Sunday, September 24, 2023

!!!!!!! ५५५ आणि व्होल्टेज मल्टीप्लायर !!!!!

 २००२ सालची  गोष्ट आहे . त्यावेळी  मी  साताऱ्यात स्वतःचा व्यवसाय सुरु केला . पार्टनरशिपमध्ये होता .  मी व्यवसाय का करत गेलो तर मला त्यावेळी पुण्यासारख्या ठिकाणी येउन राहायला आणि नोकरी शोधायला पैसे जवळ नव्हते आणि व्यवसाय सुरु करायला काय लागतय? . एक  मल्टीमीटर , सोल्डरिंग गन आणि दोन चार स्क्रू ड्रायव्हर  बस ...... अजुन काय?  हा , स्कील लागतंय त्याचा  काय  पहिल्यापासूनच महापूर  आहे आपल्याकडे  . तर एव्हढ्या भांडवलावर (आणि थोड्बहुत पार्टनरचे अर्थात पैसे . तेपण सांगितलं तर हसाल  त्याविषयी नंतर कधीतरी). तर मी साताऱ्यात व्यवसाय सुरु केला . देशमुख वस्तीमध्ये दोन रूम च्या घरात . 

त्यावेळी माझी आणि  बापूंची गाठ पडली  अर्थात हे बापू म्हणजे सगळीकडे दिसणारे बापू नव्हेत ,पण या बापूकडून मी बरंच शिकलो . माझ्या मित्राने त्यांची गाठ घालून दिली होती. साधा आय. टी. आय. माणुस (ते पण केलं होत कि नाही नक्की लक्षात नाही ). बापू म्हणजे हरहुन्नरी माणूस .त्यांच्याकडे एम. आय. डी. सी. मधील बऱ्याच इंडस्ट्रीच्या मोटर विषयी काम असायचं .  लहान आकाराच्या  मोटर पासुन मोठ्या मोटर   त्यांच्या तिथे खोलून बापूंच्या हस्त स्पर्शाची वाट बघत   इतस्तत: पडलेल्या असायच्या . मोटर रिवायडींग करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता .

 त्यावेळी सातारा एम आय डी सी मध्ये पावडर कोटिंगचा व्यवसाय अगदी बहरात आला होता . पावडर कोटिंग साठी आधी जॉबवर पावडर स्प्रे गनच्या सहाय्याने वेगवेगळ्या रंगाची  पावडर फवारली जायची .मग हि पावडर वितळून जॉबवर बसण्यासाठी त्या जॉबला एका भट्टीत घालायला लागायचं. हि भट्टी गरम करण्यासाठी  इलेक्ट्रिक हिटर असायचे .

त्यावेळी   एकतर  लोडशेडींगचा मोठा प्रॉब्लेम होता आणि त्यात विजेचे दर पण परवडायचे  नाहीत त्यामुळे बापूंनी गॅसचा पर्याय वापरून भट्टी बनवायला सुरुवात केली  होती . अर्थात त्यांनी नुसती सुरुवात केली होती त्यामुळे त्यांचे प्रयोग चालू होते . त्यांना इलेक्ट्रोनिक्ससाठी  माझी गरज होती . त्यामुळे त्यांनी मला लगेच सामील करून घेतले (अर्थात पैसे घंटा दिला नाही  पण  मी अनुभव भरपूर घेतला  ).

त्यांना गॅस डिटेक्ट करून , स्पार्क पाडून  भट्टी चालू करायची होती . आता सर्वसामान्य गॅस गीझर मध्ये जे वापरलं जात तेच तंत्रज्ञान आम्हाला वापरायच होत . त्यावेळी माहिती आणि पार्टस या दोन्हीची उपलब्धता नसायची . शेवटी मी ते सर्किट ८०५१ वापरून तयार केलं .  एल .सी. डी. वापरून त्यावर वेगवेगळे मेसेज यायचे . पण हे तंत्रज्ञान खूपच महाग व्हायचं . मला तर मायक्रो कंट्रोलर शिवाय ऑटोमेशन हि कल्पनाच करता यायची नाही. खुप विचार केला आणि शेवटी ते तंत्रज्ञान ५५५ आय. सी .वापरून अगदी स्वस्तात तयार झाल . अगदी मायक्रो कंट्रोलर वापरून जेव्हढा खर्च आला असता अगदी त्याच्या दोन टक्केपेक्षापण कमी खर्च आला .  यातून एक धडा घेतला कि प्रत्येक ठिकाणी मायक्रो कंट्रोलर गरजेचा नसतो .

बापू भट्टी बनवायला यशस्वी झाले आता प्रश्न उरला होता पावडर स्प्रे गनचा. पावडर स्प्रे गनमध्ये  जवळ जवळ ३०,००० ते ५०,०००  व्होल्टेज  गरज असते .  इतक व्होल्टेज म्हणजे मला सुरुवातीला भीती वाटली . पण यामध्ये करंट अगदी कमी असतो अगदी मायक्रो अम्पियर मध्ये त्यामुळे झटका लागत नाही .  इतक व्होल्टेज करायचं कस करायचं ? मग परत प्रयोग सुरु झाले . काही गन आणल्या होत्या त्याना खोलून पाहिलं पण आत सगळ्या सर्किटवर एम सील तर असायचं किंवा सगळ सर्किट काळ्याकुट अशा रंगान माखलेलं असायचं त्यामुळे ट्रेसिंग करायचं कस ... खुप विचार करत बसायचो . अर्थात माझ डोक इतकं चालायचं नाही . बापूंनी आयडिया सांगायची आणि मी त्यावर काम करायचं असा आमच्या कामाचा पॅटर्ण .  त्यांच्या भाषेत धु म्हटलं कि धुवायच विचारात बसायचं नाही .

नियम पाळायला मी इथच शिकलो .


तर एका वेबसाईटवर  आम्हाला थोडीफार आयडीया मिळाली कि हाय व्होल्टेज कसं तयार  करायचं . एक छोटासा  ऑस्सीलेटरच्या सहाय्याने हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करायचा तो सिग्नल स्टेप अप करायचा आणि मग व्होल्टेज मल्टीप्लायरच्या  सहाय्याने ते व्होल्टेज  अजुन वाढवायचे . मग काय परत बेसिक इलेक्ट्रोनिक्स कामी आले . मग ५५५ चा वापर करून  हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार केला . मग ते व्होल्टेज स्टेप अप करण्यासाठी टू व्हीलर गाडीतील  इग्निशन सर्किटमधील  स्टेप अप ट्रान्सफोर्मर  वापरला. मग  डायोड आणि कॅपसितर वापरून तयार केलेला  व्होल्टेज  मल्टीप्लायर वापरून आम्ही पाहिलं सर्किट बनवलं . त्यात व्होल्टेज म्हणावा तसं वाढत नव्हत .

 मग काय करायचा मग दुसरा प्रयोग .. त्यासाठी टी व्ही मधील इ. एच. टी. चा वापर . हा बऱ्यापैकी यशस्वी झाला. त्यावेळची गंमत म्हणजे सगळ सर्किट बनल,  पण आम्ही अजूनही कलर टी व्ही च अखंड सर्किट वापरत होतो . अर्थात सर्किट मधील फक्त  इ एच टी हाच उपयोगात यायचा . त्यावेळी बापुना मी म्हणालो आता आपण एक वेगळ सर्किट बनवूया . पण बापू म्हणाले कशाला वेगळ सर्किट बनवायचं? आहे  हेच छान आहे . आपल्याला रेडीमेड टीव्हीच सर्किट मिळत तेच वापरायच . कस्टमरला पण अस मोठ सर्किट बघितल्यावर पैसे द्यायला बर वाटत. आणि दुसरा कोणी कॉपी करायला गेला कि कन्फ्युज होउन गेला पाहिजे .

आम्ही परीक्षेला ५५५ आणि व्होल्टेज मल्टीप्लायर यावर उत्तर लिहून मार्क्स  मिळवले पण त्याचा वापर कुठे करतात हेच शिकवलं नाही . आज डास मारायच्या मच्छरच्या बॅट, गॅस लायटर अशा बऱ्याच गोष्टीमध्ये या व्होल्टेज मल्तीप्लायरचा वापर केला जातो ... तुम्ही सागू शकाल काय ? अजुन काही उदाहरणे.


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in


No comments:

Post a Comment