Sunday, May 24, 2020

अभ्यास .... अभ्यासक्रमाचा भाग -१

बऱ्याच दिवसाची इच्छा होती ती लॉक डाउन मुळे सफल झाली . गेले पंधरा दिवस एकच काम केल ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामधील इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग संबंधित कोर्सच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास. मग त्यात Government of Maharashtra's Engineering Colleges , Government of Maharashtra's-Aided Engineering Colleges, University Department Institutes, University Managed Institutes, Deemed University या सर्व आल्या . याच बरोबर डिप्लोमा , आय टी आय आणि HSC MCVC हे पण आले . काही प्रमाणात इतर शाखांमध्ये अंतर्भूत केलेल्या इलेक्ट्रोनिक संबधित विषयांचा केलेला अंतर्भाव पण त्यातच आले.
यामध्ये आय आय टी चा अभ्यासक्रम अंतर्भूत नाही.
अजूनही अभ्यास चालूच आहे . कदाचित अजूनही एक महिना लागेल. बघू अजून किती काल इंटरेस्ट टिकतो.
हा अभ्यास करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या त्यातील काही मी नमूद करतो.
१. आय टी आय अभ्यासक्रम इलेक्ट्रॅनिक मेकॅनिक हा बऱ्यापैकी काळाला धरून चालला आहे . अजून २० टक्के त्यात बदल करता येईल .
२. HSC MCVC च्या अभ्यासक्रमासाठी जवळजवळ २७ पुस्तके संदर्भ म्हणून वापरलेली आहेत . डिप्लोमा साठी १४२ पुस्तकांचा संदर्भ दिला आहे त्या मानाने इंजिनियरिंगसाठी कमी पुस्तकांचा संदर्भ दिला आहे.(अर्थात हि नावे जरी दिली असली तरी खरंच त्यातील कुठल्या पुस्तकातील संदर्भ कुठे घेतला आहे देवाक माहित ).
३. ITI चा अभ्यासक्रम हा त्यांच्या विद्यार्थ्यांना नोकरी लागण्याचा उद्देश ठेउन तयार केलेला आहे आणि तो उद्देश त्या अभ्यासक्रमात पुरेपूर रित्या प्रतिबिंबित होतो. पण डिप्लोमा आणि त्यापेक्षाही डिग्रीचा अभ्यासक्रम हा उद्देश विहीन वाटतो कारण त्यामध्ये एकसंधता नाही.
4. दुसऱ्या शाखेच्या अभ्यासक्रमात जसे कि मेकॅनिकल , ऑटोमोबील केलेला इलेक्ट्रोनिक संबधित असणाऱ्या विषयांची अवस्था बऱ्यापैकी शेंडा आणि बुडखा नसल्यासारखी आहे. उगीच चिटकवावे असे असे आहेत .
५. बायोमेडिकल आणि एरोनोटीकलमध्ये जितका वाव इलेक्ट्रोनिकला द्यायला पाहिजे तितका दिलेला नाही.
५. फूड इंजिनियरिंग आणि अग्रीकल्चरलं इंजिनीरिंगमध्येपण इलेक्ट्रोनिक्स विषय आहेत पण ते केवळ माहितीपर आहेत त्यांचा योग्य उपयोग केलेला नाही.
६. इंजिनियरिंग आणि पोलीटेक्निक मधील इलेक्ट्रोनिक्स विषयात बरेच बदल करण्याची गरज आहे , त्यामध्ये आलेला विस्कळीत पणा काढून टाकण्याची गरज आहे .
7. बऱ्यापैकी अभ्यासक्रम हा केवळ माहितीप्रधान झाला आहे त्यात कार्यानुभावाला अजिबात वाव नाही.
8. इंजिनियरिंगमध्ये स्पेशलायझेशन जे आहे ते हास्यास्पद आहे , नावापुरत आहे.
9. बऱ्यापैकी विषय आणि त्यांचे अभ्यासक्रम कॉपी पेस्ट आहेत.
१०. बऱ्याच विषयातील तंत्रज्ञान हे काल बाह्य झाल आहे पण अजूनही ते अभ्यासक्रमात आहेत .
11. एका विषयाची नाळ दुसऱ्याशी जुळवलेली नाही त्यामुळे सगळा अभ्यासक्रम तुकद्याड्या तुकड्यात विभागाला आहे.
.
.
.
बरच काही.
एक मात्र खर आहे कि हा अभ्यासक्रम लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे . सध्या वेळ मिळालेला आहे त्याचा योग्य वापर संबधित करून घेतीलच.
-चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

असा हा सूंदर ऑन लाईन क्लास,

असा हा सूंदर ऑन लाईन क्लास,
ऑन लाईनच्या क्लासला मजा येते खास.
ऑन लाईन क्लासची मजाच न्यारी,
गादीवर लोळत पाहता येतो घरी.
नाही सकाळी लवकर उठायची घाई,
नाही गडबड पळत जाऊन बस पकडायची.
नाही आता ओझे जड जड दप्तराचे,
नाही आता भीती पुस्तक किंवा वही विसरायचे,
हवे तेव्हा मित्राबरोबर करू शकतो चॅट.
बोअर करणाऱ्या टीचरना करू शकतो म्युट ,
आली जरी डुलकी मी कॅमेरा ऑफ करतो,
कानाला हेडफोन लावून हळूच मी झोपतो.
सगळ्यात आवडे मला एक गोष्ट या क्लासची,
हवे तेव्हा मला गायब होता येते याची.

** करोनाची आँधी आणि मॅकलेचे भूत गाडण्याची उत्तम संधी ***

------------------------------------------------------------------------------
आम्हाला तिसरीच्या वर्गात असताना एक धडा होता - माकडाचे घर. माकड असत ते दर वेळी पावसाळ्यात भिजत असताना एकच विचार करत असत की यंदा पाऊस संपला की आपण घर बांधायचंच.पण पाऊस संपला की परत त्याच्या लक्षात राहायचं नाही , असाच हिवाळा जायचा, मग उन्हाळा जायचा आणि परत पावसाळ्यात पावसात भिजत माकड विचार करायचे की यंदा पावसाळा संपला की नक्की घर बांधायचे.
आजतागायत त्या माकडाने घर बांधलंच नाही.आता माकड म्हातारं झालंय आता त्याला विचारलं तर ते पूर्वजांना शिव्या घालत बसतं.
-----------------------------------------------------------------------------
परवा बातमी वाचली की यंदा महाविद्यालये सप्टेंबरमध्ये सुरू करायचा यु.जी. सी .चा विचार आहे. ही बातमी वाचली आणि एक विचार आला की जवळपास चार महिने अजून अवकाश आहे कॉलेजेस चालू करायला .इतका मोठा वेळ म्हणजे खूपच मोठा बोनस मिळाला आहे शिक्षण क्षेत्राला. मॅकलेने घातलेल्या पायावर जवळपास दोनशे वर्ष आपलं शिक्षण क्षेत्राची इमारत अवलंबून आहे. त्याच्या नावाने बोंब ठोकत प्रत्येक जण आपल कर्तृत्व लपवत होत. जमल तशी मोडतोड आणि बांधकाम चालू होतं त्यामुळे भक्कम अस काही झालं नाही. आणि ही इमारत आता मोडकळीस आली आहे.तीच सोंदर्य तर कधीच गेलंय. वेगवेगळ्या प्रयत्नाचा कामचलाऊ मेडक्यांनी कसंबसं छत आतापर्यंत तोलून धरलं पण आता ते अंगावर पडायची वेळ आली आहे.
सध्या लॉक डाऊन मुळे जग थांबलं आहे. महाविद्यालये बराच काळ बंद राहणार आहेत,पुढच्या वर्षीच ऍडमिशन कशी होतील हे काही सांगता येत नाही. शिक्षकांच्या नोकऱ्याच काही सांगता येत नाही.
तर आपण जर पुढच्या जर एक वर्षाचा प्लॅनिंग करून जर ही इमारत परत बांधयाला घेतली तर.अगदी पाया खणून.
सप्टेंबरपर्यंत जो वेळ आहे त्याचा उपयोग पाया घालणेसाठी होईल त्यानंतर आपल्याकडे किती शिक्षक कामाशिवाय राहतात त्यांचा अंदाज घेऊन पुढची बांधणी करता येईल.
अगदी अंगणवाडीपासून ते पार पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याची ही उत्तम संधी आहे.आता आलेल्या नाविन्यपूर्ण साधनांचा परिपूर्ण वापर या शिक्षण पद्धतीत करता येईल. नवीन शैक्षणिक उपकरणे , शास्त्रीय पुस्तके तयार करता येतील. शिक्षकांना खऱ्या अर्थाने उपग्रेड करायला हे वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येईल.गेल्या काही वर्षात ज्ञानाचा झराच आटला आहे.सगळी विहीर आम्ही संपवली आहे. आता त्यात परत भर घातली पाहिजे.यासाठी आपल्याकडील शिक्षकांचा वापर करू शकतो.
मी मागे एकदा 1880 सालच पुस्तक वाचलं होतं त्यात मॅकले च्या शिक्षण पद्धतीवर टिका केली होती . म्हणजे त्याच्या शिक्षण पद्धतीचे दोष 140 वर्षांपूर्वीच लक्षात आले होते तरीपण अजूनही आम्ही त्याच्या नावाने बोंब ठोकत आहे.तर आता आपल्याकडे हे मॅकलेचे भूत गाडून टाकण्याची परिपूर्ण संधी आली आहे त्यांचा अवश्य उपयोग व्हावा.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स,पुणे

****** चायना माल, आणि मानसिकता******

1998-99 चा काळ असावा. मेड इन चायनाची गजरची घड्याळं पार खेडोपाडी पोहोचायला लागली होती आणि आमच्या देशाची वेळ बदलायला सुरुवात झाली. 50 रु ला मिळणाऱ्या त्या गजराच्या घड्याळान देशाची अभिरुची आणि दूरदृष्टी बदलायला सुरुवात केली होती. आजोबांन त्याच्या तरुणपणात त्यांच्यासाठी घड्याळ घ्यावं आणि नातवाने ते त्याच्या तरुणपणात हातात कौतुकाने मिरवाव ह्या अपेक्षा संपायला सुरुवात झाली .
गुणवत्ता आणि टिकाऊपणाला किंमत देण्याची मानसिकतेचे बारा वाजले .कोईभी चीज 49,99 रु अशा कचऱ्याच्या भावात मिळणाऱ्या वस्तूंमुळे कचरा जमायला सुरुवात झाली. हळुहळु माणसाची मानसिकताच कचरा झाली.
USE and THROW एक नवीन संकल्पना या चायना मार्केट मुळे रुजू लागली. प्रत्येक जण आताचा विचार करू लागला. प्रत्येक प्रश्नाच्या मुळात न जाता वरून मलमपट्टी करू लागला.आतापुरत काम होतंय ना भविष्याचा विचार कशाला अस प्रत्येकाला वाटू लागलं. वस्तू सोडा लोकं लोकांना use अँड throw करायला लागला. याचा तोटा म्हणजे सामाजिक बांधिलकी कमी व्हायला लागली.लोकांच्यात इर्षा वाढू लागली, जागा टिकवून ठेवण्यासाठी चाटुगिरी वाढू लागली. इथेच कागद वाढायला सुरुवात झाली.
चायनाने आणलेल्या वस्तू दिसायला देखण्या होत्या .दिसायला मस्त आणि किमतीला स्वस्त. लोक बाह्यरूपावर भाळायला लागली. वस्तू खराब झाली तर स्वस्त आहे काय फरक पडतोय ही मानसिकता झाली.चांगल्या वस्तूची डिमांड कमी व्हायला लागली. हाच पॅटर्न सर्व क्षेत्रात वापरला जाऊ लागला.चकाचक ऑफिस, गुळगुळीत कागदपत्रं वाढायला लागली. फळं देणारी झाडं लावायच्या ऐवजी शोबाज नखरेल झाडं सगळीकडे मिरवू लागली. या झाडांच महत्व सर्व क्षेत्रात वाढू लागल. असल्या या परिसराच प्रतिबिंब माणसांच्या वर्तनात पण पडु लागला. सगळीकडे नपूसंक वातावरणाची निर्मिती होऊ लागली .माल कसाही असो पॅकींग चांगलं पाहिजे.पुढं पुढं तर लोक पॅकिंगच्याच इतकं प्रेमात पडू लागले की ते पॅकिंगच शोसाठी ठेऊ लागले. पॅकिंगच्या आतला माल काय आहे ते बघायला विसरू लागले आणि हळूहळू वस्तुपेक्षा पॅकिंगच्या भाव आला.
एखादा माणूस किती काम करतो याच कौतुक मागे पडून काही काम नाही हो फक्त दोन सह्या करतो आणि एव्हढा मोठा पगार घेतो याच कौतुक वाढायला लागलं किंबहुना लोकांना कमी काम करून जास्त पैसा मिळवणं हे स्टेटस सिम्बॉल वाटू लागलं. त्याचाच परिणाम या नवीन पिढीवर होत आहे. कष्ट आणि मेहनत करून पैसा कमविणे हे दुय्यम समजले जाऊ लागले.
आपल्याकडे मिळणार चायनीज खाणं खऱ्या अर्थाने चायनीज नाही तरी पण या चायनीज खाण्याने आमच्या जिभेला नवीन चवी दिल्या . अन्ना मध्ये पोषक द्रव्य किती आहे , ते शरीरासाठी घातक आहे का यापेक्षा ते किती चटपटीत लागत यावर जास्त भर दिला जाऊ लागला.त्याचे परिणाम आरोग्यावर होऊ लागले आहेत.
चायनाने इतक्या प्रकारचये प्रोडक्ट बाजारात आणले आहेत की त्यामुळे चालू पिढीला नवनिर्मिती ची ओढच वाटत नाही. ज्वारीच्या कडव्याच्या थाटापासून वस्तू बनवायची कला संपली. स्वतः पतंग करून उडवायचा जमाना गेला.तयार बॅटरी वर चालणारी आधुनिक खेळणी त्यांच्यामधील जिज्ञासा कमी करू लागली. खेळण्याचा उपयोग शिक्षणासाठी करायच्या ऐवजी शिक्षणाचंच खेळणं झालं.
चायनाच्या प्रोडक्टने केवळ आमचं अर्थशास्त्रच नाही तर समाज शास्त्र, राज्य शास्त्र, आरोग्यशास्त्र , शिक्षण शास्त्र सगळं बघता बघता कधी बदलून टाकलं हे कळलंच नाही.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे

**** ऑस्ट्रीच अल्गोरिदम*****

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र: बात तो कर लो. (भाग 9)
ऑपरेटिंग सिस्टीमचा अभ्यास करताना एक अल्गोरिदम होता "ऑस्ट्रीच अल्गोरिदम" . हा अल्गोरिदम डेड लॉक संबंधी होता.
ऑस्ट्रीच हा पक्षी आहे ज्याला मराठीत आपण शहामृग म्हणतो.
तर शहामृगचा धावण्याचा वेग हा 70 किलोमीटर/ तास असतो.
याच्या पायात इतकी ताकद असते की एका फटक्यात सिंहाला गारद करू शकतो पण या ताकदीचा त्यालाच अंदाज नसतो . त्याच्यावर एखादं संकट येत म्हणजे कुठलाही प्राणी त्याच्या मागे लागला की तो संकटाचा सामना करणे अथवा पळण्याचे ऐवजी स्वतः च डोकं जमिनीत खुपसतो आणि कल्पना करतो की संकट टळलं. आणि त्याच्या यावृत्ती मुळेच तो मारला जातो.
ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऑस्ट्रीच अल्गोरिदम तेव्हाच फायद्याचा असतो जेव्हा सिस्टीमचे आयुष्य डेड लॉक येण्याच्या पूर्वीच संपणार असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले तर चालते.
आमच्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गेली कित्येक वर्षे हाच अल्गोरिदम वापरला गेला आहे. असू दे, चालू दे अस म्हणत आम्ही प्रत्येक प्रश्नाला बगल दिली . कागदावर निव्वल आकडे वाढवून प्रत्येक प्रश्न झाकून टाकले.एखाद्या प्रश्नाला लढा द्यायच्या ऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष्य केलं. कागदी घोडी नाचवींत फायलीच्ढि चे ढिगारेच्या ढिगारे बनवले आनि त्याच्याखाली तोंड लपवल.
काय होणार? कशाला होणार? याचा विचार मीच का करू ? मलाच काय पडलंय? जाऊ दे तिकडं जे सगळ्यांचे होईल तेच आपलं होईल अस म्हणून कुठलाही प्रॉब्लेम आला की आम्ही सोयीस्कर पाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.आम्ही मान खुपसून बसलो कागदात आणि मनाला समजावत बसलो की काहीही प्रॉब्लेम नाही...
पण आता वेळ आली आहे.संकट पुढ्यात आहे आणि आता आम्हाला जाणीव झाली पाहिजे आपल्यातील ताकदीची. हे मंदीच संकट केवळ आपण ठाम पणे उभं राहिलं तरच जाणार आहे .
आता लढण्याशिवाय पर्याय नाही. आता पळण्याच्या साऱ्या वाटा संपल्या आहेत.पगार मिळायचे तर बऱ्याच ठिकाणी थांबले आहेत. इथून पुढं काय होईल कोणीही सांगू शकत नाही.बाहेर मार्केटला उतरून स्वत:ला अजमावण्याच धाडस आता संपलेलं आहे.ज्यांच्यात धाडस होत ते आधीच सोडून गेलेले आहेत.
अशावेळी राजकारण सगळं बाजूला ठेवून शांतपणे विचार केला पाहिजे. एक तर पळलं पाहिजे नाहीतर लढल पाहिजे.
...आता मान बाहेर काढलीच पाहिजे नाहीतर सगळंच अवघड आहे.

