Sunday, May 24, 2020

असा हा सूंदर ऑन लाईन क्लास,

असा हा सूंदर ऑन लाईन क्लास,
ऑन लाईनच्या क्लासला मजा येते खास.
ऑन लाईन क्लासची मजाच न्यारी,
गादीवर लोळत पाहता येतो घरी.
नाही सकाळी लवकर उठायची घाई,
नाही गडबड पळत जाऊन बस पकडायची.
नाही आता ओझे जड जड दप्तराचे,
नाही आता भीती पुस्तक किंवा वही विसरायचे,
हवे तेव्हा मित्राबरोबर करू शकतो चॅट.
बोअर करणाऱ्या टीचरना करू शकतो म्युट ,
आली जरी डुलकी मी कॅमेरा ऑफ करतो,
कानाला हेडफोन लावून हळूच मी झोपतो.
सगळ्यात आवडे मला एक गोष्ट या क्लासची,
हवे तेव्हा मला गायब होता येते याची.

** करोनाची आँधी आणि मॅकलेचे भूत गाडण्याची उत्तम संधी ***

------------------------------------------------------------------------------
आम्हाला तिसरीच्या वर्गात असताना एक धडा होता - माकडाचे घर. माकड असत ते दर वेळी पावसाळ्यात भिजत असताना एकच विचार करत असत की यंदा पाऊस संपला की आपण घर बांधायचंच.पण पाऊस संपला की परत त्याच्या लक्षात राहायचं नाही , असाच हिवाळा जायचा, मग उन्हाळा जायचा आणि परत पावसाळ्यात पावसात भिजत माकड विचार करायचे की यंदा पावसाळा संपला की नक्की घर बांधायचे.
आजतागायत त्या माकडाने घर बांधलंच नाही.आता माकड म्हातारं झालंय आता त्याला विचारलं तर ते पूर्वजांना शिव्या घालत बसतं.
-----------------------------------------------------------------------------
परवा बातमी वाचली की यंदा महाविद्यालये सप्टेंबरमध्ये सुरू करायचा यु.जी. सी .चा विचार आहे. ही बातमी वाचली आणि एक विचार आला की जवळपास चार महिने अजून अवकाश आहे कॉलेजेस चालू करायला .इतका मोठा वेळ म्हणजे खूपच मोठा बोनस मिळाला आहे शिक्षण क्षेत्राला. मॅकलेने घातलेल्या पायावर जवळपास दोनशे वर्ष आपलं शिक्षण क्षेत्राची इमारत अवलंबून आहे. त्याच्या नावाने बोंब ठोकत प्रत्येक जण आपल कर्तृत्व लपवत होत. जमल तशी मोडतोड आणि बांधकाम चालू होतं त्यामुळे भक्कम अस काही झालं नाही. आणि ही इमारत आता मोडकळीस आली आहे.तीच सोंदर्य तर कधीच गेलंय. वेगवेगळ्या प्रयत्नाचा कामचलाऊ मेडक्यांनी कसंबसं छत आतापर्यंत तोलून धरलं पण आता ते अंगावर पडायची वेळ आली आहे.
सध्या लॉक डाऊन मुळे जग थांबलं आहे. महाविद्यालये बराच काळ बंद राहणार आहेत,पुढच्या वर्षीच ऍडमिशन कशी होतील हे काही सांगता येत नाही. शिक्षकांच्या नोकऱ्याच काही सांगता येत नाही.
तर आपण जर पुढच्या जर एक वर्षाचा प्लॅनिंग करून जर ही इमारत परत बांधयाला घेतली तर.अगदी पाया खणून.
सप्टेंबरपर्यंत जो वेळ आहे त्याचा उपयोग पाया घालणेसाठी होईल त्यानंतर आपल्याकडे किती शिक्षक कामाशिवाय राहतात त्यांचा अंदाज घेऊन पुढची बांधणी करता येईल.
अगदी अंगणवाडीपासून ते पार पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याची ही उत्तम संधी आहे.आता आलेल्या नाविन्यपूर्ण साधनांचा परिपूर्ण वापर या शिक्षण पद्धतीत करता येईल. नवीन शैक्षणिक उपकरणे , शास्त्रीय पुस्तके तयार करता येतील. शिक्षकांना खऱ्या अर्थाने उपग्रेड करायला हे वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येईल.गेल्या काही वर्षात ज्ञानाचा झराच आटला आहे.सगळी विहीर आम्ही संपवली आहे. आता त्यात परत भर घातली पाहिजे.यासाठी आपल्याकडील शिक्षकांचा वापर करू शकतो.
मी मागे एकदा 1880 सालच पुस्तक वाचलं होतं त्यात मॅकले च्या शिक्षण पद्धतीवर टिका केली होती . म्हणजे त्याच्या शिक्षण पद्धतीचे दोष 140 वर्षांपूर्वीच लक्षात आले होते तरीपण अजूनही आम्ही त्याच्या नावाने बोंब ठोकत आहे.तर आता आपल्याकडे हे मॅकलेचे भूत गाडून टाकण्याची परिपूर्ण संधी आली आहे त्यांचा अवश्य उपयोग व्हावा.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स,पुणे

****** चायना माल, आणि मानसिकता******

1998-99 चा काळ असावा. मेड इन चायनाची गजरची घड्याळं पार खेडोपाडी पोहोचायला लागली होती आणि आमच्या देशाची वेळ बदलायला सुरुवात झाली. 50 रु ला मिळणाऱ्या त्या गजराच्या घड्याळान देशाची अभिरुची आणि दूरदृष्टी बदलायला सुरुवात केली होती. आजोबांन त्याच्या तरुणपणात त्यांच्यासाठी घड्याळ घ्यावं आणि नातवाने ते त्याच्या तरुणपणात हातात कौतुकाने मिरवाव ह्या अपेक्षा संपायला सुरुवात झाली .
गुणवत्ता आणि टिकाऊपणाला किंमत देण्याची मानसिकतेचे बारा वाजले .कोईभी चीज 49,99 रु अशा कचऱ्याच्या भावात मिळणाऱ्या वस्तूंमुळे कचरा जमायला सुरुवात झाली. हळुहळु माणसाची मानसिकताच कचरा झाली.
USE and THROW एक नवीन संकल्पना या चायना मार्केट मुळे रुजू लागली. प्रत्येक जण आताचा विचार करू लागला. प्रत्येक प्रश्नाच्या मुळात न जाता वरून मलमपट्टी करू लागला.आतापुरत काम होतंय ना भविष्याचा विचार कशाला अस प्रत्येकाला वाटू लागलं. वस्तू सोडा लोकं लोकांना use अँड throw करायला लागला. याचा तोटा म्हणजे सामाजिक बांधिलकी कमी व्हायला लागली.लोकांच्यात इर्षा वाढू लागली, जागा टिकवून ठेवण्यासाठी चाटुगिरी वाढू लागली. इथेच कागद वाढायला सुरुवात झाली.
चायनाने आणलेल्या वस्तू दिसायला देखण्या होत्या .दिसायला मस्त आणि किमतीला स्वस्त. लोक बाह्यरूपावर भाळायला लागली. वस्तू खराब झाली तर स्वस्त आहे काय फरक पडतोय ही मानसिकता झाली.चांगल्या वस्तूची डिमांड कमी व्हायला लागली. हाच पॅटर्न सर्व क्षेत्रात वापरला जाऊ लागला.चकाचक ऑफिस, गुळगुळीत कागदपत्रं वाढायला लागली. फळं देणारी झाडं लावायच्या ऐवजी शोबाज नखरेल झाडं सगळीकडे मिरवू लागली. या झाडांच महत्व सर्व क्षेत्रात वाढू लागल. असल्या या परिसराच प्रतिबिंब माणसांच्या वर्तनात पण पडु लागला. सगळीकडे नपूसंक वातावरणाची निर्मिती होऊ लागली .माल कसाही असो पॅकींग चांगलं पाहिजे.पुढं पुढं तर लोक पॅकिंगच्याच इतकं प्रेमात पडू लागले की ते पॅकिंगच शोसाठी ठेऊ लागले. पॅकिंगच्या आतला माल काय आहे ते बघायला विसरू लागले आणि हळूहळू वस्तुपेक्षा पॅकिंगच्या भाव आला.
एखादा माणूस किती काम करतो याच कौतुक मागे पडून काही काम नाही हो फक्त दोन सह्या करतो आणि एव्हढा मोठा पगार घेतो याच कौतुक वाढायला लागलं किंबहुना लोकांना कमी काम करून जास्त पैसा मिळवणं हे स्टेटस सिम्बॉल वाटू लागलं. त्याचाच परिणाम या नवीन पिढीवर होत आहे. कष्ट आणि मेहनत करून पैसा कमविणे हे दुय्यम समजले जाऊ लागले.
आपल्याकडे मिळणार चायनीज खाणं खऱ्या अर्थाने चायनीज नाही तरी पण या चायनीज खाण्याने आमच्या जिभेला नवीन चवी दिल्या . अन्ना मध्ये पोषक द्रव्य किती आहे , ते शरीरासाठी घातक आहे का यापेक्षा ते किती चटपटीत लागत यावर जास्त भर दिला जाऊ लागला.त्याचे परिणाम आरोग्यावर होऊ लागले आहेत.
चायनाने इतक्या प्रकारचये प्रोडक्ट बाजारात आणले आहेत की त्यामुळे चालू पिढीला नवनिर्मिती ची ओढच वाटत नाही. ज्वारीच्या कडव्याच्या थाटापासून वस्तू बनवायची कला संपली. स्वतः पतंग करून उडवायचा जमाना गेला.तयार बॅटरी वर चालणारी आधुनिक खेळणी त्यांच्यामधील जिज्ञासा कमी करू लागली. खेळण्याचा उपयोग शिक्षणासाठी करायच्या ऐवजी शिक्षणाचंच खेळणं झालं.
चायनाच्या प्रोडक्टने केवळ आमचं अर्थशास्त्रच नाही तर समाज शास्त्र, राज्य शास्त्र, आरोग्यशास्त्र , शिक्षण शास्त्र सगळं बघता बघता कधी बदलून टाकलं हे कळलंच नाही.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे

**** ऑस्ट्रीच अल्गोरिदम*****

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र: बात तो कर लो. (भाग 9)
ऑपरेटिंग सिस्टीमचा अभ्यास करताना एक अल्गोरिदम होता "ऑस्ट्रीच अल्गोरिदम" . हा अल्गोरिदम डेड लॉक संबंधी होता.
ऑस्ट्रीच हा पक्षी आहे ज्याला मराठीत आपण शहामृग म्हणतो.
तर शहामृगचा धावण्याचा वेग हा 70 किलोमीटर/ तास असतो.
याच्या पायात इतकी ताकद असते की एका फटक्यात सिंहाला गारद करू शकतो पण या ताकदीचा त्यालाच अंदाज नसतो . त्याच्यावर एखादं संकट येत म्हणजे कुठलाही प्राणी त्याच्या मागे लागला की तो संकटाचा सामना करणे अथवा पळण्याचे ऐवजी स्वतः च डोकं जमिनीत खुपसतो आणि कल्पना करतो की संकट टळलं. आणि त्याच्या यावृत्ती मुळेच तो मारला जातो.
ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऑस्ट्रीच अल्गोरिदम तेव्हाच फायद्याचा असतो जेव्हा सिस्टीमचे आयुष्य डेड लॉक येण्याच्या पूर्वीच संपणार असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले तर चालते.
आमच्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गेली कित्येक वर्षे हाच अल्गोरिदम वापरला गेला आहे. असू दे, चालू दे अस म्हणत आम्ही प्रत्येक प्रश्नाला बगल दिली . कागदावर निव्वल आकडे वाढवून प्रत्येक प्रश्न झाकून टाकले.एखाद्या प्रश्नाला लढा द्यायच्या ऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष्य केलं. कागदी घोडी नाचवींत फायलीच्ढि चे ढिगारेच्या ढिगारे बनवले आनि त्याच्याखाली तोंड लपवल.
काय होणार? कशाला होणार? याचा विचार मीच का करू ? मलाच काय पडलंय? जाऊ दे तिकडं जे सगळ्यांचे होईल तेच आपलं होईल अस म्हणून कुठलाही प्रॉब्लेम आला की आम्ही सोयीस्कर पाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.आम्ही मान खुपसून बसलो कागदात आणि मनाला समजावत बसलो की काहीही प्रॉब्लेम नाही...
पण आता वेळ आली आहे.संकट पुढ्यात आहे आणि आता आम्हाला जाणीव झाली पाहिजे आपल्यातील ताकदीची. हे मंदीच संकट केवळ आपण ठाम पणे उभं राहिलं तरच जाणार आहे .
आता लढण्याशिवाय पर्याय नाही. आता पळण्याच्या साऱ्या वाटा संपल्या आहेत.पगार मिळायचे तर बऱ्याच ठिकाणी थांबले आहेत. इथून पुढं काय होईल कोणीही सांगू शकत नाही.बाहेर मार्केटला उतरून स्वत:ला अजमावण्याच धाडस आता संपलेलं आहे.ज्यांच्यात धाडस होत ते आधीच सोडून गेलेले आहेत.
अशावेळी राजकारण सगळं बाजूला ठेवून शांतपणे विचार केला पाहिजे. एक तर पळलं पाहिजे नाहीतर लढल पाहिजे.
...आता मान बाहेर काढलीच पाहिजे नाहीतर सगळंच अवघड आहे.

