Sunday, May 24, 2020

***** अभियांत्रिकी शिक्षण परत उजळू दे *****

गेल्या आठवड्यात विनानुदानीत अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संस्थापकांची एक फेसबुकवर मिटिंग झाली. बऱ्याच जणांनी त्याची लिंक मला पाठवली आणि माझे मत विचारले. तशी हि शिक्षणक्षेत्रातील मोठी दिग्गज असताना माझ मत काय मांडायचं ? पण बराच विचार केला म्हटलं मंथन सुरु झाल पण सगळ्यांनी सापाच शेपूट पकडलं आहे आणि सापाच तोंड पकडायला कोणीही तयार नाही. मग हे मंथन पूर कस होणार ? शेवटी विचार केला कि कोणीतरी ते टोक पकडलंच पाहिजे. मंथन चालू राहीलच पाहिजे.
अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राची गेल्या पाच वर्षापासून उतरत्या दिशेने वाटचाल सुरु झालीच होती. या किंवा पुढच्या वर्षी हे मान टाकणार होतच, पण माझ्या मते हा कोविड योग्य वेळी देवासारखा धावून आला आहे .या कोविडच्या निमित्ताने या क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याची मोठी संधी या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला मिळालेली आहे पण या संधीच सोन करायचा दृष्टीकोन कुणाकडेही नाही. शांतपणे दूरगामी विचार करून खंबीर निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक जण परत अंग लपवायचा प्रयत्न करत आहे . या परिस्थिती बरोबर दोन हात करायचे सोडून पळवाट शोधत आहे.
जेव्हा पेशंट आय सी यु मध्ये मरणासन्न असतो त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी निष्णात डॉक्टर लागतो, त्याचबरोबर योग्य आहार ,औषधे वगैरे पेशंटला देण्यासाठी पैसा पाण्यासारखा घालवायला लागतो पण आपण पैसे वाचविण्यासाठी खर्चात कपात करायला लागलो तर काय होईल, गुण यायची शक्यता किती? मग पैसे वाचवणे साठी अंगारे धुपारे करायचे का?
ही अशीच परिस्थिती आलेली आहे. पैसे घालून हे क्षेत्र वाचविण्यासाठी गरज असताना त्यात कपात करून आणि नकारात्मक भूमिका घेऊन हे क्षेत्र वाचणार तर नाहीच पण याला जगविण्यासाठी जास्त प्रयास करावे लागणार आहेत.
आपल्याकडे स्वायत्त विद्यापीठ आणि इतर विद्यापीठातील विद्यार्थी यांचा प्रश्न हा एकाच पद्धतीने सुटणारा नाही. त्यामुळे ते जे करतात ते इतरावर थोपवण्यात काहीही अर्थ नाही. पूर्ण फी भरून येणारे विद्यार्थी आणि निव्वळ जागा भरण्यासाठी बाबा पुता करून आणलेले विद्यार्थी याच्या मध्ये आर्थीक, शैक्षणिक, मानसिक आणि कौटुंबिक असा टोकांचा फरक आहे तो ध्यानात घेतला पाहिजे.
बरीच जण AICTE ,DTE च्या नावे खडे फोडतात पण हे फोडण्यापूर्वी सगळे नियम कसे साम , दाम , दंड , भेद वापरून फाट्यावर बसवले हे सोयीस्कर रित्या विसरतात. या यंत्रणेला सवयी तुम्ही लावल्या. NBA, NAAC सारख्या चांगल्या मूल्यमापनाच्या पद्धतीला कागदावर व्यवस्थित बसवलं आणि मिळालेल्या ग्रेड मिरवल्या पण आता पितळ उघडे पडत आहे म्हणून त्यांच्या नावाने शंख फुंकण्यात काहीही अर्थ नाही. त्यामधील निकष योग्य पद्धतीने पाळले असते तर ही वेळ आलीच नसती.
अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांनी निव्वळ मुलांच्या फी आणि समाजकल्याणच्या भरोशावर राहण्यात काहीही अर्थ नव्हता. आपल्याकडे असणाऱ्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा वापर करून संस्थेचे उत्पन्न वाढवणे गरजेचे होते पण याचा कधीही विचार केला नाही. आपल्या संस्थेमधील उपलब्ध जागेचा आणि उपकरणांचा वापर करून उद्योगजगतासाठी संशोधन आणि उत्पादन विकासासाठी कार्य करायला पाहिजे होत पण ते करायला जमल नाही. लाखामध्ये पैसे घालून उभ्या केलेल्या लॅबचा उपयोग फक्त दिखाव्यासाठी केला गेला त्या लॅबमधील उपकरणाचा वापर करून पैसे मिळवता नाही आले. एव्हढंच काय बऱ्याच ठिकाणी उद्योगांनी लॅब उभा करून दिल्या आहेत त्याचा वापर करायला पण जमलेलं नाही. मध्यंतरी बऱ्याच महाविद्यालयांना वाहन उद्योगांनी इंजिन भेट दिली आहेत. त्या महाविद्यालयांनी त्याचा उपयोग शो पीस म्हणून केला, काही ठीकाणी तर त्याचवर धूळ मावत नाही. कुणाच्याही मनात आल नाही कि विद्यार्थ्यांना घेऊन ते खोलून बघाव आत कस आहे हे आपणपण बघावं आणि विद्यार्थ्यांना पण शिकवावं?
