Sunday, March 15, 2020

*** इंजिनिअरिंग को स्कोप नही कहनेवाले तेरा मुहं काला.****

*** इंजिनिअरिंग को स्कोप नही कहनेवाले तेरा मुहं काला.****
इंजिनियरिंग करणं म्हणजे परीसाचा शोध घेणं असत,ज्यानी त्याला श्रद्धेनं शोधून स्पर्श केला त्यांचं आयुष्य सोनं झालं . पण त्याला स्पर्श करण एव्हढं सोपं नाही अफाट कष्ट करायला लागतात.पण हे कष्ट करायला नको म्हणून अंगावर गोल्डन कलर मारून जे परीस सापडला म्हणून मिरवतात ते काही काळानंतर आपोआपच उघढे पडतात आणि मग इंजिनिअरिंगला शिव्या देतात.
ज्या शिक्षणावर आपल्या आयुष्याची चाळीस वर्षे आनंदात जायची आहेत त्यांची तयारी चार वर्षात करायची आहे तर विचार करा की या चार वर्षात किती अभ्यास केला पाहिजे.आणि हो अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे प्रात्यक्षिक आणि अवांतर मिळवलेला अनुभव हेच असत . पण नुसती घोकंपट्टी करून मिळवलेले मार्क्स म्हणजे काही उपयोगाचे नसतात.
आजकाल या कलर मारलेल्या लोकांची संख्या जास्त झाली आहे आणि हेच लोकं इंजिनिअरिंग शिक्षणाला बदनाम करत आहेत. सर्वात वाईट एकाच गोष्टीच वाटतं, यातीलच काही शिक्षण क्षेत्रात पण आले आहेत ,शिक्षक बनले आहेत. ज्या अभियांत्रिकी पदवीच्या जीवावर आयुष्य भर पैसे कमवले, बंगले बांधले, स्वतः ची पोर इंजिनिअर बनवली त्यांना पुढील शिक्षणासाठी परदेशात MS (इंजिनिअरिंग चे पुढील शिक्षण) करायला पाठवली, हीच माणसे जेव्हा तोंड वाकडे करून इंजिनिअरिंगला स्कोप नाही म्हणतात त्यावेळी खूपच राग येतो.केवळ याच लोकांच्या मुळे नवीन शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप भोगाव लागत आहे.
मित्रानो ,आता वेळ आली आहे हे नकारात्मक विचार झटकून टाकण्याची.ही वेळ आहे इंजिनिअरिंग विषयी लोकांमध्ये सकारात्मकता जागवण्याची. सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
आज वेडयासारखी इंजिनिअरिंग ला नावं ठेवत मुलं इतर शाखांना जात आहेत पण त्यांना हे कळत नाही की इंजिनिअरिंग नाही तर उद्योग नाहीत आणि उद्योग नाही तर नोकऱ्या नाहीत. आता इंजिनिअरिंगविषयी लोकांमध्ये आणि आपल्या विध्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. यापुढे नकारात्मक विचार व्यक्त करू नका.
जे नकारात्मक विचार प्रसारित करतात त्यांना समजावा, समज द्या.
डॉल्फिन लॅब्स आता लवकर या विषयी कॅम्पेनिंग सुरू करणार आहे.
माझी एकच इच्छा आहे आपण इंजिनिअर आपल्या गाडीवर, फेसबुक च्या प्रोफाइल पिक्चर वर, व्हाट्सएपच्या डी.पी.वर इंजिनिअर असल्याचे टाकू शकतो." मी इंजिनिअर आहे याचा मला अभिमान आहे ", या सारखे स्लोगन टाकू शकतो.आपल्या संस्थेच्या प्रवेशद्वारात चांगले स्लोगन टाकू शकतो. यामुळे हळूहळू सकारत्मक विचार जर वाचायला मिळाले तर हळूहळू नकारात्मकता कमी होण्यास नक्किच मदत होईल.
मला अभिमान आहे इंजिनिअर असल्याचा, तुमचं काय?
मी सुरुवात केली आहे ,तुम्ही पण करा.
इंजिनिअर आहात तर शेअर करा.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860.

अर्जुन आठवावा , अर्जुन साठवावा , मनी बाळगावा , सदा चिंतावा .....

आयुष्यात कधीतरी बिकट अवस्था येते. सगळ काही असून नसल्यासारखं होत . नोकरी जाते , व्यवसायात मार बसतो, नातेवाईक दुरावतात, ज्यांची लायकी नाही अशांचे पाय धरायची वेळ येते. मन अगदी खचून जात . काय करावं हेच कळत नाही अशावेळी मी एकच गोष्ट करतो. डोळे मिटतो आणि अर्जुनाचा वनवासाचा काळ आठवतो. मनाला खूपच धीर येतो. आज मी आजूबाजूला जेव्हा पाहतो तेव्हा अभियांत्रिकी शिक्षणाला आलेल्या मंदीमुळे सैरभैर झालेले शिक्षक मित्र पाहतो , नोकऱ्या नसल्यामुळे फिरणारे विद्यार्थी पाहतो त्यावेळी खुपच वाईट वाटत. म्हणून महाभारतातील एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट ज्यावर जास्त कोण बोलत नाही आणि जी मला नित्य प्रेरणा देते ती सांगतो.
युधिष्टिर द्यूतात हारलेमुळे पांडवांना वनवास भोगावा लागला. पांडव वनवासात असतानाच्या काळाचा विचार केला तर असं दिसून येत कि वनवासात असताना अर्जुन टिवल्या बावल्या करत बसला नाही. त्याच्या भावाच्यामुळे हि परिस्थिती आली म्हणून तो त्याला दुषणे देत बसला नाही किंवा दैवाला दोष देत रडत किंवा कुढत बसला नाही . सार संपल म्हणून रडत बसला नाही . या वनवासाच्या काळात त्याने स्वत:ला सतत काहीतरी शिकण्यात गुंतवून ठेवले. . नित्य नवीन साधना करीत राहिला. स्वत:च्या कौशल्यात तो नित्य वाढ करत राहिला. या काळात तो त्याचे वडील इंद्र याच्याकडून शस्त्रविद्या शिकला त्यांच्याकडून त्याने वज्र मिळवले , ब्रहस्पती ऋषीकडून त्याने युध्दशास्त्राचे धडे त्याने गिरवले. शिवाकडून त्याने पाशुपती अस्त्र शिकून घेतले. त्याने कुबेर, यम आणि वरूण यांना त्याने प्रसन्न करून घेतले आणि त्यांचेकडून त्यांची अस्त्रे मिळवली. चित्रसेन गन्धर्व जो संगीत आणि नृत्यात निपुण होता त्याचेकडून तो नाच सुद्धा शिकला.
अज्ञातवासाचा एक वर्षाचा काळ अर्जुनासाठीचा सर्वात दु:खद होता , त्याची सर्वात कठिण आणि कठोर मानसिक परीक्षा परीक्षा बघणारा होता. विचार करा, हा अर्जुन जो देवांच्या राजाचा मुलगा ,साक्षात भगवान कृष्णाचा अतिशय जिवलग मित्र. ज्याच्या धनुष्याच्या केवळ टणत्काराने शत्रूचे धाबे दणाणले जायचे. ज्याला पूर्ण पुरुष मानले जायचे अशा अर्जुनाला स्वत:ची ओळख लपवून साडी नेसून , केसं वाढवून , हातात काकणे घालून , राजकुमारी उत्तरेला नाच शिकावण्यासाठी ब्रहन्नडा बनून रहायला लागले. अशा या अवस्थेत ज्या ज्या वेळी त्याच्या पुढे द्रौपदी येत असणार त्या त्या वेळी त्याच्या मनाला काय यातना होत याची कल्पना सुद्धा करवत नाही. विराट पुत्राच्या बढाया ऐकताना आणि त्याच्याकडून अपमान होत असताना त्याला काय वाटले असेल? आयुष्य संपवून टाकावे अशी इच्छा त्याच्याही मनात त्यावेळी कित्येक वेळा आली असेल.
कसे काढले असतील त्याने ते दिवस? तेही त्याची काहीही चूक नसताना. कधी याचा विचार केला का ? पण अर्जुनाने सगळे भोगले कारण त्याचा स्वत:वर विश्वास होता. स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास होता.त्याला माहित होते हे वनवासाचे दिवस पाहता पाहता संपतील आणि परत त्याला संधी मिळणार आहे. त्याला त्याच्या धनुष्यावर विश्वास होता . त्यामुळे तो वनवासाच्या दिवसात सुद्धा भावी लढाईची तयारी करत होता. आणि पुढचा इतिहास सर्वाना ज्ञातच आहे.
मित्रानो, सध्या अभियांत्रिकी शिक्षणावर हि जी ओढवून घेतलेली मंदी आलेली आहे.( हि ओढवून घेतलेली मंदी म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी माझा यापूर्वीचा अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील मंदी हा लेख वाचावा) त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी घडायला लागल्या आहेत. अशावेळी मन स्थिर ठेवण्याची गरज आहे. कुणालाही दुषणे न देता स्वत:ला आणि विद्यार्थ्यांना घडवणेसाठी झोकून द्यायला हवं आहे . बऱ्याच शाखांना विद्यार्थी संख्या खूपच कमी झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा तणाव निर्माण होत आहे. त्यांचेपुढेही मंदीचे भूत नाचू लागले आहे. त्यामुळे त्यांनाही मानसिक आधार देण्याची खूपच गरज आहे. हि मंदी आहे हि कौशल्य कमी झालेमुळेची आहे. त्यामुळे रोज वेळ काढून नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हि वेळ काही अजून जास्त राहणार नाही . पण पुढच्या येणाऱ्या काळासाठी स्वत:ला तयार केल पाहिजे. अंधारानंतर परत पहाट हि होतच असते हे विसरून चालणार नाही .
म्हणून म्हणतो ....
अर्जुन आठवावा , अर्जुन साठवावा ,
मनी बाळगावा , सदा चिंतावा ......
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
www.dolphinlabs.in
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Friday, September 6, 2019

**** पायथॉन प्रोग्रामिंग ****

**** पायथॉन प्रोग्रामिंग ****
गेल्या महिन्यात एका असेच एक सर भेटले होते. सर सांगत होते कि त्यांचेकडे स्वायत्त अभ्यासक्रम आल्यामुळे त्यांनी आता अभ्यासक्रम काळानुसार बदलला आहे. अगदी पहिल्याच वर्षी पायथॉन प्रोग्रामिंग टाकले आहे आणि आता दुसऱ्या वर्षी मशीन लर्निंग टाकणार आहेत. ज्यामुळे मुलांना आधुनिक ज्ञान मिळेल . असं बरच काही मोठ्या उत्साहाने सांगत होते.
घरी आलो आणि सहज विचार मनात आला कि खरच असा अभ्यासक्रमात विषय टाकून काय फायदा होईल का ? आतापर्यंत असे कितीतरी प्रयत्न झाले आहेत. आपल्याकडे अभ्यासक्रमात विषय टाकला कि काम झाल अस होत पण तो विषय कसा घेतला पाहिजे याविषयी व्यवस्थितपणे मार्गदर्शन केले जात नाही. मुळात तो अभ्यासक्रम ज्याने तयार केला आहे त्याला त्या तंत्रज्ञानावर काम केलेचा अनुभव नसतो . तीन चार विदेशी विद्यापीठातील अभ्यासक्रम त्यांच्या वेबसाईटवर पाहून त्याच्यातील प्रत्येकातील काही भाग घेउन आपला अभ्यासक्रम तयार केला जातो.
हा अभ्यासक्रम तयार केल्यावर त्याच्या प्रयोगशाळा बनविण्याबाबत तर आनंदी आनंदच असतो.
ती लॅब विकसित करताना बजेटमध्ये कपात केली जाते . जेव्हढ कॉम्पुटरवर करता येईल आणि ज्याला खर्च येणार नाही अशी प्रात्यक्षिके घेतली जातात . ज्याला पैसे लागतील ती अभ्यासासाठी बाजूला ठेवलं जात .आणि हेच प्रात्यक्षिक महत्वाची असतात . म्हणजे स्वप्न वाघाच बघायचं , तयार करताना मांजर बनवायचं आणि शेवटी उंदीर दाखवायचा आणि त्याला पाहून वाघ इमॅजीन करायचा ... आहे कि नाही मज्जा .
१९९२ ते २००२ पर्यंतचा काळ आठवा . अगदी आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी पण सी ,सी ++ शिकायचे त्यांना त्याचा काहीही उपयोग झाला नाही . अगदी इंजिनियरिंग मध्ये सुद्धा सी,सी ++ शिकवून काहीही उपयोग होत नाही. कारण मुलांना अप्लिकेशन वर काम करायला मिळतच नाही. अगदी तीच अवस्था या पायथॉन ची येत्या दोनचार वर्षात होणार आहे.
पायथॉन प्रोग्रामिंग हे शिकवत असताना वेगवेगळ्या शाखातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. कॉम्पुटरच्या विद्यार्थ्यासाठी त्यांची अॅप्लिकेशन वेगळी असतील इलेक्ट्रॉनिक्ससाठी वेगळी असतील हेच लक्षात घेतलं जात नाही . इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्यांना जर शिकवायचं तर हार्डवेअरवर शिकवलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात घेउनच अभ्यासक्रम बनवून तो शिकवला पाहिजे नाहीतर कॉम्पुटरच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शिकवतात तसाच जर इलेक्ट्रोनिक्सच्या विद्यार्थ्यांना शिकवला तर त्याच महत्व राहाणार नाही.
जर आतापासून जर खबरदारी घेतली नाही तर आज ज्या पायथॉन आणि मशीन लर्निंगचा हे उदो उदो करतात बघा अजून चार वर्षात त्याची किंमत शून्य होते कि नाही. कारण ज्या गोष्टीचा उपयोग नाही ती गोष्ट कचरा होते आणि एकदा कचरा झाली कि ती शून्य होते. हे जागतिक सत्य आहे .
आपले विचार ऐकायला नक्कीच आवडेल .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,
शॉप नं. १०, केक स्टोरीच्या मागे , वेताळबुवा चौक , नऱ्हे, पुणे. ४११०४१ .
फोन – ९७६३७१४८६०
कृपया शेअर करा

*अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग ३ * **** अभियांत्रिकी शिक्षणाची ओळख आणि पालकांनी घ्यायची काळजी *****

**** अभियांत्रिकी शिक्षणाची ओळख आणि पालकांनी घ्यायची काळजी *****
*अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग ३ *
अभियांत्रिकी शिक्षण हा चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे. प्रत्येक वर्ष हे दोन सत्रात (सेमिस्टरमध्ये) विभागलेले असते म्हणजेच हा आठ सत्राचा अभ्यासक्रम आहे.
प्रत्येक सत्रामध्ये पाच विषय असतात आणि या पाच विषयातील काही विषयांना प्रात्यक्षिक,,, घेतली जातात. प्रत्येक विषयाची लेखी परीक्षा घेतली जाते आणि ज्याविषयाची प्रात्यक्षिक घेतली जातात त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. काही विषयाची तोंडी परीक्षा घेतली जाते.
याच बरोबर अधिकचा अभ्यास म्हणून विध्यार्थ्यांना स्वाध्याय (असाईनमेंट्स) दिला जातो. काही ठिकाणी वरचेवर क्लास टेस्ट घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांचे पूर्ण सत्रातील त्याची कार्यक्षमता पाहून त्यावर टर्मवर्कसचे मार्क्स दिले जातात. टर्म वर्कसचे मार्क्स देताना विद्यार्थ्याची वर्गातील अटेंडंन्स, प्रॅक्टिकलची अटेंडंस , त्याला मिळलेल्या क्लास टेस्ट मधील मार्क्स आणि त्याची एकूण वर्तणूक हि ध्यानात घेतली जाते.