ओन लाईन ...बिन लाईन

रवा पोस्ट टाकली होती, " केवळ ऑन लाइन लेक्चर घेऊन निव्वळ विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तयार करून आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करत नाही का?
बऱ्याच जणांनी रिप्लाय दिले , धन्यवाद.
ही पोस्ट टाकण्यामागे माझी एक इच्छा होती की यावर विचार मंथन व्हावे आणि त्यामधून काही तरी नवीन मार्ग निघावा.
आपण नेहमी म्हणतो की मुलांचे प्रॅक्टिकल ज्ञान कमी आहे. इंडस्ट्रीच पण तेच मत आहे.आपल्याकडे मार्कस मिळवायला मुले कमी पडत नाहीत. कमी पडतात ते प्रॅक्टिकल ज्ञानाला. हे सर्वांनाच माहिती आहे.अस असताना देखील आपण नेहमीच थेअरीवर भर देऊन मोकळे होतो. कारण प्रॅक्टिकलचे मार्क्स हे आपल्या हातांत असतात. इंजिनिअरिंगमध्ये सध्या प्रॅक्टिकलचा संबंध हा शंकरपाळीतल्या शंकरसारखा झाला आहे . ही एक प्रकारची फसवणूकच नाही का?
आता ही सगळ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची दुसरी सेमिस्टर आहे. यानंतर BE ची मुले डायरेक्ट बाहेर पडणार आहेत. ही वेळ आहे ती खूपच संवेदनशील आहे. या करोनामुळे जूननंतर मार्केट कसे असणार आहे ते सांगता येत नाही किंबहुना पुढची दोन वर्ष कशी असतील हे कुणीही सांगू शकत नाही.त्यामुळे आता भले थेअरीला मार्क्स कमी पडली तर चालतील पण प्रॅक्टिकल त्यांना जमण गरजेचं आहे.
बऱ्याच लोकांना वाटत की आम्ही सिम्युलेशन करून दाखवू. सिम्युलेशन करून पाहायला मर्यादा असतात. इंजिनिअरिंग हे पंचेंद्रियाने शिकायचं असते. जस जशे खडू फळा शिक्षण पद्धतीचे अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातून मह्त्व कमी व्हायला लागले तसतसे शिक्षण शिक्षकाच्या हातून आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जायला सुरुवात झाली आहे.
प्रत्येक वेळी आपण पाश्चात्य पध्दतीचा विचार आपल्या शिक्षणात करायला पाहतो पण आपल्या विद्यार्थ्यांची जडणघडण ही वेगळी आहे.स्वतः शिकणे आणि त्याची जबाबदारी घेणे हे त्यांना जमत नाही. आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट ही हाताने शिकवायला लागते हे सत्य आहे.
आज जर आम्ही ई लर्निंगचा उदो उदो करायला लागलो तर उद्याची अवस्था वाईट होईल .450 रु ला कोर्स मिळतात ऑन लाईन . आजकाल कंपन्या शैक्षणिक पात्रता पाहण्या ऐवजी काय येत हे पाहतात .जर प्रॅक्टिकल मिळणार नसेल आणि जर सिम्युलेशनच करायची तर इंजिनिअररिंग कॉलेजला जायचं कशाला? उद्या लोकं त्याचाही विचार करायला लागतील. या विषयात मला खोलात जायची इच्छा नाही.
बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची रेंज मुलाना मिळत नाही. बऱ्याच कॉलेजना ऑन line ट्रेनिंग देणं जमत नाही . मुलं मानसिक सैरभैर झाली आहेत. त्यांना आता गरज असणार आहे शिक्षकांची. त्यांना प्रॅक्टिकली कस स्ट्रॉंग करता येईल हे पाहिलं पाहिजे.
शेवटी किती झालं तरी विद्यापीठला ऑन line लेक्चर मुलांनी केलं आणि त्यांचा अभ्यासक्रम संपला अस आपण सांगू शकत नाही आणि ते विद्यापीठ पण म्हणू शकत नाही. लेक्चर ही घ्यावीच लागणार आहेत.मग ही कुतर ओढ कशाला करायची .
सध्या करोनाच्या साथीमुळे सारं जग थांबलं आहे.सर्वाना हा खरच छान वेळ मिळाला आहे त्यांनी तो knowledge अपग्रेड करण्यासाठी वापरावा.आपल्या स्वतः साठी विद्यार्थ्यासाठी ,संस्थेसाठी आपण इतर काय शिकू शकतो, काय माहिती मिळवू शकतो ते पाहावं अस मला वाटतं. इतका काळ आपण एका चाकोरीबद्ध आयुष्यात जगलो आता वेळ मिळाला आहे तर सर्वांनी स्वतः ला अपग्रेड करावं असं मला वाटत.
जर त्यातूनही लेक्चर घ्यायची तर विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात काय संधी आहेत. सध्याच नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि आपण शिकवत असलेल्या विषयाची त्यासाठी काय गरज आहे याची माहिती द्या.
तुमची मते अवश्य मांडा.

करोना..... कुछ तो करो ना.

ज्यावेळी संकटे येतात त्यावेळीसच केवळ माणसाचीच नाही तर समाजाची खरी परीक्षा होते. कठीण परिस्थितीत समाज कसा सामोरा जातो त्यावरून त्याची सामाजिक , मानसिक , वैचारिक पातळी दिसून येते.
प्रसंग १ :गेल्या पावसाळ्यात महाराष्ट्रात पुराने थैमान घातले होते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खूपच अवस्था बिकट झाली होती. गावेच्या गावे पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडली होती. लोक बाहेर पडायला काही नाही म्हणून घरातच आणि काहीतर घरावर अडकली होती. काय करायचं हेच कळत नव्हत , नावा ,होड्या अपुर्या होत्या त्यामुळे लोकांना बाहेर काढता येत नव्हत. सगळीकडे हतबलता आली होती. कधी कधी विचार करतो कि हतबलता कशानं आली होती तर आम्ही शिकलेली लोक विचार करायाची क्षमता गमावून बसलो आहोत आणि आम्हाला काहीही स्वत: करायची इच्छा नाही आम्ही फक्त बघे झालो आहोत. इतक पाणी आल असताना आम्ही आमच डोक गमावून बसलो . एक दोन कमी शिकलेल्या माणसांनी अक्षरशः मोठ्या काहीलीचा वापर करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले पण आम्ही आमची बुद्धी लावू शकलो नाही. सांगली आणि कोल्हापूर भागात डझनाने इंजिनियरिंग कॉलेजेस आहेत आणि त्यात शिकणारी हजारो पोर . प्रत्येक कोलेजला वर्कशोप आहे पण आमची बुद्धी चालली नाही कि मुलांचा वापर करून पत्रे वगैरे जोडून पटकन काही नावा बनवाव्या. किंवा मुलांच्या लक्षात आल नाही कि आपल्या आसपास हजारो प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्यांचा वापर करून एखादा तराफा बनवावा. त्यावेळी मी दोन इंजीनियारिग कोलेजला संपर्क केला पण त्याचं म्हणन पडल कि हे आपल काम काम नाही. खर तर जाहिरात करायची मोठी संधीपण होती.
प्रसंग २: सध्या करोनाने धुमाकूळ घातला आहे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लागणारी सुरक्षाप्रणाली खूपच तुटपुंजी आहे. त्यात चीनमधून आम्हाला आयात करायची इतकी सवय लागली आहे कि आम्ही आमच्या देशात पर्यायच उभे करू दिले नाही . चीनची वस्तू स्वस्त आणि आमची वस्तू महाग का ? यावर कधी पर्यायच शोधला नाही. नोकर बनवण्याच्या नादात आम्ही मुलांच्या विचारशक्तीला वावच दिला नाही . आज आमच्याकडे वेनटीलेटरचा तुटवडा पडू शकतो त्याला पर्याय शोधण्याची गरज आहे .आजच लोकसत्ताला आल आहे त्याप्रमाणे बऱ्याच वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा आहे त्यावर विचार मंथन व्हायची गरज आहे पण यावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही. यावेळीपण काही ठिकाणी संपर्क केला पण काहीही रिस्पोंस नाही.
आज आपल्या इंजिनियरनी भरलेल्या देशात आपत्तींना कस तोंड द्यायचं हेच कळत नाही . प्रत्येक गोष्टीसाठी हाय टेक पर्याय शिकवल्यामुळे या मुलांना आसपासच्या गोष्टीपासून एखादी गोष्ट कशी बनवायची हेच कळत नाही. आपले विद्यार्थी हेच आपल भविष्य आहे हे कुणी लक्ष्यातच घेत नाही. नशीब अजून करोना आटोक्यात आहे पण पुढच्या क्षणाला काय वाढुन ठेवलं आहे हे सांगता येत नाही . तरी ज्यांना मनापासून वाटत कि आपण आपल्या देशासाठी कांही करू शकतो त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या साधनाचा वापर करून काय करता येईल हे शोधल पाहिजे. अनलिमिटेड इंटरनेट पॅकचा खऱ्या अर्थाने वापर करायची वेळ आली आहे .
नक्कीच कुणाला काहीतरी सापडेल . उगा अफवा फोरवर्ड करण्यापेक्षा आणि अफवा वाचत बसण्यापेक्षा , चघळत बसण्यापेक्षा काहीतरी धीराच्या गोष्टी शोधा आणि त्या पसरवा. लोक अखेर आशेवरच जगतात. कालच परभणीच्या एका मुलाने केलेलं व्हेन्तिलेटरच मॉडेल पाहिलं . तस ते मॉडेल खूपच प्राथमीक अवस्थेत आहे पण तरीही त्याला सलाम केला पाहिजे . त्याने केलेल्या मॉडेल मुळे कितीतरी लोकांना उत्साह आला. सध्या मी एका ग्रुपच्या सोबत आहे त्यांनी पण त्याचं डिझाईन पूर्ण करत आणल आहे. दोन तीन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
माझी सर्व अभियंत्याना विनंती आहे. कुणीतरी काहीतरी करील यावर बसू नका .प्रत्येकाने काहीतरी हातभार लावावा . कुठेतरी सुरुवात केलींच पाहिजे कदाचित यातून नवीन संधी तयार होतो.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