ओन लाईन ...बिन लाईन

रवा पोस्ट टाकली होती, " केवळ ऑन लाइन लेक्चर घेऊन निव्वळ विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तयार करून आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करत नाही का?
बऱ्याच जणांनी रिप्लाय दिले , धन्यवाद.
ही पोस्ट टाकण्यामागे माझी एक इच्छा होती की यावर विचार मंथन व्हावे आणि त्यामधून काही तरी नवीन मार्ग निघावा.
आपण नेहमी म्हणतो की मुलांचे प्रॅक्टिकल ज्ञान कमी आहे. इंडस्ट्रीच पण तेच मत आहे.आपल्याकडे मार्कस मिळवायला मुले कमी पडत नाहीत. कमी पडतात ते प्रॅक्टिकल ज्ञानाला. हे सर्वांनाच माहिती आहे.अस असताना देखील आपण नेहमीच थेअरीवर भर देऊन मोकळे होतो. कारण प्रॅक्टिकलचे मार्क्स हे आपल्या हातांत असतात. इंजिनिअरिंगमध्ये सध्या प्रॅक्टिकलचा संबंध हा शंकरपाळीतल्या शंकरसारखा झाला आहे . ही एक प्रकारची फसवणूकच नाही का?
आता ही सगळ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची दुसरी सेमिस्टर आहे. यानंतर BE ची मुले डायरेक्ट बाहेर पडणार आहेत. ही वेळ आहे ती खूपच संवेदनशील आहे. या करोनामुळे जूननंतर मार्केट कसे असणार आहे ते सांगता येत नाही किंबहुना पुढची दोन वर्ष कशी असतील हे कुणीही सांगू शकत नाही.त्यामुळे आता भले थेअरीला मार्क्स कमी पडली तर चालतील पण प्रॅक्टिकल त्यांना जमण गरजेचं आहे.
बऱ्याच लोकांना वाटत की आम्ही सिम्युलेशन करून दाखवू. सिम्युलेशन करून पाहायला मर्यादा असतात. इंजिनिअरिंग हे पंचेंद्रियाने शिकायचं असते. जस जशे खडू फळा शिक्षण पद्धतीचे अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातून मह्त्व कमी व्हायला लागले तसतसे शिक्षण शिक्षकाच्या हातून आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जायला सुरुवात झाली आहे.
प्रत्येक वेळी आपण पाश्चात्य पध्दतीचा विचार आपल्या शिक्षणात करायला पाहतो पण आपल्या विद्यार्थ्यांची जडणघडण ही वेगळी आहे.स्वतः शिकणे आणि त्याची जबाबदारी घेणे हे त्यांना जमत नाही. आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट ही हाताने शिकवायला लागते हे सत्य आहे.
आज जर आम्ही ई लर्निंगचा उदो उदो करायला लागलो तर उद्याची अवस्था वाईट होईल .450 रु ला कोर्स मिळतात ऑन लाईन . आजकाल कंपन्या शैक्षणिक पात्रता पाहण्या ऐवजी काय येत हे पाहतात .जर प्रॅक्टिकल मिळणार नसेल आणि जर सिम्युलेशनच करायची तर इंजिनिअररिंग कॉलेजला जायचं कशाला? उद्या लोकं त्याचाही विचार करायला लागतील. या विषयात मला खोलात जायची इच्छा नाही.
बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची रेंज मुलाना मिळत नाही. बऱ्याच कॉलेजना ऑन line ट्रेनिंग देणं जमत नाही . मुलं मानसिक सैरभैर झाली आहेत. त्यांना आता गरज असणार आहे शिक्षकांची. त्यांना प्रॅक्टिकली कस स्ट्रॉंग करता येईल हे पाहिलं पाहिजे.
शेवटी किती झालं तरी विद्यापीठला ऑन line लेक्चर मुलांनी केलं आणि त्यांचा अभ्यासक्रम संपला अस आपण सांगू शकत नाही आणि ते विद्यापीठ पण म्हणू शकत नाही. लेक्चर ही घ्यावीच लागणार आहेत.मग ही कुतर ओढ कशाला करायची .
सध्या करोनाच्या साथीमुळे सारं जग थांबलं आहे.सर्वाना हा खरच छान वेळ मिळाला आहे त्यांनी तो knowledge अपग्रेड करण्यासाठी वापरावा.आपल्या स्वतः साठी विद्यार्थ्यासाठी ,संस्थेसाठी आपण इतर काय शिकू शकतो, काय माहिती मिळवू शकतो ते पाहावं अस मला वाटतं. इतका काळ आपण एका चाकोरीबद्ध आयुष्यात जगलो आता वेळ मिळाला आहे तर सर्वांनी स्वतः ला अपग्रेड करावं असं मला वाटत.
जर त्यातूनही लेक्चर घ्यायची तर विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात काय संधी आहेत. सध्याच नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि आपण शिकवत असलेल्या विषयाची त्यासाठी काय गरज आहे याची माहिती द्या.
तुमची मते अवश्य मांडा.

करोना..... कुछ तो करो ना.

