Monday, February 25, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग 35 )

*** शिक्षण संस्थाची समाजाशी तुटलेली नाळ ***
तुम्हाला एक वर्षाची करायची तजवीज करायची असेल तर बी पेरा, दहा वर्षाची करायची असेल तर पैसे पेरा आणि कायम स्वरुपाची करायची असेल तर माणसे पेरा – अनामिक लेखक.
जानेवारी महिना सुरु झाला कि सगळी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्र निकेतनं खडबडून जागी होतात. सर्वाना वेध लागतात अॅडमिशनचे. मग काय नवनवीन कल्पनांना ऊत येतो . कुणी मेळावे घेतो, कुणी शिबिरे घेतो, कुणी स्पर्धा घेतो तर कुणी कसली कसली ऑलिम्पियाड घेतो. या सर्वामागे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयाची जाहिरात करणे हाच हेतू असतो. मग यासाठी वेगवेगळे क्लास , शिक्षण संस्था यांना हाताशी धरले जाते . क्लास वाले , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्था पण आता हुशार झाले आहेत . वाहणाऱ्या गंगेत हात कसा धुवुन घ्यायचा हे त्यांना पण कळल आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि महाविद्यालयात असणाऱ्या शिक्षकाविषयी असणारा त्यांच्या मनातील आदर कमी झाला आहे . यामध्येपण सेटिंग, कमिशन वगैरेसारख्या गोष्टी आता यायला लागल्या आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयांची आणि तंत्र निकेतनांची संख्या वाढली आहे त्यामुळे या गोष्टी आता नाकारता येत नाहीत. पण एक नवीन आणि चुकीचा पायंडा पडत चालला आहे जो घातक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे म्हणून त्यांचेपुढे जे चित्र रंगवले जाते किंवा त्यांचेपुढे जे वायदे केले जातात त्यावर भुलून जे अॅडमिशन घेतात त्यांचा नंतर अनुभव चांगला नसतो. यामुळे काही महाविद्यालयांना ज्या ठिकाणाहून अॅडमिशन झाली होती त्या भागात परत तोंड दाखवता येत नाही .
अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतन मालकीची असणाऱ्या बऱ्याच शिक्षण संस्थांची माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालयेपण आहेत . पण हि विद्यालयात शिकणारी मुले संस्थेच्याच तंत्रनिकेतन मध्ये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश करत नसतील तर त्या संस्थेच कुठेतरी नक्कीच चुकत आहे . सातारामधील एका बलाढ्य अशा शिक्षण संस्थेला त्यांच्या तंत्रनिकेतनला किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुरेसे विद्यार्थी मिळत नसतील आणि त्यांना जण विद्यार्थी मिळवण्यासाठी भटकायला लागत असेल तर परिस्थिती खरीच विचार करण्यासारखी आहे. त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे जर संस्थेच्याच तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी जर संस्थेच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात येत नाहीत याचा अर्थ काय काढायचा हे प्रत्येकांनी ठरवलं पाहिजे.
आपला विद्यार्थी हीच मोठी जाहिरात आहे हेच सगळे जण विसरून गेले आहेत . विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याचं सामाजिक भान जागृत करून त्यांना समाजाशी जोडणं हेही महत्वाचं आहे याची जाणीव कुणालाही नाही . जर या विद्यार्थ्यांना समाजाशी जोडत गेलो तरच एक अखंड साखळी तयार होईल आणि त्या महाविद्यालयाची समाजात किंमत वाढेल हे सोपं गणित आहे. पंचवीस वर्षापेक्षाही जास्त अनुभव असणाऱ्या महाविद्यालयांची अवस्था हि आज खूपच वाईट आहे. त्यांचा अभ्यास केला तर असे दिसून येईल कि मध्यंतरीच्या काळात ते समाजापासून तुटले गेलेले आहेत.
आता परत महाविद्यालयांनी विचार केला पाहिजे आणि आहेत त्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून असे कार्यक्रम राबवले पाहिजे कि ज्यामध्ये समाजाचा फायदा होईल . एक निरंतन अशी ज्ञानदानाची प्रक्रिया राबवली पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यामध्ये त्या महाविद्यालयाची छाप पडली पाहिजे. कुठ रक्तदान शिबिरे घेणे, वाहतूक नियंत्रण करणे हि कामे महाविद्यालयाच्या जाहिरातीसाठी करणेपेक्षा शेती, शिक्षण, संरक्षण आणि आरोग्य यासाठी उपयोगी अस कमीत कमी खर्चाच्या तंत्रज्ञान निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण संस्थांनी आता समाजाशी जुळवून घेतलं पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment