Thursday, January 10, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३६ )

*** मान गमावून बसलेली मानांकने ***

एखादी गोष्ट एका वेळेनंतर जितकी चांगली करायला जाल तितकी ती जास्तच बिघडत जाते.
- मर्फीचा नियम
आजकाल बऱ्याच महाविद्यालयात गेलो कि NAAC, NBA हे शब्द ऐकू येतात. हि मानांकने असल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळणार नाही अशी मेख मारल्यामुळे हे मिळवण्यासाठी सगळीकडे पळापळ सुरु आहे.
अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा राखणेसाठी किमान काय सोयी , सुविधा असाव्यात याचा विचार करून या मानांकना च्या नियम आणि अटी ठेवल्या आहेत आणि यावरच गुणदान/ श्रेणी ठरवले जाते.एक प्रकारची महाविद्यालयाचीच परीक्षा असते हि. पण तमाम परीक्षा पद्धतींना व्यवस्थितरित्या फाट्यावर मारायच्या मनोवृत्तीमुळे हि परीक्षा पण दिखावूपणा आणि कागदी घोड्याच्या जीवावर चांगल्या गुणानी (?) उत्तीर्ण केली जाते.
खोटी कागद जमा करण्यापेक्षा खरोखर काम केलेलं कधीही सोपं आहे पण संस्थाना त्या प्रोसेस मध्ये राहाण आवडत नाही मग सुरु होतो खोट्यांचा खेळ. मग हे खोटं खऱ्यामध्ये बदलण्यासाठी कॉलेजमध्ये उशीर पर्यंत थांबणे, सुट्टीच्या दिवशी कॉलेजमध्ये बोलावणे. व्हेकेशन बुडवणे हे उद्योग सुरु होतात आणि यामध्येही परत राजकारण सुरु होत.
मानांकन संस्थांच्या भेटीचा दिवस जवळ येत जातो तसतशी धावपळीला ऊत येतो. कोण कोण काय सल्ले देईल याचा काहींही नेम नसतो . अचानक फाईल बदलतात . मग परत पळापळ सुरु होते. शेवटच्या कालावधीमध्ये ज्या कॉलेजमध्ये मानांकन समिती येउन गेलं त्यांची कमिटी मार्गदर्शनासाठी बोलावली जाते . त्यांचे सल्ले घेतले जातात. आतातर या विषयावर मार्गदर्शन करणेसाठी बाजारात विशेष सल्लागार उपलब्ध आहेत . बजेट असेल त्यांनापण बोलावलं जात .ते पण पण सल्ले देत सुटतात आणि शेवटच्या क्षणी परत कागदे बदलायला लागतात. हि लोकं एव्हढा विचार का करत नाहीत कि त्या कॉलेजमध्ये जे परीक्षक येउन गेले आहेत तेच तुमच्या महाविद्यालयात येतील याची काय खात्री. त्यांची कॉपी मारत बसण्यात वेळ वाया घालवत बसण्याऐवजी आपण स्वत:चा वेगळा पॅटर्न का घडवत नाही.
आपल्याला परीक्षेशी मतलब . चांगली तयारी असेल तर पेपर कसाही निघो आणि परीक्षक कसाही तपासो मार्क्स मिळतातच हे शिक्षकांना समजत नाही याचं खूप मोठ दु:ख वाटत. इथं तर प्रश्न माहिती आहेत आणि त्याच उत्तरही काय असाव हे पण माहिती आहे मग ते उत्तर चांगल्याप्रकारे देता येईल याचा विचार कुणी करतच नाहीत.
एक मजेची बाब या कमिट्या येणार म्हणून जी महाविद्यालयाची रंग रंगोटी होते आणि जी अनावश्यक विचार न करता उधळपट्टी केली जाते. फालतू खरेदी होते तेव्हढा खर्च किंवा त्यापेक्षा निम्मा खर्च जरी विद्यार्थ्याच्या साठी चांगले प्रशिक्षण, सुविधा देण्यासाठी वापरले तरी जास्त मार्क मिळतील.
कमिटी येण्याच्या दिवशीच प्लानिंग म्हणजे खोटारडेपणा लपवण्यासाठी केलेली एक व्युव्ह रचनाच असते. त्यांना कुठे न्यायचं, त्यांना काय दाखवायचं , कुणाला पुढे करायचं. एक एक गोष्ट व्यवस्थितपणे ठरवलेली असते. कमिट्याना पण सगळ माहिती असत . कदाचित लोकांची पळापळ ते मस्त एन्जॉय करत असतात . व्यवस्थितपणे कमिटी पार पडते आणि सगळे हुश्श करतात.
खरी मजा येते ती कमिटी गेल्यावर . कमिटी गेल्यानंतर या कमिटीला या अमुक अमुक मजल्यावर येउन दिलं नाही किंवा अमुक अमुक काम आम्ही कसं व्यवस्थितपणे लपवलं , झाकून टाकलं या विषयीच्या बढाया मारायला सुरुवात होते . पण या बढाया मारताना आपण फसवणूक केलीय याची वाईट कस वाटत नाही हेच कळत नाही . हे म्हणजे असं झालं आहे कि तपासणी होणार म्हणून रोगयावर उपचार करायचा त्याला बर करायच सोडून पैसे देउन त्याच चांगल्या तब्येतीच फिटनेस सर्टिफिकेट मिळवायचं . सांगा कसा बरा होईल रोग आणि मग रोगी आय . सी. यु . मध्ये गेल्यावर रडून काय फायदा आहे काय?
येव्हढ सगळ केल्यावर शेवटी एकदा मानांकन मिळत पण सगळ्यांना माहिती असत कि ते मानांकन कसं मिळालं आहे. त्यामधील खरं किती आणि खोटं किती हे माहित असल्यामुळे त्यामुळे त्याच्याविषयी प्रेम आणि आदर वाटणे ऐवजी किळस आणि घृणा मनात येते. सुरुवातीला या मानांकन समितीना गांभीर्यान घेतलं जायचं पण पाकीट संस्कृतीने प्रवेश केल्यान या मानांकनानींच मान घालवून टाकला आहे.
एक मात्र खर कि विद्यार्थाला विषय समजणे ,त्याचा उपयोग त्यानं त्याच्या भावी आयुष्यासाठी व्हावा , त्यामुळे त्याचा वैयक्तिक उत्कर्ष व्हावा पर्यायाने समाजाचा आणि देशाचा आपोआपच होईल हा शिक्षण पद्धतीचा उद्देश असावा. सारे प्रयत्न हे विद्यार्थी घडवणेसाठीच व्हावे असा सोपा उद्देश शिक्षण पद्धतीचा असावा पण या ऐवजी लोकं जगवावीत हा झाला आहे आणि या नादात सगळ्या सोप्या गोष्टीच रॉकेट सायन्स बनवण सुरु झाल आहे.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०