Thursday, May 9, 2024

****** भारतीय परंपरा , मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ********

 *

१ .....
खुप वर्षापूर्वी म्हणजे १९८३ साली वाचलेली गोष्ट आहे . त्यावेळी मी तिसरीत होतो . रामकृष्ण मिशनच्या कुठल्यातरी एक पॉकेट बुकमध्ये लिहिलेली होती . त्यावेळी मला या गोष्टीचा अर्थ एव्हढा खोल मध्ये समजला नव्हता पण आज त्या एका गोष्टीत वरील विषयाला समजून घेण्याचा परिपूर्ण संदर्भ आहे .
गोष्ट तशी लहानच आहे . त्यावेळच्या परिस्थितीला ती परिपूर्ण होती पण आजच्या विषयासाठी मी त्यात थोडीशी भर घालेन.
एका गावातील एक मुलगा लहान वयातच घर सोडून तप :श्चर्या करण्यासाठी जंगलात जातो तो बारा वर्षांनी साधू बनून घरी येतो. सगळे लोक त्याचा सन्मान करतात . त्याचा मोठा भाऊ त्याला विचारतो या तपश्चर्या केल्याचे फळ काय ? मग तो साधू भावाला घेऊन नदीकिनारी जातो. आणि नदीच्या पाण्यावरून या तीरावरून चालत पलीकडच्या तीराला जातो आणि परत येतो . साधूला वाटते कि भाऊ कौतुक करील. पण भाउ म्हणतो काय बारा वर्ष तपस्चर्या करून हे इतकंच मिळवलास ? यात कौतुकाच काय आहे? दोन आणे दिले तर नावाडी मला या तीरावरून तिकडे आणि परत मला घेऊन येतो . तू ज्ञानाच्या सागरात तर उतरलास पण मोती आणायच्या ऐवजी गोटे आणलेस . साधूला चूक कळली आणि परत तो जंगलाच्या दिशेने चालू लागला .
तर हि गोष्ट इथेच संपली पण मी थोडा शेवट बदलतो .
ज्यावेळी भाउ साधूला फटकारतो तेव्हा साधू म्हणतो . अरे दादा हे कलियुग आहे . इथे नमस्कार हा चमत्काराला होतो . मी पाण्यावरून चालून जायच्या कार्यक्रमाच आयोजन करेन आणि भक्त मंडळी वाढवून एक वेगळा पंथ निर्माण करेन , मोठमोठे मठ बांधेन आणि बरंच काही करता येईल . अस त्यान थोडस भावाला समजावून सांगितले आणि त्या बरोबर भावाने लगेच त्याचे पट्ट शिष्यत्व स्वीकारले.
२ .....
सुमारे पाच वर्षापासून मी एक व्हिडीओ पाहतोय . अधून मधून तो व्हाटस अप वर मला दिसतो .तुम्ही पण पाहीला असेल आणि शेअर पण केला असेल .
तर ‘गरुड संजीवनी’ नावाची एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. ती फक्त भारतात आढळते आणि काही दाव्यानुसार ती हजारो वर्षापासून आपल्याकडच्या लोकांना माहित आहे . त्या वनस्पतीची जर काडी पाण्यात टाकली तर ती प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहात जाते . जर नळ चालू केला तर त्याच्या धारेमध्ये सुद्धा ती वरच्या दिशेने जाते . मला वाटते कि ज्याच्या फोनवर whats app, फेसबुक , इन्स्टाग्राम आहे त्या सर्वांनी तो पाहिला असेलच . हा व्ही डी ओ पाहणाऱ्यामध्ये भारतातील मोठमोठे नामांकित असतील .
तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याकडील एकालाही वाटलं नाही कि या वनस्पतीचा अभ्यास करावा . जर हा व्हिडिओ खरा असेल तर जवळ जवळ पन्नास पेक्षा जास्त पी एच डी चे टॉपीक यातूनच मिळतील . या वनस्पतीच्या काडीच्या आकाराचे असे काय वैशिष्ठ्य आहे कि ज्यामुळे हि काडी प्रवाहाच्या विरुध्द आहे हे जर कळले तर बऱ्याच गोष्टीमध्ये क्रांती होईल. पण आमच्याकडे या दृष्टीने कधीच पाहिले जात नाही उलट हा चमत्कार मानून ती वस्तू देव्हाऱ्यात ठेवली तर अमुक अमुक लाभ होईल अशा भाकड कथन करून तीची पूजा तर केली जाईल किंवा भरमसाठ पैशात ती विकली जाईल .
आमच्याकडे चमत्काराचा कधी अभ्यास केला जात नाही उलट त्याला प्रश्न केला कि त्याला धर्मविरोधी म्हणणे आणि बहिष्कृत करणे हेच केलं जात . अध्यात्माचा अभ्यास विज्ञानाच्या चश्मातून कधी केलाच जात नाही . उद्या कदाचित पाश्चात्य संशोधकांनी या वनस्पतीच्या काडीच्या आकाराचा अभ्यास करून जर एखादे प्रोडक्ट बनवले तर लोक लगेच एखाद्या पुस्तकाचा आधार देवून गळे काढून हे तंत्रज्ञान भारतातच कस बनलं होत हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतील.
आपल्याकडे हाच मोठा प्रश्न आहे . भास्कराचार्य , जीवक, कणाद, वराहमिहिर , सुश्रुत हे मधल्या काळात कुठे गडप झाले होते. असे कितीतरी लोक आपल्याकडे काळाच्या ओघात गडप झाले.
हळदी मध्ये निरमा पावडर मिसळून हळदीचे कुंकू बनवून दाखवून रोज काही हजारात कमावणारे बुवा अगदी गेल्या दशकापर्यंत होते .
लोकांना सांगण्यासाठी शास्त्र झाली पण शास्त्रज्ञ अस्तंगत झाले. आजच्या काळात तर परिस्थिती खूपच वाईट आहे . लोकांचा प्रवास परत उलटा होत आहे . शास्त्राचा अभ्यास करून सृष्टीचे गूढ सोडवण्या ऐवजी परत चमत्कार आणि बुवाबाजीला उत येत चालला आहे.
आमच्याकडे देशाची सेवा करणारे शास्त्रज्ञ याच्यापेक्षा साधू आणि बुवा जास्त कमावतात . परवा चंद्रावर यान उतरवल त्या इस्त्रोच्या सगळ्या शास्त्रज्ञाच्या टीमच्या एका महिन्याच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा आणि मानसन्मान आपल्याकडचे काही बुवा किंवा महाराज एका दिवसात कमवत असतील.
भारतीय परंपरेत खुप चांगल्या गोष्टी असतील पण त्याचा वैज्ञानिक अभ्यास होत नाही . चमत्कार आणि कर्मकांड यात या गोष्टीच अवडंबर माजवल जात आहे . याला कारण आमच्याकडे नमस्कार हा चमत्काराला मिळतो . त्या चमत्काराच्या मागचे शास्त्र समजून घेउन त्यावर संशोधन करून सध्याच्या काळाला अनुरूप अशा गोष्टी स्वीकारायाची मानसिकता अजूनही तयार झालेली नाही.
आणि इथून पुढ स्वीकारतील अस वाटत नाही ... सध्यातरी एक गोष्ट घडत आहे आपण झपाट्याने उलट्या दिशेने चाललो आहोत. बघू पुढ काय होतंय ते .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स
९७६३७१४८६०
See insights
Boost a post
All reactions:
Mahesh Waghmare, Dr-Tejashri Mohite Patil and 7 others

No comments:

Post a Comment