याच बरोबर पदवीच्या दुसऱ्या वर्षी एक लहान, तिसऱ्या वर्षी मध्यम आणि शेवटच्या वर्षी एक मोठा प्रकल्प (प्रोजेक्ट ) करायचा असतो . सर्वसाधारणत: या प्रकल्पावरच सेमिनार घेतले जातात.
म्हणजेच एका सत्रात खालील प्रकारे परीक्षा असतात :-
पाच विषयांचे पेपर : ५
दोन/चार विषयाच्या प्रक्टिकल परीक्षा :२
एक किंवा दोन विषयाच्या तोंडी परीक्षा (ओरल ) : १
एक / दोन विषय टर्म वर्क : १
टेस्ट १ : ५
टेस्ट २ : ५
प्रिलीयम: ५
असाइनमेंटस( प्रत्येक विषयाच्या सहा ): एकूण ३६
म्हणजेच अभियांत्रिकीच्या चार वर्षात एक विद्यार्थी इतक्या परीक्षा देत असतो .
पाच विषयांचे पेपर : ५ * ८ =४०
दोन/चार विषयाच्या प्रक्टिकल परीक्षा :२ *८ = १६
एक किंवा दोन विषयाच्या तोंडी परीक्षा (ओरल ) : १*८ =८
एक / दोन विषय टर्म वर्क : १ *८= ८
टेस्ट १ : ५*८ = ४०
टेस्ट २ : ५ *८ =४०
प्रिलीयम: ५*८ = ४०
असाइनमेंटस( प्रत्येक विषयाच्या सहा ): एकूण ३६ * ८= २८८
याशिवाय सेमिनारस , मायक्रो /मिनी/मेगा प्रोजेक्ट्स ,सर्व्हे रिपोर्ट , इंटर्नशिप रिपोर्ट्स इतकं सार असत. भारतातील अभियांत्रिकीच शिक्षण तसं पाहिलं तर जगातील सगळ्यात अवघड शिक्षण मानल पाहिजे .
अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना मुलाला परीक्षेला विद्यापीठाच्या परीक्षेला बसण्यासाठी ७५ टक्के अटेंडंस हि गरजेची असते. काहीवेळा मुलं नाही पूर्ण करत अशावेळी महाविद्यालये पण सहानुभूतीपूर्वक विचार करतात . पण काही मुलांना तो हक्क वाटतो. प्रॅक्टिकलला कधीही येत नाहीत . डायरेक्ट प्रॅक्टिकल परीक्षेला येतात तिथंही प्रॅक्टिकल व्यवस्थित करत नाहीत . मग नापास होतात. पण थेअरी परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतात मग बोंब मारत सुटतात कि शिक्षकांनी मुद्दाम नापास केल आणि मग पालक पण त्यांची बाजू घेउन भांडायला येतात अशावेळी त्यांची कीव येते. शिकली सावरलेली हि पालक मंडळी ज्यावेळी मुलानी केलेली चूक जाणून घेउन त्याला चार शब्द सुनावण्याऐवजी शिक्षकांना दोष देतात अशावेळी खूपच वाईट वाटत . आपण आपल्या मुलाची बाजू घेउन स्व:ताच नुकसान किती करून घेतलंय नंतर त्या मुलांनं महाविद्यालय बुडवून केलेले पराक्रम बघितल्यावरच कळतंय. माझी पालकांना एक नम्र विनंती आहे कि मुलाची बाजू घेउन स्वत:च नुकसान करून घेउ नका.
मी बऱ्याच वेळा म्हणत असतो कि शेतकरी दादा तू एकदा बी पेरल्यावर दररोज मशागतीला शेतात जातोस . पोराच्या बरोबरीन त्याची काळजी घेतोस . त्यासाठी त्याच पान आणि पान तपासून बघतोस त्याला काही कीड लागली का? मग स्वत :च्या पोराची प्रगती बघायला जायला तुंला महिन्यातून एकदा तरी का सवड मिळत नाही?. पोरग अभियांत्रिकीला घातलं असेल बघ विचार कर . महिन्यातून एकदा तरी त्याच्या कॉलेजला भेट दे , त्याच्या शिक्षकांशी बोल , त्याची प्रगती कशी आहे हे विचार , त्याला पुढे जाण्यासाठी काय कराव लागेल यांच्याविषयी त्यांच्याशी बोल. मग बघ ते शिक्षकही त्याची व्यवस्थित काळजी घेतील. उगाच मार्कांनी सुजवलेली ग्रेड तुझ्या पोरांच्या पदरात टाकण्याऐवजी प्रात्यक्षिक ज्ञानातून तावून सुलाखून मिळवलेल्या खऱ्या इंजिनीयरिंगची पदवी मिळेल . तुझ पोर पण अस घडलेल असेल कि त्याच्यासाठी संधीची दारेच काय तर संधीच हात जोडून उभी राहील .
बघ दादा , यावेळी एव्हढ करच. महिन्यातून एकदातरी पोरांच्या शिक्षकांना भेटच ..................
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
*मुल इंजिनियरिंग शिकतात तर डॉल्फिन लॅब्सचा नंबर तुमच्या मोबाईलवर अवश्य सेव्ह करा आणि काही माहिती पाहिजे असेल तर अवश्य फोन करा*
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग २. **** अभियांत्रिकी शिक्षणाचे अर्थशास्त्र ****

**** अभियांत्रिकी शिक्षणाचे अर्थशास्त्र ****
अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग २.
चर्चा करत असताना बरेचजण मला माझे मत विचारत असतात कि अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता कशामुळे ढासळली तर त्याला कारणे भरपूर आहेत पण सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे पालक आणि त्यांचे लाडावलेले पाल्य . पालकांना या शिक्षणाचे गांभीर्य राहिलेले नाही. पाल्याच्या सगळ्या चुकांना पाठीशी घालत असताना, त्यांची वकिली करत असताना त्यांना आपण स्वत: स्वतःचच नुकसान करून घेतोय हेच कळत नाही . पाल्य कॉलेजला आला नाही म्हणून त्याला जाब विचारणेऐवजी त्याच्या शिक्षकांना तो गैरहजर का राहिला याची काहीतरी केविलवाणी कारणे देत असतात . विद्यार्थ्यांना पण शिक्षणाचं गांभीर्य नाही . अभियांत्रिकी शिक्षण आणि कला, वाणिज्य शाखेतील शिक्षण यामध्ये असणारा फरक त्यांच्या लक्षात येत नाही. ते अभियांत्रिकी शिक्षणाकडे त्याच दृष्टीने पाहत असतात. अभियांत्रिकी शिक्षणाचा भर हा प्रॅक्टिकल आणि चालू मार्केट यावर जास्त असतो . इथ विषयांच्या अभ्यासाची खोली हि झपाट्याने बदलत असते. पुस्तकातल्या विषयाबरोबरच इतर अवांतर गोष्टींचा अभ्यास लागतो . कलेच्या शाखेच्या विद्यार्थ्याला कलेचा अभ्यास करावा लागतो ,वाणीज्यच्या विद्यार्थ्याला वाणिज्य पण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासासोबत कला , वाणिज्य आणि विज्ञान या सगळ्यांची माहिती असणे चांगल असत. त्याच्यासाठी पुस्तकात किंवा अभ्यासक्रमात जितक असत त्यापेक्षा जास्त माहिती त्याला इतर लागत असते हे त्याला कळतच नाही . मग तोही त्यांच्या प्रमाणे लेक्चर , प्रॅक्टिकलला बंक मारायला लागतो . वर्ग आणि प्रयोगशाळेपेक्षा त्याचा वेळ कँटीन, कट्टा आणि इतर गोष्टीतच जास्त जातो.