ज्यावेळी संकटे येतात त्यावेळीसच केवळ माणसाचीच नाही तर समाजाची खरी परीक्षा होते. कठीण परिस्थितीत समाज कसा सामोरा जातो त्यावरून त्याची सामाजिक , मानसिक , वैचारिक पातळी दिसून येते.
प्रसंग १ :गेल्या पावसाळ्यात महाराष्ट्रात पुराने थैमान घातले होते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खूपच अवस्था बिकट झाली होती. गावेच्या गावे पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडली होती. लोक बाहेर पडायला काही नाही म्हणून घरातच आणि काहीतर घरावर अडकली होती. काय करायचं हेच कळत नव्हत , नावा ,होड्या अपुर्या होत्या त्यामुळे लोकांना बाहेर काढता येत नव्हत. सगळीकडे हतबलता आली होती. कधी कधी विचार करतो कि हतबलता कशानं आली होती तर आम्ही शिकलेली लोक विचार करायाची क्षमता गमावून बसलो आहोत आणि आम्हाला काहीही स्वत: करायची इच्छा नाही आम्ही फक्त बघे झालो आहोत. इतक पाणी आल असताना आम्ही आमच डोक गमावून बसलो . एक दोन कमी शिकलेल्या माणसांनी अक्षरशः मोठ्या काहीलीचा वापर करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले पण आम्ही आमची बुद्धी लावू शकलो नाही. सांगली आणि कोल्हापूर भागात डझनाने इंजिनियरिंग कॉलेजेस आहेत आणि त्यात शिकणारी हजारो पोर . प्रत्येक कोलेजला वर्कशोप आहे पण आमची बुद्धी चालली नाही कि मुलांचा वापर करून पत्रे वगैरे जोडून पटकन काही नावा बनवाव्या. किंवा मुलांच्या लक्षात आल नाही कि आपल्या आसपास हजारो प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्यांचा वापर करून एखादा तराफा बनवावा. त्यावेळी मी दोन इंजीनियारिग कोलेजला संपर्क केला पण त्याचं म्हणन पडल कि हे आपल काम काम नाही. खर तर जाहिरात करायची मोठी संधीपण होती.
प्रसंग २: सध्या करोनाने धुमाकूळ घातला आहे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लागणारी सुरक्षाप्रणाली खूपच तुटपुंजी आहे. त्यात चीनमधून आम्हाला आयात करायची इतकी सवय लागली आहे कि आम्ही आमच्या देशात पर्यायच उभे करू दिले नाही . चीनची वस्तू स्वस्त आणि आमची वस्तू महाग का ? यावर कधी पर्यायच शोधला नाही. नोकर बनवण्याच्या नादात आम्ही मुलांच्या विचारशक्तीला वावच दिला नाही . आज आमच्याकडे वेनटीलेटरचा तुटवडा पडू शकतो त्याला पर्याय शोधण्याची गरज आहे .