Sunday, May 24, 2020

****** चायना माल, आणि मानसिकता******

1998-99 चा काळ असावा. मेड इन चायनाची गजरची घड्याळं पार खेडोपाडी पोहोचायला लागली होती आणि आमच्या देशाची वेळ बदलायला सुरुवात झाली. 50 रु ला मिळणाऱ्या त्या गजराच्या घड्याळान देशाची अभिरुची आणि दूरदृष्टी बदलायला सुरुवात केली होती. आजोबांन त्याच्या तरुणपणात त्यांच्यासाठी घड्याळ घ्यावं आणि नातवाने ते त्याच्या तरुणपणात हातात कौतुकाने मिरवाव ह्या अपेक्षा संपायला सुरुवात झाली .
गुणवत्ता आणि टिकाऊपणाला किंमत देण्याची मानसिकतेचे बारा वाजले .कोईभी चीज 49,99 रु अशा कचऱ्याच्या भावात मिळणाऱ्या वस्तूंमुळे कचरा जमायला सुरुवात झाली. हळुहळु माणसाची मानसिकताच कचरा झाली.
USE and THROW एक नवीन संकल्पना या चायना मार्केट मुळे रुजू लागली. प्रत्येक जण आताचा विचार करू लागला. प्रत्येक प्रश्नाच्या मुळात न जाता वरून मलमपट्टी करू लागला.आतापुरत काम होतंय ना भविष्याचा विचार कशाला अस प्रत्येकाला वाटू लागलं. वस्तू सोडा लोकं लोकांना use अँड throw करायला लागला. याचा तोटा म्हणजे सामाजिक बांधिलकी कमी व्हायला लागली.लोकांच्यात इर्षा वाढू लागली, जागा टिकवून ठेवण्यासाठी चाटुगिरी वाढू लागली. इथेच कागद वाढायला सुरुवात झाली.
चायनाने आणलेल्या वस्तू दिसायला देखण्या होत्या .दिसायला मस्त आणि किमतीला स्वस्त. लोक बाह्यरूपावर भाळायला लागली. वस्तू खराब झाली तर स्वस्त आहे काय फरक पडतोय ही मानसिकता झाली.चांगल्या वस्तूची डिमांड कमी व्हायला लागली. हाच पॅटर्न सर्व क्षेत्रात वापरला जाऊ लागला.चकाचक ऑफिस, गुळगुळीत कागदपत्रं वाढायला लागली. फळं देणारी झाडं लावायच्या ऐवजी शोबाज नखरेल झाडं सगळीकडे मिरवू लागली. या झाडांच महत्व सर्व क्षेत्रात वाढू लागल. असल्या या परिसराच प्रतिबिंब माणसांच्या वर्तनात पण पडु लागला. सगळीकडे नपूसंक वातावरणाची निर्मिती होऊ लागली .माल कसाही असो पॅकींग चांगलं पाहिजे.पुढं पुढं तर लोक पॅकिंगच्याच इतकं प्रेमात पडू लागले की ते पॅकिंगच शोसाठी ठेऊ लागले. पॅकिंगच्या आतला माल काय आहे ते बघायला विसरू लागले आणि हळूहळू वस्तुपेक्षा पॅकिंगच्या भाव आला.
एखादा माणूस किती काम करतो याच कौतुक मागे पडून काही काम नाही हो फक्त दोन सह्या करतो आणि एव्हढा मोठा पगार घेतो याच कौतुक वाढायला लागलं किंबहुना लोकांना कमी काम करून जास्त पैसा मिळवणं हे स्टेटस सिम्बॉल वाटू लागलं. त्याचाच परिणाम या नवीन पिढीवर होत आहे. कष्ट आणि मेहनत करून पैसा कमविणे हे दुय्यम समजले जाऊ लागले.
आपल्याकडे मिळणार चायनीज खाणं खऱ्या अर्थाने चायनीज नाही तरी पण या चायनीज खाण्याने आमच्या जिभेला नवीन चवी दिल्या . अन्ना मध्ये पोषक द्रव्य किती आहे , ते शरीरासाठी घातक आहे का यापेक्षा ते किती चटपटीत लागत यावर जास्त भर दिला जाऊ लागला.त्याचे परिणाम आरोग्यावर होऊ लागले आहेत.
चायनाने इतक्या प्रकारचये प्रोडक्ट बाजारात आणले आहेत की त्यामुळे चालू पिढीला नवनिर्मिती ची ओढच वाटत नाही. ज्वारीच्या कडव्याच्या थाटापासून वस्तू बनवायची कला संपली. स्वतः पतंग करून उडवायचा जमाना गेला.तयार बॅटरी वर चालणारी आधुनिक खेळणी त्यांच्यामधील जिज्ञासा कमी करू लागली. खेळण्याचा उपयोग शिक्षणासाठी करायच्या ऐवजी शिक्षणाचंच खेळणं झालं.
चायनाच्या प्रोडक्टने केवळ आमचं अर्थशास्त्रच नाही तर समाज शास्त्र, राज्य शास्त्र, आरोग्यशास्त्र , शिक्षण शास्त्र सगळं बघता बघता कधी बदलून टाकलं हे कळलंच नाही.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे

No comments:

Post a Comment