट्ट्यात आहेत हे पाहिलं जात आणि त्यानुसार  त्याची ग्रेड ठरवली जाते. सर्वसाधारणपणे दहा-दहा मार्कांच्या पट्ट्यात ग्रेड विभागली जाते. या ग्रेड सिस्टमचा फायदा म्हणजे  आकड्यामध्ये मार्कस दिसत नाहीत आणि ग्रेडिंग लिहिल्यामुळे अंदाज येत नाही सगळ आल इज वेल दिसत. पण न दिसणारा तोटा म्हणजे एक्कावन्न मार्क पडलेला आणि साठ मार्क पडलेला एकाच ग्रेड मध्ये येतो.
पूर्वी पेपर चेक करत असताना बऱ्याच ठिकाणी परीक्षक अर्धा मार्क देत असत . हा अर्धा मार्क म्हणजे मूल्यमापन पद्धतीच्या संवेदनशीलतेचा  निदर्शक होता. अर्थात याला जोडीदार नाही मिळाला तर शेवटी तो एका मार्कात रुपांतरीत केला जायचा. मार्क द्यायच्या या  कंजूसपणाचे द्रुष्टीक्षेपात न येणारे दूरगामी फायदे कधी लक्षात घेतले नाहीत. जस इमारत बांधत असताना एक एक मिमी मध्ये माप मोजल तर ती इमारत कशी सुबक बनेल  आणि जर मापे फुटाच्या ढोबळ पट्टीमध्ये ज्यावर इंचाची  मापेच लिहिली नाहीत अशा पट्टीने मोजल तर कशी बनेल याचा ज्याला अंदाज करता येईल त्याला या ग्रेडिंग पद्धतीचा तोटा नक्कीच लक्षात येईल.
पाश्यात्य शिक्षण पद्धती मध्ये ग्रेडिंग देत असताना त्यांनी जो अभ्यासक्रम बनवला आहे त्यामध्ये खूपच अभ्यास करायला लागतो त्याचबरोबर मार्क्स देण्यातला काटेकोरपणा आणि अतिशय महत्वाच म्हणजे प्रामाणीकपणा त्यांनी जपला आहे या उलट गेल्या दोन सत्राचे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून पेपर लिहिणारी  आपली पोर आणि सढळ हातानी मार्क्स उधळणारे परीक्षक. या दोनातील फरक सांगायचा म्हणजे त्याचं काम टनात चालत त्यामुळे त्यांना ग्रेडिंग सिस्टम चालते पण आपल्याकडे काम मणात चालत त्यामुळे हि ग्रेडिंगची पद्धत फायद्याची नाही .
एक मात्र खर , ग्रेडिंग पद्धतीचा आणि दगडाला शेंदूर पासून देव करण्याच्या आपल्या भारतीय मानसिकतेचा खूपच जवळचा संबंध आहे .....जरा मेंदूला ताण द्या नक्कीच कळेल.

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २२ )


***  संशोधन - फुकटचे लुटा धन   ***


अभियांत्रिकी शिक्षणामध्ये संशोधन हा एक कळीचा मुद्दा आहे.  प्रत्येक सत्रामध्ये एक नोटीस निघते त्यामध्ये शिक्षकांना सांगितले जाते कि तुम्ही एक तरी पेपर तुमचा प्रकाशित करा किंवा तुमचे संशोधन साठीचे प्रपोजल तयार करा . या संशोधनाच्या जबरदस्तीची आधी चीड यायची पण आता एक मोठा विनोदच वाटतो . संशोधन हे कधीही जबरदस्तीने किंवा आमिष देउन करता येत नाही त्याला तसा पिंड असावा लागतो . सगळ्याच शिक्षकांना संशोधन जमेल असे नाही किंवा एखादया शिक्षकांना खूपच चांगल शिकवता येत म्हणून त्यांना संशोधन करता येईलच अस नाही.  मुळात एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून संशोधनाची अट ठेवण हेच चुकीच आहे, कारण त्यासाठी विद्यापी आहेत . अभियांत्रिकी महाविद्यालयाची मांडणी हि अतिकुशल मनुष्यबळ निर्माण करणेसाठी झालेली आहे. त्यामुळे तेथील संशोधनासाठी लागणाऱ्या  साधनसामग्री उपलब्धतेवर मर्यादा येतात . तिथून जास्तीतजास्त एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनाची निर्मितीची अपेक्षा ठेवणे काही गैर नाही. पण संशोधन म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली .
मुळात संशोधनासाठी शिक्षकावर जबरदस्ती करण्यापूर्वी संशोधन करण्यासाठीच लागणारे प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची क्षमता संस्थेमध्ये आहे का? हे पाहिलं पाहिजे . बऱ्याच संस्थेत नामांकित जर्नल उपलब्ध नसतात , उपकरणे तर सांगायला नको पदवीच्या अभ्यासक्रमासाठी लागणारी उपकरणे ती सुद्धा माफक म्हणजे जेव्हडी लागतील तेव्हडीच कार्य करणारी  असतात . इंटरनेट वापरायच तर बऱ्याच साईट या बंद केलेल्या असतात . नेटचा स्पीड हा कासवाला लाजवेल असा असतो. लायब्ररी मध्ये संदर्भ ग्रंथ हे अभ्यासक्रमासाठी लागणारेच असतात . मग अशा मोडक्या तलवारी देउन संशोधनाच्या महासंग्रामासाठी शिक्षकाना पाठवणे हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.
बऱ्याच ठिकाणी संशोधनासाठी प्रपोझल पाठवताना पी.एच.डी. पाहिजे अशी अट असते . मग जबरदस्तीने एखाद्या जुनियरला को. पी. आय. करून त्याच्या बोकांडी ते काम टाकल जात. अनेक ठिकाणी  पी.आय.हे व्यवस्थापनात अडकून पडलेले असतात त्यामुळे ते काहीच काम करत नाहीत  मग या को . पी. आय . ची अवस्था खूपच वाईट होते . काही वेळा शिक्षक उगाच कटकट नको म्हणून कसतरी कुठूनतरी कॉपी पेस्ट करुनं प्रपोजल पाठवतात अर्थात ते सिलेक्ट होणार नाही अशी त्यांची खात्री असते  आणि अस प्रपोजल जेव्हा त्यांच्या दुर्दैवाने निवडले जाते मग का्य मजा सांगायची  महाराजा... एखादी छोटी कथाच होइल त्यावर ....
बर तो रिसर्च पूर्ण करून तर काय फायदा फक्त अप्रयालवर दोनचार मार्क मिळतात . पूर्ण केलेबद्दल एक पगारवाढ पण मिळत नाही . मिळालेल्या पैशात संस्थेसाठी उपकरणे खरेदी होतात , लायब्ररीसाठी पुस्तके खरेदी होतात , रिसर्च बाबतीत बोम्बाबोम्बच असते कारण बर्याचदा मिळालेले पैसे पुरत नाहीत , काहिवेला संस्था पैसे काढून घेते/ वेळेत देत नाही .  मग खोट्या बिलासाठी धावाधाव होते . काही पी. आय. मात्र बिलंदर असतात  बी.इ. किंवा एम.. च्या विद्यार्थ्याला पैसे घालायला लावुन त्यांचेकडून प्रोजेक्ट करून घेतात आणि पैसे स्वत: लाटतात.
कुठल्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात जे रिसर्च प्रोजेक्ट झाले आहेत कधी वेळ मिळाला तर अवश्य बघा . त्याच मॉडल आहे का ते बघा . ते चालू आहे का ते बघा आणि त्या मॉडेलचा काय उपयोग होतो ते पहा ते वापरात आहे का ते पहा आणि खरच त्या संशोधन निधीचा वापर करुन काहीतरी संशोधन झाल आहे की फ़क्त काही कागद तयार झाली आहेत का ते पहा ... तुमच्या पदरी  फ़क्त निराशाच येइल .