आजच लोकसत्ताला आल आहे त्याप्रमाणे बऱ्याच वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा आहे त्यावर विचार मंथन व्हायची गरज आहे पण यावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही. यावेळीपण काही ठिकाणी संपर्क केला पण काहीही रिस्पोंस नाही.
आज आपल्या इंजिनियरनी भरलेल्या देशात आपत्तींना कस तोंड द्यायचं हेच कळत नाही . प्रत्येक गोष्टीसाठी हाय टेक पर्याय शिकवल्यामुळे या मुलांना आसपासच्या गोष्टीपासून एखादी गोष्ट कशी बनवायची हेच कळत नाही. आपले विद्यार्थी हेच आपल भविष्य आहे हे कुणी लक्ष्यातच घेत नाही. नशीब अजून करोना आटोक्यात आहे पण पुढच्या क्षणाला काय वाढुन ठेवलं आहे हे सांगता येत नाही . तरी ज्यांना मनापासून वाटत कि आपण आपल्या देशासाठी कांही करू शकतो त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या साधनाचा वापर करून काय करता येईल हे शोधल पाहिजे. अनलिमिटेड इंटरनेट पॅकचा खऱ्या अर्थाने वापर करायची वेळ आली आहे .
नक्कीच कुणाला काहीतरी सापडेल . उगा अफवा फोरवर्ड करण्यापेक्षा आणि अफवा वाचत बसण्यापेक्षा , चघळत बसण्यापेक्षा काहीतरी धीराच्या गोष्टी शोधा आणि त्या पसरवा. लोक अखेर आशेवरच जगतात. कालच परभणीच्या एका मुलाने केलेलं व्हेन्तिलेटरच मॉडेल पाहिलं . तस ते मॉडेल खूपच प्राथमीक अवस्थेत आहे पण तरीही त्याला सलाम केला पाहिजे . त्याने केलेल्या मॉडेल मुळे कितीतरी लोकांना उत्साह आला. सध्या मी एका ग्रुपच्या सोबत आहे त्यांनी पण त्याचं डिझाईन पूर्ण करत आणल आहे. दोन तीन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
माझी सर्व अभियंत्याना विनंती आहे. कुणीतरी काहीतरी करील यावर बसू नका .प्रत्येकाने काहीतरी हातभार लावावा . कुठेतरी सुरुवात केलींच पाहिजे कदाचित यातून नवीन संधी तयार होतो.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे