Wednesday, September 27, 2023

((((( Out of Box Thinking - अभ्यासक्रम आणि मानवी उत्क्रांतीशी स्पर्धा )))))

 


 ज्यावेळी मी पहिल्यांदा या शिक्षण क्षेत्रात २००७ साली  आलो त्यावेळी  एका अभियांत्रिकी महाविद्यालयात जॉईन झालो होतो . तिथ एक पहिल्यांदा प्रकार बघितला. त्या कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणजे अती हुशार (त्यांच्या मते ) होते. दर मिटींगला काहीतरी नवीन आयडिया मांडायचे . माझी पहिलीच मिटिंग होती .मी सगळ्यात पहिल्या रांगेत बसलो होतो  होतो .  त्यांनी कल्पना मांडली आणि म्हणाले कोण कोण तयार आहे यासाठी . मला काही कळल नाही . ती कल्पना पण अव्यवहार्य होती . दोन तीन क्षण गेले मला अस जाणवलं कि ते माझेकडे रोखून बघत आहेत . मी चमकून इकडे तिकडे पाहिले तर सगळ्यांनी बोट वर केलं होत . मी थोड बावचळून हळूच बोट वर केलं . नंतर आठवडाभर डिपार्टमेंट मध्ये त्या कल्पनेसाठी कागद जमवण चालू होत. 

 पुढच्या मिटिंग पासुन मला माझ्या सहकाऱ्यांनी मला शहाण केलं होत. त्यांनी काही सांगितल कि लगेच हात वर करायचा नाहीतर सरांना राग येतो . पण या अव्यवहार्य कल्पना राबवताना स्टाफची किती दमछाक होते याची कुणाला  काही घेण देन नव्हत .आणि त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही कल्पना पूर्ण पण झालेल्या मला पाहायला मिळाल्या नाहीत  .

त्यानंतर हा प्रकार थोड्याफार बदलाने  जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पाहिला.

**********************************************************************************

आज जे शिक्षण क्षेत्रात सगळीकडे जे प्रयोग चालले आहेत ते पाहिलं तर अशी भीती वाटते कि हे प्रयोग करणारे विचार करतात का ?  त्यापेक्षा वाईट म्हणजे कुठलाही विचार  करता अहो रूपम , अहो ध्वनी म्हणून विचार न करता लगेच त्या प्रयोगाला डोक्यावर घेणारी जी जमात आहे, त्यांना हे कळत का कि याचे परिणाम पुढ त्यांच्याच पिढीला भोगायला लागणार आहे . 

मानव ज्यावेळी पृथ्वीवर अस्तित्वात आला त्यावेळेपासून आजच्या या अवस्थेला यायला लाखो वर्षे लागली . हळूहळू मानवाचा  मेंदू  वेगवेगळ्या अनुभवला तोंड देत उत्क्रांत होत गेला . एक एक ज्ञानशाखा सुरु व्हायला अगदी अलीकडच्या दहा हजार वर्षापासून सुरुवात झाली . कला , वाणिज्य , विज्ञान आणि अगदी अलीकडे अस्तित्वात आलेल्या तंत्राशाखा .

 हे जर पाहिलं निर्माण होणाऱ्या  तर ज्ञान आणि   माहितीचा वेग हा  अगदी घातांकीय वेगात वाढत चालला आहे . प्रत्येक क्षेत्रात होणारी  अवाढव्य  प्रगती पाहिली तर त्यामानाने माणसाच्या मेंदूमध्ये होणारी वाढ आणि मेंदूचा होणारा विकास हा  अगदी नगण्य आहे. 

मेंदू आणि मेंदूच्या विकासाचा वेग ध्यानात न घेता निव्वळ फार्स करून पैसा कमवायची  प्रथा सुरु झाली आहे . २०१० पासुन जर तुम्ही पाहिले तर मुलांच्या बुद्धीमतेचा जर अंदाज घेतला तर त्यामध्ये वाढ होण्याऐवजी कमतरता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे . याला कारण कि ज्ञानात निर्माण होणारी विविधता आणि त्याचबरोबर मेंदूची वेगवेगळ्या कार्यामध्ये होणारी विभागणी वाढत आहे . त्यामुळे प्रत्येक विषयावर होणाऱ्या विचाराची खोली कमी होत चालली आहे.  आजचे विद्यार्थी जरी तंत्रज्ञान हाताळणे यामध्ये कुशल असली तरी त्यांच्या बुद्धीच्या  किंवा मेंदूच्या  वाढीत काहीही बदल झालेला नाही.तसेच निरीक्षण , चिंतन  अनुभवाच्या आधारे अनुकरण आणि शेवटी अवलंबन या ज्या  शिकण्याच्या पायऱ्या आहेत त्यामध्येही अजुन बदल झालेला नाही . 

मुलांच्या मध्ये संशोधकता , विचार करण्याची प्रवृत्ती वाढवायची असेल तर त्यांच्या मेंदूला विचार करायला पुरेसा वेळ दिला पाहिजे . त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी अभ्यासक्रमात जागा ठेवल्या पाहिजेत पण या ऐवजी  त्यांच्या  अभ्यासक्रमात अकारण वाढत जाणारे  विषय , मेजरच्या बरोबर डोंबलावर पडणारे मायनर चे अधिकचे विषय ,  निष्कारण वाढवलेले प्रोजेक्टचे ओझे , वेगवेगळे बनवायचे  रिपोर्ट , वेगवेगळी  क्रेडीट  याखाली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता    घुसमटून जात आहे.  काही विषय असे आहेत कि त्यांची पूर्वतयारी करायसाठी लागणारे विषय हे एक तर अभ्यासक्रमात नाहीत किंवा तो विषय नंतर घेतला जातो . विषयाची गुंफण चुकत चालली आहे आणि इतर अनेक गोष्टींचा विद्यार्थ्यावर होणारा भडीमार वाढत चालला आहे . 

आपले विद्यार्थी, त्यांची आर्थिक , सामाजिक परिस्थिती . आपल्याकडे गेल्या शंभर वर्षापासून आलेली शिक्षण पद्धती याचा विचार न करता कुठल्यातरी पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा अचानक करत असलेला अवलंब . क्रांतिकारक बदलाच्या नावाखाली  शिक्षणात होत जाणारे बदल हे देशातील शिक्षण हळूहळू  संपवून  टाकेलं काय अशी मला भीती वाटत  आहे .  अर्थात शिक्षण हे कधी संपत नाही पण काही काळाने मागे अवश्य ढकलले जाऊ शकते .

मानवाचे जन्मापासून त्याच्या मेंदूमध्ये होणारे बदल याच्या वेगामध्ये बदल झालेला नाही .पण हे सगळ लक्षात न घेता आज जे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करण्याचा घाट घातला आहेत त्याला पाहिले तर अस वाटत कि  मानवाच्या उत्क्रांतीच्या वेगाशी चाललेली शिक्षण क्षेत्राची स्पर्धा देशाला कुठ घेऊन जाणार ?


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६० 






Sunday, September 24, 2023

!!!!!!! ५५५ आणि व्होल्टेज मल्टीप्लायर !!!!!

 २००२ सालची  गोष्ट आहे . त्यावेळी  मी  साताऱ्यात स्वतःचा व्यवसाय सुरु केला . पार्टनरशिपमध्ये होता .  मी व्यवसाय का करत गेलो तर मला त्यावेळी पुण्यासारख्या ठिकाणी येउन राहायला आणि नोकरी शोधायला पैसे जवळ नव्हते आणि व्यवसाय सुरु करायला काय लागतय? . एक  मल्टीमीटर , सोल्डरिंग गन आणि दोन चार स्क्रू ड्रायव्हर  बस ...... अजुन काय?  हा , स्कील लागतंय त्याचा  काय  पहिल्यापासूनच महापूर  आहे आपल्याकडे  . तर एव्हढ्या भांडवलावर (आणि थोड्बहुत पार्टनरचे अर्थात पैसे . तेपण सांगितलं तर हसाल  त्याविषयी नंतर कधीतरी). तर मी साताऱ्यात व्यवसाय सुरु केला . देशमुख वस्तीमध्ये दोन रूम च्या घरात . 

त्यावेळी माझी आणि  बापूंची गाठ पडली  अर्थात हे बापू म्हणजे सगळीकडे दिसणारे बापू नव्हेत ,पण या बापूकडून मी बरंच शिकलो . माझ्या मित्राने त्यांची गाठ घालून दिली होती. साधा आय. टी. आय. माणुस (ते पण केलं होत कि नाही नक्की लक्षात नाही ). बापू म्हणजे हरहुन्नरी माणूस .त्यांच्याकडे एम. आय. डी. सी. मधील बऱ्याच इंडस्ट्रीच्या मोटर विषयी काम असायचं .  लहान आकाराच्या  मोटर पासुन मोठ्या मोटर   त्यांच्या तिथे खोलून बापूंच्या हस्त स्पर्शाची वाट बघत   इतस्तत: पडलेल्या असायच्या . मोटर रिवायडींग करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता .

 त्यावेळी सातारा एम आय डी सी मध्ये पावडर कोटिंगचा व्यवसाय अगदी बहरात आला होता . पावडर कोटिंग साठी आधी जॉबवर पावडर स्प्रे गनच्या सहाय्याने वेगवेगळ्या रंगाची  पावडर फवारली जायची .मग हि पावडर वितळून जॉबवर बसण्यासाठी त्या जॉबला एका भट्टीत घालायला लागायचं. हि भट्टी गरम करण्यासाठी  इलेक्ट्रिक हिटर असायचे .

त्यावेळी   एकतर  लोडशेडींगचा मोठा प्रॉब्लेम होता आणि त्यात विजेचे दर पण परवडायचे  नाहीत त्यामुळे बापूंनी गॅसचा पर्याय वापरून भट्टी बनवायला सुरुवात केली  होती . अर्थात त्यांनी नुसती सुरुवात केली होती त्यामुळे त्यांचे प्रयोग चालू होते . त्यांना इलेक्ट्रोनिक्ससाठी  माझी गरज होती . त्यामुळे त्यांनी मला लगेच सामील करून घेतले (अर्थात पैसे घंटा दिला नाही  पण  मी अनुभव भरपूर घेतला  ).

त्यांना गॅस डिटेक्ट करून , स्पार्क पाडून  भट्टी चालू करायची होती . आता सर्वसामान्य गॅस गीझर मध्ये जे वापरलं जात तेच तंत्रज्ञान आम्हाला वापरायच होत . त्यावेळी माहिती आणि पार्टस या दोन्हीची उपलब्धता नसायची . शेवटी मी ते सर्किट ८०५१ वापरून तयार केलं .  एल .सी. डी. वापरून त्यावर वेगवेगळे मेसेज यायचे . पण हे तंत्रज्ञान खूपच महाग व्हायचं . मला तर मायक्रो कंट्रोलर शिवाय ऑटोमेशन हि कल्पनाच करता यायची नाही. खुप विचार केला आणि शेवटी ते तंत्रज्ञान ५५५ आय. सी .वापरून अगदी स्वस्तात तयार झाल . अगदी मायक्रो कंट्रोलर वापरून जेव्हढा खर्च आला असता अगदी त्याच्या दोन टक्केपेक्षापण कमी खर्च आला .  यातून एक धडा घेतला कि प्रत्येक ठिकाणी मायक्रो कंट्रोलर गरजेचा नसतो .

बापू भट्टी बनवायला यशस्वी झाले आता प्रश्न उरला होता पावडर स्प्रे गनचा. पावडर स्प्रे गनमध्ये  जवळ जवळ ३०,००० ते ५०,०००  व्होल्टेज  गरज असते .  इतक व्होल्टेज म्हणजे मला सुरुवातीला भीती वाटली . पण यामध्ये करंट अगदी कमी असतो अगदी मायक्रो अम्पियर मध्ये त्यामुळे झटका लागत नाही .  इतक व्होल्टेज करायचं कस करायचं ? मग परत प्रयोग सुरु झाले . काही गन आणल्या होत्या त्याना खोलून पाहिलं पण आत सगळ्या सर्किटवर एम सील तर असायचं किंवा सगळ सर्किट काळ्याकुट अशा रंगान माखलेलं असायचं त्यामुळे ट्रेसिंग करायचं कस ... खुप विचार करत बसायचो . अर्थात माझ डोक इतकं चालायचं नाही . बापूंनी आयडिया सांगायची आणि मी त्यावर काम करायचं असा आमच्या कामाचा पॅटर्ण .  त्यांच्या भाषेत धु म्हटलं कि धुवायच विचारात बसायचं नाही .

नियम पाळायला मी इथच शिकलो .


तर एका वेबसाईटवर  आम्हाला थोडीफार आयडीया मिळाली कि हाय व्होल्टेज कसं तयार  करायचं . एक छोटासा  ऑस्सीलेटरच्या सहाय्याने हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करायचा तो सिग्नल स्टेप अप करायचा आणि मग व्होल्टेज मल्टीप्लायरच्या  सहाय्याने ते व्होल्टेज  अजुन वाढवायचे . मग काय परत बेसिक इलेक्ट्रोनिक्स कामी आले . मग ५५५ चा वापर करून  हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार केला . मग ते व्होल्टेज स्टेप अप करण्यासाठी टू व्हीलर गाडीतील  इग्निशन सर्किटमधील  स्टेप अप ट्रान्सफोर्मर  वापरला. मग  डायोड आणि कॅपसितर वापरून तयार केलेला  व्होल्टेज  मल्टीप्लायर वापरून आम्ही पाहिलं सर्किट बनवलं . त्यात व्होल्टेज म्हणावा तसं वाढत नव्हत .

 मग काय करायचा मग दुसरा प्रयोग .. त्यासाठी टी व्ही मधील इ. एच. टी. चा वापर . हा बऱ्यापैकी यशस्वी झाला. त्यावेळची गंमत म्हणजे सगळ सर्किट बनल,  पण आम्ही अजूनही कलर टी व्ही च अखंड सर्किट वापरत होतो . अर्थात सर्किट मधील फक्त  इ एच टी हाच उपयोगात यायचा . त्यावेळी बापुना मी म्हणालो आता आपण एक वेगळ सर्किट बनवूया . पण बापू म्हणाले कशाला वेगळ सर्किट बनवायचं? आहे  हेच छान आहे . आपल्याला रेडीमेड टीव्हीच सर्किट मिळत तेच वापरायच . कस्टमरला पण अस मोठ सर्किट बघितल्यावर पैसे द्यायला बर वाटत. आणि दुसरा कोणी कॉपी करायला गेला कि कन्फ्युज होउन गेला पाहिजे .

आम्ही परीक्षेला ५५५ आणि व्होल्टेज मल्टीप्लायर यावर उत्तर लिहून मार्क्स  मिळवले पण त्याचा वापर कुठे करतात हेच शिकवलं नाही . आज डास मारायच्या मच्छरच्या बॅट, गॅस लायटर अशा बऱ्याच गोष्टीमध्ये या व्होल्टेज मल्तीप्लायरचा वापर केला जातो ... तुम्ही सागू शकाल काय ? अजुन काही उदाहरणे.


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in


Tuesday, September 19, 2023

^^^^^ Out of Box Thinking ^^^^ -मेकॅनिकल इंजिनियरिंगची हाराकिरी

 1999-2000 सालचा काळ होता . त्यावेळी मी तिसऱ्या वर्षाला नापास झालो त्यावेळी मी तडक साताऱ्याला गेलो आणि तिथे MIDC 

मध्ये  जॉब पकडला . हे एक वर्ष जे नापास झालेमुळे वाया जाणार होत त्याच एका वर्षाला मी  माझ्या आयुष्याचा पाया बनवलं . 

मेकॅनिकल, इलेक्त्रीकल  आणि एरो नोटीकल या शाखांशी मैत्र त्यावेळेसच जुळले.

त्यावेळेस आठवड्यातून एकदा कल्याणीच्या फॅब्रीकेशन शॉपला प्रीव्हेटिव मेंटेनन्ससाठी जायला लागायचं . प्रीव्हेटिव मेंटेनन्स म्हणजे 

 आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी सर्व मशीनची इलेक्ट्रिक कनेक्शन चेक करायची . सगळे कॉट्रक्तर उघडून त्याच्या पट्ट्यावरच्या  

कॉन्टक्ववरचा कार्बन घासायचा . त्यामुळे इलेक्ट्रिक सर्किट शिकलो .  त्यावेळी पहिल्यांदाच अवाढव्य अशा लेथ मशीनी पाहिल्या . 

दहामिटर लांब आणि जवळजवळ दोन मीटरचा  चक असणाऱ्या लेथ मशीनवर एखादा जॉब महिनाभर ज्यावेळेस केवळ पोलिश पेपरच्या

 सहाय्याने गुळगुळीत करण्यासाठी तीन तीन  शिफ्ट  फिरत असायचा त्यावेळेसच मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या  अवाढव्यतेचा अंदाज आला होता . 

अवाढव्य  अशा होरीझन्तल बोअरिंग मशीन , व्हर्टीकल टरेट लेथ , मिलिंग मशीन , कित्येक टनाचे जॉब उचलणाऱ्या राक्षशी क्रेन यावर

 बसून कंट्रोल पॅनेल मधील   वायरिंगच्या जंजाळात काम करताना मन इतक तल्लीन व्हायचं कि  अगदी तहान भूक हरवून जायचं .  अशा 

अनेक मशिनरी तिथ पाहिल्या . 

 पण मला एका मशीनच जास्त आकर्षण होत ते म्हणजे शेप कटिंग मशीन . एकदा पाहिजे असलेल्या आकाराच 

स्कॅनिंग करून त्याच  आकाराचे तीन तीन इंच जाड अशा लोखंडी शीट मधून तुकडे कापून काढणारी ती मशीन म्हणजे माझ्यासाठी एक 

आश्चर्य होती.  सगळ्यात  मोठ आश्चर्य म्हणजे ती मशीनचे कंट्रोल करणारा  मुख्य प्रोसेसर  ८०८५ हा होता. ८०८५ वापरून आपण काय  

मिरॅकल बनवु शकतो याचा मला अंदाज त्यावेळेस आला . एकदा  ते मशीन रिपेअर करण्याचा योग आला होता त्यावेळी जवळजवळ

 दोन महिने खपून अखंड  सर्किट मी ट्रेस केलं होत . सात A2 आकाराच्या शीटवर पेन्सिल आणि पट्टी वापरून ते सर्किट काढलं होत .

कल्याणी बरोबरच  "के ग्रुप" च्या वेगवेगळ्या  मशीन शॉप मध्ये वेगवेगळ्या मशीनच्या रिपेरिंगचे काम करण्याचा मला योग आला 

होता. प्लास्टिक  मोल्डिंग , बॉटल मेकिंग , पी वी सी पाईप , इलेक्ट्रिक  वायर  , पावडर कोटिंग मशीन , डेअरी मशीन तयार करणाऱ्या 

वेगवेगळ्या   कंपन्यांबरोबर काम केलं . हायड्रोलिक  ,न्यूमॅटीक मशीनवर काम केलं यातील प्रत्येकाविषयी नंतर 

डिटेलमध्ये योग येईल तसं बोलुच .

सांगायचा उद्देश म्हणजे मेकॅनिकल इंडस्ट्रीचे मेकॅनिकल कंट्रोल , प्रोसेसर बेस्ड कंट्रोल , मायक्रो कंट्रोलर बेस्ड कंट्रोल, पी. आय. डी. 

कंट्रोल , पी. एल. सी. बेस्ड कंट्रोल, कॉम्प्यूटर बेस्ड कंट्रोल , HMI, स्काडा  बेस्ड कंट्रोल अस  एक मोठ स्थित्यंतर होताना मी डोळ्याने 

केवळ पाहिलं नाही तर प्रत्यक्षात अनुभवलं आहे .

***************************************************************************

२०१२ सालची गोष्ट आहे . कॉलेजमधील काही मेकॅनिकलची मुल माझेकडे आली होती .त्यांनी मला सांगितलं कि ते गाडी करत आहेत आणि त्यामध्ये त्यांना लावायला एक सर्किट पाहिजे होत आणी  त्या  संदर्भात त्यांना मार्गदर्शन पाहिजे होत . माझी उत्सुकता वाढली . मग मी त्यांचेबरोबर गेलो तर कॉलेजने त्याना जागा दिली होती त्यामध्ये पन्नासभर मुल वेगवेगळे काम करत होते ते पाहून मला खूपच छान वाटलं. मग मी मेकॅनिकल डिपार्टमेंटला जायला लागलो . बरेच स्टाफ मित्र बनले . त्यांचेबरोबर बोलल्यावर मला एक लक्ष्यात  आल कि बरीच मुले हि त्यांचे प्रोजेक्ट गाडी संबधीतच करत होते. मग सहज त्यांचे जुने रिपोर्ट चाळले  . सगळा भर ऑटोमोबाईलवरच होता . त्यावेळी मेकॅनिकलला मार्केट पण होत . पण या मुलाचं लक्ष्य हे ऑटोमोबाईलकडे होत . तस बघायला गेल तर केवळ ऑटोमोबाइलसाठी एक स्पेशल शाखा होती. हे  प्रोजेक्ट करायचं काम त्यांच होत पण या कामात सारे मेकॅनिकलचे विद्यार्थी गढले होते.  उरलेल्याना आय. टी. मध्ये जायचं होत . आणि माझ्या डोक्यात त्यावेळेसच मेकॅनिकल विषयी धोक्याची घंटा वाजली . माझे काही जुने लेख वाचले तर ज्यावेळी मेकॅनिकल भरात होत त्यावेळेसच मी लिहिलं होत कि आज इलेक्ट्रोनिक्स जात्यात असलं तरी मेकॅनिकल सुपात आहे .

********************************************************************************

मेकॅनिकल इंजिनियरिंगने आता थोड आत्म परीक्षण केलं पाहिजे . उद्योग क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे . अभ्यासक्रम बदलला पाहिजे. अभ्यासक्रम बदलने म्हणजे केवळ एखादा इलेक्ट्रोनिकक्सचा किवा प्रोग्रामिंगचा विषय टाकणे असा नसुन त्याची मेकॅनिकल विषयीच्या अभ्यासक्रमाविषयी योग्य सांगड घातली पाहिजे . कारण इथं शिक्षकालाच कळत नाही हा विषय काय उपयोगाचा आहे ते विद्यार्थ्याना काय सांगणार ( उदा . मेकॅक्ट्रोनिक्स ). आज मेकॅनिकल इंजिनियरिंग क्षेत्रात करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत पण त्यातील संधी शिक्षण क्षेत्राला दिसत नाही . जुनाट पद्धतीच्या अवाढव्य मशिनरी आता अस्तंगत व्हायला लागल्या आहेत आणि कमी उर्जेवर चालणाऱ्या, आकाराने लहान ,पोर्टेबल, वजनाने हलक्या अशा मशिनरीचे युग आले आहे . इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रोनिक्स  आणि प्रोग्रामिंगचा वापर  करून मशीन आता स्वयंचलित आणि बुद्धिमान होत चालल्या आहेत. त्यामुळे तसा विचार केला तर आपल्या देशामधीलच जवळजवळ ९० % मशीन्स या बदलायच्या स्थितीत आहेत . अत्याधुनिक मशिनरीचे घरटी प्रमाण वाढत चालल आहे त्यामुळे मेकॅनिकलला स्कोप तस बघायला गेल तर कम्प्युटरपेक्षा जास्त आहे. मेकॅनिकल उद्योगामध्येच देशामधील  बेकारी कमी करण्याच सामर्थ्य आहे . पण ऑटोमोबाईलचा केलेला अती उदोउदो आणि  आय. टी. नादात अभ्यासक्रमाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष्य  त्यामुळे  हि ब्रंच पण पराभूत मानसिकतेकडे  वळत  आहे . 


चित्तरंजन महाजन 

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in



 


Tuesday, September 12, 2023

@@@ Out of Box Thinking - मुलांना प्रोग्रम्मिंग का जमत नाही ? -- ( भाग -१)

 १९८९ साली जेव्हा नुकतेच संगणक बाजारात आले होते तेव्हा कोल्हापूरमध्ये कोहिनूर इन्स्टीट्युटमध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा पहिल्यांदा क्लास सुरु झाला होता. ज्यामध्ये फक्त "बेसिक"  नावाची प्रोग्रामिंगची भाषा शिकवली जायची पण  त्याची फी होती ५०० रु . त्यावेळी हि फी खूपच जास्त होती त्यामुळे शिकायला मिळाली नाही . पुढे डिप्लोमा शिकत असताना पहिल्या वर्षाला परत बेसिक प्रोग्रामिंग आले .नंतर दुसऱ्या वर्षी   "C" प्रोग्रामिंग आले . तिसऱ्या वर्षी आम्हाला विषय होता प्रिन्सिपल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज  त्यामध्ये  "फोर्ट्रान" आणि "पास्कल" या लँग्वेज होत्या. परत डिग्री सेकंड एअरला "C" प्रोग्रामिंग आले . मला वाटते त्याप्रमाणे सेकंड एअर च्या दुसऱ्या सेमिस्टरला कि तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला   "C++" आले. परत फायनल इयरचा प्रोजेक्ट करत असताना "JAVA" चा थोडा संबंध आला . हे एव्हढ शिकलो पण याच्यामध्ये आमच ज्ञान एरिया ऑफ Trangal च्या पलीकडे कधी गेलच नाही . सगळा पेपर आणि प्रक्टिकल ची परीक्षा प्रोग्राम पाठ करूनच पास व्हायचो .  एकतर कॉम्प्युटर नवीनच आले होते .( सांगायची गम्मत म्हणजे त्यावेळी स्क्रीन सेव्हर आम्ही दहा दहा मिनिट बघत बसायचो , प्रोग्राम केलेला स्टोर कुठ होतो आणि तिथुन तो परत ओपन कसा करायचा हे ज्यान आम्हाला शिकवलं तो दोस्त शेवट पर्यंत त्याला आम्ही मास्टर समजायचो) खरी गोष्ट म्हणजे आमच्या शिक्षकांनाच ते येत नव्हत. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण तो शिकवताना आत्मविश्वास नसायचा  आणि हे शिकून काय करायचं हेच त्यांना सांगायला जमत नसायचं. ते पण पुस्तकातले प्रोग्राम घ्यायचे . त्यामूळ बी. इ. झाली तरी आमची प्रोग्रामिंग यथा तथाच होत.  पण असेम्ब्ली प्रोग्रामिंग चांगल होत , खूपच चांगल. अक्षरशः ८०८५ ची पूर्ण ऑपकोड शीट पाठ होती. पण हाय लेव्हल लँग्वेजच्या बाबतीत बोंबच होती .

************

 पुढे  २००२ च्या आसपास साताऱ्यात "नॅनो टेक" या नावाने काम सुरु केलं होत. त्यावेळी मेसला जेवायला जात होतो . माझ्यापुढ जेवायला दोघ बसायचे . ते मटका खेळायचे आणि त्यांची चर्चा चालायची . मी एकदा सहज विचारला काय असतंय ते . ते म्हणाले हे लॉजिक असतंय . लॉजिक म्हटल्यावर माझा उत्साह वाढला मनात आल यात काय लॉजिक असतंय ते बघाव तरी . मग त्यांना माहिती विचारली मग काय त्यानापण मी चेला मिळालो . त्यांनी ओपन, क्लोज , चार्ट, कल्याण, मुंबई असं बरंच काही सांगितलं. आता मी प्रॅक्टिकल माणूस निव्वळ थेअरीन आपल्याला काय घंटा कळत नाही . मग काय प्रॅक्टिकल सुरु झालं. अगदी पन्नास पैसे पण खेळायला पुरायचे त्यामुळे रक्कम काही जास्त नव्हती . त्यांचेबरोबर नंबर लावायला सुरुवात केली . त्याचबरोबर त्यांनी एक चार्ट दिला आणि थोड काहीतरी सांगितलं . मग माझी सुरुवात झाली . तो चार्ट घेउन बसलो. काही कळत नव्हत . मग तो  सिक़्वेन्स शोधायचा ...... सुरुवातीला  ते आकडे बघूनतरही जांभया यायच्या  झोप यायला लागली . थोडा वेळ बघितलं कि छान झोप यायची . नन्तर नंतर   मळमळयला सुरुवात झाली ,  मध्येच आकडे लागायचे उत्साह वाढायचा परत नवीन हुरुपाने चार्ट घेउन बसायचो. नंतर डोकं दुखायला सुरुवात झाली . अक्षरश : डोक तापायला सुरुवात झाली .