परदेशामध्ये नवीन तंत्रज्ञान हे विद्यापीठात तयार होत आणि मग ते उद्योगात वापरलं जात . ते नवीन तंत्रज्ञान घेऊन विद्यापीठे उद्योगाकडे जातात .आपल्याकडे शिक्षण संस्था उद्योगातील लोकांना बोलावून घेतात नवीन तंत्र विद्यार्थ्यांना समजावून सांगायला आणि तेही फुकट सांगावे अशी अपेक्षा ही करतात हा एव्हढाच फरक पुरेसा आहे कि आपण कुठे आहोत ते समजून घेण्याचा..
ज्यावेळी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र भरात होते त्यावेळी संस्थापकांनी आपल्या संस्थेसाठी pillar निवडण्याच्या ऐवजी feeler चा भरणा केला. निव्वळ कागदपत्रे रंगवण्यासाठी नगाला नग भरला . हा नग भरताना त्याची खरंच काय गुणवत्ता आहे याची पारख केली नाही किंबहुना अशी पारख करणारी माणसेच सध्या कुठल्याही संस्थेकडे नाही.
संस्था सुरुवात केली तेव्हा संस्थापकांनी पारख करून माणसे भरली होती, टिकवली होती पण नंतर त्याचा व्याप वाढल्यानंतर त्यांही हे काम दुसऱ्याच्या गळ्यात ज्यांना या क्षेत्राची माहिती नाही आणि चांगली माणसांची पारख करता न येणाऱ्या जवळच्या लोकांकडे सोपवले आणि पण याच जवळच्या लोकानी वैयक्तिक स्वार्थासाठी त्या अधिकाराचा दुरुपयोग केला आणि शेवटी सैनिकाऐवजी बाजारबुनग्याचा भरणा झाल्यामुळे सध्याची हि स्थिती आलेल्ली आहे.
शैक्षणिक पात्रता वाढली कि पगार वाढतो पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढत असते याच भान काही लोकांना राहिलेलं नाही किबहुना बऱ्याच जणांनी मी पी. एच. डी. केली आहे आणि मला इतकाच लोड पाहिजे असे भांडण काढण्यातच आणि काम टाळण्यातच यांनी धन्यता मानली. एव्हढंच काय दुसर्ऱ्याचे पाय ओढण्यासाठी यांनी कुरापत्या सुरुवात केली . आज या लोकांचा पगार वाढलेला आहे आणि त्यामानाने याची कार्यक्षमता कमी झालेली आहे .याच्या पगाराचा भार वाढत चालला आहे आणि बऱ्याच संस्था याखाली दबून गेल्या आहेत.बऱ्याच ठिकाणी ज्या विषयाला विद्यार्थी येत नाहीत त्या विषयाचा लोड हे घेत असतात. यांच्या कामगिरीचे पुनर्मुल्यांकन करण्याची गरज आहे. संस्थापकांनी आता पगार आता पदासाठी ना देता लायक माणसाना निवडून त्याच्या कार्यक्षमता पारखून त्यांना द्यायला पाहिजे. भले तो कुठल्याही पदावर असो.
हे जे ऑन लाईनच फॅड जे आणल आहे त्याला व्यवस्थित आणि विचारपूर्वक वापरायला पाहिजे होत. पण पुढ पुढ करण्याच्या नादात त्याच नाविन्य आणि त्याच्यातील रस घालवून बसलो आहोत. शिक्षणक्षेत्रात प्रयोग करताना खूप विचार करायला लागतो कारण त्याचा परिणाम खूप लांबपर्यंत टिकतो. आपल्याकडे सरसकट आठवीपर्यंत पोर पुढे ढकलली याचे दुष्परिणाम अजूनही सगळे भोगत आहेत.
प्रॅक्टिकलचे ऐवजी सिम्युलेशन करा किंवा त्याचे व्हिडीओ दाखवा म्हणानाऱ्याचे तर चरणतीर्थ प्राशन केले पाहिजे. आपली मुले मार्क्स मिळवण्यात कमी पडत नाहीत तर प्रक्टिकल ज्ञानात कमी पडतात हे उद्योग क्षेत्र ओरडुन सांगते . आतापर्यंत यावर कित्येक वेळा चर्चा झाडल्या आहेत तरीही हे गांभीर्याने घ्यायचा कुणीही विचार करत नाही.
आपण मेकॅलेच्या नावाने बोंब ठोकतो आणि नोकर घडवतो. पण उद्योजक किंवा संशोधक का घडत नाही याचा विचार आपण का करत नाही? आम्ही प्लेसमेंट दाखवतो पण किती विद्यार्थ्याची प्लेसमेंट त्याने ज्या शाखेत शिक्षण घेतले त्या संबधित क्षेत्रात झाले आहे? त्याने पैसे भरून घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग त्याच्या नोकरीत होतो का ? हे पाहतच नाही.
काही महाविध्यालये त्यांचे काही विद्यार्थी उद्योजक /स्पर्धा प्ररीक्षा पास करून सध्या या मोठ्या पदावर आहे असं कौतुकाने सांगतात आहेत पण तो विद्यार्थी शिकत असताना त्याला व्यवसाय अथवा स्पर्धा परीक्षा करण्याविषयी आपण काय मदत केली हे कुणी सांगेल का?
आपली मुले मास्टर करायला परदेशात जातात कारण तिथ शिकल्यावर त्यांना चांगला जॉब मिळतो कारण तिकडे प्रॅक्टीकल ज्ञानावर भर दिला जातो शिवाय विकसित झालेलं उद्योग क्षेत्र आहे आणि ज्यामुळं त्यांच्या कर्तुत्वाला वाव आहे. आमच्याकडे मास्टर केलेल्या विद्यार्थ्याला नोकरी मिळत नाही इतका आम्ही विश्वास घालवून बसलो आहोत. पी एच डी झालेल्याला स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही . आत्मनिर्भर होता येत नाही मग काय बोलायलाच नको. हे विचारात घेतलं पाहिजे.
मध्यंतरी अभियांत्रिकी क्षेत्राला आलेल्या भरतीच्या लाटेवर अनेक स्वार झालेले आमचे सो कॉल्ड शिक्षण सल्लागार / मार्गदर्शक आता का चालत नाहीत? त्यांची जादू संपली का ? त्याच्यात कधीच काही अर्थ नव्हता. त्यांचेजवळ होत ते फक्त कागद रंगवायच कसब. आता त्यांनी शांतपणे विश्रांती घ्यायला पाहिजे . पुढच्या पिढीतील योग्य अशा माणसाकडे कार्यभाग सोपवला पाहिजे.
आपल्या संस्थेचे माजी विध्यार्थी हे एक मोठा अॅसेट असतात पण त्याचे महत्व कुणीच ध्यानात घेतलेलं नाही. त्यांच्याकडे हात पसरण्याऐवजी त्यांनी स्वतःहून मदत केली पाहिजे पण इतके जिव्हाळ्याचे संबंध जपता आले का? एक रुपयासाठी परीक्षेतून उठवून ऑफिसमध्ये बोलावणाऱ्या संस्था आहेत त्यांचे विद्यार्थी कसे मदत करतील? आणि विद्यार्थ्याकडून पैसे का मागायचे ? विद्यार्थी ऐवजी त्यांना ग्राहक या भूमिकेत त्याला पाहिले आहे मग त्याच्याकडून काय मिळेल ही अपेक्षाच करण्यात अर्थ नाही. त्या ऐवजी इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्या सहाय्याने संस्थेचा उत्कर्ष करून घेता येईल पण काय मागायचे हेच कळत नाही.
ऑन लाईनसाठी आपण उदेमी , कोर्सेरा ,खान अकेडमी यांची उदाहरणे देतो पण त्या कोर्सचा सगळ्याच शाखांना उपयोग होत नाही शिवाय यांचा उपयोग हा स्कील अप ग्रेडेशनसाठी केला जातो. आपल्याला महाविद्यालयात मुळात स्कील निर्माण करायच मोठं अवघड काम करावं लागते हि महत्वाची गोष्ट आहे.
आपल्याकडे दूर शिक्षण हा प्रकार अभियांत्रिकीसाठी होताच . पण काहीतरी खुसपटे काढून त्याला बंद करायला लावले. आपल्याकडे IETE मध्ये पण एक चांगली कल्पना राबवली होती कमी पैशात इंजिनियर होता येत होत. फक्त आठवड्यातून एकदा प्रक्टिकल करायला सेंटरला जाव लागायचं. एक चांगली कल्पना होती त्याच पुनर्जीवन करायला पाहिजे. सध्याच्या परीस्ठीतिला तोंड देण्याची क्षमता त्या संकल्पनेत आहे.
अजून बरच काही आहे ……
फक्त एक लक्षात घ्या इंजिनियरिंग हे आपण योग्य रीतीने चालवत नाही म्हणून नाहीतर इंजिनियरला कधीही मंदी नसते. तर त्याला अशा मंदीतपण संधी दिसते.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment