Wednesday, October 25, 2023

^^^^^ ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा

 २००१ ची गोष्ट असेल . माझा एक मित्र जालिंदर पाटील हा बेंगलोरला जॉबला लागला होता . त्याने मला बेंगलोरला नेले. तिथ गेल्यावर मला कळल कि याला जॉब वगैरे काहीही नाही . घरी दाबात सांगितलं होत कि विप्रोमध्ये आहे पण तिथ त्याला कसलाही जॉब नव्हता. खर तर त्याची मानसिक अवस्था बिघडली होती. निव्वळ पुस्तक वाचत रूमवर बसायचा ( जालिंदर पाटील हा एक वेगळाच लेखाचा विषय आहे मी यावर लिहीनच ). नवीन स्वप्न रंगवायचा . जॉब कन्सल्टन्सी मधून इंटरव्यू फॉर्म आणायचा पण पुढे काहीही नाही . अगदी त्याचा आत्मविश्वास गमावुन गेला होता . दोन तीन दिवसात मलाच त्याच टेन्शन आल . ज्याच्या भरोशावर आलो तोच अधांतरी होता मग काय ? माझे तर बी ई चे विषय राहिले होते . काय करायचं ? माग तर येउ शकत नव्हतो . काय करायचं कळना? जवळ पैसे तर नाहीत याला मागावे कसे ?

आणखी दोन तीन दिवस वाट पाहिली तोवर याने दोन तीन  कंपनीचा इंटरव्यूसाठी फॉर्म आणला होता . त्यातली एक कंपनी ,जी जवळच होती  आणि तिच्या  नावात सर्विस होत मग मनाचा  हिय्या केला आणि त्यातला एक फॉर्म घेतला  आणि  कृती कम्प्युटर सर्विस राजाजीनगर येथे गेलो. कंपनी एच. पी. चे प्रिंटर , प्लोटर सर्विस करायची . त्यावेळी बेंगलोरला इतक हिंदी चालायचं नाही . कन्नड आणि इंग्लिश . आमच इंग्लिश म्हणजे काय सांगायला नको . बरेच जण आले होते. इंटरव्यू घ्यायला मालकच होते वेंकटेश त्याचं नाव . इंग्रजीतून सुरुवात झाली . माझ काय त्यांना किती समजत होत काही कळत नव्हत . शेवटी ते म्हणाले . You dont understand Kannada , you dont speak English ,how you can work for us?

प्रश्न खतरनाक ... दोन सेकंद विचार केला आणि म्हणालो . Sir, I dont understand Kannada , I cant speak English but I can understand what that Machine says and I know how to take care of machine.  उत्तर झन्नाट दिल . थोडावेळ ते विचारात पडले . मग मला थोडावेळ बाहेर थांबायला सांगितले . मग थोडावेळ त्यांच्या सर्विस इंजिनियर्सशी डिस्कस केले आणि मी सिलेक्ट झालो .

पुढचे पंचवीस दिवस मी जालिंदर पाटील या नावाने काम केले . या दिवसात मी जीवाचे रान करून त्यांना माझी निवड योग्य होती हे दाखवून दिले . खुश होते माझेवर . दहा तारखेला पगार झाला . अकरा तारखेला मी त्यांना सांगितले कि मी बी ई नापास आहे आणि माझे नाव जालिंदर पाटील नसुन मी चित्तरंजन महाजन  आहे . त्यांनी आश्चर्याने पाहिले पाच दहा मिनिटे कन्नड मध्ये झापझाप झापले . ते विसरून गेले कि मला कन्नड जास्त कळत नाही (थोडफार कळत होत  दोस्त मल्लापाची कृपा ) . शेवटी मला म्हणाले कि माझ्या ओरिजिनल नावाने काम कर .....

आणि बेंगलोर मध्ये कामाला सुरुवात केली ...

********

परवा DIDAC ला गेलो होतो . असाच एकाने स्टॉल घेतला होता त्यातच मला जागा दिली होती. हे सगळ अचानकच झाल त्यामुळे मला काही तयारीपण करता आली नाही. जे काही माझेजवळ होत ते घेउन गेलो होतो . स्टॉल मध्ये माझे मटेरियल लावले . आणि सहजच फिरून आलो . बघतोय तर काय इतर स्टॉल पुढे माझ मटेरियल म्हणजे चकचकीत  मॉल बाहेर एखादा गावाकडचा गावढळ गावठी भाजी घेउन बसतो तशी झाली . काय करायचं ज्यान नेलं त्यालाही माझेविषयी कशाला याला आणल अस वाटल . माझी तर अवस्था खूपच बिकट झाली होती त्यातच तीनचार ओळखीचे भेटल्यावर तर खूपच लाजल्यासारखं झाल पण मनात म्हटलं यांना कुठ माहित आहे डॉल्फिन लॅब्स काय आहे ती . चार पाच वाजेपर्यंत माझ्या लक्षात  आले कि बाकीच्यांनी त्यांची किट्स हि धंदा म्हणून बनवली होती पण माझी किट्स हि मुलांना समजण्यासाठी मी विशेष संशोधन करून बनवली होती . अटल टिंकरिंग लॅब्स ची जशी महाराष्ट्रात अवस्था आहे तशीच इतर राज्यात पण आहे . नुसत चकचकीत लॅब्स फुलली लोडेड सगळीकडे आहे पण युटीलायझेशन जवळजवळ शून्य . मला यु एस पी दिसला .

रात्रभर विचार केला . सकाळी राजाजी नगरला गेलो . वेंकटेश सरांना भेटलो . त्यांनी सुरुवातीला ओळखलं नाही पण थोडीफार त्यांना लिंक लागली . त्याच्या पाया पडलो आणि विचार केला. I am Engineer..... I can do anything.

दुसऱ्या दिवशी बॅटिंग सुरु केली चांगला रीस्पोंस मिळाला . माझ इंग्लिश काही अजुन सुधारलेलं नाही पण पुढच्याला जो विश्वास द्यायचा तो आपल्याजवळ होता. मनात म्हटलं बाकीचे लोकं बकरे शोधात आहेत आणि माझा दृष्टीकोन त्यांच्या सारखा नाही . दोन दिवसात बरंच काही घडलं. हळूहळू मी सांगेनच.

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा .... काय भुललासी वरलिया डोंगा ...

आमच इंग्लिश डोंग ... आमची कीटस कदाचित असतील डोंगी ,पण आमचा हेतू तर सरळच आहे.