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या  dearengineers.blogspot.com या ब्लॉगला भेट द्या

शेअर करा , विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Monday, November 19, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २१ )


***  प्रशिक्षण कार्यक्रमाची ऐशीतैशी  ***

शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. त्या क्षेत्रात काम करत असणाऱ्या तज्ञ लोकांची तसेच इतर इच्छुक लोकांची  ओळख व्हावी हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश असतो. बरेच कार्यक्रम विद्यापीठे किंवा वेगेवेगळ्या  शिक्षण समित्या, सरकारी संस्था  प्रायोजित करतात . अगदी एक दिवसापासून एक महिन्याचे प्रशिक्षण देशातील विविध महाविद्यालयात सुरूच असतात. प्रशिक्षण कार्यक्रम घेतले कि naac किंवा nba मध्ये मार्क्स मिळतात त्यामुळे बरेच महाविद्यालये हि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात ,त्यांना हे करणे निकडीच असत.
पण प्रत्यक्षात  अतिशय कमी शिक्षक या कार्यक्रमाला उत्सुक असतात. त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शिक्षकं मिळत नाहीत . जर प्रोग्राम ए.आंय.सी.टी.इ. किंवा टी. क्यूप खाली नसेल तर विचारायलाच नको  अक्षरशः बाबा पुता करून रजिस्ट्रेशन मिळवावी लागतात किंवा मग बी.ई. च्या किंवा एम.ई च्या विद्यार्थ्याना बकरे बनवावे लागते .बऱ्याच वेळेला प्रशिक्षण कार्यक्रमाचे निमित्ताने शिक्षक सुट्ट्या घेत असतात. बरीच लोकं आपल्या गावापासून दूर नोकरी करत असतात. जर त्यांचे गावी किंवा गावाच्या आसपास असणाऱ्या महाविद्यालयात जर प्रशिक्षण कार्यक्रम असेल तर अगदी ओळख काढून, सेटिंग लावून नाव नोंदणी केली जाते . एव्हढं करुनहि काही महाभाग पूर्ण कार्यक्रम अटेंड करतच नाहीत. फक्त सकाळी जायचं सही करायची नाश्ता खायचा परत जायचं आणि मग डायरेक्ट जेवायलाच यायचं किंवा दुसऱ्या दिवशी परत तोंड दाखवायला जायचं . आणि ओळख असेल तर काय जायची पण गरज नाही सर्टिफिकेट अगदी  घरपोच मिळत . काही ठिकाणी प्रत्येक मोड्यूलला हजेरी घेतली जाते पण तिथेही एखादा सही करणेसाठीहि तयार केला जातो . अशी अवस्था आहे प्रशिक्षण कार्यक्रमाची.
याला अपवाद काही कार्यक्रम तर असे असतात कि शिक्षकांनी या कार्यक्रमात प्रशिक्षण  घेतले तर त्यासाठी वेगळी वेतनवाढ वगैरेसारखी आमिष पण असतात अर्थात या कार्यक्रमाना मिळणारा प्रतिसाद चांगला असतो.

यात शिक्षकांची पण जास्त चूक आहे असं वाटत नाही. वेगवेगळे आणलेले तज्ञ त्यांच्या विषयात विद्वान असतात पण त्यांच्या सर्वांच्या विषयात सुसूत्रता नसते . बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या तोंडून  तेच तेच  ऐकायला लागते . प्रात्यक्षिकांना फाटा दिलेला असतो . पॉवर पोइंट प्रेसेंटेशनवर बडबड चालु असते. अगदी चार वर्षांनी जर तो तज्ञ बोलावला तरी तीच पी.पी.टी. आणि तेच एकसुरी व्याख्यान ....वैताग येतो. बर त्यांनी जर प्रात्यक्षिक घ्यायची म्हटलं तर त्यामानाने पैसे मंजूर होत नाहीत त्यामुळे त्यानाही ते शक्य नसते. लागणारी सोफ्टवेअर पायरेटेड असतात , व्यवस्थित चालत नाहीत असे बरेच प्रश्न आहेत . काही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तर एकमेकाशी संबंध नसलेले विषय कोंबून कोंबून भरलेले असतात. अगदी एक ना धड भाराभर चिंध्या अस कार्यक्रमाच स्वरूप असत.  त्यामुळे कुठल्याही विषयाला खोलपर्यंत हात घालता येत नाही . विषयाला सुरुवात होते आणि वेळ संपतो. गेल्या दहा पंधरा वर्षात नवीन दमाचे आणि नवीन विषयावर बोलणारे तज्ञ तयार झालेलेच नाहीत आणि तयार होउ पण दिलेले नाही त्यामुळे तज्ञ लोकांची वाणवा निर्माण झाली आहे. मिळणारे मानधन हे तुटपुंजे आहे त्यामुळे इंडस्ट्रीतील अनुभवी  लोक जास्त तयार नसतात.   
शिक्षकाना प्रशिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे.बदलत्या काळानुसार झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञानाची त्यांना माहिती होणे हे अतिशय गरजेचे आहे . शिक्षक होणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्यभरासाठी विद्यार्थी बनण्याचे  घेतेलेले व्रत असते. पण आजकाल बरेच  शिक्षक विसरले, प्राचार्यही विसरले आणि संस्थाहि विसरल्या. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर बंधने आली. त्यामुळे प्रशिक्षणासाठी शिक्षक मिळेनात. कॉलेज परवानगी देत नाही आणि स्वत:हून प्रशिक्षणासाठी पैसे भरायची इच्छा नाही आणि काही ठिकाणी ऐपतही नाही अशी अवस्था झाली.
आजकाल तर हि प्रशिक्षणे म्हणजे कागदी घोडी झाली आहेत आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट विकण्याचा धंदा. आणि यामुळेच प्रशिक्षणाचा दर्जाही खालावला आहे . हि सर्टिफिकेटस म्हणजे केवळ फाईलला कागद लावण्याचा नुसता उपद्याप झाला आहे.


यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या  dearengineers.blogspot.com या ब्लॉगला भेट द्या


शेअर करा , विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Friday, November 16, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २० )



***  प्लेसमेंटचा भूल भुलैया  ***

मागे एकदा दहा वर्षापूर्वी माझा एक मित्र HR होता ,आताही आहे त्याला मी एक प्रश्न विचारला कि काय रे बाबा तुम्ही एखाद्या आय टी कंपनीसाठी विद्यार्थी निवडता तेव्हा साठ टक्के पेक्षा जास्त असे का निवडता ?. म्हणजे साठ टक्केपेक्षा कमी मार्क असणारी मुल लायक नाहीत अस म्हणायचं आहे का तुला? उलट या मुलापेक्षा मी असे कितीतरी विद्यार्थी पाहतो ज्यांना मार्क्स नाहीत पण त्यांचेमध्ये जास्त संशोधकता , नवनिर्मिती करणेची क्षमता जास्त असते मग त्यांना का घेत नाही?
 त्यावेळी त्याने मला उत्तर दिले कि, हे बघा सर, आम्हाला त्यांचे मार्कांशी काय घेणे देणे नसते . ज्या अर्थी ती फर्स्ट क्लास मिळवतात किंवा डीस्टिंगशन मिळवतात याचा अर्थ त्यांची एका जागेला बसुन काम करायची क्षमता जास्त आहे , त्याच बरोबर ती जास्त विचार न करता आज्ञेनुसार मुकाट काम करू शकतात , दिलेलं काम ती वेळेत करतील आणि त्यासाठी रात्र दिवस ते एक करतील हेच आम्ही बघतो. त्यांना चांगला पगार द्या काम खलास . याउलट  गोष्ट या कमी मार्क्सवाल्याची हे इतर गोष्टीत बरेच पुढे असतील पण हि जास्तच डोकं लावतात ,यांच्यात शिस्तशीरपणा कमी असतो म्हणून यांना टर्म वर्क आणि प्रॅक्तीकलला मार्क्स कमी मिळतात आणि निव्वळ थेअरीच्या मार्कावर फर्स्ट क्लास मिळत नाही . त्यामुळे आम्हाला लगेच कळत कि आमच्यासाठी लायक आहे कि नाही . बाकी आम्हाला त्याच्या  विषयाच्या ज्ञानाबद्दल काही घेणदेण नसत. मी अवाक् झालो.
परवा परत मला माझ्या एच आर  मित्राशी बोलण्याचा संबध आला त्याला मी विचारलं काय सध्या कस काय चालू आहे. तो म्हणाला सध्या कंडीशन जरा वाईट आहे. आम्हाला मुलं निवडताना अडचण येते कारण आता मुलांची गुणवत्ता खूपच ढासळत चालली आहे . मग तुम्ही काय करता ? माझा भाबडा प्रश्न . सोपं आहे, आता काय करायचं ज्यांची लायकी नाही अशा मुलांना निवडायचं मग काय यांना माहिती असते कि हा जॉब गेला कि त्यांना कुणी विचारणार नाही त्यामुळे ती जीव तोडून काम करतात . कारण आम्हाला त्यांना ते जे शिकलेत याविषयी काहीही घेण देण नसत. फक्त यांना काम अस द्याव लागत ज्यातून त्यांना डोकं वर करायला वेळ मिळणार नाही . झालं डोक्यात शिट्ट्या ...म्हणजे हे असं झाल कि काही माणस शेअर मार्केट मध्ये मार्केट वर जाताना पण पैसे काढतात आणि खाली जाताना पण . पडलं तरी नाक वर.
आता बघा, वेगवेगळे संस्थेत अनेक मुलं प्लेस होतात पण ते जिथ प्लेस होतात त्यांना तेच काम मिळत का जे ते शिकले?  तुम्हाला आश्चर्याची गोष्ट दिसेल कि  आय टीवाला आयटीत ,कॉम्पुटरवाला आय टीत, इलेक्ट्रॉनिक्सवाला आयटीत, इलेक्ट्रिकलवाला आयटीत , मेकनिकलवाला आयटीत आता तर सिविलवाले पण आयटीत जायची स्वप्न पाहतात आणि जायला सुरुवात झाली आहे. मग काय झाल त्यांच्या शिक्षणाचं ? कशाला एव्हढा वेळ आणि पैसा  घालवला. यामुळे आपल्या समाजाच आणि पर्यायानं देशाच पण खुप नुकसान होत आहे. आम्हाला वाटत कि पोर परदेशात जाऊन आम्हाला परदेशी चलन देतात पण जर तुम्ही तुलना केली कि त्या चलनाचा आम्ही खूपच मोठा मोबदला देत आहोत.  आमच्या पिढीचा बौद्धिक ऱ्हास होत आहे . मार्गदर्शन करणारी मागची अभ्यासू पीढी  संपत चालली आहे. मधली पिढीची अवस्था वर सांगितलेप्रमाणे . आता पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शकच नाहीत त्यांचे परिणाम आम्ही पहात आहेच.  
आहो, आम्ही आमची वासर फोडली  आणि अजूनही फोडत आहोत हो बैल करण्यासाठी ..... कायमस्वरूपी वांझोटी केली आणि करत आहोत  आणि वर टिर्या बडवून कौतुक करून सांगतो आहे पण वंश वाढवायला वळू लागतात. आता बसलोय दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघत.

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या  dearengineers.blogspot.com या ब्लॉगला भेट द्या


शेअर करा , विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग -19)

चहाविक्या अभियांत्रिकीचा विद्यार्थी ,चहा विकणारा शिक्षक आणि याच्यापुढे जावून पगार वेळेवर मिळत नाही म्हणून आंदोलन केलं म्हणून संस्थेमधून काढून टाकल्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या पदव्या जाळणारा अभियांत्रिकीचा शिक्षक ...... येत्या काही काळात अजुन काय बघायला मिळणार याचा काही अंदाज नाही.   काय दिवस आले हे  अभियांत्रिकी शिक्षणावर ? काही काळापूर्वी सरदारजीवर विनोद ऐकायला मिळायचे तसेच आता अभियंत्यावर ऐकायला मिळतील आणि तशी सुरुवातही झाली आहे .
सम्राज्ञीन काही झाल तरी सिंहासन सोडायचं नसत ती जर खाली उतरून आली कि लोक तिच्या पदराला हात  घालायला कमी करत नाहीत . गुलबकावलीची  फुलं जर गटाराच्या कडेन उगवायला सुरुवात झाली तर जनावरे सुद्धा त्याला विचारत नाहीत. अगदी तशीच अवस्था अभियान्त्रीकीवर शिक्षण क्षेत्रावार आली आहे. सोन्याचा घास मातीमोल भावात मिळाल्यावर भिकारीपण माजले आणि मग सुरु झाला ओरबाडून घ्यायचा खेळ ... पोट भरलं झाल कि कचऱ्यात टाका .... कशाला कशाला मेळ नाही . दुष्काळात एरंडाला पण भाव येतो तसा वाढप्याना पण भाव आला ... मागणी वाढली मग भेसळ सुरु झाली ...हळूहळू  बाळ कुपोषित व्हायला लागली .. मग त्यांना कुणी विचारेना ...त्यांच्यात आता झुंजायचं बळ उरेना ... मग आता काय  ? जीण पोसलं तिच्याच पदराला हात.... अरे कुठ तरी थांबा आता ... ज्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रावर  आपल्या देशाच भवितव्य आहे त्याचा  असा अपमान आणि अवहेलना नका करू . तुम्ही भाळला खोट्या स्वप्नांना , तुम्ही फसला खोट्या झगमटाला . अरे त्या पदवीच्या कागदाला  जीवनसागराची नौका बनवायच्याऐवजी मनामध्ये अभियंता जागवला असता तर हि वेळच आली नसती हा सागर चालत पार केला असता . पण अभियंता जागवण  खरंच एव्हड सोपं आहे का ? राजानो पदवी मिळाली म्हणून अभियंता होत नसत त्यासाठी हवी घोर तपश्चर्या. आणि अभियंता कधीही हारत नसतो...तो कधीही थकत नसतो. कितीही संकटे येउ द्या तो रडत नसतो.
बाहेर पडा अभियंत्याविषयीच्या भ्रामक कल्पनामधून , परत जाणून घ्या  अभियंता कुणाला म्हणायचं ? त्याच कर्म काय आहे ? आणि त्याची कर्तव्ये काय आहेत ?
अभियंता निर्मिती करतो......तो ब्राम्हस्वरूप आहे .
अभियंता पालन करतो .....तो विष्णू स्वरूप आहे .
अभियंता पुन: निर्मितीसाठी नाश करतो ...तो शिवस्वरूप आहे ..
नित्य नवीन आव्हानांचा सामना करणे हेच त्याचे कर्म आहे आणि जगाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणे हेच त्याचे कर्म आहे .
वाचा ...परत वाचा , मनाला विचार तुम्ही खरच अभियंता आहात काय ?
मग आतापर्यंत शिकला ते काय होत ?
.
.
मी अभियंता आहे याचा मला अभिमान आहे.
विक्रमादित्य 

Thursday, November 15, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग १७ )

*** थेअरीकडे लक्ष, प्रात्यक्षिकाकडे दुर्लक्ष ***
प्रात्यक्षिकं हा अभियांत्रीकी शिक्षणाचा श्वास आहे. विद्यार्थ्याला जे पुस्तकी ज्ञान शिकवले जाते त्याचा स्वानुभव मिळावा यासाठी प्रात्यक्षिकांना अभियांत्रिकी शिक्षणात खूप महत्व आहे. प्रात्यक्षिक केल्यावर त्याची माहिती ,निरीक्षण आणि अनुमान लिहीणेसाठी जर्नल ( याला प्रयोगवही म्हणु) असतात. या प्रात्यक्षिकावर परीक्षाही घेतली जाते .प्रत्येक सत्रात किमान तीन,चार विषयांना प्रात्यक्षिक परीक्षा असतात .
पण आजकाल या अतिशय महत्वाच्या अशा प्रात्यक्षिकाविषयी अवस्था काय आहे? बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनाच प्रात्यक्षिक करताना येत नाही त्यामुळे बाजारात कमीत कमी डोक लावून प्रात्यक्षिक करण्याचे रेडीमेड किट्स करणारे तयार झालेले आहेत आणि अशा किट्सला पसंती मिळू लागली आहे . याबरोबरच काही विद्यापीठात तर ती किट्स अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांनीच पुरस्कृत करण्याचे घाणेरडे धंदे सुरु केलेले आहेत . बऱ्याचशा महाविद्यालयात तर छापील जर्नल दिले जाते . विद्यार्थ्यांनी काहींही लिहायचं नाही फक्त रीडिंग भरायची , असतील तर एक दोन गणित करायची झालं जर्नल. हि गणितं सुद्धा मुले स्वत: करत नाहीत . कुणीही प्रात्यक्षिकं गंभीरपणे करत नाहीत. ९० % मुलांना झालेल्या प्रात्यक्षिकाच अनुमान (conclusion) स्वतःच्या मनाने लिहिता येत नाही . प्रात्यक्षिकाच्या दोन तासाच्या वेळात विद्यार्थी आणि शिक्षक काय करतात हाच एक संशोधनाचा विषय आहे. बहुतांश वेळा पहिल्या अर्ध्या तासात प्रात्यक्षिक संपतात, बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनी एकदा समजाऊन सांगितलं कि विद्यार्थ्यांनी स्वत: करून पहाण अपेक्षित असत पण विद्यार्थी काही करत नाहीत . थोड पाहिल्यासारख करतात आणि मग निवांतपणे उरलेल्या वेळात जर्नल लिहितात, इतर असाईनमेंट्स सोडवतात, मोबाईलवर whats app वर चाटिंग करत बसतात. जास्तच झाल तर कुठले कुठले फॉर्म भरत बसतात.
शिक्षकांच्या बाबतीत एकदा सगळ समजावून सांगितलं कि त्यांची जबाबदारी संपते मग जर्नल तपासणे किंवा आजकाल बरेच कागदी घोडे नाचवणे चालू आहे त्यांची पूर्तता करणेच ते काम करतात. मागे सांगितल्याप्रमाणे ९५ टक्के निकाल लावायचाच आहे मग काय पोरांना येउ दे किंवा नाही हे सगळ शिक्षकाच्या बोकांडी असत, काहीही झालं तरी ७०% च्यावर मार्क्स मिळतात विद्यार्थ्यानाही हे माहित झालं आहे त्यामुळे ते निवांत असतात. कित्येक महाविद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षेवेळी असणाऱ्या तोंडी परीक्षेसाठीसुद्धा प्रश्नावली तयार करणेस शिक्षकांना सांगितले जाते अगदी उत्तरासकट आणि त्याची कॉपी विद्यार्थ्यांना द्यायची जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे. अर्थात हि तोंडी परीक्षा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक जमलं नाही तर त्याला पास करण्यासाठीची एक औपचरिकता असते पण त्यामध्येही विद्यार्थी बोलत नाहीत. अक्षरशः त्यांना त्याविषयाला असणाऱ्या सहापैकी तीन धड्याची सुद्धा नावे सांगता येत नाहीत .( कळकळीने शिकवलेल्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत काही येत नाही, ते तोंडसुद्धा उघडत नाहीत तेव्हा शिक्षकाच्या मनाची होणारी घालमेल ज्यावेळी हे विद्यार्थी शिक्षक होतात तेव्हाच त्यांना कळते. शिक्षक झालेवरच कळत कि टुकार मुलालासुद्धा पास करणेसाठी शिक्षक किती धडपडतात आणि याची त्या मुलांना माहितीही नसते )
ज्यांना साधे प्रात्यक्षिक धडपणे करता येत नाही तो व्यवसाय कुठून उभारणार ? व्यवसायच जर उभे राहिले नाहीत तर नोकऱ्या कुठून मिळणार ? आणि नोकऱ्याच नाहीत तर अभियांत्रिकी महाविद्यालये कशी चालणार? हे एक साधे सोपे गणित आमच्या सो कोल्ड शिक्षणतज्ञांना कळले नाही हे आमच्या देशाचे दुर्दैव आहे.
शेअर करा , आपले विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Tuesday, November 13, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग १६ )



***  पाश्च्यात्य शिक्षणपद्धतीचा वाढतोय भाव , अभ्यास नाही देवा मला पाव ***
आजकाल इंटरनेटच्या जमान्यामुळे जग जवळ येत चालल आहे . क्लिकसरशी शेजारच्या देशात डोकावून पाहता येत . पाश्चात्य देशामधील शिक्षणक्षेत्रामध्ये काय चालल आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून लगेच कळतं. यामधूनच नवनवीन संकल्पना आपल्या अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीमध्ये वरचेवर चर्चेत येत आहेत.  पाश्च्यात संकल्पनांना भुलून त्यावर खोलवर विचार न करता आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पहिल्यांदा श्रेय घेण्याच्या नादात व्यवस्थितपणे अभ्यास न करता घाईघाईने रुजवायचा प्रयत्न करून त्याची व्यवस्थितपणे वाट  लावण्यामध्ये आपण पटाईत झालो आहोत .
ज्या देशातील शिक्षण पद्धतीचे आपण गोडवे गातो आणि ती शिक्षण पद्धती राबवण्याचा प्रयत्न करतो त्या देशाच्या शिक्षण पद्धतीचा पहिल्यांदा  मुलभूत अभ्यास करायला पाहिजे आणि मग राबवली पाहिजे पण आपल्याकडे असं होत नाही . आपल्याकडे अमेरिकन/ जर्मन शिक्षण पद्धतीचा उदोउदो होतो पण या  शिक्षण पद्धती अशा मुलासाठी तयार केलेल्या आहेत जी मुल वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांची मत मांडतात आणि त्यांना तिथूनच विचार स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे धडे मिळालेले असतात आणि ते पाळले जातात. तुम्ही स्वतः करा (Do It Yourself ) या संस्कुतीमध्ये वाढलेल्या या मुलाना लहानपणापासूनच स्वत:ची गोष्ट स्वत: करायची सवय असते. Yes I Can हा यांचा मंत्र असतो . कुठल्याही समस्येवर स्वत: समाधान शोधण्याच त्यांना बाळकडू मिळालेलं असत . वयाच्या अठरा वर्षापर्यंत हे स्वयंभू होतात. कष्टाला आणि स्वावलंबीपणाला दिलेला सन्मान यामुळे ती लवकरच मिळवती होतात. त्यांना जबाबदारी उचलायला शिकवलेलं असत आणि मिळणाऱ्या अपयाशाच पण जबाबदारी ते दुसऱ्यावर टाकत नाहीत. कामाच्या वेळेस काम हे त्यांच्यात भिनलेले असत. आणि सर्वात महत्वाच त्यांना काय करायचं हे त्यांना ठाऊक असत.  
  याउलट आमच्याकडे अजूनही  पोरग अठरा वर्षाच होउन  इंजिनियरिंगला आल तरी त्याचे वडील म्हणतात अजूनही लहान आहे. लहान असताना त्याला काय कळतय असं म्हणून स्वातंत्र्य दिल जात नाही . प्रत्येक गोष्ट करणेसाठी ती आज्ञेची वाट पाहतात, स्वत: जबाबदारी पेलायला ती इतकी समर्थ नाही आहेत . आपल्यापुढे ते ताडमाड दिसतात म्हणून त्यांची बौद्धिक कुवत जास्त आहे अस नाही . Whats App  आणि फेसबुक वर timepass करतात याचा अर्थ ते टेक्निकली खुपच पुढे आहेत आणि त्यांची आकलन शक्ती जास्त आहे असं नाही . आयुष्यातील अनेक निर्णय ते सल्ला घेउनच करतात. मला हे जमेल का अशी शंका  त्यांच्या मनात प्रत्येक वेळी येते. लोक काय म्हणतील याची भीती त्यांच्या मनात लहानपनापासून घातलेली असतात . कोणताही  धाडस करायला  हे तयार नसतात आणि जबाबदारीची त्यांना जाणीवच नसते (अर्थात हा आपला राष्ट्रीय प्रश्न आहे ).
अशा अनेक बाबी आहेत ज्यांचा विचार आपण करत नाही आणि तो न केल्याने बऱ्याच पाश्यात्य शिक्षण पद्धती आपल्याकडे फेल गेलेल्या आहेत आणि जाणार आहेत . याचा अर्थ आपली मुले कुठल्याही बाबतीत कमी आहेत अस मला अजिबात वाटत नाही . फक्त आपल्या मुलांची जडणघडण, आपली संस्कृती  हि वेगळ्या पद्धतीची आहे आणि याचे काही फायदेहि आहेत . त्यामुळे याचा विचार करूनच शैक्षणिक धोरणं आखली पाहिजेत . 

पटल असेल तर शेअर करा, विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Tuesday, November 6, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग १५ )


***  अभियांत्रिकी शिक्षण – आतबट्ट्याची गुंतवणूक ***

मागे अशाच एका शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात  अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राशी निगडीत एका नामचीन अशा व्यक्तिमत्वाचे भाषण ऐकायचा योग आला होता. त्या भाषणातच त्यांनी अभियांत्रिकी शिक्षणाशी निगडीत काही आकडे फेकले . (बाकी आकडे फेकले कि एखाद्या विषयावर आपला किती अभ्यास आहे ते दाखवता येत). त्यांनी सांगितले कि आजच सकाळी मी एका पेपर मध्ये वाचल कि उद्योग जगताने केकेल्या परीक्षणानुसार फक्त १० टक्केच विद्यार्थी हे रोजगारक्षम असतात.
लगेच माझ्या डोक्यात एक गणित आले ते असे:-
एका मुलाची एका वर्षाची फी :-         ७५,०००/-
जेवणाचा खर्च जवजवळ :-             २०,०००/-
राहण्याचा खर्च  जवळजवळ :-          २०,०००/-
पोकेटमनी आणि इतर खर्च :-           २०,०००/-
एक वर्षाचा खर्च जवळजवळ :-         १,३५,०००/-
चार वर्षाचा खर्च १,३५,०००X ४         ५,४०,०००/-
एका वर्गात ६० जण  ५,४०,००० X६० = ३,२४,००,०००/-
एका कॉलेजमध्ये ४ ब्रंच = ३,२४,००,००० X ४ =१२,९६,००,०००/-
महाराष्ट्रमधील कॉलेज २५० पकडुया  ;- २५० X १२,९६,००,००० =३२४०,००,००,०००/-
म्हणजे जवळपास  ३,२४० कोटी रु .चा टर्न ओव्हर.
आता या पैकी फक्त दहा टक्के लोक रोजगारक्षम म्हणजेच फक्त ३२० कोटी रुपये सत्कारणी लागले आणि २,९१६ कोटी रु काय झाले ? कधी याचा आपण विचार करतो का? म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील   अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीची कार्यक्षमता फक्त १० टक्के आहे .म्हणजे वरचे २९१६ कोटीमध्ये काय होत? याचा उत्तर म्हणजे फक्त माणस जगवली जातात, अर्थचक्र फिरत राहत आणि फक्त कचरा निर्माण होतो. कचरा... वह्यांचा, कचरा .....फायलींचा , कचरा.......कागदांचा, कचरा ...... पदव्यांचा ,कचरा...... मनाचा, कचरा......भावनेचा , कचरा ....... कचऱ्याचा , कचरा.....कचरा......आणि फक्त कचरा .
शांतपणे विचार करा म्हणजे यातील भीषणता कळेल . कसा राहिल हो या शिक्षणावर लोकांचा विश्वास. आणि किती दिवस टिकून राहील हि शिक्षणव्यवस्था ? हे फक्त अभियांत्रिकीच इतर अनेक विद्याशाखा त्यांच्यात हि अशीच व्यवस्था आहे .
हे शिक्षण घेण्यात वेळ आणि पैसे लावणेपेक्षा एव्हडाच पैसा आणि वेळ जर कोणत्याही व्यवसायात लावले तर लावणारा नक्कीच यशस्वी होईल आणि आपण हि उदाहरणे आपल्याच आसपास पाहत आहोत.

पटल असेल तर शेअर करा नसेल तर विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Monday, November 5, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा ( भाग -१४ )



*** आय. आय. टी.च खूळ - दुखण्याच मूळ  ***
आमच्या अभियांत्रिकीमध्ये आय. आय. टी. एक मोठं प्रस्थ आहे . आय. आय. टी. देशाची एक अभिमानाची गोष्ट आहे  पण नकळतपणे आय. आय. टी. च्या पावलावर पावुल ठेवण्याच्या नादात आपलं अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्र दिशा हरवून जात आहे.
आय. आय. टी. म्हणजे अभियांत्रिकीचा मानबिंदू. जवळ जवळ साठ वर्षाची उज्वल परंपरा असणाऱ्या या संस्थेविषयी प्रत्येक देशवासियांना अभिमान आहे. तेथील शिक्षक , विद्यार्थी, त्याचं संशोधन आणि त्याची शिक्षण पद्धती याविषयी गारुड प्रत्येकाच्या मनात आहे. याविषयी शंकाच नाही.
पण एखाद्या गोष्टीचे अभिमान वाटणे ठीक आहे काही प्रमाणात अनुकरण करणेही ठीक आहे पण प्रत्येक बाबतीत बाबावाक्य प्रमाणाम या प्रमाणे आय. आय. टी. प्रमाणम म्हणण्यामुळे आमचे नुकसान होत आहे.

आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याची गुणवत्ता काय असते ? आय. आय. टी. त जायचं स्वप्न पाहणारा विद्यार्थी जवळजवळ आठवीपासून आय. आय. टी. च्या बारावीनंतरच्या प्रवेशपरीक्षेसाठी झोकुन देत असतो . (परवा तर एकजण सांगत होता कि त्यान त्याच्या  मुलाला आय. आय. टी. च्या प्रवेश परीक्षेच्या तयारी साठीच्या क्लास ला घातलं आहे माझ्या डोक्यात शिट्ट्या वाजल्या माझ्या पाचवीच्या पोराच्या वर्गात शिकणार पोरग अजून त्याला शेंबूड काढता येत नाही त्याच्यासाठी सुद्धा क्लास आपल्या पुण्यनगरीत निघाले आहेत ). १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेपेक्षाही त्याला ती प्रवेश परीक्षा देवून पास होउन तो आय. आय. टी. मध्ये प्रवेश घेत असतो म्हणजे अखंड देशातील पहिल्या पंधरा हजार विद्यार्थ्यामध्ये तो असतो. आय. आय. टी. मध्ये काय शिकवतात ? कसं शिकवतात यावर एक पुस्तकच होईल.तर अशा गुणवत्तेच्या मुलांना शिकवण्यासाठी असणाऱ्यांना सोयी आणि सुविधा काय असतील याचा विचार करावा.
आता थोड आपल्या मुलांच्याकडे बघा. या मुलांनी आठवीपर्यंत परीक्षा दिलेली नाही. नववी मधून कसतरी दहावीत ढकललं आहे .दहावीत आणि बारावीत हातातील मार्कांच्या जीवावर मिळालेली भरघोस मार्क घेउन मिळत आहे मग काहींही शिकवायचं तर टाका अभियांत्रिकीला अशा मनोवृत्तीने आलेलं किंवा किमान इंजिनियर बनून आपलं पोट तरी भरील अस विचार करून टाकलेलं  पोट्ट . करा तुलना .आता यापुढे जावून त्याला शिकवणारे शिक्षक , शिक्षण पद्धती , त्याला मिळणारे शैक्षणिक सुविधा आणि याचीही तुलना करा.
आय. आय. टी.मधून पी.एच. डी. करून आलेल्या बऱ्याच शिक्षकांना मी आय. आय. टी. ची आणि इतर ठिकाणच्या शिक्षणपद्धतीची तुलना करताना मी पाहिलं आहे आणि त्या धर्तीवर ती पद्धत राबवताना पाहिलं आहे पण त्यांच्या या पद्धतीचा इतर लोकावर काय परिणाम होतो याचा विचार केला पाहिजे. आय. आय. टी.चे अनुकरण करणेचे नादात इतर बरेच प्रश्न उभा राहात आहेत  ज्याकडे कुणाचही लक्ष जात नाही शिक्षणतज्ञांनी यावर काम सुरु केल पाहिजे .
आय. आय. टी.तील तज्ञ लोकांनीही या विषयावर काम करायला हरकत नाही. गुलाब आणि झेंडू दोघांनाही वाढवण्याची पद्धत वेगळी असते  हे सोपं तत्व आता विचारात घेतलं पाहिजे.
सगळ्यात  महत्वाच म्हणजे आय. आय. टी. ने  त्यांच्या ग्लॅमरचा फायदा घेऊन तयार केलेले नवीन प्रोगामची भुरळ पाडून पैसे गोळा करायचे धंदे बंद करावेत. कारण त्यांच्या प्रोग्राम राबवायला बऱ्याच गोष्टीची कमतरता असते . बऱ्याच ठिकाणच्या लॅब्स या तशाच पडून आहेत . आमच्या विद्यार्थ्याना खरेच याचा पूर्णपणे फायदा होत नाही . त्यांचेसाठी एकदोन दिवसाचे ऐवजी निरंतर शिक्षण प्रणालीचा वापर करता येईल का हे पाहिलं पाहिजे.  आमच्या या साध्या विद्यार्थ्यांना  मी माठ म्हणत नाही कारण हि मुलहि काही कमी नाहीत आणि आमचे शिक्षकही काही कमी नाहीत  यांना जमत असेल  तर  त्यांच्या कुवतीनुसार योग्य मार्गदर्शन करावी हि हात जोडुन विनंती आहे.
माझी सर्वाना एक नम्र विनंती आहे कि आय. आय. टी.च्या धर्तीवर आपल्या शिक्षण पद्धती मध्ये प्रयोग करत असताना मुलांचा ,शिक्षकांचा आणि त्यांना मिळत असणाऱ्या सुविधांचा विचार करून प्रयोग करावेत . आता खरी गरज आहे त्यांचेतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय करता येईल यावर ठोस कार्यक्रम तयार करण्याची . या विषयावर आपण नंतर खोलवर बोलणार आहेच .

याविषयावर आपली मते ऐकण्यास आनंद होईल .

चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Sunday, November 4, 2018

अभियांत्रिकी शिक्षण : दशा आणि दिशा (भाग १२)


*** बौद्धिक संपदा आणि शिक्षणक्षेत्राची बौद्धिक दिवाळखोरी ***

मागे "थ्री इडीयट" नावाचा एक इडीयट सिनेमा आला होता. या चित्रपटाने अभियान्त्रीकी शिक्षणाविषयीच्या अनेक भंकस कल्पनांना जन्म दिला. त्याविषयी मी नंतर लिहिणारच आहे पण पेटंट या शब्दाला खरे ग्लॅमर आणले ते या सिनेमाने . विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये पेटंट विषयी खरी जागृती आणली ती या सिनेमाने आणि हा अतिशय चांगला विषय गांभीर्याने न हाताळल्यामुळे त्याचं हसं केलं शिक्षण क्षेत्राने.

