Wednesday, October 31, 2018

अभियांत्रिकी शिक्षण : दशा आणि दिशा (भाग ९)

अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम – चिंतेचा विषय
अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम बनवणे हा एक वेगळाच सोहोळा असतो. बदलते तंत्रज्ञान, बदलती व्यावसायिक धोरणे , नवीन व्यावसायिक गरजा आणि मागणी याचा अंदाज घेऊन असा अभ्यासक्रम बनवायचा कि ज्यामुळे भावी अभियंत्यामध्ये योग्य ते कौशल्य निर्मिती होईल या साठी दर तीन किंवा चार वर्षांनी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रम मंडळाची बैठक होत असते . या बैठकीत अभ्यासक्रम ठरवला जातो.
अभ्यासक्रम बदलताना नक्की करतात काय? बहुंताश वेळा विषयाची नाव बदलली जातात . जुन्या अभ्यासक्रमातील एखादा काढून टाकलेल्या विषयाचं नवीन अभ्यासक्रमात पुनरुत्थान केल जात. किंवा पहिल्या सत्रातील विषय दुसऱ्या सत्रात / दुसऱ्या वर्षात घुसवायचा झाला. अगदीच झाल तर एखादा नवीन विषय अभ्यासक्रमात घुसवायचा झाला अभ्यासक्रम तयार. हा नवीन विषय घुसवताना त्या विषयाची पूर्वतयारी काय लागेल? त्याची पार्श्वभूमीची तयारी त्या पूर्वीच्या अभ्यासक्रमात झाली का ? याची काळजी काळजी घेतली जात नाही. परदेशातील किंवा देशातील एखाद्या विद्यापिठाचा अभ्यासक्रम जसाच्या तसा उचलला जातो. त्या विषयाचा खरच त्या अभ्यासक्रमासाठी उपयोग आहे का याची खात्री सुद्धा बऱ्याचवेळा करून घेतली जात नाही.
यापेक्षाही घातक म्हणजे प्रकार म्हणजे जे विषय विद्यार्थ्यांना अवघड जातात त्या विषयातील अवघड भाग काढून टाकणे यामध्ये शक्यतो गणिती भागाचा बळी दिला जातो. त्यातील डिझाईनचा भाग काढून टाकला जातो . प्रोग्रामिंग चा भाग काढून टाकला जातो आणि अशा रीतीने त्याविषयाची काठीण्य पातळी कमी केली जातात. काही विषय शक्य झाले तर थेअरीमधून काढून त्याला प्रॅक्टिकल मध्ये टाकायचं आणि तरीही तो विषय झेपत नसेल तर त्याला टर्म वर्कला ठेवायचं . “ C प्रोग्रामिंग” सारख्या विषयावर हि पाळी येते. कधीकधी मला भीती वाटते कि गणित हा विषयच अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमातून काढून टाकतील काय ? विनोदाचा भाग सोडा पण मेटलर्जी , DSP , SOM , TOM, DOS, TOS या विषयातील गणित काढून टाकले तर काय उरेल ते सांगण्याची गरज नाही .
अभ्यासक्रम हा अभियांत्रिकीचा पाया नाही तर तो अभियांत्रिकीचा ढाचा आहे आणि तो गांभीर्याने घेण्याचा भाग आहे . कधीतरी वेळ मिळाला तर एक प्रयोग करून बघा. तुम्ही शिकवत असलेल्या शाखेच्या तीन वर्षाचा अभ्यासक्रम घ्या . एका बोर्डवर तीन वर्षातील सर्व विषयाची नावे लिहून काढा . त्या विषयाखाली शक्य झाले तर त्या विषयातील धड्यांची नावे लिहा . एक बसण्यासाठी योग्य आसन घ्या आणि त्या बोर्डवरील लिहिलेले सर्व नजरेच्या टप्प्यात येईल असं बसा आणि बघा कशाचा कशाला काय ताळमेळ लागतो का? अजून जर खोलात जायचं असेल तर तो अभ्यासक्रमातील मुद्दे बघा . सगळ्यात मोठा विनोद तुम्हाला दिसेल . आमच्या अभियांत्रीकी शाखेच्या आराखडा असा आहे कि त्याला आड आणि बुडच नाही . अमिबा जसा आकार बदलतो तसा आपला अभ्यासक्रमाच स्वरूप आहे याला निश्चित असा आकारच नाही.
आता सगळ्यात महत्वाच आहे ते अभ्यासक्रमाच आरेखन व्यवस्थित केल पाहिजे. अभ्यासक्रम असा पाहिजे कि त्या अभ्यासावर व्यवसाय उभे राहतील ... व्यवसायाच्या गरजेवर अभ्यासक्रम तयार केला तर त्याला काहीही स्वरूप राहणार नाही.
आपले विचार ऐकायला नक्कीच आवडेल .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे
९७६३७१४८६०

Monday, October 29, 2018

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा ( भाग 8)


**** पॉवर पॉईंट- लेक्चर जोमात, पोर कोमात.****
काही हौशी प्राचार्यांनी कुठून कुठुन ऐकलेल्या , इंटरनेट वरील वाचिव , रंजक अशा पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा अवलंब आपल्या भारतीय अभियांत्रिकी शिक्षण पद्धती मध्ये करण्यासाठी जे काही प्रयोग केले त्याचे side इफेक्ट्स आता कळून येत आहेत.
2008 - 09  गोष्ट आहे प्रत्येकजण आपल्या महाविद्यालयात वेगवेगळे प्रयोग करत होता. त्याच वेळी power point प्रेझेन्टेशनच एक नवीनच खूळ पसरलं. शिक्षकांनी खडू फळा पध्दत सोडून या नवीन प्रकाराचा स्वीकार करावा असं काही संस्थेच्या प्राचार्यांना , हेड ऑफ डिपार्टमेंटना  वाटू लागलं. खडू फळा ही पद्धत जुनाट वाटू लागली . बऱ्याच शिक्षकांनी याचा विरोध करायला सुरुवात केली होती अर्थात याच खरं कारण वेगळं होतं .पण येनकेन प्रकारे त्यांचेवर हा प्रकार लादला गेला. काही हाडाचे शिक्षक होते त्यांनी याचा विरोध केला पण शेवटी त्यांनाही या माध्यमांशी जुळवून घ्यावे लागले.
या प्रेझेंटेशन च्या प्रकाराने बरेच जण अभ्यास करणेच विसरून गेले आहेत अर्थातच अभ्यास करायला लागणार नाही म्हणून कितीतरी जणांनी या प्रयोगाला पाठींबा दिला आहे.पहिल्यांदा एखाद्या विषयावर  एक तासाच लेक्चर घ्यायच म्हणजे किमान तीन तासाचा अभ्यास करायला लागतो काही वेळा हा वेळही कमी पडतो. पण power point च्या सहाय्याने हा वेळ वाचू लागला. इंटरनेट वरून तयार मिळालेल्या ppt वाचून दाखवणे म्हणजेच लेक्चर घेणे असा समज सगळीकडे पसरला, शिक्षक होणे हे सर्वात सोपे हे power point वर शिकलेल्या पहिल्या पिढीला सोपे वाटू लागले कारण त्यांनी ते अनुभवलेले होते. इंजिनिअरिंगला शिकवणं हे इतकं सोपं वाटत होतं की निव्वळ प्रोजेक्टच्या मार्कांच्या जीवावर शेवटाच्या वर्षी प्रथम वर्ग मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही हे क्षेत्र त्यांच्यासाठी आहे असे वाटू लागलं आणि इतर कुठेही नोकरी मिळली नाही तर चला किमान इंजिनिअरिंगचा मास्तर बनू इतकी या पदाची लायकी खाली गेली. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये नोकरी म्हणजे निवांतपणा हा भ्रम सगळीकडे पसरला आणि बाजार तेजीत होता त्यामुळे संधीही मिळाली.
या power point मुळे खर तर आमच्या शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आला. पाच मिनिटांत पूर्ण तासाच्या लेक्चर ची तयारी करणारी नवीन जमात निर्माण झाली.इंटरनेटवरून मिळालेल्या रेडिमेड ppt वरील किमान ती बनवणाऱ्या ची नावे बदलायची सुध्दा कंटाळा करणारी शिक्षक जमात या क्षेत्राला मिळाली. आवड नाही तर अभ्यास नाही, अभ्यास नाही तर ज्ञान नाही . निव्वळ ppt वाचणे आणि घ्या लिहुन. संपलं लेक्चर.
आता वेळच वेळ मग या वेळेच काय करायचं ? मग ज्यांना जमत त्यानं शेअर बाजार, bit कॉइन, नेटवर्क मार्केटिंग, प्लॉट खरेदी, जमीन खरेदी विक्री, गाड्या भाड्याने देने अशा व्यवसायाची  सुरुवात केली. शिकवण दुय्यम झालं. बाकीच्यांनी इतर गोष्टीत मन रमवायला सुरुवात केली.
या सर्वाच फलित म्हणजे मुलं लेक्चर अटेंड करत नाहीत...मुलं डायरेक्ट ppt मागतात आणि शिक्षक देतातही. मुलांना diagram चा फ्लो कळत नाही त्यामुळे आताच्या पिढीला diagram फ्लो नुसार काढता येत नाही. आजकाल ओरिजिनल ppt नेटवर सुद्धा मिळतात त्यामुळे मुले डायरेक्ट तिथूनच download करतात.

या सगळ्यांचा परिणाम असा झाला की लेक्चर जोमात आणि पोर कोमात.

(Power point च्या साहाय्याने lecture घेणं खरं तर खूपच अवघड प्रकार आहे. या प्रकाराने माझाही पहिल्यांदा आत्मविश्वास हिरावून घेतला होता)

आपली मते ऐकायला नक्कीच आवडेल.

चित्तरंजन महाजन.
9763714860

Tuesday, October 23, 2018

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग 2)



देवा गणराया , तूला एक गोष्ट सांगायची होती पण सांगायचा धीरच झाला नाही. आज आमच्या राज्यावर दुष्काळाने थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतात चिमणीला प्यायला पाणी नाही. जमिनीला पडलेल्या भेगा पाहुन  काळीज पीळवटायला लागलय. वाटल आता माझ्या मागणीपेक्ष्या त्त्यांच्यावर तुझी कृपा होणे गरजेचे आहे. पण कालचाच facebook वरचा प्रसंग पाहिला आणि आता राहवत नाही म्हणुन हे सांगतो.
हे विघ्नहर्त्या, आज जी अवस्था शेतीची आहे त्याच्याहि पेक्षा भयाण  अवस्था शिक्षणाची आहे. एक पिक नाही पिकल तर वर्ष वाया जात  पण  आज जो शिक्षणाचा खेळखंडोबा चालला आहे त्याची त्याला जर वेळीच आवर नाही घातला तर आमच्या किती  पिढ्या वाया जातील याची कल्पनाच करवत नाही.
हे लंबोदरा, अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या पिल्लाला मदत करण्याची मनाई, त्या पिल्लाच्या आईलाही निसर्गानं केलेली आहे, यात निसर्गाची निष्ठुरता नसते तर त्या पिलाला संकटाला सामना करणेची ताकद आणि अनुभव देणे हा असतो. संघर्ष हेच जीवन आहे याचा प्रथम प्रात्यक्षिक अनुभव इतक्या लहान वयात घेउनच ते जगात येत. जर त्या पिलाच्या आईने त्याचा कळवला येउन  निसर्गाला धुडकावल तर......
पण निसर्गाचा पायाभूत हा नियम आमच्या तथाकथित उच्च विद्याविभुषित शिक्षण शास्त्रज्ञाना    समजत नाही, त्यांना त्यात निष्ठुरता वाटते. मुलांना रागवु नका,काही बोलू नका, त्यांना  जास्त अभ्यास देऊ नका. त्यांच्या कलानं घ्या. त्यांना  परीक्षा नको,त्यांना गृहपाठ नको. असे अनेक मत आजचे शिक्षण शास्त्रज्ञ करत आहेत. याचा खूप मोठा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत आहे.
हे विनायका , पीक लावलेवर योग्यवेळी त्यामध्ये विरळणी हि करावीच लागते आणि विरळणी करताना निर्कृष्ट रोप हे काढुनच टाकाव लागत  त्यामागे त्याचा उद्देश पीक चांगल याव हा असतो. उपलब्ध जागा ,खाद्य या गोष्टी उरलेल्या पीकाला व्यवस्थित मिळावी हा असतो. त्याप्रमाणे नापास न करता सरसकट सर्वाना पास करत नेल्यामुळे आज एक अंधाधुंदी माजली आहे . ज्यावर कुणालाही बोलायला वेळ नाही आणि बोलायची इच्छा हि नाही. याचा खूप मोठा परिणाम उद्या आमच्या देशावर होणार आहे. नापास होण हि सुधारणेसाठी असणारी संधी आहे , स्वत:ची कुवत जाणुन घेउन वेळीच दुसरा मार्ग पकडण्यासाठी मिळालेली सूचना आहे हे लक्ष्यात न घेता आम्ही नापास हि शिवी करून टाकली,एक कलंक करून टाकला आणि त्या कलंकापासून दूर पळावे यासाठी अनेक बरेवाईट मार्ग अवलंबले.
हे एकदंता, जर पाश्चात्य शिक्षण पद्धती चांगली असती तर आज त्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारताकडे भिकाऱ्यासारखे बघावे लागले नसते. हे लोकांना कळत कसे नाही. त्यांनी डमरू हालवायचा आणि आम्ही मग माकडासारख्या उड्या मारणार, मग तेच आम्हाला certificate देणार मग आम्ही ते मिरवणार ...... बर हा डमरू त्यांनी हलवावा म्हणुन आम्हीच त्यांना गाऱ्हाणे घालणार,त्यासाठी वर पैसे देणार आणि त्यांच्या  अनंत उपकारांच्या ओझ्याखाली स्वत: ला गाडून घेणार . हे कधी आम्हाला कळणार? . आजच्या जगातील चालू असणारा याहूनी मोठा आणि हास्यास्पद विनोद काय? लाज वाटते देवा आमची बुद्धी कुठे गहाण पडली आहे?
हे सुखकर्त्या, तसं पाहिलं तर शेतकरी आणि शिक्षक एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक पोटाची भूक भागवतो आणि दुसरा मनाची . तंत्रज्ञानाच्या भाषेतच सांगायचं  म्हणजे एक हार्डवेअरची काळजी घेतो  आणि दुसरा सोफ्टवेअरची. जे नियम शेतीला लागु होतात तेच शिक्षणाला.
नवीन प्रकारची बियाण मार्केटला आली आहेत त्याचा उपयोग करून पिक एकदाच घेता येत, पिक चांगल येत पैसाही चांगला मिळतो पण त्या पिकाचा उपयोग बीजासाठी होत नाही , ती बीज नपुसंक असतात. त्याप्रमाणेच घाऊक बाजार पेठेसाठी तयार केलेली  नपुसंक बुद्धिमत्ता असणारी एक पिढीच या देशात निर्माण झाली आहे. यांना स्वत:ची बुद्धिमत्ता हि नाहीच . आपल मत काय आहे हे न सांगता पाश्चात्य देशातला अमुक अमुक काय सांगतो त्यावर यांची बुद्धिमत्ता ठरते .
ज्याप्रमाणे नगदी पिकांच्या नादाला लागुन शेतीच वाटोळ झालंय त्याचप्रमाणे पैशाच्या नादाला लागुन त्याप्रमाणे अभ्यासक्रम तयार करून शिक्षण क्षेत्राचं वाटोळ झाल आहे.
हे दुख:हर्त्या, ज्याप्रमाणे आज मुलांना  शेतकरी व्हायला नको आहे ,त्याप्रमाणे उद्योजक व्हायला नको आहे.
त्यामुळे आज लाख निर्माण होतात  पण लाखाचे पोशिंदे तयार होत नाहीत.  विद्यार्थी किती   उद्योजक झाले हे पाहण्याऐवजी  किती नोकर   झाले याची  टिमकी  वाजवण्यातच धन्यता मानली जाते. परिणामी बेकारांच्या झुंडीच्या झुंडी आज फिरत आहेत.
आज दुष्काळामुळ शेतकरी आत्महत्या करतात. उद्या भरमसाठ बेकारी वाढलेवर जी अवस्था होईल त्याची कल्पनाही सहन करता येत नाही. इथे तरुण बेकार आत्महत्या करणार नाहीत तर तलवारी घेउन रस्त्यावर फिरतील. चार घासासाठी मुडदे पडतील आणि जर आताच शिक्षण पद्धतीवर विचार नाही केला तर येत्या काही वर्षातच हे चित्र दिसेल.
मुलांच्या कौशल्याचा विकास व्हावा , त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावा यासाठी प्रात्यक्षिकावर भर द्यावयाचे सोडून इ – लर्निगचे नवीन खूळ काढले आहे. नवनवीन अभ्यासक्रम आणि सरतीर्फिकेटचा भडीमार झाला आहे. पायाभुत शिक्षणाचा कुणी विचारच करत नाही. सारे प्रयोग चालले आहेत. प्रयोग , प्रयोग आणि प्रयोग,
आमच्या देशातील बुद्धिमत्तेचा वापर देशासाठी न करता त्यांना दुसऱ्या देशातील उद्योजकाची चाकरी करायला पाठवायचे आणि त्यांच्या मालकांना आपल्या देशात व्यवसाय करायला बोलवायचे मला वाटते हा जो मोठा विनोद आहे तो तुला पुढच्या वर्षीपर्यंत हसायला पुरेसा आहे.
देवा परमेश्वरा तसं सांगायचं खूप आहे खुप काही लिहिले आहे पण त्यातील काही मुद्दे मी तुला सांगत आहे.,

हे बुद्धीच्या देवा, शेतकऱ्यावर तर तू कृपा करच पण थोडी कृपा आमच्या शिक्षण क्षेत्रावरहि कर हि विनंती.

-चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा ( भाग 7)


*** अभियंत्रिकी सरणावर, देशाच भविष्य तिरडीवर ***

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा या लेखमालेला मिळत असणाऱ्या  प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पूर्ण महाराष्ट्रतुन अनेक जणांचे फोन येत आहेत.बऱ्याच गोष्टी कळत आहेत , आणि महत्वाचं म्हणजे  रडगाणे गाणाऱ्यापेक्षा सद्यस्थिती आहे ती बदलण्यासाठी काम करायला खूपच जण तयार आहेत ही सगळ्यात महत्त्वाची आणि सकारात्मक गोष्ट आहे.
मित्रांनो, ही लेखमाला लिहिण्यामागे मला सरकारच्या धोरणावर,
संस्थापकावर, शिक्षकावर, विद्यार्थ्यांत्यांवर किंवा कुणावरही टीका करायची नाही पण ज्यागोष्टी चालल्या आहेत अर्थात या सर्वांना माहीतच आहेत पण यावर कुणी बोलत नाहीत मी फक्त मांडत आहे.
या सर्वमागे माझी फक्त एकच भूमिका आहे आणि ती म्हणजे राजा नागडा आहे हे सांगणाऱ्या माणसाची.
2000 पर्यत  अभियांत्रिकी शिक्षणामध्ये प्रतिष्ठा आणि विद्वत्ता बऱ्यापैकी होती . अभियांत्रिकी शिक्षणाला दर्जा होता आणि सगळी काही आलवेल चाललं होतं.
पण नंतर बाजारात मागणी वाढली होती आणि ती पूर्ण करताना दूरदृष्टी वापरली नाही आणि काहीही विचार न करता अभियांत्रिकी महाविद्यालयाची संख्या वाढत गेली . तालुका पातळीवर अभियांत्रिकी महाविद्यालये चालू झाली अर्थात ही एक खूपच चांगली गोष्ट होती.खऱ्या अर्थाने ज्ञानाची गंगा समाजापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली होती. पण याना परवानगी देताना तेथील शिक्षणाचा दर्जा चांगला कसा राहील आणि त्या दर्जात वाढ कशी होईल यांचेकडे दुर्लक्ष करण्यात आले.
बाजार अगदी जोमात आला होता आणि प्रत्येकजण धुंदीत होता . हवशे, गवशे आणि नवशे जोमात आले होते. अनेक स्तोम माजू लागली ,क्षणीक फ़ायद्यासाठी एखादी  गोष्ट करत असताना तिचा दुसऱ्या गोष्टी वर काय दूरगामी परिणाम होईल याचा कुणीही विचार करत नव्हते. आय टी क्षेत्रात आलेल्या तेजीत सगळेजण मस्त झाले होते. धडाधड नवीन नियम बनत होते. कसले कसले प्रशिक्षण सुरू झाली. कसले कार्यक्रम सुरू झाले . या प्रशिक्षणाचा आणि कार्यक्रमाचा अभियांत्रिकी शिक्षणात काय उपयोग हेच कळत नव्हतं प्रत्येकजण चला एक कागद फाईलला असाच विचार करत होते. अभियांत्रिकी महाविद्यालयात  शिकवायचं असत हेच सर्वजण विसरून गेले होते. कागदपत्रे तयार करण्यात लोकांचा वेळ जाऊ लागला.
आपल्या देशाचा सगळ्यात वाटोळं झालं ते म्हणजे 1980 पासून आमच्यातील विद्वत्ता बाहेर जायला लागली होती . 2000 पासुन त्याला उत आला . प्रत्येक महाविद्यालयातील topper मुलं अगदी टिपून घेऊन गेले आम्ही आनंदात की आमची मुलं परदेशात गेली.
अरे पण गेल्या अठरा वर्षात ज्या पद्धतीने आमची चांगली मुलं नेली याची तुलना अल्लाउद्दीन खिलजीने भारत लुटण्यासाठी केलेल्या अठरा स्वाऱ्याशीच  होऊ शकते.त्यानं धनसंपत्ती नेली.आता आमची भावी ज्ञानसंपदा गेली.
जरा विचार करून बघा काय राहील आहे आमचेकडे? बुद्धीच नाही राहिली आहे. आणि जी काही उरली आहे ती येत्या काही वर्षात संपणार आहे. मधली फळीच गुणवत्तापूर्ण नाही आणि या फळीमध्ये जे काम करणारे आहेत त्यांना पुढं येऊन दिलं जात नाही आणि याचे प्रतिबिंब आजच्या शिक्षण व्यवस्थेतच नाही तर प्रत्येक क्षेत्रात दिसत आहे. पुढच्या फळीसाठी योग्य मार्गदर्शक नाहीत.
आता इथून पुढे खरी सत्व परीक्षा आहे. आता खरी गरज आहे जे काही लोक आहेत जे खरच प्रामाणिकपणे काम करतात त्यांनी एकत्र येण्याची. निसत्व होत चाललेल्या या शिक्षण क्षेत्राला अनुभव रुपी विरजण लावून  मंथनाची गरज आहे. पुर्णपणे सडण्यापूर्वी.....

तुमचे विचार ऎकायला निश्चित आवडेल.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे
9763714860

Sunday, October 21, 2018

अभियांत्रिकी शिक्षण – दशा आणि दिशा ( भाग ६ )


**** रेडीमेड प्रोजेक्ट : अभियांत्रिकीला शिक्षणाला  लागलेला कर्करोग ****

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी करायची  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  प्रोजेक्ट. आतापर्यंत जे शिकले त्या ज्ञानाची खरी परीक्षा. हा प्रोजेक्ट स्वतः  करावं हे अपेक्षित असत पण थेअरीकडे जास्त लक्ष दिलेमुळे  प्रॅक्टिकलकडे दुर्लक्ष्य होते . त्यामुळे मिनी प्रोजेक्ट करतानाच  फे फे उडते ,मग  हा मेगा  प्रोजेक्ट करायचं म्हणजे पोटात भीतीचा गोळा येतो .त्यामुळे  हे  प्रोजेक्ट विकत घ्यायचं ठरतं आणि इंजिनियरिंगची तीन वर्षाची मेहनत आणि पैसे पाण्यात गेल्यातच जमा होते.
तीन वर्षात जवळजवळ प्रत्येकी सहा लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या चार पोरांच्या गटाने मिळून एक प्रोजेक्ट करायचा असतो म्हणजेच जवळजवळ चोवीस लाख रुपये खर्च करून  तयार केलेला गट जर वीस बावीस हजार रुपये घालुन जर प्रोजेक्ट विकत घेत असेल तर सगळे पैसे आणि मेहनत वाया गेलेसारखीच गोष्ट आहे
आम्ही गेली दोन वर्षे सर्वेक्षण केले आणि त्यातून निघालेले निष्कर्ष हे धक्कादायक आहेत.पुण्यामध्ये जर कात्रज हा केंद्रबिंदू मानून जर तीन किलोमीटरचे वर्तुळ काढले तर या वर्तुळात जवळजवळ १३२ प्रोजेक्ट विकणारे आहेत्त.  गेल्यावर्षी हा आकडा ८७ होता . जवळजवळ ४० ते ५० कोटी रुपयाचा व्यवसाय या एव्हढ्या भागात होतो. हे कशाचं द्योतक आहे?
कुठल्याही अभियांत्रिकी विद्यालयाच्या बाहेर जा, दहा ते बारा प्रोजेक्ट विक्याचे बोर्ड लागलेले असतात.काही प्रोजेक्टविक्यांची तर हिम्मत इतकी वाढलेली आहे  ते सरळ महाविद्यालयाच्या आत जाहिरात लावतात आणि काही तर प्रोजेक्ट लिस्ट तिच्या किमतीसह प्राचार्यांच्या नावे पाठवतात . किती मोठी शोकांतिका आहे?  यातील काही  प्रोजेक्ट विके महाविद्यालयात येउन फुकट गेस्ट लेक्चर घेतात किंवा अतिशय कमी दरात कार्यशाळा घेतात, वेगवेगळ्या कार्यक्रमाना प्रायोजकत्व देत असतात. या लोकांनीच  इंजिनियरिंगच्या दोन दिवसाच्या कार्यशाळेची फी मल्टीप्लेक्सच्या दोन तासाच्या  सिनेमाच्या तिकीटापेक्षा कमी करून ठेवली आहे .
यातील काही प्रोजेक्ट विके  त्या महाविद्यालायाचेच धडपडे विद्यार्थी असतात आणि त्यांचेविषयी शिक्षकांना आनंद वाटतो .त्यांना वाटत कि आपल्या विद्यार्थ्यांनी स्टार्ट अप केलाय यांना आपण मदत करू . पण ह्या विद्यार्थ्यांना मदत करून आपणच  आपल्या स्वतःच्या भविष्याला खड्ड्यात ढकलतो हे त्या बिचाऱ्यानाही कळत नाही .
बऱ्याच महाविद्यालयात शिक्षक हे प्रोजेक्ट साठी IEEE सारख्या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांचा वापर करायला सांगतात. प्रोजेक्ट संकल्पना  मागताना त्याबरोबर IEEE तीन तीन पेपर मागतात .पण त्या महाविद्यालयात ते पेपर डाऊनलोड करायची सोय नसते ,काय करायचं पोरांनी तरी?
काही मुलांना त्याची प्रात्याक्षिके व्यवस्थित करता येत नाहीत , मुलांची बौद्धिक कुवत काय आहे हे शिक्षकांना  पक्के माहित असतानासुद्धा त्यांचेकडून नाविन्यपूर्ण अशा प्रकल्पाची अपेक्षा करणे हे सुद्धा चुकीचे आहे. इतकी जर त्याची बुद्धिमत्ता असती तर ते आपल्या महाविद्यालयात आलेच कशासाठी  असते याचा विचार केला जातच नाही . यांचा आवाका ध्यानात न घेता त्यांना नवीन आयडिया साठी परत परत पाठवले जाते .
जर महाविद्यालय जुने असेल तर त्या विद्यार्थ्यांची वाटच लागते  आणेल तो प्रोजेक्ट एक तर झालाय किंवा यात काय नवीन अस म्हणून त्यांना परत पाठवलं जात. असं दोन महिने तंगवल्यावर शेवटी ते आणतील तो गप्प स्वीकार केल्याशिवाय पर्याय राहात नाही आणि त्या विद्यार्थ्याना त्यांच्या सिनियरनी याचा कानमंत्रच दिलेला असतो  त्यामुळे काही विद्यार्थी तर अगदी प्रीलीयाम सुरु होनेपुर्वीच मार्गदर्शकाची गाठ घेतात मग अगदी झक मारत त्यांनी आणलेल्या प्रोजेक्टला स्वीकारायला लागते .
काहींही झालं तरी प्रोजेक्टला मार्क किमान ९० टक्के द्यायचे असा फतवा काढलेला असतो त्यामुळे त्या मुलानी केलेला  सारा त्रास पोटात घालुन चांगले मार्क दिले जातात आणि केवळ या मार्कांच्या जीवावर टुकार मधल्या टुकार पोरालाही शेवटच्या वर्षी फर्स्ट क्लास मिळतो. आणि मग काय ? काहीही केलं तरी आपल कुणीही काहीही वाकड करू शकत नाही  हा संदेश त्यांच्याकडून त्यांचे
ज्यूनियरमध्ये पसरला जातो. मग वर्षभर प्रोजेक्ट करणेसाठी घासणाऱ्या मुलांच्यात आणि काहीही येत नाही पण विकत आणलेल्या मुलांच्या प्रोजेक्टसाठीच्या मार्कामध्ये दहा किंवा जास्तीत जास्त पंधरा मार्कांचा फरक असतो. मग स्वतः प्रोजेक्ट का करायचा? असा चुकीचा संदेश पसरला जातो.
बऱ्याचशा महाविद्यालयात प्रोजेक्ट लॅब असते पण या प्रोजेक्ट लॅब मध्ये काय करायचं हेच माहिती नसतं . चार टेबल आणि स्टूल ठेवली कि झाली प्रोजेक्ट लॅब.  प्रोजेक्ट करण्यासाठी एक दिवसाची सुट्टी पण असते मग या लॅब्सचा उद्देश काय हेच कळत नाही. फक्त एका लॅब्सच्या नावाची भर. बऱ्याच महाविद्यालयात सिम्युलेशनची सोफ्टवेअर नसतात पण प्रोजेक्टच सिम्युलेशन मागितलं जात आणि हे सिम्युलेशन सोफ्टवेअर पण शिकवलेलं नसतं आणि त्याविषयी शिक्षकानाही  माहिती नसते .
ज्या मुलांची प्लेसमेंट झालेली असते त्यांना प्रोजेक्टमध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. बरीच मुले गेट आणि GRE सारख्या परीक्षा करत असतात . बऱ्याच जणांना शेवटच्या वर्षाचा आनंद घ्यायचा असतो आणि अशा लोकांची संख्याच सध्या जास्त आहे. मग काय प्रोजेक्ट विकत घ्यायला उत येतो.
प्रत्येक विद्यालयात एखादा तरी शिक्षक असा  असतो कि त्याला असे वाटत असते कि मुलांनी त्यांचे प्रोजेक्ट स्वतः करावेत आणि मुलांना सर्व शिकवायचीसुद्धा त्याची  तयारी असते पण अशा शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून घेणे हे त्या महाविद्यालयातील हुशार मुलानासुद्धा कटकट वाटते. त्याचेकडे कुणीही जातच नाही . सर्वसाधारणपणे कमीत कमी त्रास देणारे,जास्त मार्क्स देणारे , काहीही न येणारे  आणि गोड बोलणारे मार्गदर्शक यांना प्रथम पसंती दिली जाते. त्यामुळे ज्या मुलांना मार्गदर्शक उरलेला  नाही  आणि आत्ता काहीच  पर्याय नाही अशी मुले नाईलाजाने या शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून निवडलतात किंवा त्यांचेवर लादले जातात. आणि असल्या टुकार मुलांना दोन तीन वर्षे  मार्गदर्शन केल्यावर त्या शिक्षकाचाही उत्साह मावळतो.
आजकाल तयार प्रोजेक्ट तर विकत घ्यायचं   सोडाच तर प्रोजेक्ट भाड्याने मिळण्याची सुद्धा सोय बऱ्याच ठिकाणी आहे . एकच प्रोजेक्ट तीनचार विद्यालयात फिरवला जातो आणि जर दोन वेगळ्या विद्यालयातील ग्रुपची प्रोजेक्ट एक्झामची  तारीख एकच पडली तर मग काय जी  धमालच उडते यावर एक सिनेमा आरामात होईल.
जर एका  मार्कासाठीसुद्धा परीक्षेत नेलेली चिट्ठी हि गुन्हा असेल तर  सहाशे मार्कासाठी विकत नेलेला प्रोजेक्ट हा सामुहिक गुन्हाच नाही का ? आणि हा गुन्ह्याकडे जाणूनबुजून केलेले दूर्लक्ष म्हणजे या गुन्ह्यात घेतलेला सहभागच नाही का ?
ह्या विषयावर जेव्हड लिहील तितक कमीच आहे . अभियांत्रिकी शिक्षणाचा जर दर्जा सुधारायचा असेल तर हा कर्करोग 
मुळापासून काढून टाकायला हवा. पण हा इतका पसरला आहे कि त्यासाठी प्रबळ अशी इच्छाशक्ती पाहिजे .
तुमची मते ऐकायला मला नक्कीच आवडेल.

चित्तरंजन महाजन .
डॉल्फिन लॅब्स,पुणे .
९७६३७१४८६०
आवडलं असेलच शेअर करा.

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा ( भाग 5 )


अभियांत्रिकी शिक्षण : दशा आणि दिशा ( भाग 5)

साधारण 1997-98 ची गोष्ट असेल. त्यावेळी दर बुधवारी टाइम्स ऑफ इंडिया मधील आसेन्ट या जॉब पुरवणीमध्ये सध्या मार्केटला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर साठी जॉब कुठं आहेत ते वाचायचो. बऱ्यापैकी जॉब हे पुण्यातील कंपन्या मध्ये असायचे पण खाली नोट लिहिलेली असायची की पुणे विद्यापीठाशिवाय इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी apply करू नये.खूपच टेंशन यायचं आम्हाला.
पुणे विद्यापीठाचा दराराच तसा होता. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयात प्रवेश मिळवणे म्हणजे गुलबकावलीचे फुल मिळवायसारखे अवघड असायचं. त्यात पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम म्हणजे  इतका अवघड असायचा की हायर  सेकंड क्लास मिळाला तरी पुरे असा असायचा. फर्स्ट क्लास म्हणजे सोनेपे सुहागा...
पण आज काय अवस्था आहे?  पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी हा फक्त आय टी मधील प्लेसमेंटसाठीच योग्य आहे कोअरसाठी तो चालतच नाही. त्यामूळे कोअर व्यवसाय पण ढासळत चालले आहेत.
ही अशी का अवस्था आली? 
2002 चा किस्सा सांगतो त्यावेळी मी बेंगलोरला होतो आणि एका होस्टेल मध्ये राहत होतो.तिथे बरेच एंजिनियरिंगचे विद्यार्थी राहत असत. त्यावेळी आम्हाला एक लक्षात आले की तिथं इंजिनीअरिंगला आरामात 90 टक्के मिळतात आणि परीक्षेच्या आधी अभ्यासासाठी जवळजवळ महिना स्टडी लिव्ह मिळते.
खरच रडू आलं मनातल्या मनात.
मार्कांचा फुगवटा आणण्याचं खर मोठं पाप हे दक्षिणेकडच्या विद्यापीठांनी केलं.
या फुगवट्या पुढं आपली विद्यार्थी कमी पडू लागले मग 2008 - 09 पासून आपल्याकडेपण मार्कांची खिरापत वाटायला सुरुवात झाली. बाजारात मागणी वाढली होती त्यामुळे मुलाना प्लेसमेंट मिळू लागल्या पुणे विद्यापीठाचा पॅटर्न इतर विद्यापीठाणी उचलायला सुरुवात केली.  मागणी इतकी वाढली होती की मुलांना खरंच काय येत यापेक्षा मार्क किती आहेत ते पहायला सुरुवात झाली अर्थात तो पहिला criteria होता आणि त्यामध्ये आपल्या कॉलेजमधील जास्तीत जास्त विद्यार्थी कसे राहतील यासाठी हातामधील मार्क्स हे अक्षरशः उधळायला सुरुवात झाली.प्रात्यक्षिक परीक्षेत काहीही येऊ किंवा न येवो भरमसाठ मार्क वाटायचा सपाटा सुरू झाला. प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करायचं नाही असा फतवा प्रत्यक्ष संस्थापकाकडून येऊ लागले. मग काय नापास करत नाहीत तर प्रात्यक्षिक कशाला करायची असा मुलांच्यात कल वाढू लागला आणि उगीच आपण काही करून कशाला वाईटपणा घ्यावा असं स्टाफ विचार करू लागला.आणि अशारितीने अभियांत्रिकी शिक्षणाचे बुरुज ढासलायला सुरवात झाली. पण बाजार जोरात होता आणि बाजारात सुबत्ता आली होती .
ज्यावेळी सुबत्ता येते तेव्हा आळस, बेफिकिरी आणि तडजोड या गोष्टी माणसामध्ये प्रवेश करतात. सुखाची रेलेचेल असल्यावर आपोआपच आळस अंगात येतो. अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी होते, आजचा दिवस तर व्यवस्थित गेला मग उद्याचं उद्या बघु अशी बेफिकिरी वाढीस लागते. पुढे कष्ट करायची इच्छा कमी होते मग तडजोडीला सुरुवात होते. शेवटी एक दिवस असा येतो कि तडजोडीनेही प्रश्न सुटत नाही मग आपण जागे होतो .आता आपल्याजवळ कामाचे कौशल्य राहिलेले नसते आणि मधल्या वेळेत जग पुढे गेलेले असते आता सुरु होते धावाधाव, ताणतणाव आणि वैताग.
अशातुन सुटका करायचे तर अंगी येते चापलुसी आणि कागदी घोडे नाचवणेची प्रवृत्ती, खोटेपणा आणि लांडी लबाडी. हळुहळू या खोटेपणा, चमचेगिरी  याला प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होते. हि प्रतिष्ठा अधिकृत करणेसाठी कागदपत्रे तयार केली जातात. रोज नवीन कागदे, नवीन नियम तयार करणेसाठी माणसांच्या झुंडी कामाला लागतात. कागदाला महत्व येते. कागदासाठी कागद ,कागदासाठी कागद. कागद जमायला लागतात, रद्दी वाढायला लागते. आता वेळ निघून गेलेली असते. हाती फक्त कागद उरतात. कौशल्याची किंमत कमी होते आणि कागद किती आहे ते पाहिले जाते. त्यामुळे आता फक्त कागदावरचे वाघ बनतात  आणि हे वाघ इतरांना कागदाची भीती घालण्यात आयुष्य घालवतात. 
आजच अभियांत्रिकी शिक्षण या वाघांच्या तावडीत सापडले आहे आणि ते सोडवलं पाहिजे.


चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा (भाग 4)



बरेच जण विचारत आहेत की ही अभियांत्रिकी शिक्षण सुधारण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत आणि त्यासाठी काय खर्च करावा लागेल ?
मित्रानो उत्तर खूप सोपं आहे, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची  अवस्था ही बाळासारखी झाली आहे.
आजकाल आपल्या बाळाला पटकन कुणी जवळ घेत नाही त्याच लाड करत नाही याचं मूळ कारण शोधून त्यावर उपाय केला पाहिजे.
झालंय अस की मधल्या काळात बाळाचं खूपच कोडकौतुक झालंय. त्या नादात त्याला पौष्टिक खायला घालायचं  आणि  मैदानावर खेळायला लावायचं विसरलो आहे. मुलखाच्या महाग कडबऱ्या आणि टुकार चिलिमिली सारखं सत्वहीन खान त्याला घातलं आहे .बाळ गुटगुटीत दिसण्यासाठी  पोषणमुल्य असणार जेवणाऐवजी त्याला डायरेक्ट वेगवेगळी  टॉनिक ,च्यवनप्राश यांचा मारा केला आहे तो इतका झाला आहे की त्याची पचनशक्ती कमी झाली आहे . त्याला भरपुर सूर्यप्रकाशात खेळण्याऐवजी बसल्याजागी व्हिडीओ गेम सारखे बैठे खेळ खेळायची सवय त्याला लागली आहे .पोटात काहीही नाही, त्याला चार घास घातले पाहिजेत. इतके दिवस त्याला कष्ट नको म्हणून त्याला डायरेक्ट सलाईनन अन्न पुरवठा सुरू केला होता तो बंद केला पाहिजे. 
 महत्त्वाच म्हणजे बाळ रोगट आणि कमकुवत झालं आहे हे स्वीकारा म्हणजे त्यावर उपाय करण सोपं होईल. इतके दिवस फिट असलेची सर्टिफिकेट देत होता ती आता चालणार नाहीत, परदेशी वैद्य चालणार नाहीत. उगीच मोठे महागडे डोस त्याला पेलवणार नाहीत.सगळयात पहिल्यादा त्याला बाहेर आणा त्याला स्वछ हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळुदे. तो सदृढ दिसावा म्हणून त्याच्या अंगावर बांधलेले शोभिवंत आणि गुबगुबीत आवरणे काढून टाका त्याचच  त्याला खूप ओझं झालं आहे .त्याच्याशी प्रेमानं बोला, त्याच्या पाठीवरून हात फिरवा.फारच घाबरला आहे ते.त्याच्याशी गप्पा मारून त्याची हिम्मत आणि आत्मविश्वास वाढवा. ते लगेच उभा राहून पळायला सुरुवात करील याची अपेक्षा  मनी बाळगू नका. सकस अन्नाचा डोस त्याला लगेच पचणार नाही म्हणून भांबावून जाऊ नका . हळूहळू प्रयत्न करून आपण या बाळाला परत निरोगी आणि सदृढ करू शकतो.एकदा हा सदृढ झाला की त्याची वाट तोच चालेल...तो नवीन वाटाही बनविल....यशाची उत्तुंग शिखरे त्याला खुणावू लागतील आणि तो तिकडे स्वतः ही जाईल आणि सोबत अनेकांना घेऊन जाईल. 


चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग 3)

 *** सडणारी बुद्धीमत्ता आणि नासणारी स्वप्ने  ***
सध्याच्या अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीचा  सगळ्यात मोठा दुष्पपरिणाम म्हणजे  मुलांची बुद्धी सडत आहे कारण बुद्धी विकासाच्या  वाचन ,चिंतJन, मंथन या ज्या पायऱ्या आहेत त्याच या शिक्षण पद्धतीने काढून टाकल्या आहेत आता केवळ जमलं तितकं वाचन आणि कुंथण या दोनच पायऱ्या आहेत. एका नावाजलेल्या विद्यापीठाने चालू केलेल्या ऑनलाइन objective प्रकारच्या अभिनव परीक्षा पद्धतीबद्दल तर काही बोलायलाच नको. या पद्धतीत तर चिंतन ,मनन याला फाटाच दिला आहे.
पक्का अभियंता घडणेसाठी त्याची अभ्यासाची पध्द्त ही      फुलपाखरांच्या सारखी असावी. फुलपाखरू जेव्हा अंड्यातून बाहेर येते तेव्हा त्याची सुरवंटा अवस्था असते या अवस्थेत ते खूपच खादाड असते खाण, खाणं आणि फक्त खाणं एव्हडाच त्याचा उदयोग असतो नंतर ते कोषावस्थेत जाते,बराच काळ ते कोषावस्थेत असते आणि एक दिवस ते कोषावस्थेतुन निघते आणि आपले रंगबिरंगी पंख फडकवत फिरू लागते.
त्याच प्रमाणे अभियंता हा ज्ञान पिपासू पाहिजे मिळालेल्या ज्ञानाचे त्याने चिंतन केलं पाहिजे आणि त्या चिंतनातून मिळालेले सार हे त्याला मिरवता आले पाहिजे.
आपल्याकडे वरील गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं निव्वल पुस्तकी ज्ञानावरच्या पदव्या या मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करू शकत नाहीत , आणि त्यांचे मनात शिक्षणाविषयी काहीही किंमत उरत नाही आणि एक प्रकारे चार पैशाच्या फायद्यासाठी एक मेंदू सडला जातो.
यापेक्षाही वाईट गोष्ट आहे ती म्हणजे त्या मुलांच्या पालकांची होणारी तगमग. आयुष्य शेतात xxxपर्यंत माती जाऊपर्यंत काम करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांकरी बांधवांची, आयुष्य खडतर गेलं पोरांच्या वाट्याला अस आयुष्य येऊ नये असा विचार करणाऱ्या अनेक पालकांची, पोराच्या शिक्षणासाठी शेताचा तुकडा विकणाऱ्या पालकांची, आयुष्य कचऱ्यागत गेलं आता पोरगं शिकून काहीतरी पांग फेडल अशा अनेक पालकांची स्वप्ने आता नासायला सुरुवात झाली आहे.
इंजिनिअरिंग म्हणजे आता विनोदास्पद गोष्ट झाली आहे. आधीच आपला अभ्यासक्रम हा दहा वर्षे मागं आहे असे बोंबलून उदयोग क्षेत्र सांगत आहे आता वेळीच जर यावर विचार नाही केला तर अजून दहा वर्षे मागे फेकले जाण्याचा धोका आहे.
आता प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयापुढे मुलांच्या ऍडमिशन ची खूपच मोठी समस्या उभी राहिली आहे. वाढलेली महाविद्यालयाची संख्या, बाजारातील कमी झालेली मागणी आणि यामुळे हुशार मुलांचा या शाखेकडील कमी होणारा कल यामुळे आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कॉलेज जगवण्यासाठी अक्षरशः बाबा पुता करून आणलेली मुले ...याना या शिक्षणात रसही नाही आणि त्यांचा तो वकुबही नाही अशा मुलाचा केलेला भरणा, मग त्या मुलांना पास करण्यासाठी करावी लागणारी केविलवाणी धडपड, त्यांच्यासाठी कमी करावे लागणारे अभ्यासक्रमातील आणि परीक्षेतील काठिण्य आणि त्यामुळे मुलांच्या गुणवत्तेत परत होणारी घट हे असं एक नवीनच दुष्टचक्र सुरू झालं आहे. One night इंजिनिअर ही नवीन संकल्पना आता उदयास आलेली आहे. मागील दोन परीक्षांचे पेपरचा जरी अभ्यास केला तरी स्कोअरिंग होईल अशी निघणारी प्रश्नपत्रिका ही कशाची द्योतक आहे? मग एव्हढ करायचं तर डायरेक्ट पदवीच हातात द्यायची.... अरे काय चाललंय काय? हे बदलता नाही का येणार ? आता केवळ पालकांचंच नांही तर या देशाच महासत्ता बनण्याचं स्वप्नच आता नासायला लागल आहे.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग -1)

सध्या अभियांत्रिकी विद्यालयाची अवस्था खूपच गंभीर होत चालली आहे. अचानकपणे अभियांत्रिकी शिक्षणाला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामुळे आलेल्या सुगीत हात धुवून घेण्यासाठी वाढलेली महाविद्यालयांची संख्या, त्यामध्ये गुणवत्ता न राखल्याने आता मोठा प्रश्न बनून उभी ठाकली आहेत.
बाजारात मागणी नसल्याने झपाट्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कमी होणारा कल यामुळे आता अनेक महाविद्यालये बंद पडत आहे आणि बऱ्याच महाविद्यालयात आता पटसंख्या कमी करून घेतली जात आहे.
अभियांत्रिकी विद्यालय बंद पडणे अजूनही आपल्याकडे गांभीर्याने घेतला जात नाही कारण आपल्याकडे लोकांना अस वाटत की ह्यामुळे फक्त संस्थापक आणि त्याचे शिक्षक यांचेपूरताच हा प्रश्न आहे  त्याचा आपल्याला काय फरक पडणार आहे असं जनतेला वाटतं पण खरंच या प्रश्नांची व्याप्ती इतकीच आहे का?
हा प्रश्न फक्त वर उल्लेख केलेल्या बाबीपुरता मर्यादित नाही तर सर्वसामान्य लोकावरही त्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. एक अभियांत्रिकी विद्यालयांमुळे आसपासच्या किमान दहा गावातील अर्थव्यवस्था बदलत असते . अनेक छोटे मोठे उद्योग त्यावर अवलंबुन असतात , शेकडो लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे कामधंदा मिळतो . ही अभियांत्रिकी विद्यालये म्हणजे एक प्रकारची अर्थव्यवस्थेतील चक्र आहेत. आणि आता ह्या चाकांची गती कमी होत आहे आणि काही ठिकाणी तर ही चाकं बंद पडली आहेत. याचे दुष्परिणाम  आता बऱ्याच ठिकाणी दिसायला लागले आहेत.

सगळ्यात मोठा धोका तर अभियांत्रिकी शिक्षणावरून लोकांचा उडणारा विश्वास हा अतिशय घातक आहे. व्हाट्स अप आणि मोबाइल घुसून  फालतू विषयात गुंग झालेल्या बथ्थड डोक्याना या विषयावर बोलायला वेळच नाही किंबहुना हा विषय समजून घेण्याची कुवतही नाही.  पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या विषयाकडे कमी होणारा कल हा आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाला किमान 25 वर्ष मागे घेऊन जाणार आहे.

विद्यार्थी संख्या घटलेने संस्थापक पगार देऊ शकत नाहीत , त्यामुळे राज्यात  बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची आंदोलन होत आहेत,  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत . गावोगावी अभियंते पडून आहेत त्यांचं आणि त्यांच्या बुद्धी च व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न  आहे. बऱ्याच ठिकाणी बांधलेल्या इमारतीच्या लाईटचे बिल भरण्याचीही कुवत संस्थापकाना राहिलेली नाही किंबहुना या अवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चरच करायचं काय ह्याच कोडं पडलं आहे काही ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा विचार चालू केला आहे आणि काही ठिकाणी सुरू झाल्याची आहेत.

आता याप्रश्नामध्ये सरकारही हतबल झालं आहे कारण या प्रश्नांची व्याप्ती खूपच वाढली आहे आणि गेल्या काही वर्षात अभियांत्रिकी शिक्षणात गुणवत्ता वाढवण्याचे केलेले प्रयत्न हे केवळ आणि केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या वृत्तीमुळे वाया गेलेले आहेत.
आता करत असणारे उपाययोजना ह्या दूरगामी विचार न करता तात्पुरत्या उपचारासाठीचे आहेत त्यामुळे त्याचे फायदे न दिसता तोटेच दिसत आहे....खरं सांगायच तर आपल्याकडे कुठलीही योजना तयार करताना प्लॅन B हा तयार पाहिजे पण तो तयार केला जात नाही.
या प्रश्नाचा तिढा तसा खूपच मोठा आहे आणि तो सुटावा यासाठी काय करता येईल यासाठी डॉल्फिन लॅब्स प्रयत्नशील आहे. अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातील आणि उद्योग क्षेत्रातील बरीच मंडळींचा सहवास डॉल्फिन लॅब्समध्ये मिळत असतो .यावर चिंतन आणि विचारमंथन होत असत.बरेच प्रयोग होत असतात. यावरून बऱ्याच गोष्टी मनात येत असतात.अभियांत्रिकी शिक्षण हे वाचल पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे.प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात आणि आपल्याला त्या दोन्ही बाजूला पाहिले पाहिजे.
या विषयावर तुमचे विचार जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
धन्यवाद.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860