Monday, February 4, 2019

भियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३७ )


*** विद्यार्थ्यासाठी मुल्यवर्धित प्रशिक्षणे ***
सध्या तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत आहेत . नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणे गरजेचे आहे . ज्यामुळे त्यांना त्या विषयातील तज्ञाचे मार्गदर्शन व त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यानुभव मिळेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मुल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे आता निकडीचे झाले आहे . पण बऱ्याच ठिकाणी संस्थापाकानांच आणि व्यवस्थापन समितीलाच अशा प्रशिक्षणाचे महत्व माहीत नाही त्यामुळे आहे करी कुलममध्ये तर घ्यायलाच पाहिजे म्हणून वेगवेगळी एक दिवसीय, दोन दिवसीय मुल्यवर्धित प्रशिक्षणे कार्यक्रम आखले जातात.
केवळ घ्यायचे म्हणून गेली चारपाच वर्षात अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी जेव्हडे मुल्यवर्धित प्रशिक्षणे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले गेले त्यापैकी बरेच कार्यक्रम चांगल्या प्रतीचे नव्हते. निव्वळ कागदपत्र रंगवण्यासाठी घेतले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला नाही . हा फीडबॅक एका बॅचकडून दुसऱ्या बॅचकडे गेला त्यामुळे आता विद्यार्थीच या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तयार नसतात . बऱ्याच ठिकाणी या प्रशिक्षणासाठी पैसेही हे विद्यार्थ्यांकडून घ्यायचे असतात पण वाईट पुर्वानुभावामुळे विद्यार्थी जास्त पैसे द्यायला तयार होत नाहीत .
चांगल्या प्रतीच्या प्रशिक्षक लोकांना त्यांचे मानधन देता येत नाही त्यामुळे स्वस्तामध्ये प्रशिक्षण देणारे शोधावे लागतात. स्वस्तात म्हणजे किती स्वस्तात तर दोन तासाचे करमणुकीचे कार्यक्रम घेणाऱ्या गावठी कलाकाराला सुद्धा जेव्हढ मानधन मिळत त्यापेक्षाही कमी पैशात यांना दोन दिवसाचे पूर्ण कार्यक्रम प्रात्यक्षिकासहित हवे असतात.
स्वस्तात प्रशिक्षण देणारे स्वत: हून शोधतच येत असतात . स्वस्तामध्ये प्रशिक्षण देणाऱ्यामध्ये बरेच जण तयार प्रोजेक्ट विकणारे प्रोजेक्ट विके असतात. त्यापैकी काहीजण तर त्याच महाविद्यालयातीलच हुशार माजी विद्यार्थी म्हणजे ज्यांना प्रात्यक्षिक ज्ञान चांगले आहे पण कुठे जॉब मिळाला नाही म्हणून तयार प्रोजेक्ट विकणारे प्रोजेक्ट विके बनलेले असतात . मग या लोकांना जर पैसे घेउन जर आपल्या उद्योगाची जाहिरात करायला मिळत असेल तर ते हसत तयार होतात. मग सुरु होते नवीन दुष्ट चक्र. या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला विद्यार्थ्यांना जास्त हुशार करायचे नसतेच मुळी आणि त्यांना कामाचा अनुभव जरी असला तरी विद्यार्थ्यांना विषय समजून सांगण्याची जी हातोटी आणि अनुभव नसतो. त्यामुळे थेअरीवर टाईम पास केला जातो. प्रात्यक्षिक घेतली जात नाहीत. जी घेतली जातात त्यामध्ये साहित्य अपुरे असते , हात लावायला मिळाले तरी भाग्य अशी अवस्था असते. अशा कार्यक्रमामुळे मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ऐवजी भीती निर्माण होते. या मुलामध्ये रेडीमेड प्रोजेक्टची जाहिरात केली जाते आणि यातून प्रोजेक्ट ग्रूप मिळवले जातात आणि त्यांना प्रोजेक्ट विकले जातात.
NAAC किंवा NBA साठी व्यावसायिक करार करण्यासाठी व्यावसायिकांची गरज असते पण असे व्यावसायिक प्रत्येक शिक्षकाच्या ओळखीचे नसतात मग अशा प्रोजेक्टविक्या माजी विद्यार्थ्यापुढे आपोआपच पायघड्या घातल्या जातात. बऱ्याच महाविद्यालयात हि परिस्थिती अनुभवास येते .
पैशाबरोबरोबरच मोठा प्रश्न येतो तो म्हणजे वेळेचा. पुस्तकी अभ्यासावर अॅकेडेमिक कॅलेंडर आणि रोजच टाईमटेबलमध्ये इतका भर दिला जातो कि अशा कार्यक्रमासाठी वेळच बाजूला काढून ठेवेलेला नसतो किंवा एक दोन दिवस इतकाच वेळ ठेवलेला असतो जो खुपच अपुरा असतो. चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेणेसाठी किमान पाच दिवस बाजूला काढले पाहिजेत. पहिला दिवस तंत्रज्ञानाची परीपूर्ण माहिती , दोन दिवस त्यावर प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण आणि परत दोन दिवस केस स्टडी जी विद्यार्थ्याकडून करून घेणेसाठी असा कार्यक्रम आखला तरच त्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. अजूनही आपल्याकडे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बाबतीत वर्कशॉप, सेमिनार यातला फरक लक्षात घेतला जात नाही . वर्कशॉपच्या नावाखाली सेमिनार घेतले जातात. स्लाईड शो केला जातो. बऱ्याचदा पाच दिवसाचे कार्यक्रम आखले जातात त्यात सुसूत्रता नसते. तीन चार वेगवेगळे टॉपिक एकत्र घुसडले जातात. तज्ञ व्याख्यात्यांची गर्दी केली जाते. भले हे व्याखाते त्या विषयातील नामांकित तज्ञ असतील पण त्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने ते त्या विषयाला न्याय देऊ शकत नाहीत.
मुल्यवर्धित प्रशिक्षण हे रोजच जेवणाबरोबर शारीरिक क्षमता वाढीस लागणेकरिता जसा पौष्टिक खुराक घ्यावा लागतो त्या प्रमाणे असतात . त्याची गुणवत्ता हि राखावीच लागते पण ज्याप्रमाणे खुराकाला खर्च जास्त येतो तसाच या मुल्यवर्धित प्रशिक्षणाबाबत असतं. या मुल्यवर्धित प्रशिक्षणाच महत्व आता लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण मुल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रम आखले पाहिजेत त्यासाठी पुरेशा खर्चाची आणि पुरेसा वेळ बाजूला काढून ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे.
या पूर्वीचे भाग वाचनेसाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment