Tuesday, December 25, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३४ )

*** सुकनारं टॅलेंट आणि आटणार हार्डवर्क ***

मन्सूर खुदबुद्दिन सुतार माझा सहावीतील मित्र. दारूच्या आहारी जावून गेला हे ज्यावेळी मी ऐकल त्यावेळी मन चरकल. पाचवी आणि सहावीतील माझा जानी दोस्त. अवांतर वाचनाची पुस्तके ,वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक, वायरी , बॅटरीचे सेल,वायरी , बॅटरीचे बल्ब, डी.सी. मोटारी , टेपरेकॉर्डरची कॅसेट , वेगवेगळ्या आकाराची नट,बोल्टस असल्या गोष्टीमध्ये दोघानाही इंटरेस्ट. दप्तर अशा गोष्टीने भरलेल असायचं. कधीतरी आमच्या एखाद्या शिक्षकांना लहर आली तर ते म्हणायचे महाजन आणि मन्सूर आणा तुमची जादूची पोतडी पुढं. झालं मग आमच्या दप्तरांच छान पैकी डिसेक्शन व्हायचं.
मन्सूरला अभ्यासापेक्षा काहीतरी बनवण्यात खूपच इंटरेस्ट असायचा. त्यात त्याच्या वडिलांच वेल्डिंगच दुकानं मग काय गाड्यांचे वगैरे पार्टस बघायला मिळायचे आणि आमच्या कल्पनेची विमाने पुऱ्या ब्रम्हांडात भ्रमण करून यायची. त्यामुळे त्याचेबरोबर खुपच मजा यायची . पण एकच प्रॉब्लेम होता स्वारीला अभ्यासाचा खूपच कंटाळा. त्यामुळे गृहपाठ , परीक्षा गोष्टीत खूपच मागे होता . त्यामुळे छड्या वगैरे ठरलेलं असायच आणि मार्क्स पण पडायचे नाहीत. पण त्याचा विचार न करता त्याचं कल्पनेचं विमान सुसाट सुटलेलं असायचं आणि त्याच्या मागे बसायला मलाही आवडायचं. सातवीनंतर मी दुसऱ्या शाळेत गेलो. मग हळूहळू संपर्क तुटत गेला . कधी कधी त्याचेबरोबर भेट व्हायची नंतर पूर्ण संपर्क तुटला. तो काही जास्त शिकला नाही. लवकरच त्याने मशिनरी वगैरे दुरुस्तीची कामे घ्यायला सुरुवात केली होती. त्यात त्याचा चांगला जम बसला होता असं कळलं होतं. मनात खूप इच्छा असायची त्याला भेटायची पण गेली कित्येक वर्ष भेटच झाली नाही. आणि आता हि बातमी जेव्हा ऐकली तेव्हा खूपच वाईट वाटले.
मला वाटते आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अशा गोष्टीचा अनुभव घेतला असेल. आपल्या वर्गात शिकणारी,आसपासची बरीच हरहुन्नरी मुले नंतर योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने वाया गेलेली तुम्हाला दिसतील. अशी मुले अभियांत्रिकी शिकत असतानाही आपल्याला भेटतात. यांची दुनिया वेगळी असते आणि त्यात डोकावण्यासाठी कुणाला वेळ नसतो. खऱ्या अर्थाने हि मुले टॅलेंटेड असतात पण हि मार्कांच्या पट्टीत कधीच बसत नाहीत. यांच मन असत कल्पनांनी भरलेल आणि तीच त्यांची ताकद असते. मन कल्पनेत वावरत असलेने यांना व्यवहार जमत नाही. त्यांच्या कल्पनेचा वेग आणि या जगाची चाल यांचेमध्ये खूपच फरक असतो.तसच अभियांत्रिकीचा बनलेला पुस्तकी अभ्यास त्यांना पेलत नाही कारण हा अभ्यासक्रम कल्पनांना वाव देत नाही तो टॅलेंटला वाव देणेसाठी नाही तर हार्डवर्क मोजण्यासाठी केलेला आहे . त्यामुळे हळूहळू यांच्या मनात डिप्रेशन येत, तासाला बसत नाहीत , दांड्या मारतात आणि हळूहळू व्यसनाचे आहारी जाताना दिसतात.
हि बाब फक्त विद्यार्थ्याबाबतच घडते असं नाही तर आपल्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये काही शिक्षकाबाबतही घडत असते . काही शिक्षक असतात हुशार . सतत ते काहीना नवीन काही तरी करत असतात . त्यांना प्रयोग करणे आवडते. त्यांना पी. एच. डी. वगैरे कागदामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. पण त्यांना वाव दिला जात नाही किबहुना त्यांना वाव देण्याची कोणती विशेष व्यवस्था आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केलेली आढळून येत नाही. अशा व्यक्तींना कुजवन्यातच धन्यता मानली जाते. त्यामुळे अशा शिक्षकांचाही नंतर शिकवण्यातील रस निघुन जात आहे .
टॅलेंट आणि हार्डवर्क या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीत असणे हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे. आमच्याकडे हार्डवर्कला अतिशय महत्व दिलेलं आहे आणि त्यामुळे टॅलेंट सुकून जात आहे.
टॅलेंट म्हणजे झरा आणि हार्डवर्क म्हणजे भरलेल्या टाक्या. टॅलेंटनं हार्डवर्क करायचच नसत त्याला मुक्त सोडायचं असत . मुक्तपणे. या झऱ्याच पाणी उपसायच असत .त्याच्या कल्पनेवर काम करायला हार्डवर्क करणारी माणसे लावायची असतात. पण आमच्याकडे या झऱ्याभोवती कठडे केले जातात आणि यांच्या विहिरी बनवतात लागेल तेव्हा पाणी हापसतात आणि त्यांची तुलना साठवलेल्या पाण्याबरोबर करून परत त्याच विहिरीची टिंगल करतात. आता हळूहळू सगळीकडेच दुष्काळ पडत चालला आहे. हार्डवर्कपण आटत चालल्या आहेत. आता परत टॅलेंटला शोधून त्यांना जपलं पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्याची हार्डवर्क बरोबर व्यवस्थित सांगड घातली पाहिजे .नाहीतर भवितव्य अवघड आहे .


Sunday, December 23, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३३ )

*** अडाणी शहाणे आणि शिकलेले अडाणी ***

प्रसंग एक : १९९७ साल . घरात आत्तीन दिलेला जुना शटरचा टीव्ही. बारा वर्ष वापरून( कि ताबलून ?) जुना झालेला म्हणुन स्वत:साठी नवीन घेताना हा जुना काय करायचा म्हणून भावावर केलेला उपकार. त्याला घरी आणला पण चित्र काही व्यवस्थित यायचं नाही. मी इंजिनियरिंगला दुसऱ्या वर्षाला होतो. वडिलानी सांगितले बघ काय होतंय ते खोलून. म्हटलं मला काय त्यातलं अजून येत नाही. बाप सटकल. म्हणालं तुला कशाला झक मारायला इलेक्ट्रोनिक्सला घातलाय काय? मी म्हणालो असल काय आम्हाला शिकवलेलं नाही. बाप परत चिडल. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये बघतोय तर बाप एच. ओ. डी. केबिनजवळ . विचार केला हि काय बला झाली पण विचारायची टाप नव्हती. एच. ओ. डी. आमचा राजा माणूस डी.डी.शहा सर. वडिलांनी विचारलं कि आम्ही एव्हड कष्ट करून हाडाची काड करून पोराला शिकवतोय आणि त्याला साधा टीव्ही रिपेअर करता येत नाही. काय शिकवताय तुम्ही त्याला? सरांची माझ्या वडिलांची समजूत घालता घालता पुरेवाट झाली. शेवटी वडलांनी सांगितलं कि पोराला बडवा , मारा, पुरा मी काही तुम्हाला विचारणार नाही पण माझ्या पोराला काय आल नाही तर मात्र चप्पल घेऊन येणार.
प्रसंग दुसरा: २०१२ साल .मी शिक्षक. विद्यार्थी नियमित येत नाही , प्रॅक्तीकलला बसत नाही, तासाला बसायचं सोडून कॉलेजच्या आवारात बोंबलत फिरत असतो म्हणून त्याचे वडिलांना फोन केला. कॉलेजन जबरदस्तीन आमच्यावर लादलेलं कर्तव्य . सांगायला गेलो तर ते डायरेक्ट म्हणाले कि काही सांगू नका मला सगळ माहिती आहे मी पण एका इंजिनियरिंग कॉलेजचा व्हाइस प्रिन्सिपल आहे. काही फरक पडत नाही. डोक्यावर हात मारून घेतला आणि कानाला खडा लावून घेतला.
मला वाटत वरींल दोन प्रसंग बऱ्याच जणांनी थोड्याफार फरकांनी अनुभवले असतील .
आजचा पालक शिकलेला( कि हुकलेला?) आहे. मोठ्या कष्टांनी त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिक्षण दिल आहे आणि त्यांनी सुद्धा खूपच कष्ट केले . शिक्षणासाठी खूपच हाल अपेष्टा भोगल्या . एक वेळच्या अन्नाला पण मोताद झालेले असतानापण त्यांनी शिक्षण घेतलं . आज जे सुख ते भोगत आहेत ते केवळ शिक्षणाच्याच ताकदीवर. पण स्वत:ला कष्ट करायला लागले ती वेळ आपल्या मुलावर येउ नये म्हणून हाच पालक मुलांचे अपार लाड करत आहे आणि त्याला मेहनत करण्यापासून परावृत्त करत आहे हि दुर्दैवाचीच गोष्ट आहे.
आज हि जी अभियांत्रिकी शिक्षणाच्या वेळ आली आहे त्याला पालक पण जबाबदार आहे . अभियांत्रिकी शिक्षण यंत्रणेचा पालक हा पण अतिशय महत्वाचा घटक आहे हे पालक विसरत चालला आहे . चार पैसे फेकून शिक्षण विकत घेता येत नाही तर त्याबरोबर पोरानं पण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या अभ्यासाची जबाबदारी पालकाची पण असते हेच तो विसरत चालला आहे . पैसे देतोय तर हे सगळ काम कॉलेजने केलं पाहिजे अस त्याला वाटत आहे . सहा महिन्यातून एकदा होणाऱ्या पालक मिटींगला यायला यांना वेळ नाही. पोरांना शिक्षा करायची तर परत अडचण , प्रात्यक्शिकाला नाही बसवायचा तरी प्रोब्लेम , त्यांना रागवायचं तरी प्रॉब्लेम. त्याला काही बोलायचं तरी प्रोब्लेम ....काय करायचं कॉलेजने. दगडानच जर छिन्नी मारून घ्यायला नकार दिला तर शिल्पकार काय डोंबल करणार. मग मूर्ती घडवणेसाठी लागणारे कष्ट घेण्यापेक्षा लाल रंग माखला कि झालं. हेच सगळीकडे चालू आहेत. स्वत:ला पोरग ऐकत नाही मग शिक्षकांनी काय करायच?. त्याचेजवळ काय जादूची छडी आहे काय ? हा पालकांनी पण विचार केला पाहिजे.
कधी कधी अस वाटत कि शिकलेल्या पालकांनी स्वत: जेव्हड त्यांचे मुलाचं नुकसान करत आहे तेव्हड त्याचे दुश्मन पण वाईट चिंतत नसतील .आज शिक्षणाची किंमत यांनीच ठेवली नाही. यांचेपेक्षा अडाणी आणि कमी शिकलेले बाप बरे होते.
शेतकरी पालक पिक लावलेवर दर दोन दिवसाने रानाकड जाऊन मशागत करतो. नोकरदार पालक रोज संध्याकाळी खर्चाचा अंदाज घेतो. व्यावसायिक पालक तर क्षणाक्षणाला फायदा तोट्याचा अंदाज घेत असतो . प्रत्येकाला आपल्या गुंतवणुकीची काळजी आहे. मग स्वत:च पोरग शिकतंय , ती पण एक गुंतवणूकच आहे हे कसं यांना कळत नाही . एव्हडी मोठी गुंतवणूक केली आहे तर तर त्याच्या प्रगतीचा महिन्यातून एकदा कॉलेजमध्ये जाउन अंदाज घेता येत नाही काय ?
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग 3२ )

*** पंख फुटलेले राजहंस,आणि.............. ***

काल एका सरांशी फोनवर बोलत होतो त्यांनी मला सांगितले कि ते एक कोर्स करायला लागले आहेत. म्हणाले कंटाळा आला या शिक्षकी पेशाचा आता इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे. आश्चर्याचा धक्का बसला. मग आनंदही वाटला. कारण त्यांचेसारखे अभ्यासू आणि प्रात्यक्शिकामध्ये हुकुमत असणारे या पेशात टिकू शकणार नव्हते आणि टिकले असते तरी या शिक्षण क्षेत्राला त्यांची काहीच किंमत वाटणार नव्हती. त्यामुळे पुढे मागे डिप्रेशनमध्ये जाणेऐवजी हेच चांगले. खूपच आनंद वाटला. पण रात्री परत हा प्रसंग आठवुन मन सुन्न झालं.
गेल्या सहा महिन्यात बऱ्याच शिक्षकांनी शिक्षकी पेशाला स्वत:हून टाटा केला. त्यापैकी बरेचजण हुशार होते आणि महत्वाचे म्हणजे ते त्यांच्या विषयावर हुकुमत असणारे आणि काहीतरी वेगळ करून पाहणारे होते. खरंच अभियांत्रिकी शिक्षणाला मंदी आली ते एका परीन बरच झाल कारण आता खरी ओळख होत आहे माणसांच्या खर्या व्यक्तिमत्वाची. आतापर्यंत वाघांच कातड पांघरून वाघाचा आव आणनाऱ्याची आणि स्वत: वाघ आहे हि जाणीव जागी झालेवर डरकाळ्या फोडणाऱ्यांची. या मंदीन बऱ्याचजणांच अस्तित्व जागं झालं.
बाजाराला जेव्हा सुरुवात तेव्हा काही हुशार लोक चुकून आणि काही लोक काहीतरी आदर्श घेउन उद्योगक्षेत्र सोडून शिक्षकी पेशात आले. मनात त्यांचे खूपच स्वप्ने होती. पण या पेशात आलेवर इथल्या अतिहुशार माणसांनी पहिल्यांदा त्यांचा अंदाज घेतला. त्यांच्या बुद्धीचा फायदा स्वत:साठी करून कसा घेता येईल ते पाहिले . गोड बोलून त्यांचे डोक्यावर कागदी कामाचे भूत बसवले . यांना वाटत होते कि आपले कौतुक म्हणून आपल्यावर जबाबदारी देत आहेत. पण नंतर त्यांना जेव्हा समजू लागल कि आपला पोपट होत आहे तेव्हा मात्र त्यांची तगमग वाढू लागली. ज्यांना विरोध करायला जमल नाही त्यातील काहीजण डिप्रेशन मध्ये गेले तर ज्यांचेजवळ हिम्मत होती त्यांनी स्वत:च्या ज्ञानाच उपयोग करून स्वत: चे काहीतरी उद्योग करायला सुरुवात केली . 
याचवेळी आणखी एक गोष्ट घडली ज्यांची लायकी नाही आणि इतर कोणतही काम मिळाले नाही त्यांनी या पेशात प्रवेश केला आणि नशिबाने बाजारात मागणी असलेने त्यांना संधी पण मिळायला लागली. खरे हुशार होते ते. त्यांनी ओळखल कि आपल्याला नशिबाने संधी मिळाली आहे आणि याचेशिवाय पर्याय नाही. मग काय जी हुजुरीला सुरुवात झाली आणि आमचे शिक्षण क्षेत्र नासायला सूरुवात झाली. काम कमी पण हांजी हांजी करून यांनी वरिष्ठांच्या वर्तुळात प्रवेश केला. घाणेरडे राजकारण सुरु झाले . टोळ्या बनल्या प्रत्येक विभागामध्ये. प्रत्यक्ष काम करणे ऐवजी विभागप्रमुखाचे भोवती कोंडाळ वाढू लागलं. कामाच्याऐवजी मिटींगा वाढू लागल्या , पाळती सुरु झाल्या . कागदी घोडी नाचायला सुरुवात झाली . सगळेजण बिनकामाच्या कामात व्यस्त झाले .याचा फायदा घेउन त्यांनी विद्यार्थी केंद्रित काहीतरी करायच्या ऐवजी स्वकेंद्रित कामे करायला सुरुवात केली. गोड बोलून ,कामे टाळून स्वत:च्या पदव्या घेतल्या. आणि खरंच ज्यांना काही येत होत त्यांचे आधी व्यवस्थितपणे वरची पदे कमावली.आज आमच्या अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रामध्ये या लोकांचे प्रमाण वाढले आहे. फोटो फ्रेम करून ठेवायच्या यांच्या पदव्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला वाचवु शकत नाहीत. आज अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राला यांच्या पदव्यांचा भार सोसत नाही आणि हेच कारण आहे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र कोसळायच . ज्यांना पंख आहेत ते उडून जात आहेत पण हे मात्र जाणार नाहीत. खरच खूप वाईट वाटत आहे भावी पीढीच.
पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Wednesday, December 19, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३१)



*** स्वायत्ततेची ऐशीतैशी ***

१९९९ ची गोष्ट आहे. माझा मित्र अक्षत केसरवाणी जो अलाहाबादचा होता त्याचा मित्र आला होता. त्याच बी.टेक. झाल होतं आणि नोकरीच्या शोधात तो इकडे आला होता. त्यान बी.टेक. म्हटल्यावर आश्चर्य वाटलं.
कारण बी.टेक. असुनही जॉब मिळत नाही म्हणजे माझ्या दृष्टीने खूपच आश्चर्यची गोष्ट होती . कारण त्याकाळी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मेरीट हे बी.टेक.साठी लागायचं. त्यावेळी बी.टेक. आणि बी. ई. मधील फरक नक्की काय असतो ते माहिती नव्हत कारण ते जाणून घ्यायची आमची लायकी पण नसायची. पण बी.टेक. म्हणजे लय भारी , जास्तच काहीतरी असं वाटायचं. मी याबाबत अक्षतला विचारलं तर तो म्हणाला आमच्याकडे बी.टेक. फालतू समजतात आणि बी .ई.ला खूपच किंमत आहे. बी.टेक. म्हणजे सगळे चिंधीचोर आहेत. त्यावेळी  काहींही डोक्यात घुसलं नव्हतं आणि मी ते विसरूनही गेलो होतो.
पण अलीकडे महाराष्ट्रात पण बी.टेक.च जे पेव फुटायला सुरुवात झाली  आहे ते पाहून मला त्याची आठवण झाली.
स्वायत्त महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी.टेक. डिग्री दिली जाते हे सोपं आता कळल. स्वायत्तता म्हणजे अभ्यासक्रम महाविद्यालय बनवणार. त्यांची प्रवेश प्रक्रिया वेगळी ,त्याची परीक्षा महाविद्यालय ठरवणार, पेपर त्यांचे वेगळे आणि तेच तपासणार . म्हणजे बऱ्याच बाबतीत सारे निर्णय हे महाविद्यालय स्वत: घेऊ शकणार. कितीतरी मोठी गोष्ट आहे हि. झपाटयान बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश करून  त्यानुसार विद्यार्थी घडवणार. खरंच खुप मोठी गोष्ट आहे. याबाबतीत आपल्याकडील स्वायत्त संस्थांनी खूप मेहनत घेउन या स्वायत्ततेचा आब राखला होता . त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचे विद्यार्थी घडायचे . बी.टेक. म्हणजे हमखास चागली नोकरी हे ठरलेलं होत . यामुळे आपल्याकडे बी.टेक. या पदवीला जास्तच महत्व प्राप्त झाल होत. स्वायत्त संस्था हि कमी होत्या त्यामुळे बी.टेक. चा भाव हा खूपच होता .
 मध्यंतरात  पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मध्ये बाजारामध्ये आलेल्या तेजीमुळे बरेच अभियांत्रिकी महाविद्यालये उभी राहिली. स्पर्धा सुरु झाली. पण गुणवत्ता राखता न आल्याने बऱ्याच महाविद्यालयांना टाळा लावायची वेळ आलेली आहे. अभियांत्रिकी शिक्षणावरचा लोकांचा विश्वास उडू लागला.  त्यामुळे  बी.टेक. च्या आकर्षणाचा उपयोग करून घेण्यासाठी काही महाविद्यालयांनी स्वायत्तता घेतली आहे . पण हि स्वायत्तता घेण्यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशातील स्वायत्त संस्थाचा अभ्यास करायला पाहिजे होता पण तो केलेला दिसत नाही. स्वायत्तता म्हणजे मनमानी नाही तर ती एक जबाबदारी असते , खूपच  मोठी जबाबदारी. हेच बऱ्याच स्वायत्तसंस्थेच्या लक्षात आलेलं नाही. स्वायत्तता हि दुधारी तलवार आहे हे ते विसरलेले आहेत. ठोस असा निर्णय घेऊन कार्यक्रम आखायच्या ऐवजी अजूनही काहीजण चाचपडत आहेत तर काहीजण प्रयोग करत आहेत. पण या प्रयोगाच्या नादात ते विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहेत. हेच त्यांच्या लक्षात येत नाही .स्वायत्ततेच्या नावावर मनमानी चालू आहे. अभ्यासक्रम स्वत: करायचा तर तो सोपा करायचा. शिकवताना जेव्हड जमेल तितकंच शिकवायचं आणि जेव्हड शिकवलं आहे त्यावरच पेपर काढायचा . झालं. पेपरही तिथंच तपासायचे मग काय विचारायला नको. निकाल पाहिजे तसा लावायचा. त्यामुळे स्वायत्तसंस्थेत प्रवेश घ्यायचा म्हणजे कमी त्रासात चांगल्या मार्काने पास व्हायची हमखास खात्री सध्या असा गैरसमज सगळीकडे पसरत चालला आहे . हे वेळीच आवरलं नाहीतर हे खूपच घातक आहे. नाहीतर अजून काही वर्षात महाराष्ट्राची पण अवस्था उत्तर प्रदेश सारखी व्हायची.

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .

चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Monday, December 17, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३० )

*** देवपण हरवलेले शिक्षण ***
एका गावात एक श्रीमंत राहात होता . त्याला देव पहायचा होता . त्यासाठी तो खूप साधुना , संताना , बुवांना भेटला. वाटेल तितका पैसा द्यायला तयार होता. पण देव दाखवणारे भेटत नव्हते . शेवटी एकाने सांगितले कि अमुक एक साधू आहेत ते दाखवतील. तो साधूला भेटला.साधूने देव दाखवायचं कबूल केल आणि वेळ पाहून त्याला त्यादिवशी सकाळी बोलावलं.
सकाळी उठून तो गेला. साधुमहाराजांच्या काखेत झोळी होती. त्यांनी त्याच्या खांद्याला अडकवली आणि न बोलता त्यांचे मागे यायची खूण केली. झोळी थोडी जडच होती. मुकाट्याने तोही त्यांचेमागे चालू लागला. बराच वेळ ते चालत एका डोंगराचे पायथ्याशी आले. साधु महाराजांनी डोंगर चढायला सुरुवात केली. याचे जवळ झोळी असलेने तो दमला त्याने हळूच झोळीत पाहिले तर चार विटा होत्या . त्याने साधुमहाराजची गयावया केल्याबर साधू महाराजांनी एक विट टाकायला परवानगी दिली. वजन थोडे हलके झाले. थोड्यावेळाने परत दम लागायला सुरवात झाली . आता साधू महाराज परवानगी देईनात. मग त्याने वाद घालायला सुरुवात केली. मग शेवटी साधू महाराजांनी परवानगी दिली. मग त्याने दुसरी विट टाकली.मग परत थोड्यावेळाने हळूच तिसरी विट टाकली . त्याची हि विट साधूमहाराजाने पाहिली होती पण ते काही बोलले नाहीत. ते शांत पणे चालत होते . आता तो निर्ढावलेला होता. त्याने चौथी विट साधुसमोर फेकून दिली. वजन हलके झाले होते.
आता ते डोंगराच्या माथ्यावर आले होते . त्याने साधुमहाराजांना विचारले देव दाखवा. साधू महाराज हसू लागले. म्हणाले मी कुठून आता दाखवू . तु टाकलेले विटा या मी पंधरा साधना करून सिद्ध केल्या होत्या. त्या विटावरच देवच अवतरण होणार होत . आता मी काही करू शकत नाही. श्रीमंत रडू लागला . मग त्याने साधूला वचन मागितले कि या झालेल्या प्रकारावर ते काहीही बोलणार नाहीत.
मग खाली आलेवर श्रीमंताने सांगायला सुरुवात केली कि त्याला देव भेटला. कुणी साधूला विचारले कि साधू फक्त मंद स्मित करायचे.
वरीलप्रमाणे आमच्या अभियांत्रिकीमध्ये घडते आहे. अभियंता बनायचे म्हणून विद्यार्थी महाविद्यालयात येतात. पण प्रत्येक वर्षी अभ्यास करायचा सोडतात. शेवटी रडत बसतात काहीही येत नाही. हातात फक्त पदवीचा कागद येतो . अर्थात इथे तप:साधना करणारे साधुपण खूपच कमी राहिलेले आहेत आणि कस लावणारे ज्ञानाचे डोंगर पण संपलेले आहेत .इथ फक्त संधीसाधुची भरमार होत आहे . आता खरी गरज आहे खऱ्या साधूंची पण हे साधू शोधणार कसे कारण ते देव दाखण्याची पदवी गळ्यात घेउन थोडेच फिरतात. आणि त्यांना ओळखणारे पण राहिलेले नाहीत.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Tuesday, December 11, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २९ )


*** इंडस्ट्री व्हिजीट: औद्योगिक भेट कि मनोरंजन सहली ***

गेल्या महिन्यात रायगडावर ट्रेकिंगला गेलो होतो . रात्रीचे नऊ वाजता धापा टाकत एक ग्रुप रायगडावर आला. पायरी मार्गाने आलेमुळे दमला होता. त्या ग्रुपमध्ये काही मुली होत्या त्या रडत होत्या. चौकशी केली तर तो ग्रुप धुळ्याकडील एका इंजिनियरिंग कॉलेजच्या कॉम्पुटर डिपार्टमेंटचा होता .अधिक चौकशी केली तर कळलं कि ते इंडस्ट्री व्हिजीट द्यायला पुण्याला आले होते .एकदोन कंपन्या पाहिल्या आणि मग फिरायला म्हणून रायगडावर हा ग्रुप आला होता. कुणाला रायगड विषयी जास्त माहिती नाही आणि रायगड चढायचा म्हणजे हजारच्यावर पायऱ्या चढायला लागतात याविषयी काहीही माहिती नाही. इतक्या उशिरा परत फिरायची सोय नाही. इतक्या पायऱ्या चढायची सवय नसल्यामुळे त्या मुली अगदी मेटाकुटीला आलेल्या होत्या. त्यांची अवस्था खराब झाली होती . त्यांनी होळीच्या माळावर आलेवर त्यांनी  मटकन बसकण मारली आणि आता त्या हलायला ही तयार नव्हत्या, त्यांच्या अंगात ते त्राणही उरलं नव्हतं . शिक्षक कोण आहेत ते पाहिलं तर अजूनही मिसरूड व्यवस्थित न भरलेले शिक्षक पाहिल्यावरच कल्पना आली. कसलीही माहिती नाही आणि इंडस्ट्री व्हिजीटच्या नावाखाली उत्साहाच्या भरात हे रायगडला आले होते .डोकं सटकल होत पण काय बोलणार?
इंडस्ट्री व्हिजीट हि मुलं जे शिकतात ते ज्ञान व्यवसायात कुठं वापरतात? यावर कोणते उद्योग चालतात?
कोणते उत्पादन तयार होतं? उद्योगाच इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं? त्या उद्योगातील उद्योजक ,तेथील मॅनेजर ,वर्कर ,तिथं वापरली जाणारी मशिनरी  याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून असते. पण या इंडस्ट्री व्हिजीटच रुपांतर पर्यटन सहलीत कधी झालं हे कळलंच नाही . या इंडस्ट्री व्हिजीटला मार्क्सपण ठेवले आहेत त्यामुळे घेणे गरजेचे. पण निव्वळ इंडस्ट्री व्हिजीट करायची म्हणजे मूलंपण येत नाहीत. मग काय एकदोन उद्योगांना भेटी आणि त्याबरोबर भरपूर पर्यटन असा सुवर्णमध्य साधला गेला आहे . काही संस्थांनी तर या इंडस्ट्री व्हिजीटच भांडवल  विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी केला आहे तर काही संस्थानी या इंडस्ट्री व्हिजीटचा उपयोग पैसे सुरु कमावण्यासाठी केला आहे . उद्योग भेटीसाठी हे विद्यार्थी काश्मीरपासून ते कन्याकुमारीला जातात. अशा उद्योग भेटी घडवून आणणारे एजंट आणि एजन्सी सुरु झाल्या आहेत . वेगवेगळी पॅकेजेस तयार होत आहेत. या उद्योग भेटीमधून खरंच काय साध्य होतं ?
बऱ्याच वेळा या इंडस्ट्री व्हिजीटच्या नावाखाली केवळ टाइमपास केला जातो. इतर वेळी चांगल्या ट्रेनिंगसाठी पैसे भरताना तोंड मुरडणारी मुलं या इंडस्ट्री व्हिजीटसाठी पैसे आणायला काहीही खळखळ करत नाहीत. इंडस्ट्री व्हिजीट आहे म्हणून पालकही मुकाटपणे पैसे देतात विचार करतात जावुदे तेव्हडीच पोराची हौस. पण या सगळ्या गोष्टीमुळे इंडस्ट्री व्हिजीटच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे हे कुणीही लक्षात घेत का नाही?
इंडस्ट्री व्हिजीटसाठी घरापासून हजारो मैल जायची खरंच गरज आहे काय ? इतकं दूर ज्या उद्योगाला मुल भेट द्यायला जातात तिथं असं काय बनतं जे आपल्या भागात बनत नाही. असं काय वेगळपण आहे त्या उद्योगात कि तिथ गेलेवरच शिकायला मिळेल?  याचा विचारच केला जात नाही. बरं जात असताना तिथल्या वातावरणाचा , हवामानाचा , अनुकूल वेळचा ,धोक्याचा पण अभ्यास केला जात नाही त्यामुळे उद्भवणाऱ्या संकटाचा अंदाज येत नाही आणि दुर्घटना घडत असतात.
याचा अर्थ उद्योगांना भेटी देऊ नये असा होत नाही त्या अतिशय गरजेच्या आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या उद्योगभेटी या अतिशय महत्वाच्या आहेत. हे उद्योगाची जागा म्हणजे एक त्यांचेसाठी मंदिरं आणि उद्योग क्षेत्रे (MIDC) त्यांचेसाठी खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहेत असं मी मानतो. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्याला सोल्डरिंगचा वास , मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना फ्लोअरवरचा ऑईलचा गोडसर वास , आय. टी. ,कॉम्पुटरच्या विद्यार्थ्यांना टिपिकल आय टी कंपनीत येणारा वास हे उदबत्ती आणि धुपासारखे वाटले पाहिजेत आणि त्याची त्यांना आवड लागली पाहिजे. त्यांनी सतत नवनवीन उद्योगांना भेटी दिल्या पाहिजेत. पण या भेटी देताना ज्ञानार्जन हा एकच उद्देश असेल याची काळजी घेतली पाहिजे.


पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Friday, December 7, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २८ )

*** विझलेली स्वप्ने आणि हरवलेले शिक्षण ***

अभियांत्रिकीच्या सध्या आलेल्या अवस्थेचा अभ्यास करत असताना धक्कादायक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे  विद्यार्थ्यांना ते जे शिक्षण घेतात ते काय आहे? ते  कशासाठी आहे? हेच माहित नाही. आश्चर्य वाटलं ना ? पण खरंच हे सत्य आहे. विद्यार्थ्यांना हेच माहित नाही कि इंजिनियरिंग शिकायचं म्हणजे नक्की काय शिकायचं ?
त्यांना एकच माहिती आहे कि घोकून पेपरमध्ये मार्क्स मिळवायचे , प्रॅक्टिकलला मार्क्स शिक्षक देतातच. किबहुना त्यांचा तो हक्कच आहे . फर्स्टक्लास मिळवायचा आणि  मस्तपैकी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिलेक्ट व्हायचं ,मिळेल त्या कंपनीत घुसायच. बाकी कुठला विषय? त्यात काय आहे ? तो कशाशी खातात याचे त्यांना काहीही घेणे देणे नाही. नोकरी मिळाली बस झालं. समजा नाही मिळाली प्लेसमेंट तर मग काय ? मग करा कुठलातरी कोर्स मिळतोय जॉब. याबाबत त्यांचे सिनियर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत असतातच. काहीही नाही झालं कि मग घरचा व्यवसाय/धंदा  आहेच.
लाखो रुपये देउन जे विषय शिकायचे आहेत त्या विषयासाठी रफ नोटबुक वापरण्याच्या त्यांच्या  दलिंदर मनोवृत्तीवरून अभियांत्रिकी शिक्षणाचं अवमूल्यन विद्यार्थ्याच्या मनात किती खाली झाल आहे हे कळून येत. वीस ,पंचवीस हजार रुपयाचा फोन बाळगणारा विद्यार्थी जेव्हा दोन/तीन  रुपयाच युझ आणि थ्रो पेन वर्गात नोट्स लिहून घ्यायला वापरतो त्यावेळी तो शिकत असणाऱ्या ज्ञानाला काय किंमत देतो हे लक्षात येऊन तळपायाची आग अगदी मस्तकात जाते. पहिल्या लेक्चरला नियमाने उशीर करताना त्यांना काहीही वाटत नाही अगदी कॉलेजच्या शेजारी राहणारी मुलेहि वेळेवर येत नाहीत. ऐंशी टक्के पेक्षा जास्त हजेरी असणारी मुले हि फक्त हजेरी पुस्तकातच असतात. बऱ्याच महाविद्यालयातील विद्यार्थी हे क्लास टेस्ट आणि सराव परीक्षेच्यावेळी काहीही अभ्यास न करता येतात. उत्तरपत्रिका कोऱ्याच देतात. दोन तासाच्या सराव परीक्षेला अर्धा तासही बसायची त्यांची इच्छा नसते आणि बळजबरीने बसवले तर निवांत डोकं बाकावर ठेवून निर्लज्यपणे झोपण्यापर्यंत मजल या विद्यार्थ्यांची गेली आहे . शिक्षकपण कशाला डोक्याला कटकट म्हणून सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करतात .
सगळ्यात दु:खाची गोष्ट म्हणजे आमच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यापुढे आदर्श नाहीत,गेल्या काही वर्षापासून ते घडलेच नाहीत. आदर्श हा संघर्षातून घडतो पण सामाजिक आणि शैक्षणिकक्षेत्रात आजकाल  कामाचा  संघर्ष इतका कमी केला आहे आणि बिनकामाचा संघर्ष इतका वाढवला आहे  कि त्यामुळे सगळ वातावरण बुळचट ,किरकिरं आणि कटकटीच  झाल आहे.  चमच्याने भरवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यामध्ये संघर्ष करायची वृत्तीच निघून गेली आहे. यांचे आदर्श म्हणजे म्हंजे सिनेअभिनेते किवा एखादा खेळाडू . जी काही थोडीफार आय.आय.टी. आणि परदेशातील इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांची उदाहरणे आहेत  ती पण ज्यांनी अभियांत्रिकी  शिक्षण अर्धवट सोडून स्वबळावर अस्तित्व निर्माण केले आहेत त्यांची . गेल्या कित्येक वर्षामध्ये अभियांत्रिकीचा महत्व सांगणारा एकही चमचमता तारा बनलाच नाही . जे काही घडले ते पाट्या टाकणारे हाय टेक क्लार्कस.
विद्यार्थी स्वप्न बघायची विसरूनच गेलेले आहेत . जी काही डोळ्यापुढे आहेत ती चायना मालाप्रमाणे फुटकळ आहेत आणि किती काळ त्यांच्या मनात राहतील याची शाश्वती नाही. अफाट अस स्वप्न पाहावं आणि ऊर फुटेस्तोपर्यंत त्याचा  पाठलाग करावा अशी धमक आता यांच्यात उरलेली नाही. थोड्या थोड्या कारणाने अस्वस्थ होणारी हि पिढी कुठल्याही विषयात खोल जायला तयार नाही.
का झालं हे असं? साधारणतः वीस ते पंचवीस वर्षापूर्वी बस थांब्यावर  उभा राहिलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी हा शंभर पोरामध्ये ओळखून यायचा. त्याच्या वागण्यामध्ये एक attitude दिसायची. आजचं  शिक्षण हे पदवी देत आहे पण attitude घडवायला कमी पडत आहे. मुलामधील अभियंता जागवणेऐवजी पदवीचा कागद देत आहेत . पैसे देऊन पदवी विकत घेता येईल पण ही attitude कुठून आणायची?
आता खरी गरज आहे यांचेपुढे आदर्श निर्माण करणेची. त्यांचेमध्ये attitude जागविणेची , त्यांच्या डोळ्यात नवीन स्वप्ने भरायची ,ते इतक्या सहज पणे होणार  नाही पण त्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत.

पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

Thursday, December 6, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २७ )

कोण्या एका गावात एक भजीवाला होता . त्याच्या हातच्या भजीच्या चवीची पंचक्रोशीमध्ये ख्याती पसरली होती . खूपच चांगला व्यवसाय चालला होता. छान हॉटेल बांधलं होत आणि मजेत संसार चालला होता. त्याचा मुलगाही हुशार होता म्हणून त्याला त्याने खूप शिकवायचं ठरवलं होत . पदवीपर्यत तालुक्याच्या ठिकाणी शिकल्यावर त्याला एका चांगल्या हायफाय मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये घातलं. पोरग दर आठवड्याला गावी आलं कि तो बापाला नवीन नवीन गोष्टी सांगायचा. बाप पण कौतूकान ऐकायचा. एक दिवस पोरानं जगाच्या बाजारात मंदी येणार आहे आणि कॉस्ट कटिंग केल पाहिजे असं काहीतरी वाचलं. तो काळजीत पडला. रविवारी घरी आलेवर गंभीरपणे म्हणाला कि बाबा मंदी येणार आहे म्हणून आपण कॉस्ट कटिंग केली पाहिजे. वडिलांना काही कळेना पण येव्हड शिक्षण घेतलेलं पोरग सांगतय तर काहीतरी वेगळ होणार असं त्याला वाटलं . भांबावला तो. पोरग जास्त वाचायला लागलं आणि कॉस्ट कटिंगवर अक्कल पाजळू लागलं. बापाला काय सुचेना त्याच्या डोक्यात मंदी आणि मंदीनंतर काय होणार या चिंतेने तो घाबरू लागला . पोराचे सल्ले ऐकू लागला. 
पगाराचे पैसे वाचवण्यासाठी त्याने हॉटेलमधील हाताखालची माणसं कमी केली.लाईट बिल वाचावयाच्या नादात हॉटेलवरील रोषणाई कमी केली. माल कमी दर्जाचा वापरायला सुरु केली. रोजच्या पेक्षा भजी कमी करायला सुरुवात झाली. प्लेटा गेल्या,कागद आले. दिवसभर मंदी येणार या चिंतेच्या तणावाने चेहऱ्यावरचे हसू मावळले. त्यामुळे वागण्यात चीड चीडपणा यायला लागला परिणामी गिऱ्हाईक तुटू लागले. त्यामुळे परत तणाव परत कॉस्ट कटिंग.. हळूहळू हॉटेलची कळा गेली . त्याचा फायदा घेउन दुसर हॉटेल शेजारी उभं राहिलं.याच सारं गिऱ्हाईक तिकड जाऊ लागल,धंदा बसत गेला आणि एक दिवस मंदी दारात आली त्यान हॉटेल बंद केलं. पोराला म्हणाला बरं झालं तुला शिकायला पाठवला म्हणून मंदी येणार ते आधीच कळल तु शिकला नसता तर खूपच वाईट झालं असत . म्हणून पोराला शाबासकी देऊन त्याच्या हुशारीची तारीफ सगळ्यांना सांगत फिरू लागला. 
सध्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अवस्थेची कारणे वरच्या गोष्टीत आढळून येईल. बऱ्याच व्यवस्थापनाने या मंदीचा धसका घेतला आहे त्यातच अतिशहाणे लोक त्यांना सल्ले देत आहेत, काहीजण स्वत:च्या डोक्याने कोस्ट कटिंग करायला सुरुवात केली आहे. पण या सगळ्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे आणि परत त्याचा विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होत आहे. हे चक्र गेले चारपाच वर्ष चालू आहे. आता तर सगळीकडे हतबलता आली आहे. गुणवत्ता वाढवण्यासाठी पैसे खर्च करायच्या ऐवजी मानांकने मिळवण्याठी पैसे उधळायला सुरुवात झाली आहे. आता या मानांकनामधील फोलपणा सगळ्यांच्या लक्षात येउ लागला आहे . किती दिवस त्या मानांकनाच्या जीवावर जोगवा मागायचा हे आता कळल पाहिजे. रोगी जेव्हा अतिदक्षता विभागात असतो त्यावेळी त्याच्यावरचा खर्च वाचवायचा नसतो तर त्याला वाचावयाच असत. हे सोपं सूत्र विचारात घेतलं पाहिजे.
हि खरी वेळ आहे काम करायची , विद्यार्थ्यासाठी कष्ट घ्यायची. त्यांचेसाठी नवीन योजना राबवण्याची. शिकत असलेला विद्यार्थी कसाही असो त्याविषयी कुरकुर न करता त्याला शिकवण्यासाठी तळमळ जागवण्याची . प्रत्येक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षकांना विश्वासात घेतलं पाहिजे. नवीन विद्यार्थी केंद्रित योजना आखायला पाहिजेत . त्या आखताना दुधात मिठाचे खडे टाकणारे वेळीच बाजूला केले पाहिजेत. शिक्षकांनीही ठरवलं पाहिजे कि येणारी तीन वर्ष जे काहीही होईल ते कष्ट करू आणि असे विद्यार्थी घडवू कि त्यानंतर अॅडमिशनसाठी भिकाऱ्यासारखे गावोगावी कुठल्या क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये फिरायची वेळ येणार नाही. शेवटी काहीही असो जर गुणवत्ता असेल तर विद्यार्थी जगाच्या कुठल्याही टोकाकडून तुमच्याकडे येईल ... अगदी झक मारत . 
एक गोष्ट आयुष्याने शिकवली आहे कि विहीर हि दुष्काळातच खणायची असते. जर पाणी लागलं तर ते पाणी कायमस्वरूपी मिळेल आणि जरी नाही लागले तरी आपल्या प्रयत्नामुळे ती इतकी खोल गेलेली असेल कि एका पावसात आयुष्यभर पुरेल इतक पाणी साठेल.
पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.com या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २६ )