Sunday, March 15, 2020

***** स्वत: ओढवून घेतलेली गरिबी. *****“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “ (भाग ४)

***** स्वत: ओढवून घेतलेली गरिबी. *****
“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “ (भाग ४)
प्रसंग पहिला : अशाच एका कॉलेजाला भेट द्यायला गेलो होतो. संस्थेचे डायरेक्टर त्यावेळी संस्था ऑफिसला होते. आधीची थोडी ओळख होतीच .म्हटलं चला भेटावं. भेटायला गेलो डायरेक्टरसाहेबांच्या पुढे काही माणस उभी होती आणि समोर एक चेक पडला होता त्यावरून ते हुज्जत घालत होते कि इतकं बिल कस झालं . जवळपास सोळा मिनिटे यावर विचारमंथन झाल आणि त्या चेकवर नंतर सही करतो म्हणून त्या माणसाना बाहेर पाठवल. सहज चेकवर नजर पडली . चेक होता फक्त १६० रुपयाचा. खूपच वाईट वाटले . जवळजवळ बत्तीस वर्षाचा इतिहास असणाऱ्या संस्थेच्या डायरेक्टरवर १६० रुपयाचा चेकवर सही करायला लागणे आणि ती सही करताना सोळा मिनिट वाया घालवायला लागणे यासारखी वाईट गोष्ट नव्हती.
थोडा वेळ गेला मग डायरेक्टर साहेब बोलायला लागले. काय सांगू सर ,एके काळी आमच्या इथे डोनेशन चालत होत पण आता अॅडमिशन होत नाहीत. लोकांचे पगार सहा सात महिने झाले आहेत थकले आहेत. गेले चार पाच वर्ष झाले हे असेच चालले आहे. मी विचारले मग मॅनेजमेंटच पुढ काय प्लानिंग आहे. ते म्हणाले काय आता या वर्षी एक कोटी दहा लाख रुपये खर्चून नॅशनल लेव्हलच खेळाच मैदान तयार केल आहे. क्षणभर डोक भंडावलं. म्हटल विद्यार्थ्यासाठी मग ट्रेनिंग च कस काय ? लगेच रडायला सुरुवात … काय सांगायचं सर , हा सगळा खेड्याचा भाग . सगळे गरीब विद्यार्थी . पैसे देत नाहीत . आहो कॉलेजची फी भरत नाहीत. ते ट्रेनिंग काय करणार ?
*******
प्रसंग दुसरा : असच एका कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी बोलणी करायला बोलावल होत . कॉलेज तस शहरापासून दूरच होत. कॉलेज मधून डिपार्टमेंटकडे चाललो. लंच ब्रेक होता . कट्ट्यावर , जिन्यात ,पायऱ्यावर मुले निवांत बसली होती. प्रत्येकाच्या हातात अन्द्रोइड फोन होता . निवांतपणे whats app वर चाटिंग वगैरे चालू होत. कुणालाही कुणाकडे बघायला वेळ नव्हता, अगदी तंद्री लागली होती.
एच. ओ. डी. ना भेटलो . एच. ओ. डी. नी सागितलं कि त्यांना मुलांच्या प्रोजेक्टसाठी वर्कशोप पाहिजे. म्हटल काही काळजी करू नका आपल्या ट्रेनिंग नंतर त्यांना प्रोजेक्ट करायला नक्की जमेल . एच. ओ. डी. म्हणाले पण आमच्या मुलांना प्रोग्रामिंग येत नाही. मी म्हणालो हरकत नाही सर या वर्कशोप नंतर त्यांना प्रोग्रामिंग सुद्धा जमेल . एच. ओ. डी. ना त्यांच्या मुलाविषयी विश्वास होता त्यामुळे ते परत म्हणले आमच्या मुलांना अजून पार्टसची नावे पण माहित नाहित . आता आमचा आमच्या ट्रेनिंग वर विश्वास होता म्हणून मी म्हणालो काही काळजी नको मुल त्यांचा प्रोजेक्ट ते स्वत: करतील . मग म्हणाले ठीक आहे पण तुमची वर्कशॉपची फी जरा जास्तच आहे . आता मला यांच्यासमोर काय बोलाव कळेना. ते म्हणाले आहो आताच आमच्या मुलाकडून इंडस्ट्री व्हिजीट गोव्याला जाणार आहे चार दिवसासाठी म्हणून पैसे घेतले आहेत. आता पुढच्या आठवड्यात गॅदरिंग आहे त्याचा पण खर्च आहे सध्या त्यामध्ये पोर गुंतली असल्याने आपल्याला या आठवड्यात वर्कशॉप घेता येणार नाही . वास्तविक पाहता त्या मुलांनी इंडस्ट्री व्हिजीट साठी जितके पैसे भरले होते त्याच्या पंधरा टक्के इतकीच फी मी तीन दिवसाच्या वर्कशोप साठी मागितली होती.
काय करायचं ? आणि लगेच पुढच पेटंट वाक्य सुरु झाल आमची पोर गरीब आहेत .हा सगळा खेड्याचा भाग . सगळे गरीब विद्यार्थी . पैसे देत नाहीत . आहो कॉलेजची फी भरत नाहीत. ते ट्रेनिंग काय करणार ?
*****
आता मात्र माझी थोडी सटकली. आणि दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट घडली. मी म्हणलो सर, हि गरीब पोर तुम्ही कॉलेजला घेताच कशाला ? हि पोर खरीच गरीब आहेत का ? पंधरा हजार रुपयाचा मोबाईल फोन वापणारी मुले हि गरीब कशी म्हणायची. आणि असली हि दलीन्द्री पोर तुम्ही किती काळ सांभाळणार आहात . हि पोर गरीब नाहीत तर त्यांना माहित आहे कि आज तुम्हाला त्यांची गरज आहे . हे चित्र बनवलं कुणी.? हि पोर पण इतकी डोक्यावर बसली आहेत कि वर्गात लेक्चरला बसत नाहीत , प्रॅक्टिकलला येत नाहीत . सबमिशन करत नाहीत . इतकी माजली आहेत . आपल्याला हि किंमत पण देत नाहीत. कशीबशी पास होतात . प्रॅक्टिकल आणि टर्म वर्कला आपणच मार्क देतो ना . यांना ट्रेनिंगसाठी पैसे नाहीत मग यांची प्लेसमेंट कशी होणार ? प्लेसमेंट नाही तर कॉलेजच नाव कस उजळणार . त्याशिवाय पैसे देणारी चांगली मुले कशी येणार ? हि मुल गरीब नाहीत तर आपली मानसिकता गरीब झाली आहे. इंजिनियरिंगच्या मुलांना ज्याचं प्रॅक्टिकल ज्ञान चांगल आहे त्यांना जॉब हे आहेतच . भारतातच नव्हे तर जगभर जॉब आहेत. पण आम्ही आमची मानसिकता बदलली पाहिजे . आम्ही आता आमचे विचार बदलले पाहिजेत . आपल्याला या असल्या गरिबांची किळस आली पाहिजे . आपल्या कॉलेजला चांगले विद्यार्थी यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .
आता संस्थेन पण ठरवलं पाहिजे कि आपल्याकडे डोनेशन देणारी पोर आली पाहिजेत त्यासाठी काय कराव ? शिक्षकांनी पण विचार केला पाहिजे कि आपल्याला सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळाला पाहिजे आणि तो पण प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला. हे स्वप्न रंजन नाही हे शक्य आहे. आमच्या पुण्यातच एक कॉलेज अस होत कि २०१० पर्यंत त्या कॉलेजला टुकार मानण्यात येत होत पण त्यांनी ठरवलं आता बदलायचं, आता त्यांची जवळजवळ चार कॉलेज आहेत . डबल इनटेक , फुल अॅडमिशन विथ डोनेशन. अर्थातच हे करण्यासाठी चार ते पाच वर्षाचच प्लानिंग केल पाहिजे आणि त्याबरोबरच कष्ट करन्याबरोबरच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवली पाहिजे .
आता गरज आहे ही गरीब विचारसरणी बदलण्याची कारण ही जर बदलली नाही तर अवघड आहे....खूपच अवघड आहे.
मॅनेजमेंटच पण आणि शिक्षकांचं पण.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०