पेटंट म्हणजे काय ?
पेटंट एक अधिकार आहे जो एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही एकदम नवीन सेवा, तांत्रिक, प्रक्रिया, उत्पादन किंवा डिझाईनसाठी दिला  जातो. ज्यामुळे कोणीही त्याची नक्कल तयार करू शकत नाही. पेटेंट एक असा अधिकार आहे, जो मिळाल्यानंतर ती  व्यक्ती किंवा संस्था ज्या  उत्पादनाचा शोध करते किंवा बनवते  त्या उत्पादनाला बनवण्याचा एकाधिकार प्राप्त करते.
जर पेटेंट मिळालेल्या व्यक्तीऐवजी इतर कोणी व्यक्ती किंवा संस्था याच उत्पादनाला बनवते, तर ते बेकायदेशीर मानले जाते आणि जर पेटेंट मिळालेल्या व्यक्तीने त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवल्यास पेटेंटचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण जर कोणी या उत्पादनाला बनवू इच्छित असेल तर त्याला पेटेंट मिळालेल्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून परवानगी घ्यावी लागेल आणि त्याला रॉयल्टी देणे गरजेचे आहे.
आता वर्ल्ड ट्रेड संघटनेने पेटेंट लागू राहण्याचा कालावधी २० वर्ष केला आहे, जो पहिले प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा होता.
( सौजन्य  : https://www.inmarathi.com/everything-you-need-to-know-about-patent-and-its-registration/)
 पेटंट फाईल केल्याबद्दल शिक्षकाला काय मिळते ? एखाद्या शिक्षकाने पेटंट फाईल केलं तर किंवा त्याला ते पेटंट मिळालं तर त्याबद्दल त्याला काय फायदा मिळेल याविषयी काहीही नियमच केलेले नाहीत .  जवळजवळ सर्व  ठिकाणी या पेटंटसाठी सगळे पैसे शिक्षकच भरतो किंवा विद्यार्थी भरतात आणि त्याचं नाव मिरवत महाविद्यालय. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याकडे या चार पाच वर्षात जेव्हडे शैक्षणिक संस्थांनी ( आय आय टी आणि काही शासकीय शैक्षणिक संस्था सोडून) पेटंट फाईल केले त्यातील ९८ टक्के कल्पना या पेटंट मिळण्याच्या लायकीच्याच नाहीत . किबहुना पेटंट कशाचं करायचं हेच माहित नाही .या पेटंटची खरी लायकी आमच्या शिक्षण क्षेत्राने घालवली आहे . आमच्याकडे एखादी चांगली कल्पना आली कि त्याची व्यवस्थितपणे तिची कशी वाट लावायची यांच्या तज्ञांची काहींही कमतरता नाही.
मागे एका संस्थेने पेटंटच्या बाबतीत कळसच केला. फायनल इयरचे सारे  प्रोजेक्ट पेटंटसाठी फाईल केले आणि  ते फाईल करताना त्यामध्ये  त्या ग्रुपमधील विद्यार्थ्यांची नावे, मार्गदर्शकाचे नाव, त्यातच शिक्षकाची नाव आणि हेड ऑफ डिपार्टमेंटच नाव ओघानेच . म्हणजेच खिचडी पकी सबमे बटी. काही न करता दहा दहा पेटंट नावावर . अरे चाललय काय ? बर ते पेटंट ची लायकी काय ? ते परीक्षेत टिकणार आहे का ? पण काय आहे आपल्या देशात पेटंटच्या परीक्षेसाठी परीक्षकच नाहीत. त्यामुळे पाच पाच वर्षे या पेटंटच मूल्यमापन होतंच नाही मग काय तोपर्यत मिळतं मिरवायला. बर झालच मूल्यमापन  आणि नाही मिळाले पेटंट तर मग ... आहेत पुढची फाईल केलेली . आणि हि गोष्ट बऱ्याच चाणाक्ष लोकांनी आणि संस्थांनी हेरली आहे.. आणि त्यांचे नावावर पेटंटची संख्या वाढतच आहे वाढतच आहे . या पेटंटच असं तर कॉपीराईटविषयी असेच प्रयोग होत आहेत. मग अशा प्रकारे फाईल केलेल्या लोकांना या पेटंटच खर महत्व माहीतच नाही. नावावर लागलेली दहाबारा पेटंटची नावे मिरवताना त्यांच्या मनात खर तर या पेटंट विषयाप्रती सन्मानच नसतो.
आता तर काय या ज्याप्रमाणे प्रोजेक्टविके झालेले आहेत त्याप्रमाणे पेटंट फाईल करून देणारे एजंट पण बाजारात फिरत आहेत . बल्क पेटंट फाईल करण्यास सूट देत आहेत. नवीन योजना आणत आहेत आणि हे खुपच घातक आहे. कारण बौद्धिक संपदा हि अत्युच्च संपदा आहे आणि तिचा मान जर नाही राखला तर आपण बुद्धीचं महत्व सांगू शकणार नाही.
आपल्याकडे फार्मसी, केमिकल आणि काही प्रमाणात मेकॅॅनिकल शिक्षण आणि उद्योगक्षेत्र सोडलं तर  पेटंट विषयी व्यवस्थित जागृती झालेली नाही. एखाद्याने पेटंट फाईल केल तर त्या पेटंटला व्यवहारात कस आणायचं हेच माहित नाही आणि याविषयी मार्गदर्शन करणारा नाही. जर स्वत: बाजारात आणलं तर त्याच्यात थोडासा बदल करून पुढच्या दहा दिवसात त्याचेपेक्षा अव्वल प्रॉडक्ट बाजारात येईल आणि त्याला कसा आळा घालायचा याबद्दल कायदे नाहीत . जर  न्यायालयात गेलो तर आपली न्यायालये निवांतपणा विषयी प्रसिद्ध आहेत . निकाल लागुपर्यत किती वर्षे जातील याची खात्री नाही . कोर्टबाजी करणे इतपत आपल्याजवळ वेळ आणि पैसा असला पाहिजे आणि तो कितीजणांजवळ आहे..


                                                
 आपली  मते ऐकायला नक्कीच आवडेल . शेअर करा.


चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे
९७६३७१४८६०