Sunday, February 26, 2023

***** गतकाळाची होळी होवो , नवी पिढी उदयाला येवो *********

 

***** गतकाळाची होळी होवो , नवी पिढी उदयाला येवो *********

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥  -----कवी – वसंत बापट

 

करोना हि देशावर ओढवलेली मोठी आपत्ती होती पण हाच  करोना खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन यांच्यासाठी एक इष्टापत्ती ठरला . करोनापूर्वीच   या क्षेत्राला आधीच घरघर लागली होती पण करोनामुळे या क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली .  कमी होणारी विद्यार्थी  प्रवेशांची संख्या आणि नियमित द्यावे लागणारे शिक्षकांचे पगार यामुळे कित्येक शिक्षण संस्था या डबघाईला आलेल्या होत्या. कित्येकांना हा पगाराचा डोलारा सांभाळणे मुश्कील झाले होते  पण करोना आला आणि संस्थांचे नशीब पालटले.  अनियमित होणाऱ्या पगारामुळे आणि आय टी क्षेत्रात आलेल्या बुममुळे बरेच शिक्षक जॉब सोडून गेले . काही  ठिकाणी शिक्षकांना या संधीचा फायदा घेऊन काढून टाकले गेले . जे आहेत त्यांचा पगार निम्मा केला . इन्फ्रास्ट्रक्चर वापर खर्च शुन्य झाला . कन्झ्युमेबल  वरचा खर्च वाचला , असे अनेक खरच वाचले . विद्यार्थ्याकडून १०० टक्के फी वसुली झाली. ज्याठिकाणी शिक्षक पगारासाठी संप ,कुरकुर करत होते त्यानाही  निमुटपणे काम करण्याशिवाय पर्याय उरला नाही .

ऑन लाईन परीक्षेमुळे बऱ्याच वर्षापासून अडकून असलेल्या विद्यार्थ्यांची सुटका झाली .   दहावी , बारावी मध्ये मार्कांची खैरात केली गेली त्यामुळे तंत्रनिकेतन आणि महाविद्यालयांचे प्रवेश वाढले . यामुळे अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनाच्या बेंडकुळीत बळ वाढले.

खर म्हणजे हि स्थिती जास्त काळ टिकणारी नाही आणि याचा पण अंदाज घेउन पुढे मार्गक्रमण करण्याच्या दिशेने कुणीही प्रयत्न करत नाही . प्रत्येकजण जल्लोषात मग्न आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा काय आहे हे विचारात घेउन त्यांना या क्षेत्राची गोडी कशी लागेल , त्यांच्यात कोशल्य कसे वाढेल याचा कुणीही विचार करत नाहीत . करोना काळात जो मिळालेला (वाचलेला ) पैसा आहे त्याचा योग्य विनिमय करून विद्यार्थ्यांचा पर्यायाने  महाविद्यालयाचा दर्जा कसा वाढवायचा याचा विचार कोणीही करताना दिसत नाहीत . उलट करोना काळात पैसे वाचण्याच्या ज्या क्लुप्त्या मिळाल्या त्याचाच वापर करताना बरेचजण दिसत आहेत .

मध्यंतरी म्हणजेच करोनापूर्व काळात ढकलगाडीतून आलेल्या विद्यार्थ्यामुळे बर्याच चुकीच्या प्रथा पडल्या होत्या त्या बंद करून आता आलेल्या विद्यार्थ्यांना एका नवीन साच्यात टाकायची हि एक अनमोल संधी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र गमावत आहे असे मला वाटते.  त्यांच्यामध्ये  अभियांत्रिकी शिक्षणाविषयी प्रेम वाढवण्याऐवजी फालतू अभिनेते , अभिनेत्री  यांच्या चित्रपटांचे प्रमोशनच्या कामाच्या सुपाऱ्या घेणही बऱ्याच ठिकाणी चालले आहे . दहा दहा दिवस गदरिंग आणि खेळाचे कार्यक्रम आयोजित करून आपण विद्यार्थ्यांचे पर्यायाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचे अफाट नुकसान करत आहे हे यांच्या गावीही नाही . कारण या कार्यक्रमापूर्वी किमान दहा दिवस आणि हे कार्यक्रम झाल्यावर किमान एक आठवडा अशाप्रकारे किमान विसतीस दिवस  विद्यार्थी हे वेगळ्याच मानसिकतेत वावरत असतात.