तंत्रज्ञान आज झपाट्याने बदलत आहे. या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यावर भविष्याचा अंदाज घेउन आपली अभ्यासविषयक धोरणे ठरवली पाहिजेत. त्यामध्ये सातत्याने आपण मागे पडत आहे. अपारंपरिक उर्जा निर्मिती , ड्रोन तंत्रज्ञान, ३ डी प्रिंटींग, हायब्रीड व्हेइकल या सारख्या विषयांचा युद्धपातळीवर अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे .अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या ऐच्छिक विषयासाठी असलेल्या नियमांच्या तरलतेचा फायदा घेतला पाहिजे. वरील तंत्रज्ञानाच चार ,पाच वर्षापूर्वीच खेळण होउन आमच्या सहा सात वर्षाच्या मुलाच्या हातात येउन पडलं तरी आमच्या शिक्षणक्षेत्राला त्याचा पत्ताही नाही . रिमोटवर चालणारी हेलिकॉप्टर, ड्रोन,३ डी प्रिंटर हि याची उत्तम उदाहरणे आहेत.
तंत्रज्ञानाची माहिती व्हायला अवांतर वाचन पाहिजे , अभ्यास पाहिजे . अभियांत्रिकीच्या सगळ्या शाखांचा परस्पर संबंध आहे त्यामुळे आपल्या शाखेबरोबर इतर शाखांचाही अभ्यास पाहिजे. आमचा हा अभ्यास कमी पडत आहे कुठंतरी भविष्यात पहायची क्षमता कमी पडत आहे . बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगक्षेत्रामध्ये होणाऱ्या घडामोडीचा वेध घेऊन त्यावर swat विश्लेषण करून त्यावर आधारित्त विषयाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात करता आला पाहिजे.अंड्रोइड प्रोग्रामिग, पायथॉन प्रोग्रामिंग , आर्टिफीशियल इंटीलीजंस, डाटा अॅनॅलीसीस यासारखे विषय जवळजवळ बाजारात आल्यापासून त्यांना अभ्यासक्रमात टाकणेपर्यंत बरीच दिरंगाई झाली आहे . अजूनही त्यावर आधारीत अभ्यासक्रमात आणलेले विषय याचं स्वरूप निट ठरलेले नाही. त्याचा अभ्यास असणारे शिक्षक नाहीत. एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याबाबतीत प्रोजेक्ट्विके हे शिक्षकापेक्षा खूपच प्रगत आहेत किंवा बहुतांश तंत्रज्ञानाची माहिती हि या प्रोजेक्टविक्यांच्यामुळे शिक्षकांना होत आहे. हि एक शोकांतिकाच आहे .
इलेक्ट्रॉनिक्स या शाखेच्या भविष्याचा मागोवा घेता आलेला नाही त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक्स आज जात्यात आहे तर मेकॅनिकल सुपात आहे.येणाऱ्या कालावधीत वाहन उद्योगात मोठी क्रांती होत आहे. बरीच वाहने बॅटरीवर चालणार आहेत. मग अशावेळी आय. सी. इंजिनचा वापर कमी होणार आहेत. आपली मेकॅनिकल इंडस्ट्री बऱ्यापैकी वाहन उद्योगावर अवलंबून आहे त्यामुळे वेळीच विचार केला नाही तर एक दोन वर्षात मेकॅनिकल शाखेची अवस्था पण इलेक्ट्रॉनिक्ससारखी होणार आहे. किबहुना व्हायला सुरुवात झाली आहे. कॉम्पुटर आणि आय. टी. मध्येही आपली पोर प्रोग्रामिंगमध्ये मागे पडत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अजून कमी दर्जाच्या कामावर त्याची निवड होत जाईल. 
इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत अजूनही आम्ही कम्यूनिकेशन क्षेत्रामध्ये भरपूर रोजगार वाढ होणार आहे अस दरवर्षी प्रोजेक्ट करत आहे आणि जे तद्दन खोट आहे . कारण जस तंत्रज्ञान प्रगत होत चालल आहे तशी अभियंत्यासाठीची कम्यूनिकेशन क्षेत्रामधील रोजगार निर्मिती कमी होत चालली आहे. त्यामुळे आम्हाला इलेक्ट्रॉनिक्ससाठी कम्युनिकेशन क्षेत्र प्रोजेक्ट करण सोडलं पाहिजे आणि इतर क्षेत्र शोधली पाहिजेत आणि त्यावर आधारित बदल अभ्यासक्रमात केले पाहिजे. अशाप्रकारे नवीन तंत्रज्ञान आणि त्यावर तयार होऊ घातलेली क्षेत्रे आणि त्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या संधी या शोधण्यासाठी एक वेगळी फळीच तयार केली पाहिजे. 
आत्ता इथून पुढे इंजिनीयरसाठी रोजगार निर्मिती हि कमीच होणार आहे. पण याच्या उलट असंहि म्हणता येईल कि इंजीनियर्सना आता नवीन तंत्रज्ञानाला शिकून त्यावर आधारित उद्योग सुरु करायला खूपच वाव आहे. 
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २५ )

*** थोड डॉल्फिन लॅब्सविषयी ***
अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राविषयी लिहिण्यासारखं बरंच आहे आणि ते चालुच राहिल कारण तो इतक्यात संपण्यासारखा विषय नाही. पण बऱ्याच लोकांना माझेबद्दल आणि डॉल्फिन लॅब्स बद्दल जिज्ञासा आहे तर थोडी त्याविषयी माहिती देतो. 
मित्रानो ,२००६ साली मी चुकून शिक्षणक्षेत्रात आलो . त्यापूर्वी मी उद्योगक्षेत्रात काम करत होतो . तसा मी इलेक्ट्रोनिक्स शाखेचा विद्यार्थी आहे पण मला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या शाखेशी निगडीत डिझाईनविषयक काम केल त्यामुळे त्या शाखेविषयी बरीच माहिती झाली. त्यावेळी एम्बेडेड सिस्टममध्ये काम चालत असलेने कॉम्पुटर प्रोग्रामिंग आणि कर्नेल डेव्हलपमेंटचा अनुभव आला. अशा रीतीने अभियांत्रिकीच्या पाचही शाखामधून कामाचा बऱ्यापैकी अनुभव घेतला होता. 
या क्षेत्रात आलो त्यावेळेसच जाणवलं होत कि इथं काहीतरी चुकत आहे. माझेपरीन मी त्यावेळी सहकाऱ्यांशी,वरिष्ठांशी या विषयावर चर्चा करायला सुरवात केली पण त्यावेळी बाजाराला तेजी यायला सुरवात झाली होती त्यामुळे कुणालाही चर्चा करायला रस नव्हता. याकाळात मी स्वत: बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतला . माझी टिंगलटवाळी ,कुरघोडी,उपहास, अपमान हे करणारेही हि खूपच जण होते . उद्योग क्षेत्रातून आलेला माणूस म्हणजे समुद्रातला मासा जर विहिरीत चुकून आला तर त्याची काय अवस्था होते ती मी अनुभवली. या शिक्षणक्षेत्रामध्ये बरेच चांगले लोक भेटले ...तसं मुळात कुणीही वाईट नसत पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत नाही. चांगला मंत्र समजला. त्यामुळे मित्रही वाढत गेले. सगळ्याच शाखेत रस असलेने सगळ्या शाखामधील शिक्षकांशी संबंध वाढत गेले.
हळूहळू कळत गेलं कि कुणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सगळे एका प्रवाहाचा भाग आहेत त्यामुळे त्यानाही प्रवाहाप्रमाणे वाहत राहणे भाग आहे. मनाला एक शांती मिळाली. मग या शिक्षणक्षेत्रावरच प्रयोग करायला सुरुवात केली. बरेच चांगले आणि स्वत: ओढवून घेऊन वाईट अनुभव घेतले . त्यातून बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. 
अशातच २०१२ साली एक विद्यार्थी मला म्हणाला, सर,काहीतरी काम द्या नोकरी मिळत नाही. तसा तो साधारण विद्यार्थी होता . गणेश कळंबे त्याचं नाव. त्यावेळी त्याचेसाठी काहीतरी कराव म्हणून त्याला माझे घरी काही पार्टस होते त्यातून थोडं सर्किट बनवायचं काम दिल. थोडे दिवस रुळला त्याला काम मिळाल . मग दुसरा आला त्याच नाव शैलेश आडनाव विसरलो. तो थोडे दिवस होता. अर्थात हे काम म्हणजे पदरचे पैसे घालणच होत. नंतर त्यालाही जॉब मिळाला . आज गणेश कळंबे सिमेन्स मध्ये आर. अँड डी. इंजिनियर आहे. अतिशय सामान्य विद्यार्थी पण त्याला मार्ग मिळाला . शैलेशही पण आज चांगल्या मोठ्या पदावर आहे . हि कदाचित डॉल्फिन लॅब्सची सुरुवात होती. डॉल्फिन लॅब्सवर लिहायचं म्हणजे कादंबरी होईल. लवकरच डॉल्फिन लॅब्सची गोष्ट या नावाने त्यावरील लेखन प्रसिद्ध करण्याचा माझा मनोदय आहे.
हळूहळू शिक्षक या शब्दाच्या जबाबदारीची जाणीव होउ लागली . शिक्षक या शब्दाला मान देउन डॉल्फिन लॅब्सने बरेच उपक्रम हाती घेतले . जर एखादी गोष्ट मी करु शकत नाही तर त्या गोष्टीची जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही या गोष्टीच भान आलं. कुठलाही विद्यार्थी टुकार नसतो हे कळल.कितीतरी वाया गेलेले विद्यार्थी डॉल्फिन लॅब्समध्ये आले आणि मार्गाला लागले. काही विध्यार्थ्यांना उद्योगात रस होता त्यानाही डॉल्फिन लॅब्सने मदत केली. जवळ जवळ एकवीस उद्योगाची सुरवात डॉल्फिन लॅब्समध्ये झाली. जवळ जवळ अकरा पेटंटच्या मागे डॉल्फिन लॅब्सचा खारीचा वाटा आहे.डॉल्फिन लॅब्समध्ये जो आला तो मोकळ्या मनाने कधीच परत गेला नाही आणि यापेक्षाही पुढे जावून मी म्हणेन कि जे डॉल्फिन लॅब्समध्ये आले ते डॉल्फिन लॅब्सचेच झाले.
डॉल्फिन लॅब्समध्ये तिसरी पासून अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या शाखेचे विद्यार्थी येत असतात.डॉल्फिन लॅब्सचा मेंबर जो आठवीत आहे तो सुद्धा बी. इ. फायनल इयरच्या तोडीचा प्रोजेक्ट एकटा करू शकतो.याला कारण आम्ही शिकवण्याची एक वेगळी पद्धत विकसित केली आहे . या पद्धतीवरच आधारित आम्ही वर्क शॉप्स ,ट्रेनिंग प्रोग्रामस आणि इंटर्नशिप प्रोग्रामस घेत असतो.डॉल्फिन लाब्सच्य इंटर्नशिप प्रोग्रामला तर महाराष्ट्रातील वेगेवेगळ्या जिल्हातील विद्यार्थी येत असतात. 
आता पर्यंतच्या पर्यंतच्या प्रवासात विविध प्रकारची माणसे , विद्यार्थी भेटले. हौशे , गवशे आणि नवशे भेटले. स्वत:च काम झाल कि परत शिंतोडे फेकणारे भेटले. कामापुरत गोड बोलून फसवणारे हि बरेच भेटले. शिक्षकी पेशाला काळिमा असणारेही भेटले. पण चांगली माणस इतकी भेटली कि त्यापुढे हि लोक नगण्य झाली. 
सध्या मी पूर्णवेळ अभियांत्रिकी शिक्षणप्रसारासाठी काम करत आहे. अलीकडे मी जे काही लिहित आहे त्याला एका तपाच्या अनुभवाची आणि प्रयोगाची जोड आहे आणि तोही क्रियाशील अनुभव. डॉल्फिन लॅब्स हि खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी शिक्षणावर प्रयोग करणारी एकमेव लॅब्स आहे . अभियांत्रिकी क्षेत्र हे वाचल पाहिजे आणि त्यासाठी मी डॉल्फिन लॅब्सच्या माध्यमातून काम करत आहे. डॉल्फिन लॅब्सची सध्याची भूमिका काय आहे त्याविषयी मी एक वाचलेली लहान गोष्ट सांगतो.
जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी चोचीने पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न करत असते. ते पाहून एक कावळा तिला म्हणतो कि तू कितीही प्रयत्न केलेस तरी हि आग विझणार नाही.अशा वेळी ती चिमणी म्हणते कि या जळलेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझे नाव ‘आग’ लावणार्यात नाही तर आग विझावणार्यात येईल. डॉल्फिन लॅब्सची भूमिका हे या चिमणीची आहे.
सुदैवाने आपल्या अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रात लागलेली आग अजूनही भडकलेली नाही त्यामुळे प्रयत्न केला तर नक्की विझेल आणि अभियांत्रिकी शिक्षणाला परत सोन्याचे दिवस नक्की येतील. डॉल्फिन लॅब्स सर्वाना मदत करायला तयार आहे आणि सर्वांच डॉल्फिन लॅब्समध्ये स्वागत आहे .
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०