Monday, February 25, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ४१ )


*** आता ज्ञानाच्या पेटवू मशाली   ***
एकदा एका शेतकऱ्याच्या हातून मोठी चूक झाली म्हणून त्याच्यावर देव रागावला आणि त्याने शेतकऱ्याला शाप दिला कि पुढची बारा वर्ष त्याच्या शेतात पाऊस पडणार नाही. त्याच्या घरातील सगळी दु:खी झाली, सगळ्यांच्या  डोक्यात उद्यापासून काय करायचं  हा प्रश्न पडला . पण दुसऱ्या दिवशी शेतकरी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि बैल जुपून शेताकडे जायला निघाला . घरातले सगळे आश्चर्य चकित झाले. त्यांनी शेतकऱ्याला समजावले कशाला जायचे शेताला ? आता कशाला करायची मशागत आणि पेरणी ? जर प्रत्यक्ष देवानेच सांगितले आहे कि पाउस पाडणार नाही मग कशाला वेळ, पैसा आणि मेहनत वाया घालवायची? शेतकरी म्हणाला कि मलाही माहित आहे कि आता इथून पुढे बारा वर्ष आपल्या शेतात पाउस पडणार नाही पण म्हणून जर या बारा वर्षात आपण मेहनत केली नाही तर आपण सगळेच मेहनत करायचेच विसरून जाऊ. हि आपल्या घरातील नवीन पोरं जी आता आठ दहा  वर्षाची आहेत त्यांना  बारा वर्षांनी माहितीही होणार नाही शेतात काय करायचं असत. जमीन ओसाड माळरान बनून जाईल, जमीन  नापीक बनेल, सगळी हत्यारे गंजून जातील , ती हत्यारे  वापरायची कशी हे पण आपली पुढची पिढी विसरून जाईल आणि ज्यावेळी पाऊस पडायला सुरवात होईल त्यावेळी आपल्यामध्ये शेतीविषयक ज्ञान काहीही राहणार नाही आणि बारा वर्षानंतर पुढे कायमची शेती हा विषय  आपल्या खानदानातून कायमस्वरूपी निघून जाईल. म्हणून म्हणतो चला उठा सगळे आणि नेहमीप्रमाणे कामाला जाउया आणि आपल्यातील शेतकरी जिवंत ठेऊयात.
गोष्ट तशी लहानच आहे पण यामध्ये अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रासाठी खूपच मोठा संदेश लपला आहे . हि वरची गोष्ट आता अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने पुनःपुन्हा वाचली पाहिजे आणि त्यातील मतीतार्थ मनावर बिंबवला पाहिजे .
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रावर तसा गेल्या दोन वर्षापासून एका प्रकारचा दुष्काळच सुरु झाला आहे. त्यामुळे  अशी भीती वाटायला लागली आहे कि हा अभियांत्रिकी शिक्षणाचा वटवृक्ष वटायला  सुरुवात झाली आहे त्याच्या सगळ्या शाखा कोमेजून जायला सुरुवात झाली आहे. सगळे सैरभैर झालेले आहेत. सगळीकडे मंदीरुपी दुष्काळ पसरायला सुरुवात झाली आहे.
तंत्रनिकेतने आणि अभियांत्रिकी महाविद्यालये ओस पडायला लागली आहेत , बंद व्हायला लागली आहेत. सगळीकडे चिंतेच वातावरण निर्माण व्हायला लागल आहे. सगळ्यांचा अभियांत्रिकी शिक्षणावरचा विश्वास उडायला लागला आहे .सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी म्हणजे शिक्षक त्याचाही आत्मविश्वास डळमळायला लागला आहे. वेळचेवर पगार होणे बंद झालं आहे .नोकरीची पण शाश्वती राहिली नाही. त्यामुळे त्यांचाही अभ्यास कमी व्हायला लागला आहे. पगार होत नाही तरीपण लाचारासारख नोकरीला चिकटून बसायची त्याच्यावर वेळ आली आहे. खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे .
काय करायचं हा यक्षप्रश्न सर्व शिक्षकासमोर उभा राहिला आहे.माहिती नाही हि परिस्थिती कधीपर्यंत राहणार आहे पण जोपर्यंत हि परिस्थिती आहे तोपर्यंत माझी सर्व शिक्षक समुदायाला विनंती आहे कि धैर्य सोडू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास सोडू नका. उद्योग क्षेत्रामध्ये जेव्हा मंदी येते तेव्हा संशोधनाच काम जोमात सुरु होत. आता हिच करी वेळ आहे स्वत:ला  बदलण्याची . मध्यंतरीच्या कालावधीत स्वत:ला अॅकेडेमिक कामात पूर्णपणे गुंतवून घेतल्याने बऱ्याच जणांना स्वत:ला अपग्रेड करता आलेलं नाही त्यांनी हि वेळ साधून घ्यावी. मनात नैराश्येची भुते थैमान घालण्यास सुरुवात करणेपुर्वीच मनाला नवीन अभ्यासात झोकून द्या.
हि जी मंदी आली आहे ती कायम राहणार नाही पण ज्यावेळी तेजी येईल त्यासाठी सर्वांनी स्वतःला तयार केलं पाहिजे . भोवतालाच तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जाही ढासळत चालला आहे हे गृहीत धरूनच त्यांना नवीन तंत्रज्ञानाची आवड कशी लागेल , हे तंत्रज्ञान त्यांना कसे समजेल त्यासाठी काय केलं पाहिजे हे शोधलं पाहिजे आणि त्यावर अभ्यास केला पाहिजे . कुठलीही परिस्थिती जास्त काळ राहत नाही जर मंदी आहे तर तेजी नक्कीच येणार आहे पण जर तेजी आली तर ती नवीन आव्हाने घेऊन येईल आणि आपण जर त्यासाठी तयार नसेल तर परत हे क्षेत्र उभं राहण अवघड होईल.
चला उठा मित्रानो , काढून टाका मनातील नैराश्येची जळमटे. आपण अभियंते तर आहोतच पण त्यापेक्षाही महत्वाच म्हणजे आपण शिक्षक आहोत. देशाच भविष्य घडवणारे अभियंते घडवण्याचे पवित्र काम आपल्यावर आहे . जर आपण मनातून हारलो तर आपण अभियंते घडवू शकणार नाही. हे शिक्षण क्षेत्र बदलायची  धमक हि कुठल्याही सरकारमध्ये ,कुठल्याही संस्थापकात नाही. हि अवस्था बदलण्यासाठी कुठलाही मसीहा येणार नाही. हि परिस्थिती केवळ आणि केवळ शिक्षकच बदलू शकतो. आता गरज आहे स्वत:ला बदलण्याची. परत जोमाने अभ्यास करण्याची. हे शिक्षण क्षेत्र अगदी नापीक झालं आहे त्यामध्ये ज्ञानरुपी खत घालण्याची गरज आहे . आता क्रांती होण्याची गरज आहे “ शिक्षण क्रांती”. 

आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment