Thursday, May 9, 2024

****** भारतीय परंपरा , मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ********

 *

१ .....
खुप वर्षापूर्वी म्हणजे १९८३ साली वाचलेली गोष्ट आहे . त्यावेळी मी तिसरीत होतो . रामकृष्ण मिशनच्या कुठल्यातरी एक पॉकेट बुकमध्ये लिहिलेली होती . त्यावेळी मला या गोष्टीचा अर्थ एव्हढा खोल मध्ये समजला नव्हता पण आज त्या एका गोष्टीत वरील विषयाला समजून घेण्याचा परिपूर्ण संदर्भ आहे .
गोष्ट तशी लहानच आहे . त्यावेळच्या परिस्थितीला ती परिपूर्ण होती पण आजच्या विषयासाठी मी त्यात थोडीशी भर घालेन.
एका गावातील एक मुलगा लहान वयातच घर सोडून तप :श्चर्या करण्यासाठी जंगलात जातो तो बारा वर्षांनी साधू बनून घरी येतो. सगळे लोक त्याचा सन्मान करतात . त्याचा मोठा भाऊ त्याला विचारतो या तपश्चर्या केल्याचे फळ काय ? मग तो साधू भावाला घेऊन नदीकिनारी जातो. आणि नदीच्या पाण्यावरून या तीरावरून चालत पलीकडच्या तीराला जातो आणि परत येतो . साधूला वाटते कि भाऊ कौतुक करील. पण भाउ म्हणतो काय बारा वर्ष तपस्चर्या करून हे इतकंच मिळवलास ? यात कौतुकाच काय आहे? दोन आणे दिले तर नावाडी मला या तीरावरून तिकडे आणि परत मला घेऊन येतो . तू ज्ञानाच्या सागरात तर उतरलास पण मोती आणायच्या ऐवजी गोटे आणलेस . साधूला चूक कळली आणि परत तो जंगलाच्या दिशेने चालू लागला .
तर हि गोष्ट इथेच संपली पण मी थोडा शेवट बदलतो .
ज्यावेळी भाउ साधूला फटकारतो तेव्हा साधू म्हणतो . अरे दादा हे कलियुग आहे . इथे नमस्कार हा चमत्काराला होतो . मी पाण्यावरून चालून जायच्या कार्यक्रमाच आयोजन करेन आणि भक्त मंडळी वाढवून एक वेगळा पंथ निर्माण करेन , मोठमोठे मठ बांधेन आणि बरंच काही करता येईल . अस त्यान थोडस भावाला समजावून सांगितले आणि त्या बरोबर भावाने लगेच त्याचे पट्ट शिष्यत्व स्वीकारले.
२ .....
सुमारे पाच वर्षापासून मी एक व्हिडीओ पाहतोय . अधून मधून तो व्हाटस अप वर मला दिसतो .तुम्ही पण पाहीला असेल आणि शेअर पण केला असेल .
तर ‘गरुड संजीवनी’ नावाची एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. ती फक्त भारतात आढळते आणि काही दाव्यानुसार ती हजारो वर्षापासून आपल्याकडच्या लोकांना माहित आहे . त्या वनस्पतीची जर काडी पाण्यात टाकली तर ती प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहात जाते . जर नळ चालू केला तर त्याच्या धारेमध्ये सुद्धा ती वरच्या दिशेने जाते . मला वाटते कि ज्याच्या फोनवर whats app, फेसबुक , इन्स्टाग्राम आहे त्या सर्वांनी तो पाहिला असेलच . हा व्ही डी ओ पाहणाऱ्यामध्ये भारतातील मोठमोठे नामांकित असतील .
तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याकडील एकालाही वाटलं नाही कि या वनस्पतीचा अभ्यास करावा . जर हा व्हिडिओ खरा असेल तर जवळ जवळ पन्नास पेक्षा जास्त पी एच डी चे टॉपीक यातूनच मिळतील . या वनस्पतीच्या काडीच्या आकाराचे असे काय वैशिष्ठ्य आहे कि ज्यामुळे हि काडी प्रवाहाच्या विरुध्द आहे हे जर कळले तर बऱ्याच गोष्टीमध्ये क्रांती होईल. पण आमच्याकडे या दृष्टीने कधीच पाहिले जात नाही उलट हा चमत्कार मानून ती वस्तू देव्हाऱ्यात ठेवली तर अमुक अमुक लाभ होईल अशा भाकड कथन करून तीची पूजा तर केली जाईल किंवा भरमसाठ पैशात ती विकली जाईल .
आमच्याकडे चमत्काराचा कधी अभ्यास केला जात नाही उलट त्याला प्रश्न केला कि त्याला धर्मविरोधी म्हणणे आणि बहिष्कृत करणे हेच केलं जात . अध्यात्माचा अभ्यास विज्ञानाच्या चश्मातून कधी केलाच जात नाही . उद्या कदाचित पाश्चात्य संशोधकांनी या वनस्पतीच्या काडीच्या आकाराचा अभ्यास करून जर एखादे प्रोडक्ट बनवले तर लोक लगेच एखाद्या पुस्तकाचा आधार देवून गळे काढून हे तंत्रज्ञान भारतातच कस बनलं होत हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतील.
आपल्याकडे हाच मोठा प्रश्न आहे . भास्कराचार्य , जीवक, कणाद, वराहमिहिर , सुश्रुत हे मधल्या काळात कुठे गडप झाले होते. असे कितीतरी लोक आपल्याकडे काळाच्या ओघात गडप झाले.
हळदी मध्ये निरमा पावडर मिसळून हळदीचे कुंकू बनवून दाखवून रोज काही हजारात कमावणारे बुवा अगदी गेल्या दशकापर्यंत होते .
लोकांना सांगण्यासाठी शास्त्र झाली पण शास्त्रज्ञ अस्तंगत झाले. आजच्या काळात तर परिस्थिती खूपच वाईट आहे . लोकांचा प्रवास परत उलटा होत आहे . शास्त्राचा अभ्यास करून सृष्टीचे गूढ सोडवण्या ऐवजी परत चमत्कार आणि बुवाबाजीला उत येत चालला आहे.
आमच्याकडे देशाची सेवा करणारे शास्त्रज्ञ याच्यापेक्षा साधू आणि बुवा जास्त कमावतात . परवा चंद्रावर यान उतरवल त्या इस्त्रोच्या सगळ्या शास्त्रज्ञाच्या टीमच्या एका महिन्याच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा आणि मानसन्मान आपल्याकडचे काही बुवा किंवा महाराज एका दिवसात कमवत असतील.
भारतीय परंपरेत खुप चांगल्या गोष्टी असतील पण त्याचा वैज्ञानिक अभ्यास होत नाही . चमत्कार आणि कर्मकांड यात या गोष्टीच अवडंबर माजवल जात आहे . याला कारण आमच्याकडे नमस्कार हा चमत्काराला मिळतो . त्या चमत्काराच्या मागचे शास्त्र समजून घेउन त्यावर संशोधन करून सध्याच्या काळाला अनुरूप अशा गोष्टी स्वीकारायाची मानसिकता अजूनही तयार झालेली नाही.
आणि इथून पुढ स्वीकारतील अस वाटत नाही ... सध्यातरी एक गोष्ट घडत आहे आपण झपाट्याने उलट्या दिशेने चाललो आहोत. बघू पुढ काय होतंय ते .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स
९७६३७१४८६०
See insights
Boost a post
All reactions:
Mahesh Waghmare, Dr-Tejashri Mohite Patil and 7 others

^^^^^^नवीन शिक्षण पद्धती – अमुलाग्र बदलाची गरज ^^^^^^


आज काल नवीन शिक्षण पद्धतीवर सगळीकडे विचार मंथन सुरु आहे . अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राने तर हे खूपच मनावर घेतले आहे . बरेच महान वक्ते आणि अभ्यासक यावर विचार मांडत आहेत त्यामुळे माझं लिहीन म्हणजे सूर्यासमोर पणतीचा प्रकाश. पण याचा अर्थ विचार मांडूच नये असा नाही त्यामुळे हे लिहित आहे .
नवीन शिक्षण पध्दती मध्ये बरंच सगळ नवीन आणलं आहे . चांगली गोष्ट आहे. बदल हा घडलाच पाहिजे पण आपल्याकडे बदल हा गांभीर्याने घेतला जात नाही . आपल्याकडे बदल म्हणजे जुन्या बाटलीला नवीन लेबल लावलं म्हणजे झाल . नवीन शिक्षण पद्धतीत आता आता हे बदलायची गरज आहे .आता इथं केवळ बाटलीच नव्हे तर बाटलीच्या आतील पदार्थ सगळंच बदलायची गरज आहे . केवळ हे पदार्थच नाही तर ते पदार्थाचे डोस द्यायची पद्धत सुद्धा बदलायची गरज आहे . या अनुषंगाने विचार केला तर हे करत असतांना महाविद्यालय , स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठे (याठिकाणी विद्यापीठ म्हणजे स्वायत्त विद्यापीठ ज्याला इतर महाविद्यालये जोडलेली नाहीत असा आहे ). यामध्ये द्यायच्या शिक्षण पद्धती मध्ये आमुलाग्र बदल केला पाहिजे . कारण यांचे प्रत्येकाचे उद्देश हे वेगवेगळे आहेत आणि यातील सीमारेषा अगदी धूसर आहे . तसा हा विषय खूपच मोठा आहे त्यामुळे हळूहळू बदल कुठे झाले पाहिजेत यावर जमेल तस लिहित जाईन .
बदल करत असताना सध्याचा जो एक तास एक विषय हा असा एका दिवसात चार विषय थेअरी आणि एक प्रॅक्टिकल ढाचा हा मोडला पाहिजे . किमान विद्यापीठ पातळीवर तर झाला पाहिजे . थेअरी आणि प्रॅक्टिकल हे आता वेगवेगळ घ्यायची पद्धत पण आता मोडीत काढली पाहिजे . मुळात विषयांची जी अनावश्यक संख्या वाढवली आहे ती कमी केली पाहिजे आणि तास पद्धती ऐवजी सुरवातीला आठवड्यातून तीन तीन दिवस एक विषय असे दोन विषय एका आठवड्यात शिकवणे असे स्वरूप ठेवले पाहिजे.
सुरुवातीच्या काळात प्रात्याक्षिके झाली पाहिजे . विद्यार्थ्याला विषयाची ओळखच हि प्रात्यक्षिकातून झाली पाहिजे मग त्या विषयाची मांडणी हळूहळू विषय जाणून घेणे आणि नंतर त्या विषयाची खोली वाढवत नेणे असा प्रवास झाला पाहिजे . म्हणजेच सेमिस्टरच्या सुरुवातीला पहिल्या महिन्यात एक विषय तीन दिवस असे स्वरूप पाहिजे . नंतरच्या महिन्यात एक विषय एक दिवस आणि तिसऱ्या महिन्यात मग एक तास एक विषय अस स्वरूप झाल पाहिजे .
सुरुवातीला विचार केला तर हे अवघड वाटेल पण जर शांतपणे विचार केला तर हे एकदम सोप आहे .उलट या पद्धतीत बऱ्याच गोष्टीची कटकट कमी होईल.
आता या प्रकारे विषय शिकवण्यासाठी विषय शिकवण्याच्या पद्धती मध्ये पण बदल करायला लागेल . अभ्यासक्रमाचा ढाचा हा पूर्णपणे बदलावा लागेल. विषय हे प्रात्यक्षिकच्या रुपात मांडले जातील त्यामुळे विध्यार्थाना पण विषय चांगले समजतील.
सध्याचा अभ्यासक्रम हा नरसाल्याप्रमाणे आहे ज्यामध्ये विद्यार्थी हा मोठ्या बाजूने आत जातो आणि बाहेर येताना तो निमुळत्या बाजूने येतो . म्हणजेच तो जसजसा तो शिकत जातो तसा त्याचा फोकस हा कमी होत जातो त्यामुळे त्याला बाहेर संधी मिळत नाही . त्याउलट आता अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलले पाहिजे ज्यामध्ये हळूहळू विध्यार्थ्याचा फोकस वाढत गेला पाहिजे . ज्यावेळी तो शिकून बाहेर पडेल त्यावेळी त्याला संधीच संधी दिसल्या पाहिजेत .
लेख थोडासा अपूर्णच आहे .मुद्दाम विचारमंथन व्हावं यासाठी अपुरा ठेवला आहे ...
तुमच्या विचारांचे स्वागत .......
चित्तरंजन महाजन
९७६३७१४८६०
डॉल्फिन लॅब्स

**** आकाशी झेप घे रे पाखरा ********


सर्व साधारणपणे २०१५ -१६ ची गोष्ट असेल . एक दिवस अचानकपणे इंगळे सरांचा फोन आला . त्यांचे एक मित्र होते वानखेडे म्हणून त्यांच्या मुलासाठी सल्ला पाहिजे होता . मग मी वानखेडेना मुलाला शुभमला घेउन डॉल्फिन लॅब्स मध्ये बोलावल.
अक्खी फॅमिलीच आली . विचारपूस करताना कळल कि वानखेडे साहेब हे महावितरण मध्ये मोठ्या पोस्टवर काम करत होते आणि त्यांचा मोठा मुलगा सिंहगड कॉलेज वडगाव मध्ये इलेक्ट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन शिकत होता . पहिल वर्ष झाल आणि अचानक पणे काय झाल दुसर वर्ष शिकताना त्याचा अभ्यासातुन इंटरेस्ट गेला होता. त्याच वर्ष डाउन झाल होत . नंतरही त्याची अभ्यास करायची इच्छा उडून गेली होती . त्यामुळे विषय सुटत नव्हते . घरात बसून निव्वळ एका मोठ्या स्क्रीन च्या संगणकावर बसून रात्र रात्र फक्त व्हीडीओ गेम खेळत बसायचा . अजिबात अभ्यास करत नव्हता . पुढ शिकायची इच्छाच संपली होती .त्यामुळे दोघ नवरा बायको पण जाम टेन्शन मध्ये होते .
बोलत असताना माझ लक्ष्य शुभम कडे होत . कशीतरी दाढी वाढली होती , चुळबुळ चालू होती आणि डोळे पण अस्थिर होते . कदाचित व्हीडीओ गेम जास्त खेळत असल्याचा परिणाम होता . चार शब्द बोललो तर त्यामध्ये आत्मविश्वास नव्हता . हे लोक पार करियर कौन्सिलरचा सल्ला घेउन आले होते . पार ब्रँच बदलून आर्ट्स किंवा कॉमर्सला अॅडमिशन घेण्यापर्यंत विचार चालू होता . अगदी शेवटचा पर्याय म्हणून माझेकडे आले होते .
मी मग पालकांना थोड चहाच्या निमित्ताने बाहेर पाठवलं आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली . सुरुवातीला त्याच्या बोलण्यात काहीही सुसंगतपणा नव्हता काहीही उडवाउडवीची उत्तरं देत होता . मग मीच थोडस झापलं. आणि त्याला जाणीव करून दिली कि त्याला शेवटची संधी आहे विचार करण्याची . मग तो सांगू लागला कि कॉलेजमध्ये फक्त थेअरी होते आणि प्रॅक्टिकल जास्त डिस्कस केलं जात नाही त्यामुळे त्याचा इंटरेस्ट संपला होता. नेमकी कळ सापडली .
मग पुढ बोलन चालू झाल . जर त्याला सर्व प्रक्टिकली शिकवलं तर शिकशील का ? तो होय म्हणाला .
लगेच त्याच्या आई वडिलांना आत बोलावलं आणि प्लानिंग सुरु केल. त्याचे बरेच विषय राहिले होते . दुसऱ्या सेमची इनसेम पण जवळच आली होती . मग त्याला डॉल्फिन लॅब्स जॉईन करायला सांगितली . त्याचबरोबर मी माझे सहकारी सीमा राजपूत मॅडम , नचिकेत गायकवाड सर , भरते सर , यावले सर यांच्यासोबत चर्चा करून त्याला थोड शिकवण्यासाठी विनंती केली . हे शिक्षक म्हणजे विषय अगदी कोळून पिलेले असल्याने मला खात्री होती . त्यांनीपण माझ्या विंनतीला मान देउन त्याला शिकवायची तयारी दाखवली .
मग त्याचा दिनक्रम ठरवला. दिवसातील काही वेळ कॉलेजमध्ये येउन विषयाचा अभ्यास . त्यानंतर डॉल्फिन लॅब्सला प्रॅक्टिकल हँड्सॉन सुरु झाल .इन सेम झाली .पेपर चांगले गेले . मग त्यालापण हुरूप आला . अभ्यास करू लागला . शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे तिसऱ्या वर्षाला गेला . आता गाडी रुळावर आली होती .
पुढे त्यान एम एस केलं आणि सध्या अमेरिकेत एक चांगल्या कंपनीत काम करत आहे ...
डॉल्फिन लॅब्सच्या मुळे अजुन एक आयुष्य मार्गाला लागलं...

Sunday, November 19, 2023

माझा विद्यार्थी .... माझ प्रॉडक्ट

 परवा DIDAC बेंगलोर ला गेलो होतो सहज एका स्टॉलला भेट दिली . त्यावेळी सगळ बोलन झालेवर त्यांनी मला विचारलं कि तुमचं प्रॉडकट काय आहे . मी म्हणालो ज्यान हे तुमचं प्रोडक्ट  बनवलं तो  माझ प्रोडक्ट . त्या ते विचारात पडले मी म्हणालो "मी महाजन सर , डॉल्फिन लॅब्स". अस म्हटल्यावर ते चकित झाले .डॉल्फिन लॅब्सचा मेंबर त्या कंपनीत मॅनेजर होता. ते खुश झाले आणि त्यांनी त्या मेंबरविषयी कौतूकान बोलायला सुरुवात केली . खर तर त्यान डॉल्फिन लॅब्स च्या प्रोडक्टचीच कॉपी मारली होती.  आजपण कितीतीतरी मेम्बरच काय शिक्षक पण डॉल्फिन लॅब्स ची कॉपी मारतात. काही काही तर डॉल्फिन लॅब्सचे विचार, माहिती पत्रे सुद्धा निर्लज्यपणे कॉपी ,मारतात. मला वाईट वाटत नाही उलट अभिमान वाटतो. कि त्यांना काहीतरी मार्ग मिळाला. याचाच परिणाम पुढे असा होतो कि ते कुणावरही विश्वास ठेउ शकत नाहीत आणि हाच मला वाटत त्यांना मिळालेला शाप असतो.

असू दे ,तर हा मेंबर माझाच विद्यार्थी होता . पहिल्या वर्षाचा MATHS विषय राहिला त्यामुळे त्याला तिसऱ्या वर्षात परीक्षा देता आली नाही . मग आता वर्ष तर वाया जाणार म्हणून त्यान लॅब जॉईन केली . डॉल्फिन लॅब्सच्या साच्यात ढळत गेला . त्यान कष्ट पण चांगले घेतले आणि डॉल्फिन x नावाची लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग  सिस्टीम पण बनवली . कॉलेजमध्ये NAAC कमिटी आली तेव्हा त्यान त्याच प्रेझेन्टेशन पण केलं होत अर्थात त्यावेळी तो इयर डाउन होता. त्याला त्यावेळी मराठी बोलता येत नव्हत पण माझेसोबत राहून नंतर तोपण पाचशे पाचशे विद्यार्थ्यांच्या बॅचेस मराठी मध्ये  घेण्यात तरबेज झाला . 

लॅब मेंबर म्हणजे आम्मुहीलाप्रमाणे सांभाळत असतो पार माझ्या घराच्या किचनपर्यंत मुक्त प्रवेश त्यामुळे त्याच्या पाक कौशल्याचा विशेष म्हणजे माशांच्या पाककृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला .

पुढे त्यान चांगल नाव कमावलं. आज तो पण एक ब्रांड झाला आहे . अजूनही आमची भेट होते. डॉल्फिन लॅब्स्चे असे कितीतरी मेंबर वेगवेगळ्या क्षेत्रात नाव काढत आहेत आणि त्यांचेविषयी जेव्हा त्यांचे जवळचे , त्यांचे  सिनियर कौतुक करतात त्याचबरोबर डॉल्फिन लॅब्स्चे नाव पण कौतुकाने घेतात त्यावेळी अस वाटत कि बरच काही मिळवलं . 

अर्थात हे सगळ शिकलो ते माझ्या शिक्षकाकडून . मी शिकत असताना मला सुद्धा काही शिक्षकांच्या घरी मुक्तद्वार प्रवेश होता. मी आजही मानतो कि शिक्षकाच घर हे विद्यार्थ्यासाठी त्याच स्वतःच घर असलं पाहिजे , आयुष्यात  शिक्षक जे पदव्या , पुरस्कार मिळवतात त्याऐवजी आपण किती विद्यार्थी स्वतः घडवले त्याचा पण त्यानी स्वत : ताळेबंद बांधला पाहिजे . 

एखाद्याच  आयुष्य घडवन याच्याइतकी अचीव्हमेंट कुठलीही नाही. आणि असं आयुष्य घडवन ज्यामध्ये अनेकांची आयुष्य घडतील ते म्हणजे आयुष्याच सार्थकच म्हटलं पाहिजे .




