Saturday, October 17, 2015

इलेक्ट्रॉनिक्समधील ज्ञानामृत - १




  खरच इलेक्ट्रॉनिक्स हि केवळ अभियांत्रिकीची एक शाखा आहे का? केवळ याचा अभ्यास करून एखादी चांगली नोकरी मिळवायची हाच या शाखेचा उपयोग आहे का? चार वर्षे बी. इ.ची, किमान दोन अधिक कितीतरी वर्षे एम.इ.ची आणि त्यानंतरची कितीतरी वर्षे आपण पी.एच.डी.साठी घालवतो आणि तरी आपण फक्त माहिती मिळवतो आणि त्यावर आयुष्य घालवतो. म्हणजे आपण ज्ञानसागरात  उडी मारतो आणि मोती आणन्याऐवजी दगड आणतो आणि बाहेर पडतो कोरडेठाक.
ज्ञानाला ब्रँच नसते ते जगातील सर्व व्यक्त आणि अव्यक्त गोष्टीना ते सारखच लागु  होत. ज्यावेळी ते कळायला सुरुवात होते तेव्हा अखिल विश्वातील सर्व गोष्टीना एकाच नियमात बांधून ठेवणारी सूत्रे कळू लागतात आणि मग कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करावा लागत नाही त्या आपोआप समजायला लागतात.
चला आपण आपल्या विषयाकडे वळू या.



                                                              

चीनी तत्वज्ञानात यीन आणि यांग हि संकल्पना आहे.वरील चित्र हे या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेनुसार जगातील सर्व गोष्टी या दोन  सामावल्या आहेत. जसे कि चांगल आणि वाईट, पॉझीटीव्ह (धन) आणि निगेटिव्ह (ऋण). हे पॉझीटीव्ह हे  प्रभाव दर्शवते तर निगेटिव्ह अभाव. पण याचबरोबर या विश्वात कुठलीही गोष्ट परिपुर्ण नाही. एक गोष्टीचा अंत हा दुसरिचा प्रारंभ असतो.  वरील आकृतीमधील पांढरा भाग यीन आणि काळा भाग हा यांग प्रवृत्ती  दर्शवतो आणि त्यामधील अपरीपुर्णता ठीपक्याच्या रूपाने दाखवल्या आहेत. हि अपुर्णताच अखिल विश्वाच्या चलनवलनाला कारणीभुत आहे. ज्याक्षणी एखादी गोष्ट परिपुर्ण होते त्याच्या दुसऱ्या क्षणीच तिच्यामध्ये अपुर्णता यायला सुरुवात होते. आणि हेच या पुर्ण जगाला एकाच नियमात बांधुन ठेवणारे सूत्र आहे. आयुष्यभर चिंतन आणि मनन करायला हे पुरेसं आहे.


हे विश्व हे निरंतर आहे. एक उर्जा या विश्वाला नियंत्रित करत असते .त्या उर्जेलाच आपण चैतन्य म्हणतो आणि काही लोक देव, अल्लाह आणि गॉड  मानतात. उर्जा हि दोन प्रकारची आहे स्थिर  आणि अस्थिर.  तो सर् शक्तिमान परमेश्वर म्हणजेच अस्थिर उर्जा आहे आणि आपण चराचरामधील जो परमेश्वर आहे म्हणतो ती झाली स्थिर उर्जा. उर्जा हि निर्माण करता येत नाही किंवा ती  नष्ट करता येत नाही. तिला एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलता येते आणि ती बदलत असते.
एसी सोअर्स हा अस्थिर उर्जेच तर डीसी सोअर्स हा स्थिर उर्जेच प्रतिनिधित्व करतो. डीसी उर्जा हि पॉझीटीव्ह (धन) आणि निगेटिव्ह (ऋण) या दोन प्रकारात मोडते तर एसी उर्जा हि  पॉझीटीव्ह (धन) आणि निगेटिव्ह (ऋण) या मध्ये  आंदोलित होत राहते.