आता तर सकाळी कल्याण , मुंबई आकडे लावायला सुरुवात केली होती .. ओपनचा  निकाल बघायला गेलो कि क्लोजचे आकडे लावूनच यायचो . अंदाज पण बरोबर यायला लागले . आणि एक दिवस डोक तापायच बंद झाल . डोक शांत झाल . आता चार्ट काहीही त्रास न होता बघता येत होता. बऱ्याच गोष्टी समजायला सुरुवात झाल्या . असाच महिना गेला . आता तर चार्टची चटकच लागली होती . आणि मनात घंटा वाजली कि हे काही बरोबर नाही . आपण हे कशासाठी केलं होत आणि आता काय करतोय . लगेच चार्ट जाळून टाकला आणि नंतर आजतागायत कधी या भानगडीत पडलो नाही.

*************

हे सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मी प्रोग्रामिंग शिकत होतो त्यावेळी माझ्या मनाची अवस्था आणि हे आकडे लावणे शिकत असतानाची अवस्था एकच होती . अर्थात कंट्रोल सिस्टीम मधला टाईम डोमेन रीस्पोंस पण हेच शिकवतो कि स्थिती बदलताना मन चार फेज मधून जात . विरोध , राग , वाटाघाटी आणि शेवटी स्वीकार . मग याचा परत अभ्यास करत राहिलो. त्यावर प्रयोग करत राहिलो  आणि मग त्यावर बनली  आमची डॉल्फिन लॅब्सची ट्रेनिंग पद्धती . विद्यार्थ्याना शिकवत असताना तुम्हाला विद्यार्थ्यांना या चार फेजमधून घालवता आलं पाहिजे . 

एक आमच निरीक्षण आहे कि कधीही आम्ही ट्रेनिंग देत असताना एखादा ग्रुप जास्त उत्साहाने प्रोग्रामिंग करत असतो आणि हा ग्रुप बऱ्याचवेळा उनाड पोरांचा असतो . आणि जो ग्रुप मागे असतो तो त्यामध्ये टॉपर असतात . आता हे अस कस अस त्यांना शिकवणारे शिक्षकपण विचार करतात . 

आता याच्यामागे पण एक कारण आहे ..... त्याविषयी नंतर बोलुच.


चितरंजन महाजन

९७६३७१४८६० 

 www.dolphinlabs.in

Sunday, September 10, 2023

 %%% Out of Box Thinking - उदंड झाल्या लॅब्स   %%%

ऐहिक गोष्टी आणि ज्ञान यामधून प्रत्येकजण ऐहिक गोष्टीलाच महत्व देतो . ज्ञानाच महत्व हळूहळू कमी होत चालल आहे  ज्ञानाला किंमत किंमत कमी होत आहे . ज्यावस्तूची किंमत कमी होत जाते त्यामध्ये प्रगती कमी होत जाते आणि त्याचा लोप व्हायला सुरुवात होते . ज्ञानाचा लोप व्हायला लागला कि ऐहिक गोष्टीमधील प्रगती कमी होत जाते आणि नंतर त्यांचाही लोप व्हायला लागतो.

आज काल मी बऱ्याच महाविद्यालयात जातो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे महावैद्यालायाने केलेली इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या लब्सॅमध्ये केलेली गुंतवणूक . कोविडचा एक महत्वाचा फायदा झाला कि त्यामुळे बरीचशी डबघाईला आलेले महाविद्यालय तारले गेले कारण दोन वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च कमी झाला . फी १००% ने गोळा झाली पण सर्वात मोठा शिक्षकावरचा पगाराचा भार कित्येक संस्थाचा ६०% ने कमी झाला . त्यातच बरेचजणानी शिक्षकी पेशाला रामराम ठोकला आणि ते उद्योग क्षेत्रात गेले . कमी पगारात काम करायला तयार असणाऱ्या शिक्षकांची भरती सुरु झाली .याचा फायदा म्हणजे खर्च कमी झाला त्यामुळे पैसे राहू लागले .

या पैशाचा उपयोग त्यांना चांगला स्टाफ भरणे , मुलांना चांगली ट्रेनिंग देणे या ऐवजी रंगरंगोटी मध्ये करायला सुरुवात झाली .  कुठ गेल कि प्रत्येकजण कौतुकाने लॅब्स दाखवतो . त्यामधल्या मशिनरीची किंमत ऐकली कि चक्कर येते .

  त्यांचा वापर किती आहे हे ऐकल कि आश्चर्याचा धक्का बसतो .याचा पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे  त्या मशिनरी कशा वापरायच्या याचीही माहिती त्यांना नसते. लाखो रुपयांची मशिनरी अक्षरशः एक शो पीस बनून राहिल्या आहेत . फक्त अडमिशनच्या वेळी त्यावरची धूळ झटकली जाते. पहिल्या वर्षी अॅडमिशन घेणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांना ते दाखवले जातात आणि त्यांचा वापर माहितीपत्रकावर फोटो छापण्यासाठी केला जातो . आणि त्यांच्या  किमतीचे आकडे  या लॅब्स्साठी किती खर्च केला आहे हे याचा मोठेपणा मिरवण्यासाठी होतो . ठिकाणी जुजबी प्रात्यक्षिक दाखवली जातात पण एकूण जे पैसे घातले आहेत त्यामानाने त्याचा उपयोग किती ?

मध्यंतरी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात गेलो होतो त्यांनी मला एक मशीन दाखविली पी.सी.बी . मिलिंग मशीन . त्याची किंमत जेव्हा ऐकली त्यावेळी फक्त चक्कर येण बाकी होते . मशीनची किंमत होती २७,००,०००/- अक्षरी  सत्तावीस लाख रुपये .आणि २०१८ मध्ये मशीन घेतली होती आणि  २०२२पर्यंत त्यावर बनवलेल्या पी सी बी ची संख्या होती  फक्त दोन.  म्हजे एका पी सी बी ची किंमत     जर २७,००,०००  गुंतवणुकीचे ६% ने एक वर्षाचे व्याज  (२७,००,०००  / १०० ) * ६ = १,६२,०००  . तीन वर्षाचे  व्याज १,६२ ,००० X 3 = ४,८६,०००   म्हणजेच एक पी सी बी पडला जवळ जवळ २,४३,००० ला . 

महाविद्यालायाना खरा म्हणजे हे पैशाच गणित कळल पाहिजे . आपण जे पैसे मोजतो  ती  गुंतवणूक आहे कि निव्वळ खर्च आहे याचा विचार केला पाहिजे . कित्येक ठिकाणी मोठमोठ्या लॅब्स दाखवतात .आजकाल रोबोटिक्स  , पी. सी. बी. लॅब्स , आय ओ टी, अशा  बऱ्याच स्टेट  ऑफ आर्ट (?) लॅब्सच  एक नवीन खूळ आल आहे अक्षरश:  करोडो रुपये त्यात घातले आहेत पण त्या वापरावाचून पडून आहेत आणि ज्याठिकाणी त्या वापरल्या जातात त्या ठिकाणी  त्या वापराचा आणि त्यावर केलेल्या गुंतवणुकीचा काहीही ताळमेळ बसत नाही . मोठ्या हौसेने बनवलेल्या या लॅब्स म्हणजे एक पांढरा हत्ती बनून राहिल्या आहेत .  निव्वळ एक शो पीस बनुन. 

बर यामध्ये एखाद्या शिक्षकाने आपला इंटरेस्ट दाखवावा तर सगळ त्याच्या गळ्यात पडत . या मशिनरी इतक्या महागड्या आहेत कि त्यावर काही करायचं म्हणजे समजा चुकल तर काय ? एखादा पार्टस खराब झाला तर काय करायचं हा देखील प्रश्न आहे . त्यामुळे मुलांना दाखवताना पण त्या लांबूनच दाखवल्या जातात . बर हे मशिनरी घेतल्यावर त्याच ट्रेनिंग घेतलेल्या स्टाफची पण कुवत सगळ समजूण घेण्याएव्हढी पाहिजे .त्यासाठी तसा स्टाफ नेमला पाहिजे . कुणातरी टेम्पररी नवीन स्टाफच्या गळ्यात ते ट्रेनिंग मारलं जात . तो स्टाफ पण नंतर सोडून जातो . आता परत परत नवीन स्टाफना ट्रेनिंग द्यायला ते वेन्डोर पण इतके वैतागले आहेत कि आता तर ते प्रिन्सिपलचे फोन पण घेत नाहीत . 

आता याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावापरात आणायच्या म्हणजे थोडीफार परत गुंतवणूक करायला पाहिजे पण त्यासाठीही मानसिक तयारी नाही . त्यासाठी चांगला स्टाफ मिळत नाही कारण त्या स्टाफसाठी पैसे मोजायची तयारी नाही . आजकाल एन. बी. ए. , NAAC कमिटी मेंबर  जेव्हा याच युटीयझेशन काय ? अस विचारता तेव्हा त्यावेळी त्याची माहिती मोठ्या कौतुकाने सांगणाऱ्याला धरणी पोटात घेतली तर बर होईल अस वाटत  .  

मशिनर मध्ये फालतू पैसे घालवण्या ऐवजी मुलांना चांगल ट्रेनिंग देवून त्यांच्या माध्यमातून कमी पैशात चांगली मोठी लॅब्स बनविणे अतिशय सोपे आहे पण त्यासाठी पैसे घालणे हे पैशाचा अपव्यय वाटतो . या सगळ्याचा परिणाम म्हणजे ट्रेनिंगसाठी पैसे नाहीत . त्यामुळे मुलांना ट्रेनिंग नाही .त्यामुळे लॅब्सचा वापर नाही. आता या पांढऱ्या हत्तीच काय करायचं हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी आहे .


 चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६० 

Tuesday, September 5, 2023

### OUT Box Thinking ---- शिक्षण क्षेत्रापुढील नवीन आव्हान ###

 डॉल्फिन लॅब्स   माध्यमातून काम करताना आमचा अगदी चौथीपासून ते पार पी. एच डी पर्यंतच्या विद्यार्थ्यानशी संबध येतो . एव्हढ्या मोठ्या शिक्षण पटावर अभ्यास  करणारे दुसरे कोणी भारतात नसेल .  हा  अभ्यास करताना  महत्वाची आणि नवीन गोष्ट लक्षात आली आणि तिच्याकडे शिक्षण संशोधकाच अभ्यासासाठी लक्ष गेलेले नाही . 

आमच्याकडे काही पालक त्यांच्या मुलांना घेउन यायचे आणि तक्रार करायचे कि हा अभ्यास करत नाही . शांत नाही ,अतिशय चंचल आहे . याच अभ्यासात लक्ष्य नाही पण याला इलेक्ट्रोनिक्समध्ये खुपच लक्ष आहे . सारख  बॅटरी, वायर सारख्या गोष्टीमध्ये रमत असतो. घरातील वस्तू खोलत असतो .  

अशा विद्यार्थ्यांचे निरीक्षण करत असताना एक  गोष्ट जाणवली कि या मुलांची चेहरेपट्टी हि उलट्या  त्रिकोणी असते . कदाचित या गोष्टीचा उल्लेख माझ्या याआधीच्या लेखातही ओझरता केला असेल . यांची हनुवटी हि निमुळती असते.  या हनुवटीच्या आकारावर पण बऱ्याच गोष्टी समजत  असतात . अशा जवळजवळ प्रत्यक्ष  शंभरच्या वर  विद्यार्थ्यावर काम केलं  आणि अप्रत्यक्षपणे भरपूर  मुलांचा अभ्यास झाला आहे . 

माझ्या संपर्कात आलेले  अमय महाजन ,  तलहा शेख ,मोएझ पठाण , आयुष जाधव , सोहम मंत्री , किशन घाटोळे, शुभम वानखेडे , शुभम ठोंबरे अशी बरीच नावे घेता येतील . बरीच लिस्ट मोठी आहे पण हि मोजकी नावे ज्यांच्याशी माझ्या फेसबुकवरील मित्रांचा कधी ना कधी संबंध आलेला आहे . यातले काही जण नापास होते, काही जणांना अभ्यासात  मार्क्स चांगले नसायचे . पण आज यातले व्यवस्थित मार्गावर आहेत. काही परदेशात आहेत आणि काहींचा स्वतःचा उद्योग पण आहे .

हा तर सांगायची गोष्ट म्हणजे हि त्रिकोणी डोक्याची मुल पहिली खूपच कमी दिसायची पण अलीकडे ज्यावेळी मी वेगवेगळ्या शाळांना भेट दिसतो त्यावेळी यांची संख्या वाढत चाललेली आहे . हि एका बाजून चांगली आहे पण दुसऱ्याबाजूने विचार करता हे चिन्ह पण चांगल नाही कारण शिक्षण  क्षेत्रात हि मुलाना समजून घेण्यासाठी काही पद्धती अजुन विकसीत नाही. कारण आजपर्यंत तुम्ही जर विचार केला तर या मुलांच्यावर शिक्षण क्षेत्राने अन्यायच केला आहे . जुन्या काळात हि मुल जास्त शिकायची नाहीत .   ठराविक चौकटीत बांधून ठेवणाऱ्या शिक्षण पद्धतीशी जमायचं नाही , मध्येच शाळा सोडायची . 

हि मूल खूपच चंचल आणि धरसोड करणारी असतात . त्यांचे लहानपणापासून बुद्धीचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे झाले असेल त्यांच्यात एक ठामपणा पण दिसतो पण हे खूपच कमी निरीक्षणास आले आहे . आतापर्यंत जो अभ्यास सांगतो कि मुलांचा लक्ष्य देण्याचा टाइम स्पॅन हा १२.५  मिनिटाचा असातो तर या मुलांच्या बाबतीत तो तीन मिनिटापेक्षा पण कमी असतो.आणि आता मोबाईलच्या मुले हा अजुन कमी आला आहे . तर अशा मुलांच्या बाबतीत काय करायला पाहिजे याचा आता विचार करायला पाहिजे . कारण आता हि मुले बहुसंख्य आहेत  आणि यांची संख्या पण वाढत चालेलेली आहे .

याच्यावरही लिहिण्यासारखे खूपच आहे  आणि पुढे वेळ मिळेल तसा यावर लिहीतच जाईन. सध्या तुम्ही आसपासच्या या प्रकारच्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करा ... काही अनुभव असेल तर अवश्य शेअर करा.


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

 

Sunday, September 3, 2023

Out of Box Thinking- इलेक्ट्रॉनिकस इंजिनिरिंग- अस्तित्व गमावत चाललेली ब्रँच

यावर्षी बारावीचा निकाल चांगला लावल्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला परत भरती आली . त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या जागा पण भरल्या .अर्थात यामागचं कारण वेगळं आहे .एक तर बऱ्याच महाविद्यालयानी इलेक्ट्रॉनिक्स शाखा बंद केल्या आहेत, काही ठिकाणी इंटेक कमी केला आहेआणि कंप्यूटरला प्रवेश मिळाला नाही म्हणुन नाईलाजाने या ब्रॅंचला ऍडमिशन घेतलं आहे. त्यात पण एक चांगली आणि एक आशावादी गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक्सला  स्वतः हुन मनापासुन ऍडमिशन घेणाराची संख्या दोन चार टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळं यावर्षी इलेक्ट्रॉनिकची कळी  खुलली आहे. पण खरंच आमचं शिक्षण क्षेत्र त्यांना न्याय देण्यास सक्षम आहे का? याच उत्तर कुणीही कितीही ठामपणे होय म्हणून सांगितले तरी ते सत्य हे नसणार आहे. कारण ही शाखा सध्याच्या संधीला आणि आव्हानाला सामोरे जाण्यास अजिबात सक्षम नाही.

तुम्हाला ढोबळपणे सांगतो. 1990 - 91 ला  इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाणे कात टाकायला सुरुवात केली आणि अभ्यासक्रमातून व्हॅक्युम ट्यूब पूर्णपणे काढून टाकून ट्रान्झिस्टरवर  जास्त भर द्यायला सुरुवात केली.1998-2000 सालापासून मायक्रोकंट्रोलर फार्मात आला . 2005 पासून VLSI ला मार्केट आले आणि त्यानंतर 20०८ पासून ३२ बीट मायक्रोकंट्रोलर आणि RTOS अभ्यासक्रमात आले.

अर्थात हे यायला तसा उशीरच झाला . 2010 च्या आसपासून चित्र पालटायला सुरूवात झाली.महाविद्यालये वाढली. मुलांची गुणवत्ता कमी झाली..स्टाफची गुणवत्ता पण कमी झाली कारण महाविद्यालयांची संख्या वाढू लागली तसं स्टाफपण अपुरा पडू लागला . त्यातच उद्योगक्षेत्रातील संधी वाढत असल्यामुळे चांगली मुले प्लेस होऊ लागली होती . त्यामुळे  मिळतील  तसे स्टाफ भरले. कुठल्या स्टाफची क्षमता काय याचा विचारच केला नाही .

तशातच आठवीपर्यंत नापास नकरता धकलगाडीत बसवलेले विद्यार्थी पण आले.आता या विद्यार्थ्याचा निकाल चांगला लागावा म्हणून अभ्यासक्रमातील काठीण्य कमी करायला सुरुवात झाली .  जे इम्बेडेड सिस्टीम ज्यावर  आजचे पूर्ठीण इलेक्ट्रोनिक्स क्षेत्र अवलंबून आहे आणि आज जे  नोकरी मिळवण्यासाठी अतिशय  गरजेच असते त्याच्या मुळावरच घाव घालायला सुरुवात झाली .  C प्रोग्रामिंगवरच कुऱ्हाड चालवली. त्याच्यातील  पोइंटर , फाईल handling काढून टाकले . पुढे ८०५१  असेम्ब्ली प्रोगामिंग काढले , त्यातच PIC घुसडला .( PIC शिकणे पण गरजेच आहे पण त्याला वेगळा विषय बनवायला पाहिजे होता) . त्यामुळे  मायक्रोकांत्रोलरचा अभ्यासावर मर्यादा आली .  इंटर फेसिंग , प्रोग्रम्मिंग कमी केले . ३२ बीट आर्म  कंट्रोलर कसा शिकवायला पाहिजे यातच अक्षरशः पाच वर्षे बरबाद झाली ( हि एक वेगळीच गंमत आहे कारण मायाक्रोप्रोसेअर  कोअर आणि त्यावर डिझाईन केलेला मायाक्रोकांत्रोलर यातला फरकच अभ्यासक्रम करताना करणाऱ्याला कळला नाही  त्यामुळे शिकवलं एक आणि प्रोग्रामिंगसाठी लागणार ज्ञान मिळालाच नाही ).  

हळूहळू अभ्यासक्रमातील जो नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असा पार्ट काढला. आता तर VLSI एफ पी जी  ए प्रोगामिंगचे किट्स नाहीत  आणि RTOS शिकवायचा बंदच झाला आहे . नवीन किट्स घेण्याऐवजी सिमुलेटरवर  शिकवायला सुरुवात झाली आहे ज्याची  मजा मुलांना येत नाही . सध्या जो अभ्यास  इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी महत्वाचा आहे एकतर   तो सगळा काढून टाकला आहे किंवा त्याचे महत्व कमी केलं आहे .

आणखी एक बदल इथे सांगितला पाहिजे . सर्वसाधारणपणे १९७० च्या पूर्वी  इलेक्ट्रोनिक्सचे तंत्रज्ञान हे DC ४८V वर चालणारे होते . ८०-९० मध्ये ते २४ V वर आले , ९०-२००० च्या सुमारास 12V , २०००-२०१० पर्यंत 5V वर आले आणि २०१० पासुन २० पर्यंत 3.३V आले आणि आतातर ते १.८ Vवर हळूहळू शिफ्ट होत आहे . 

२०१० पासूनच बाजारातून ट्रान्सफोर्मर बेस्ड पॉवर सप्लाय दिसायचे बंद झाले आपण अजूनही अभ्यासक्रमात बराचसा भाग त्यावर वाया घालवत आहे .

सध्याच्या क्षेत्रासाठी कुठले विषय पाहिजेत तेच अभ्यासक्रम तयार करणाऱ्याना  ठरवता येत नाही . किट्स विकणारी टोळी जो अभ्यासक्रम बनवतात तो तोच विद्यार्थ्यांच्या कपाळी  मारला जात आहे . शिक्षकांची नवीन काही शिकण्याची मानसिकता नाही . काही स्वायत्त झालेल्या विद्यापीठात तर नवीन अभ्यासक्रम करताना केवळ  सिनियर स्टाफने  आजतागायत इतकी इतकी वर्षे त्या एकाच विषयाची पाटी टाकली म्हणून गरज नसताना सुद्धा तेच विषय ठेवले आहेत .

 इलेक्ट्रोनिक्सचे विषय कमी करून  जावा , पायथोन , जावा आणल जाऊ  लागल आहे  .  आणायला काहीही हरकत नाही पण त्याचा इलेक्ट्रोनिक्ससाठी पूरक असा वापर करण्या ऐवजी त्यांचा काही संबंधच दाखवला जात नाही .

आज तस पाहायला गेलो तर इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग जवळजवळ २० वर्ष मागे गेल आहे . त्यात आता इलेक्ट्रोनिक्सच  कम्प्युटर , मेकॅनिकल बरोबर कॉकटेल करायचं नवीन फॅड सुरु झालय (याच्याबद्दल लिहीनच ).

 ....एक मात्र खर  हळूहळू   इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग अस्तित्व  गमवत चालली आहे . आज जगात इलेक्ट्रोनिक्चास उदो उदो होत असताना सुद्धा या ब्रंचला स्वतःचा चांगला अभ्यासक्रम बनवता  येत नाही आणि  .शिकवताही हिच शोकांतिका  आहे .  

Friday, September 1, 2023

**** Out of Box Thinking - अजुन थोड आणि बरंच काही *****

आता पर्यंत मी डॉल्फिन लॅब्सच्या माध्यमातून कार्य करत असताना अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रावर बरेच संशोधन केले . त्यामुळे माझ्याकडे लिहिण्यासारखे आणि करण्यासारखे खूपच आहे . त्यामुळे दररोज जरी लिहित बसलो तरी पुढची चार पाच वर्षे तरी संपणार नाही .खर म्हणजे आता  लिहिण्यातही अर्थ  वाटत नाही कारण आता हे क्षेत्र खूपच पुढ गेल आहे आणि जवळजवळ संपलंच आहे . आता तुम्ही मान्य करत नाही कारण तेह्वढी मानसिकता पण उरली नाही . कारण जर असती तर सुधारणा करायला मागेच सुरुवात झाली असती . 

आता हेच बघाना पोरग शिकत एलेक्त्रीकल , मेकॅनिकल , इलेक्ट्रोनिक्स ,सिव्हील आणि प्लेस होत कॉम्पुटरच्या पोराबरोबर आय .टी .मध्ये म्हणजे इतके पैसे घालून, परीक्षा देवून डिग्री घेतली तिचा फायदा काय ? त्या ज्ञानाच काय करायचं अर्थात ते चार वर्षात किती मिळवलं हा प्रश्न आहेच . आणि सगळ्यात केविलवाणी अवस्था म्हणजे कॉम्पुटरची .अस काय वेगळी ब्रंच घेउन झेंडे लावले जर इतर मुलांच्याबरोबर प्लेस व्हायचे होत तर? . बर हे सगळ करून परत कंपनीत घ्यायचं ट्रेनिंग ते वेगळंच  .

हे म्हणजे  अस झालय कि दवाखान्यात पेशंटन जायचं  कारण  डॉक्टर जगायला पाहिजे, डॉक्टरने दिलेली औषधे घ्यायची कारण केमिस्ट जगला पाहिजे आणि आणलेली औषधे कचऱ्यात टाकायची कारण स्वत : पण जगल पाहिजे . 

सगळा इस्कोट झालाय कुणाला कशाचा ताळमेळ नाही . आपल्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला मुलांना आय. टी. ला घालवायची इतकी घाई झाली आहे कि त्याना प्लेसमेंटला  एन्ट्री मिळवायला लागणारी मार्क्स दिली कि आपली जबाबदारी संपली अस वाटत . मग काय कशीही मार्क्स फुगवा ..... त्यामुळे Out of Box Thinking ला कुणाला वेळच नाही आणि ते जमायला पण पाहिजे .

मला कधीकधी आश्चर्य वाटत कि चायनाची प्रोडक्ट्स तुम्ही बघा इतके वेगवेगळे व्हरायटी मिळतील . परवा तर वेणी घालण्याच सुद्धा मशीन त्यावर पाहिले . किती प्रोडक्ट्स ते बनवतात . डोक्यात कधीकधी विचार येतात कि काय चालाल काय आहे आपल्याकडे. 

इतकी सोपी प्रोडक्ट करायचं आपल्याला कस सुचत नाही तर याला कारण आहे आम्ही आमच्या मुलाचं बौद्धिक खच्चीकरण चालवल आहे. याची सुरुवात खूपच आधीपासून होते .

आपल्याकडे मुलगा पाचवी सहावी पर्यंत जाऊपर्यंत पालक मुलांचे खूपच कौतुक करतात . त्याला प्रत्येक गोष्टीत विचार मांडण्याची संधी देतात, सातवीपर्यंत ऐकून घेतात आणि त्यानंतर बापच पोराला म्हणतो बापाला शिकवतो काय ? त्याबरोबर दहावीच भूत आठवीपासूनच मानेवर बसत  .. क्लासेस सुरु होतात . काही ठिकाणी तर आठवीपासूनच आय. आय. टी .कोचीगला घालतात . पोराची विचार शक्तीच कमी करून टाकतात . रट्टा मारायची सुरुवात होते. 

दहावी नंतर लगेच बारावी ... परत अभ्यासाची सुरुवात परत रट्टा... हि परीक्षा ती परीक्षा अस करून बौद्धिक गोटा झालेलं शेवटी ते  इच्छ्चेन, नाईलाजान अभियांत्रिकीच्या   प्रवाहात पडत . पहिल वर्ष सुरु होत. अर्थात आधीच महाविद्खुयालय चालू व्पहायला  उशीर झालेला असतो .. मग काय त्या बिचाऱ्याला उसंत सुद्धा मिळत नाही. पहिलं  वर्ष संपत. दुसऱ्या वर्षी ते त्याच्या शाखेत जात त्याला वाटत साल आता काहीतरी वेगळ घडेल पण तिथ वेगळीच तऱ्हा. 

डिपार्टमेंटला आलेवर त्याला शिस्त लागली पाहिजे म्हणून परत डिपार्टमेंटचा रट्टा . दुसऱ्या सेमला त्याला वाटत आतातरी दुनिया बदलेल पण नाही .तिसऱ्या वर्षाला त्याला शिंगे यायला सुरुवात होते आणि तिसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सेम पासुन पोरग मुर्दाड बनायला सुरुवात होतेआनी   Out of Box Thinking करण्यामधून बाहेर येत .... त्याला सगळी सिस्टीम समजलेली असते आणि कळून चुकते सगळ Xटू आहे .

त्यातूनच काही मुल क्लब करतात ,काही वेगळी वाट चोखाळतात पण त्यात त्यांना जागा देण आणि त्यांनी आणलेली पारितोषिक मिरवण यापलीकडे महाविद्यालय काहीही करत नाही . कारण सगळे पैसे मुलंच जमा करतात . अर्थात काही अपवाद आहेत पण फारच थोडे आहेत .

हि कागद जमा करण्याच्या नादात पोरांच्या मेंदूची रद्दी कधी होते हे ना पोराला कळत ...ना महाविद्यालयाला....आणि  Out of Box Thinking विषयीची FDP चालतच राहतात .....चालतच राहतात .

चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in