Wednesday, October 25, 2023

^^^^^ ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा

 २००१ ची गोष्ट असेल . माझा एक मित्र जालिंदर पाटील हा बेंगलोरला जॉबला लागला होता . त्याने मला बेंगलोरला नेले. तिथ गेल्यावर मला कळल कि याला जॉब वगैरे काहीही नाही . घरी दाबात सांगितलं होत कि विप्रोमध्ये आहे पण तिथ त्याला कसलाही जॉब नव्हता. खर तर त्याची मानसिक अवस्था बिघडली होती. निव्वळ पुस्तक वाचत रूमवर बसायचा ( जालिंदर पाटील हा एक वेगळाच लेखाचा विषय आहे मी यावर लिहीनच ). नवीन स्वप्न रंगवायचा . जॉब कन्सल्टन्सी मधून इंटरव्यू फॉर्म आणायचा पण पुढे काहीही नाही . अगदी त्याचा आत्मविश्वास गमावुन गेला होता . दोन तीन दिवसात मलाच त्याच टेन्शन आल . ज्याच्या भरोशावर आलो तोच अधांतरी होता मग काय ? माझे तर बी ई चे विषय राहिले होते . काय करायचं ? माग तर येउ शकत नव्हतो . काय करायचं कळना? जवळ पैसे तर नाहीत याला मागावे कसे ?

आणखी दोन तीन दिवस वाट पाहिली तोवर याने दोन तीन  कंपनीचा इंटरव्यूसाठी फॉर्म आणला होता . त्यातली एक कंपनी ,जी जवळच होती  आणि तिच्या  नावात सर्विस होत मग मनाचा  हिय्या केला आणि त्यातला एक फॉर्म घेतला  आणि  कृती कम्प्युटर सर्विस राजाजीनगर येथे गेलो. कंपनी एच. पी. चे प्रिंटर , प्लोटर सर्विस करायची . त्यावेळी बेंगलोरला इतक हिंदी चालायचं नाही . कन्नड आणि इंग्लिश . आमच इंग्लिश म्हणजे काय सांगायला नको . बरेच जण आले होते. इंटरव्यू घ्यायला मालकच होते वेंकटेश त्याचं नाव . इंग्रजीतून सुरुवात झाली . माझ काय त्यांना किती समजत होत काही कळत नव्हत . शेवटी ते म्हणाले . You dont understand Kannada , you dont speak English ,how you can work for us?

प्रश्न खतरनाक ... दोन सेकंद विचार केला आणि म्हणालो . Sir, I dont understand Kannada , I cant speak English but I can understand what that Machine says and I know how to take care of machine.  उत्तर झन्नाट दिल . थोडावेळ ते विचारात पडले . मग मला थोडावेळ बाहेर थांबायला सांगितले . मग थोडावेळ त्यांच्या सर्विस इंजिनियर्सशी डिस्कस केले आणि मी सिलेक्ट झालो .

पुढचे पंचवीस दिवस मी जालिंदर पाटील या नावाने काम केले . या दिवसात मी जीवाचे रान करून त्यांना माझी निवड योग्य होती हे दाखवून दिले . खुश होते माझेवर . दहा तारखेला पगार झाला . अकरा तारखेला मी त्यांना सांगितले कि मी बी ई नापास आहे आणि माझे नाव जालिंदर पाटील नसुन मी चित्तरंजन महाजन  आहे . त्यांनी आश्चर्याने पाहिले पाच दहा मिनिटे कन्नड मध्ये झापझाप झापले . ते विसरून गेले कि मला कन्नड जास्त कळत नाही (थोडफार कळत होत  दोस्त मल्लापाची कृपा ) . शेवटी मला म्हणाले कि माझ्या ओरिजिनल नावाने काम कर .....

आणि बेंगलोर मध्ये कामाला सुरुवात केली ...

********

परवा DIDAC ला गेलो होतो . असाच एकाने स्टॉल घेतला होता त्यातच मला जागा दिली होती. हे सगळ अचानकच झाल त्यामुळे मला काही तयारीपण करता आली नाही. जे काही माझेजवळ होत ते घेउन गेलो होतो . स्टॉल मध्ये माझे मटेरियल लावले . आणि सहजच फिरून आलो . बघतोय तर काय इतर स्टॉल पुढे माझ मटेरियल म्हणजे चकचकीत  मॉल बाहेर एखादा गावाकडचा गावढळ गावठी भाजी घेउन बसतो तशी झाली . काय करायचं ज्यान नेलं त्यालाही माझेविषयी कशाला याला आणल अस वाटल . माझी तर अवस्था खूपच बिकट झाली होती त्यातच तीनचार ओळखीचे भेटल्यावर तर खूपच लाजल्यासारखं झाल पण मनात म्हटलं यांना कुठ माहित आहे डॉल्फिन लॅब्स काय आहे ती . चार पाच वाजेपर्यंत माझ्या लक्षात  आले कि बाकीच्यांनी त्यांची किट्स हि धंदा म्हणून बनवली होती पण माझी किट्स हि मुलांना समजण्यासाठी मी विशेष संशोधन करून बनवली होती . अटल टिंकरिंग लॅब्स ची जशी महाराष्ट्रात अवस्था आहे तशीच इतर राज्यात पण आहे . नुसत चकचकीत लॅब्स फुलली लोडेड सगळीकडे आहे पण युटीलायझेशन जवळजवळ शून्य . मला यु एस पी दिसला .

रात्रभर विचार केला . सकाळी राजाजी नगरला गेलो . वेंकटेश सरांना भेटलो . त्यांनी सुरुवातीला ओळखलं नाही पण थोडीफार त्यांना लिंक लागली . त्याच्या पाया पडलो आणि विचार केला. I am Engineer..... I can do anything.

दुसऱ्या दिवशी बॅटिंग सुरु केली चांगला रीस्पोंस मिळाला . माझ इंग्लिश काही अजुन सुधारलेलं नाही पण पुढच्याला जो विश्वास द्यायचा तो आपल्याजवळ होता. मनात म्हटलं बाकीचे लोकं बकरे शोधात आहेत आणि माझा दृष्टीकोन त्यांच्या सारखा नाही . दोन दिवसात बरंच काही घडलं. हळूहळू मी सांगेनच.

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा .... काय भुललासी वरलिया डोंगा ...

आमच इंग्लिश डोंग ... आमची कीटस कदाचित असतील डोंगी ,पण आमचा हेतू तर सरळच आहे. 

Wednesday, September 27, 2023

((((( Out of Box Thinking - अभ्यासक्रम आणि मानवी उत्क्रांतीशी स्पर्धा )))))

 


 ज्यावेळी मी पहिल्यांदा या शिक्षण क्षेत्रात २००७ साली  आलो त्यावेळी  एका अभियांत्रिकी महाविद्यालयात जॉईन झालो होतो . तिथ एक पहिल्यांदा प्रकार बघितला. त्या कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणजे अती हुशार (त्यांच्या मते ) होते. दर मिटींगला काहीतरी नवीन आयडिया मांडायचे . माझी पहिलीच मिटिंग होती .मी सगळ्यात पहिल्या रांगेत बसलो होतो  होतो .  त्यांनी कल्पना मांडली आणि म्हणाले कोण कोण तयार आहे यासाठी . मला काही कळल नाही . ती कल्पना पण अव्यवहार्य होती . दोन तीन क्षण गेले मला अस जाणवलं कि ते माझेकडे रोखून बघत आहेत . मी चमकून इकडे तिकडे पाहिले तर सगळ्यांनी बोट वर केलं होत . मी थोड बावचळून हळूच बोट वर केलं . नंतर आठवडाभर डिपार्टमेंट मध्ये त्या कल्पनेसाठी कागद जमवण चालू होत. 

 पुढच्या मिटिंग पासुन मला माझ्या सहकाऱ्यांनी मला शहाण केलं होत. त्यांनी काही सांगितल कि लगेच हात वर करायचा नाहीतर सरांना राग येतो . पण या अव्यवहार्य कल्पना राबवताना स्टाफची किती दमछाक होते याची कुणाला  काही घेण देन नव्हत .आणि त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही कल्पना पूर्ण पण झालेल्या मला पाहायला मिळाल्या नाहीत  .

त्यानंतर हा प्रकार थोड्याफार बदलाने  जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पाहिला.

**********************************************************************************

आज जे शिक्षण क्षेत्रात सगळीकडे जे प्रयोग चालले आहेत ते पाहिलं तर अशी भीती वाटते कि हे प्रयोग करणारे विचार करतात का ?  त्यापेक्षा वाईट म्हणजे कुठलाही विचार  करता अहो रूपम , अहो ध्वनी म्हणून विचार न करता लगेच त्या प्रयोगाला डोक्यावर घेणारी जी जमात आहे, त्यांना हे कळत का कि याचे परिणाम पुढ त्यांच्याच पिढीला भोगायला लागणार आहे . 

मानव ज्यावेळी पृथ्वीवर अस्तित्वात आला त्यावेळेपासून आजच्या या अवस्थेला यायला लाखो वर्षे लागली . हळूहळू मानवाचा  मेंदू  वेगवेगळ्या अनुभवला तोंड देत उत्क्रांत होत गेला . एक एक ज्ञानशाखा सुरु व्हायला अगदी अलीकडच्या दहा हजार वर्षापासून सुरुवात झाली . कला , वाणिज्य , विज्ञान आणि अगदी अलीकडे अस्तित्वात आलेल्या तंत्राशाखा .

 हे जर पाहिलं निर्माण होणाऱ्या  तर ज्ञान आणि   माहितीचा वेग हा  अगदी घातांकीय वेगात वाढत चालला आहे . प्रत्येक क्षेत्रात होणारी  अवाढव्य  प्रगती पाहिली तर त्यामानाने माणसाच्या मेंदूमध्ये होणारी वाढ आणि मेंदूचा होणारा विकास हा  अगदी नगण्य आहे. 

मेंदू आणि मेंदूच्या विकासाचा वेग ध्यानात न घेता निव्वळ फार्स करून पैसा कमवायची  प्रथा सुरु झाली आहे . २०१० पासुन जर तुम्ही पाहिले तर मुलांच्या बुद्धीमतेचा जर अंदाज घेतला तर त्यामध्ये वाढ होण्याऐवजी कमतरता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे . याला कारण कि ज्ञानात निर्माण होणारी विविधता आणि त्याचबरोबर मेंदूची वेगवेगळ्या कार्यामध्ये होणारी विभागणी वाढत आहे . त्यामुळे प्रत्येक विषयावर होणाऱ्या विचाराची खोली कमी होत चालली आहे.  आजचे विद्यार्थी जरी तंत्रज्ञान हाताळणे यामध्ये कुशल असली तरी त्यांच्या बुद्धीच्या  किंवा मेंदूच्या  वाढीत काहीही बदल झालेला नाही.तसेच निरीक्षण , चिंतन  अनुभवाच्या आधारे अनुकरण आणि शेवटी अवलंबन या ज्या  शिकण्याच्या पायऱ्या आहेत त्यामध्येही अजुन बदल झालेला नाही . 