 ज्या  ठिकाणी तंत्रज्ञानाचे सोहाळे झाले पाहिजे , अभियांत्रिकी क्षेत्रातील नामवंतांचे विद्यार्थ्याना विचार मंथन आणि  मार्गदर्शन झाले पाहिजे त्या ठिकाणी टुकार कार्यक्रमाचा भडीमार सुरु झालेला आहे .  निरो म्हणे रोम जळत असताना फिडल वाजवत बसला होता तस या आगीच गांभीर्य ध्यानात न घेता आम्ही हातपाय शेकत बसलो आहे .

हि अडमिशनची परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही . बाहेरच्या जगात मंदीच वातावरण आहे . हि मंदी भारताच्या उंबरठ्यावर येउन ठेपली आहे . आपली लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे आपला देशच हा मोठ मार्केट आहे हे विचारात घेउन आता आपल्या विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे . विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कौशल्यवान बनविल तर त्यांचा मार्ग तेच निवडतील हे सोप काम करण्याऐवजी आम्ही  सर्व शिक्षक वर्गाला कसली कसली कागदे गोळा करणे आणि रंगवणे यात अडकून टाकत आहे . रोज नवीन संकल्पनेच मढ , अभियांत्रिकी  शिक्षणक्षेत्राच्या पर्यायाने शिक्षकाच्या गळ्यात मारले जात आहे .

जर गायीला  दुध येत नसेल तर योग्य औषधोपचार करणे आणि तरीही फरक नाही पडला तर  शेवटी  गायीला बदलण्याऐवजी  धार काढणारा बदला , गोठा बदला , गोठा रंगवा , गोठ्यावर यंत्र लावा , गायीच्या गळ्यात ताईत बांधा आणि शेवटी धार काढणाऱ्याला बदला किंवा गाय खूपच दुध देते अस सर्टिफिकेट विकत घेउन मिरवा असला प्रकार जो चालला आहे तो बंद करण्याची खरी गरज आहे .

 

बऱ्याच ठिकाणी स्वायत्ततेच वार आलं अशावेळी वरून आलेल्या योजना , कार्यक्रम यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून ज्यांचा विद्यार्थ्यांना फायदा होणार नाही अशाना गळ्यात मारून न घेता उलट त्यावर प्रश्न विचारले पाहिजे. संस्थापाकासाहित सर्वांनी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राच्यामुळे आपलं घर चालत आहे त्यामुळे आपल्या महाविद्यालयात चांगले प्रवेश झाले पाहिजेत आणि त्यासाठी कमीत कमी खर्चात चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याना कस कौशल्य पूर्ण बनवू असा स्वार्थी विचार केला पाहिजे . करोडो रुपये खर्च करून मोठमोठ्या प्रदर्शनीय प्रयोगशाळा बांधण्याऐवजी कमीत कमी खर्चात विद्यार्थ्यांना कस कौशल्यपूर्ण बनवता येईल याचा विचार केला पाहिजे (नवीन लेखाचा विषय मिळाला लवकरच यावरही लिहीनच )

सध्या हि वेळ संक्रमनाची आहे . हे क्षेत्र स्थिती बदलत आहे  आणि हिच  वेळ आहे ती नवीन प्रथा पाडण्याची , अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचा कायाकल्प करण्याची  ज्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला परत उर्जितावस्था येईल त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची  .

 

 

आपले विचार अवश्य मांडा

चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dearengineers.blogspot.com