स्थिर (डीसी) उर्जा हि आपल्याला साठवून ठेवता येते तर अस्थिर (एसी) उर्जा साठवता येत नाही. ती जर साठवून ठेवायची असेल तर तुम्हाला ती पहिल्यांदा  स्थिर करावी लागते. पण साठवलेली उर्जा वापरावयाची असेल तर ती तुम्हाला प्रवाहित करावी लागते. पाणी ज्याप्रमाणे वरून खालच्या दिशेने वाहते त्याप्रमाणे उर्जा सुद्धा वरच्या पातळीवरून खालच्या पातळीकडे प्रवाहित होत असते. दोन समान पातळीमध्ये प्रवाह वाहणार नाही.

आता पर्यंत आपण वैश्विक ऊर्जेबद्दल बोललं आणि तिच इलेक्ट्रॉनिक्समधील स्वरूप पाहिलं.
पुढच्या भागात तीच नियंत्रण कस होत आणि तिचे परिणाम काय? ते पाहु.
रेझिस्टर,कॅपॅसिटर आणि इंडक्तर जे इलेक्ट्रॉनिक्समधील कनिष्ट पार्टस आपण मानतो पण त्याची नव्याने ओळख करून घेउया.
तोपर्यंत तुमची मते स्वागतार्ह आहेत.


धन्यवाद. 

Monday, October 12, 2015

डॉल्फिन लब : रिसर्च प्रोग्राम

आपणा सर्वांनाच माहित आहे कि इलेक्ट्रॉनिक्स  ब्रँचला  सर्वच कॉलेजमध्ये अॅडमिशन कमी झाली आहेत. काही कॉलेजेसमध्ये तर दोन आकडी संख्या सुद्धा पुर्ण झाली नाही . ही खरच खुपच चिंताजनक बाब आहे. यामुळे शिक्षक  आणि  विद्यार्थी  सर्वांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुन किती दिवस ही ब्रँच चालणार हे कळणं  मुश्कील झालं आहे.
      जुनी अनुभवी  माणसे सांगतात कि  हे असं होतं.  आणखी दोन वर्षाने इलेक्ट्रॉनिक्सला  परत चांगले दिवस येतील. पण कुणालाहि  माहित नाही की खरच असे  होईल  आणि समजा  झालं तर किती दिवस टिकेल हे कुणालाही माहित नाही.
      कारण आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत, आता आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे जागतिक स्पर्धा उभी ठाकली आहे. फिलिपिन्स ,चायना आणि बरेच देशानी आता कमी पैशात काम करणारे  कुशल मनुष्य बळ निर्माण करण्यात मोठीच आघाडी घेतली आहे.
      आमची  सर्वात मोठी घोडचुक म्हणजे  आम्ही लाख निर्माण केले पण लाखाचे पोशिंदे तयार केले नाही. आमचे विद्यार्थी किती   उद्योजक झाले हे पाहण्याऐवजी  किती नोकर   झाले याची  टिमकी  वाजवण्यातच आम्ही धन्यता मानली. बरं आमचे  प्लेस झालेले विद्यार्थी हे  इलेक्ट्रॉनिक्समध्ये नाही झाले तर ते झाले सॉफ्टवेअर डोमेन मध्ये झाले. म्हणजेच चार वर्षे इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान घेण्यासाठी घालवली ती सर्व वाया गेली.
      गेली दहा ते बारा वर्ष हे चाललं आहे. त्यामुळे भारतीय उद्योग जगतात कुशल इलेक्ट्रनिक्स इंजिनियरची कमतरता  निर्माण झाली आहे. म्हणुन इलेक्ट्रॉनिक्सचे उद्योग फारसे उभे राहिलेच नाही , याचा परिणाम आज नवीन इंजिनियरना नोकऱ्या  उपलब्ध नाहीत आणि त्याच बरोबर  नवीन उद्योग उभा करण्यासाठी आत्मविश्वास नाही  कि योग्य मार्गदर्शक नाहीत.फक्त प्रॅक्टिकल आणि टर्म वर्कच्या आयत्या मिळालेल्या मार्कांच्या जीवावर मार्कशीटवर गुटगुटीत दिसणारी हि बाळे व्यवहारी जगासाठी अगदीच निरुपयोगी आहेत.
      मग आता पुढे कायया सगळ्याचा परिणाम असा झाला आहे कि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे जो उद्यासाठी घातक आहे .आता  जर त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर पुढच्या वर्षी अजुन कमी अॅडमिशन होतील ज्याचा परिणाम वाईट असेल.
      डॉल्फिन लॅब्सने मी अभियंता”  हा प्रकल्प हाती घेतला आहे. ज्यामध्ये  विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान देणे , त्यांचे प्रोजेक्ट त्यांनी स्वत: करावे यासाठी मार्गदर्शन करणे , त्यांना पेटंट घेणेसाठी मदत करणे ,त्यांचेमध्ये उद्योजकता वाढीस लावणे , त्यांना उद्योग चालु करण्यासाठी मदत  करणे यासाठी लॅब्सची सभासदत्व योजना चालू केली आहे ज्यामध्ये   विद्यार्थी तसेच कॉलेज  सभासद होऊ शकतात. सभासद होणाऱ्या विद्यार्थ्याला माफक दरात वेगवेगळे कोर्स उपलब्ध आहेत. तसेच सभासद होणाऱ्या कॉलेजना विद्यार्थ्याना प्रोजेक्टचे काम करणेसाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट करणेसाठी  लॅब हि डॉल्फिन लॅब तर्फे मोफत देण्यात येणार आहे.या लॅब मध्ये डॉल्फिन लॅबने पेटंट फाईल केलेली किट्स दिली जातील.या किट्सच्या सहाय्याने 8051,ARM,AVR,PIC,Arduino,Raspberry Pi, Robotics  यावरचे प्रोजेक्टस करता येतील.. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट नाहीतर प्रोजेक्ट्स हा यामागे उद्देश आहे.

अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क करा.

डॉल्फिन लॅब्स. पुणे, ०२०-६५२०८०५१,९७६३७१४८६०



सगळ्या ब्रँचला गरजेची असणारी माझी ब्रँच आज केविलवाणी झाली आहे. जी ब्रँच सगळ्या ब्रँन्चची खरतर महाराणी आहे आणि तिच्यावर आज भिकारणीसारखी अवस्था आली आहे. आणि तिला परत तिचे वैभव मिळावे यासाठी माझे हे प्रयत्न चालू आहेत. कुणीतरी यासाठी प्रयत्न करावेत मग मी का नाही असा विचार करून मी हि वाट चालतो आहे. तुम्हाला पटल तर शेअर करा. 



Friday, October 2, 2015

असे बनतात कागदी वाघ

ज्यावेळी सुबत्ता येते तेव्हा आळस, बेफिकिरी आणि तडजोड या गोष्टी माणसामध्ये प्रवेश करतात. सुखाची रेलेचेल असल्यावर आपोआपच आळस अंगात येतो. अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी होते, आजचा दिवस तर व्यवस्थित गेला मग उद्याचं उद्या बघु अशी बेफिकिरी वाढीस लागते. पुढे कष्ट करायची इच्छा कमी होते मग तडजोडीला सुरुवात होते. शेवटी एक दिवस असा येतो कि तडजोडीनेही प्रश्न सुटत नाही मग आपण जागे होतो .आता आपल्याजवळ कामाचे कौशल्य राहिलेले नसते आणि मधल्या वेळेत जग पुढे गेलेले असते आता सुरु होते धावाधाव, ताणतणाव आणि वैताग.
अशातुन सुटका करायचे तर अंगी येते चापलुसी आणि कागदी घोडे नाचवणेची प्रवृत्ती, खोटेपणा आणि लांडी लबाडी. हळुहळू या खोटेपणा, चमचेगिरी  याला प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होते. हि प्रतिष्ठा अधिकृत करणेसाठी कागदपत्रे तयार केली जातात. रोज नवीन कागदे, नवीन नियम तयार करणेसाठी माणसांच्या झुंडी कामाला लागतात. कागदाला महत्व येते. कागदासाठी कागद ,कागदासाठी कागद. कागद जमायला लागतात, रद्दी वाढायला लागते. आता वेळ निघून गेलेली असते. हाती फक्त कागद उरतात. कौशल्याची किंमत कमी होते आणि कागद किती आहे ते पाहिले जाते. त्यामुळे आता फक्त कागदावरचे वाघ बनतात  आणि हे वाघ इतरांना कागदाची भीती घालण्यात आयुष्य घालवतात.

Tuesday, September 29, 2015

देवा गणराया......................

 देवा गणराया , तू आल्यापासुन एक गोष्ट सांगायची होती पण सांगायचा धीरच झाला नाही. आज आमच्या राज्यावर दुष्काळाने थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतात चिमणीला प्यायला पाणी नाही. जमिनीला पडलेल्या भेगा पाहुन  काळीज पीळवटायला लागलय. वाटल आता माझ्या मागणीपेक्ष्या त्त्यांच्यावर तुझी कृपा होणे गरजेचे आहे. पण कालचाच facebook वरचा प्रसंग पाहिला आणि आता राहवत नाही म्हणुन हे सांगतो.
हे विघ्नहर्त्या, आज जी अवस्था शेतीची आहे त्याच्याहि पेक्षा भयाण  अवस्था शिक्षणाची आहे. एक पिक नाही पिकल तर वर्ष वाया जात  पण  आज जो शिक्षणाचा खेळखंडोबा चालला आहे त्याची त्याला जर वेळीच आवर नाही घातला तर आमच्या किती  पिढ्या वाया जातील याची कल्पनाच करवत नाही.
हे लंबोदरा, अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या पिल्लाला मदत करण्याची मनाई, त्या पिल्लाच्या आईलाही निसर्गानं केलेली आहे, यात निसर्गाची निष्ठुरता नसते तर त्या पिलाला संकटाला सामना करणेची ताकद आणि अनुभव देणे हा असतो. संघर्ष हेच जीवन आहे याचा प्रथम प्रात्यक्षिक अनुभव इतक्या लहान वयात घेउनच ते जगात येत. जर त्या पिलाच्या आईने त्याचा कळवला येउन  निसर्गाला धुडकावल तर......
पण निसर्गाचा पायाभूत हा नियम आमच्या तथाकथित उच्च विद्याविभुषित शिक्षण शास्त्रज्ञाना    समजत नाही, त्यांना त्यात निष्ठुरता वाटते. मुलांना रागवु नका,काही बोलू नका, त्यांना  जास्त अभ्यास देऊ नका. त्यांच्या कलानं घ्या. त्यांना  परीक्षा नको,त्यांना गृहपाठ नको. असे अनेक मत आजचे शिक्षण शास्त्रज्ञ करत आहेत. याचा खूप मोठा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत आहे.
हे विनायका , पीक लावलेवर योग्यवेळी त्यामध्ये विरळणी हि करावीच लागते आणि विरळणी करताना निर्कृष्ट रोप हे काढुनच टाकाव लागत  त्यामागे त्याचा उद्देश पीक चांगल याव हा असतो. उपलब्ध जागा ,खाद्य या गोष्टी उरलेल्या पीकाला व्यवस्थित मिळावी हा असतो. त्याप्रमाणे नापास न करता सरसकट सर्वाना पास करत नेल्यामुळे आज एक अंधाधुंदी माजली आहे . ज्यावर कुणालाही बोलायला वेळ नाही आणि बोलायची इच्छा हि नाही. याचा खूप मोठा परिणाम उद्या आमच्या देशावर होणार आहे. नापास होण हि सुधारणेसाठी असणारी संधी आहे , स्वत:ची कुवत जाणुन घेउन वेळीच दुसरा मार्ग पकडण्यासाठी मिळालेली सूचना आहे हे लक्ष्यात न घेता आम्ही नापास हि शिवी करून टाकली,एक कलंक करून टाकला आणि त्या कलंकापासून दूर पळावे यासाठी अनेक बरेवाईट मार्ग अवलंबले.
हे एकदंता, जर पाश्चात्य शिक्षण पद्धती चांगली असती तर आज त्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारताकडे भिकाऱ्यासारखे बघावे लागले नसते. हे लोकांना कळत कसे नाही. त्यांनी डमरू हालवायचा आणि आम्ही मग माकडासारख्या उड्या मारणार, मग तेच आम्हाला certificate देणार मग आम्ही ते मिरवणार ...... बर हा डमरू त्यांनी हलवावा म्हणुन आम्हीच त्यांना गाऱ्हाणे घालणार,त्यासाठी वर पैसे देणार आणि त्यांच्या  अनंत उपकारांच्या ओझ्याखाली स्वत: ला गाडून घेणार . हे कधी आम्हाला कळणार? . आजच्या जगातील चालू असणारा याहूनी मोठा आणि हास्यास्पद विनोद काय? लाज वाटते देवा आमची बुद्धी कुठे गहाण पडली आहे?