मुलांच्या मध्ये संशोधकता , विचार करण्याची प्रवृत्ती वाढवायची असेल तर त्यांच्या मेंदूला विचार करायला पुरेसा वेळ दिला पाहिजे . त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी अभ्यासक्रमात जागा ठेवल्या पाहिजेत पण या ऐवजी  त्यांच्या  अभ्यासक्रमात अकारण वाढत जाणारे  विषय , मेजरच्या बरोबर डोंबलावर पडणारे मायनर चे अधिकचे विषय ,  निष्कारण वाढवलेले प्रोजेक्टचे ओझे , वेगवेगळे बनवायचे  रिपोर्ट , वेगवेगळी  क्रेडीट  याखाली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता    घुसमटून जात आहे.  काही विषय असे आहेत कि त्यांची पूर्वतयारी करायसाठी लागणारे विषय हे एक तर अभ्यासक्रमात नाहीत किंवा तो विषय नंतर घेतला जातो . विषयाची गुंफण चुकत चालली आहे आणि इतर अनेक गोष्टींचा विद्यार्थ्यावर होणारा भडीमार वाढत चालला आहे . 

आपले विद्यार्थी, त्यांची आर्थिक , सामाजिक परिस्थिती . आपल्याकडे गेल्या शंभर वर्षापासून आलेली शिक्षण पद्धती याचा विचार न करता कुठल्यातरी पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा अचानक करत असलेला अवलंब . क्रांतिकारक बदलाच्या नावाखाली  शिक्षणात होत जाणारे बदल हे देशातील शिक्षण हळूहळू  संपवून  टाकेलं काय अशी मला भीती वाटत  आहे .  अर्थात शिक्षण हे कधी संपत नाही पण काही काळाने मागे अवश्य ढकलले जाऊ शकते .

मानवाचे जन्मापासून त्याच्या मेंदूमध्ये होणारे बदल याच्या वेगामध्ये बदल झालेला नाही .पण हे सगळ लक्षात न घेता आज जे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करण्याचा घाट घातला आहेत त्याला पाहिले तर अस वाटत कि  मानवाच्या उत्क्रांतीच्या वेगाशी चाललेली शिक्षण क्षेत्राची स्पर्धा देशाला कुठ घेऊन जाणार ?


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६० 






Sunday, September 24, 2023

!!!!!!! ५५५ आणि व्होल्टेज मल्टीप्लायर !!!!!

 २००२ सालची  गोष्ट आहे . त्यावेळी  मी  साताऱ्यात स्वतःचा व्यवसाय सुरु केला . पार्टनरशिपमध्ये होता .  मी व्यवसाय का करत गेलो तर मला त्यावेळी पुण्यासारख्या ठिकाणी येउन राहायला आणि नोकरी शोधायला पैसे जवळ नव्हते आणि व्यवसाय सुरु करायला काय लागतय? . एक  मल्टीमीटर , सोल्डरिंग गन आणि दोन चार स्क्रू ड्रायव्हर  बस ...... अजुन काय?  हा , स्कील लागतंय त्याचा  काय  पहिल्यापासूनच महापूर  आहे आपल्याकडे  . तर एव्हढ्या भांडवलावर (आणि थोड्बहुत पार्टनरचे अर्थात पैसे . तेपण सांगितलं तर हसाल  त्याविषयी नंतर कधीतरी). तर मी साताऱ्यात व्यवसाय सुरु केला . देशमुख वस्तीमध्ये दोन रूम च्या घरात . 

त्यावेळी माझी आणि  बापूंची गाठ पडली  अर्थात हे बापू म्हणजे सगळीकडे दिसणारे बापू नव्हेत ,पण या बापूकडून मी बरंच शिकलो . माझ्या मित्राने त्यांची गाठ घालून दिली होती. साधा आय. टी. आय. माणुस (ते पण केलं होत कि नाही नक्की लक्षात नाही ). बापू म्हणजे हरहुन्नरी माणूस .त्यांच्याकडे एम. आय. डी. सी. मधील बऱ्याच इंडस्ट्रीच्या मोटर विषयी काम असायचं .  लहान आकाराच्या  मोटर पासुन मोठ्या मोटर   त्यांच्या तिथे खोलून बापूंच्या हस्त स्पर्शाची वाट बघत   इतस्तत: पडलेल्या असायच्या . मोटर रिवायडींग करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता .

 त्यावेळी सातारा एम आय डी सी मध्ये पावडर कोटिंगचा व्यवसाय अगदी बहरात आला होता . पावडर कोटिंग साठी आधी जॉबवर पावडर स्प्रे गनच्या सहाय्याने वेगवेगळ्या रंगाची  पावडर फवारली जायची .मग हि पावडर वितळून जॉबवर बसण्यासाठी त्या जॉबला एका भट्टीत घालायला लागायचं. हि भट्टी गरम करण्यासाठी  इलेक्ट्रिक हिटर असायचे .

त्यावेळी   एकतर  लोडशेडींगचा मोठा प्रॉब्लेम होता आणि त्यात विजेचे दर पण परवडायचे  नाहीत त्यामुळे बापूंनी गॅसचा पर्याय वापरून भट्टी बनवायला सुरुवात केली  होती . अर्थात त्यांनी नुसती सुरुवात केली होती त्यामुळे त्यांचे प्रयोग चालू होते . त्यांना इलेक्ट्रोनिक्ससाठी  माझी गरज होती . त्यामुळे त्यांनी मला लगेच सामील करून घेतले (अर्थात पैसे घंटा दिला नाही  पण  मी अनुभव भरपूर घेतला  ).

त्यांना गॅस डिटेक्ट करून , स्पार्क पाडून  भट्टी चालू करायची होती . आता सर्वसामान्य गॅस गीझर मध्ये जे वापरलं जात तेच तंत्रज्ञान आम्हाला वापरायच होत . त्यावेळी माहिती आणि पार्टस या दोन्हीची उपलब्धता नसायची . शेवटी मी ते सर्किट ८०५१ वापरून तयार केलं .  एल .सी. डी. वापरून त्यावर वेगवेगळे मेसेज यायचे . पण हे तंत्रज्ञान खूपच महाग व्हायचं . मला तर मायक्रो कंट्रोलर शिवाय ऑटोमेशन हि कल्पनाच करता यायची नाही. खुप विचार केला आणि शेवटी ते तंत्रज्ञान ५५५ आय. सी .वापरून अगदी स्वस्तात तयार झाल . अगदी मायक्रो कंट्रोलर वापरून जेव्हढा खर्च आला असता अगदी त्याच्या दोन टक्केपेक्षापण कमी खर्च आला .  यातून एक धडा घेतला कि प्रत्येक ठिकाणी मायक्रो कंट्रोलर गरजेचा नसतो .

बापू भट्टी बनवायला यशस्वी झाले आता प्रश्न उरला होता पावडर स्प्रे गनचा. पावडर स्प्रे गनमध्ये  जवळ जवळ ३०,००० ते ५०,०००  व्होल्टेज  गरज असते .  इतक व्होल्टेज म्हणजे मला सुरुवातीला भीती वाटली . पण यामध्ये करंट अगदी कमी असतो अगदी मायक्रो अम्पियर मध्ये त्यामुळे झटका लागत नाही .  इतक व्होल्टेज करायचं कस करायचं ? मग परत प्रयोग सुरु झाले . काही गन आणल्या होत्या त्याना खोलून पाहिलं पण आत सगळ्या सर्किटवर एम सील तर असायचं किंवा सगळ सर्किट काळ्याकुट अशा रंगान माखलेलं असायचं त्यामुळे ट्रेसिंग करायचं कस ... खुप विचार करत बसायचो . अर्थात माझ डोक इतकं चालायचं नाही . बापूंनी आयडिया सांगायची आणि मी त्यावर काम करायचं असा आमच्या कामाचा पॅटर्ण .  त्यांच्या भाषेत धु म्हटलं कि धुवायच विचारात बसायचं नाही .

नियम पाळायला मी इथच शिकलो .


तर एका वेबसाईटवर  आम्हाला थोडीफार आयडीया मिळाली कि हाय व्होल्टेज कसं तयार  करायचं . एक छोटासा  ऑस्सीलेटरच्या सहाय्याने हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करायचा तो सिग्नल स्टेप अप करायचा आणि मग व्होल्टेज मल्टीप्लायरच्या  सहाय्याने ते व्होल्टेज  अजुन वाढवायचे . मग काय परत बेसिक इलेक्ट्रोनिक्स कामी आले . मग ५५५ चा वापर करून  हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार केला . मग ते व्होल्टेज स्टेप अप करण्यासाठी टू व्हीलर गाडीतील  इग्निशन सर्किटमधील  स्टेप अप ट्रान्सफोर्मर  वापरला. मग  डायोड आणि कॅपसितर वापरून तयार केलेला  व्होल्टेज  मल्टीप्लायर वापरून आम्ही पाहिलं सर्किट बनवलं . त्यात व्होल्टेज म्हणावा तसं वाढत नव्हत .

 मग काय करायचा मग दुसरा प्रयोग .. त्यासाठी टी व्ही मधील इ. एच. टी. चा वापर . हा बऱ्यापैकी यशस्वी झाला. त्यावेळची गंमत म्हणजे सगळ सर्किट बनल,  पण आम्ही अजूनही कलर टी व्ही च अखंड सर्किट वापरत होतो . अर्थात सर्किट मधील फक्त  इ एच टी हाच उपयोगात यायचा . त्यावेळी बापुना मी म्हणालो आता आपण एक वेगळ सर्किट बनवूया . पण बापू म्हणाले कशाला वेगळ सर्किट बनवायचं? आहे  हेच छान आहे . आपल्याला रेडीमेड टीव्हीच सर्किट मिळत तेच वापरायच . कस्टमरला पण अस मोठ सर्किट बघितल्यावर पैसे द्यायला बर वाटत. आणि दुसरा कोणी कॉपी करायला गेला कि कन्फ्युज होउन गेला पाहिजे .

आम्ही परीक्षेला ५५५ आणि व्होल्टेज मल्टीप्लायर यावर उत्तर लिहून मार्क्स  मिळवले पण त्याचा वापर कुठे करतात हेच शिकवलं नाही . आज डास मारायच्या मच्छरच्या बॅट, गॅस लायटर अशा बऱ्याच गोष्टीमध्ये या व्होल्टेज मल्तीप्लायरचा वापर केला जातो ... तुम्ही सागू शकाल काय ? अजुन काही उदाहरणे.


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in