हे सुखकर्त्या, तसं पाहिलं तर शेतकरी आणि शिक्षक एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक पोटाची भूक भागवतो आणि दुसरा मनाची . तंत्रज्ञानाच्या भाषेतच सांगायचं  म्हणजे एक हार्डवेअरची काळजी घेतो  आणि दुसरा सोफ्टवेअरची. जे नियम शेतीला लागु होतात तेच शिक्षणाला.
नवीन प्रकारची बियाण मार्केटला आली आहेत त्याचा उपयोग करून पिक एकदाच घेता येत, पिक चांगल येत पैसाही चांगला मिळतो पण त्या पिकाचा उपयोग बीजासाठी होत नाही , ती बीज नपुसंक असतात. त्याप्रमाणेच घाऊक बाजार पेठेसाठी तयार केलेली  नपुसंक बुद्धिमत्ता असणारी एक पिढीच या देशात निर्माण झाली आहे. यांना स्वत:ची बुद्धिमत्ता हि नाहीच . आपल मत काय आहे हे न सांगता पाश्चात्य देशातला अमुक अमुक काय सांगतो त्यावर यांची बुद्धिमत्ता ठरते .
ज्याप्रमाणे नगदी पिकांच्या नादाला लागुन शेतीच वाटोळ झालंय त्याचप्रमाणे पैशाच्या नादाला लागुन त्याप्रमाणे अभ्यासक्रम तयार करून शिक्षण क्षेत्राचं वाटोळ झाल आहे.
हे दुख:हर्त्या, ज्याप्रमाणे आज मुलांना  शेतकरी व्हायला नको आहे ,त्याप्रमाणे उद्योजक व्हायला नको आहे.
त्यामुळे आज लाख निर्माण होतात  पण लाखाचे पोशिंदे तयार होत नाहीत.  विद्यार्थी किती   उद्योजक झाले हे पाहण्याऐवजी  किती नोकर   झाले याची  टिमकी  वाजवण्यातच धन्यता मानली जाते. परिणामी बेकारांच्या झुंडीच्या झुंडी आज फिरत आहेत.
आज दुष्काळामुळ शेतकरी आत्महत्या करतात. उद्या भरमसाठ बेकारी वाढलेवर जी अवस्था होईल त्याची कल्पनाही सहन करता येत नाही. इथे तरुण बेकार आत्महत्या करणार नाहीत तर तलवारी घेउन रस्त्यावर फिरतील. चार घासासाठी मुडदे पडतील आणि जर आताच शिक्षण पद्धतीवर विचार नाही केला तर येत्या काही वर्षातच हे चित्र दिसेल.
मुलांच्या कौशल्याचा विकास व्हावा , त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावा यासाठी प्रात्यक्षिकावर भर द्यावयाचे सोडून इ – लर्निगचे नवीन खूळ काढले आहे. नवनवीन अभ्यासक्रम आणि सरतीर्फिकेटचा भडीमार झाला आहे. पायाभुत शिक्षणाचा कुणी विचारच करत नाही. सारे प्रयोग चालले आहेत. प्रयोग , प्रयोग आणि प्रयोग,
आमच्या देशातील बुद्धिमत्तेचा वापर देशासाठी न करता त्यांना दुसऱ्या देशातील उद्योजकाची चाकरी करायला पाठवायचे आणि त्यांच्या मालकांना आपल्या देशात व्यवसाय करायला बोलवायचे मला वाटते हा जो मोठा विनोद आहे तो तुला पुढच्या वर्षीपर्यंत हसायला पुरेसा आहे.
देवा परमेश्वरा तसं सांगायचं खूप आहे खुप काही लिहिले आहे पण त्यातील काही मुद्दे मी तुला सांगत आहे.,

हे बुद्धीच्या देवा, शेतकऱ्यावर तर तू कृपा करच पण थोडी कृपा आमच्या शिक्षण क्षेत्रावरहि कर हि विनंती.