आता पालकांनी आणि पाल्यांनी अभियांत्रिकी शिक्षण गांभीर्याने घेतलं पाहिजे . हे शिक्षण म्हणजे एक गुंतवणूक आहे हे त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे . त्यांनी त्यांच्या पाल्यांच्या खर्चाचा नव्याने हिशोब लावायला सुरुवात केली पाहिजे आणि या गुंतवणुकीचे नियम आणि जोखमी ध्यानात घेतल्या पाहिजेत. आता पालकांनीच विचार करावा .
एका मुलाची एका वर्षाची फी :- ९०,०००/- रु.
जेवणाचा खर्च जवजवळ :- २४,०००/- रु.
राहण्याचा खर्च जवळजवळ :- २४,०००/- रु.
पॉकेटमनी आणि इतर खर्च :- २४,०००/- रु.
एक वर्षाचा खर्च जवळजवळ :- १,६२,०००/- रु.
म्हणजे पाल्याचा एका वर्षाचा खर्च जवळजवळ १,६२,०००/- रु. ( एक लाख बासष्ट हजार रुपये मात्र ) होतो. ज्यांना शिष्यवृत्ती मिळते त्यांचा बराचसा खर्च हे करदाते करत असतात.
आता या खर्चाची विभागणी पाहू या ...
एका सत्र शिकवण्याचे दिवस : ९०
एका वर्षातले शिकवण्याचे दिवस : ९०+९० = १८०
म्हणजेच एक दिवसाची शिकण्याची किंमत : १,६२,०००/ १८० = ९००
एका दिवसात असणारे तास :६
एका तासाची किंमत :९००/६ = १५०
एका मिनिटाची किंमत : २ रु. ५० पैसे
पालकांना आणि पाल्यांनाही हे कळणे गरजेचे आहे कि एक तास बुडतो म्हणजे १५० रु. बुडले आणि एक दिवस कॉलेजला दांडी म्हणजे जवळजवळ ९०० रु. वाया गेले . ज्यावेळी पालकांना हि जाणीव होईल कि आपल्या पाल्यांने कॉलेजला एक दिवस दांडी मारली तर ९०० रुपये बुडाले,त्यावेळी तो आपल्या पाल्यांला एक दिवस काय एक तासही शाळेला दांडी मारून देणार नाही. मुलाने कॉलेजला दांडी मारली म्हणजे कॉलेजचे नुकसान नाही तर त्यांचेच नुकसान आहे . वर काही मुल तर कॉलेजला दांडी मारतातच आणि क्लास पण लावतात म्हणजे हा अधिकचा भुर्दंड. या मुलानापण अक्कल पाहिजे कि आपण दांडी मारतो म्हणजे आपण आपल्या आई वडिलाची दोन तीन दिवसाची कमाई वाया घालवतो. एक एक रुपया वाचवून पाल्याच्या भविष्यासाठी पैसे लावायचे आणि हे महाराज दांड्या मारून हजाराने उडवणार .
ज्यावेळी हे अर्थशास्त्र पालकांना कळेल त्यावेळी खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी शिक्षणाच्या बदलायला सुरुवात होईल .
कृपया शेअर करा ......
धन्यवाद .
या पूर्वीचे लेख आणि लेखमाला वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन .
९७६३७१४८६०
www.dolphinlabs.in

Tuesday, July 23, 2019

अभियांन्त्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग १. **** अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो ****

**** अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो ****
अभियांन्त्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग १.
आजची अभियांत्रिकी शिक्षणाला प्रवेश घेतलेली मुले हि खरच आहेत. या अभियांत्रिकी शिक्षणाला प्रवेश घेऊन अभियांत्रिकीची पदवी मिळवण्यासाठी कुणी कुणी काय दिव्य केल असेल हे सांगितल तर आजच्या या पिढीला कळणार पण नाही कदाचित विश्वास पण वाटणार नाही .
कित्येकाच्या बापांनी जमिनी गहाण टाकल्या,विकल्या. कित्येक आयांनी आपले अंगावर एक मणी ठेउन उरलेलं सगळ सोन मोडून टाकल , कित्येक बहिणींनी आपल्या भावाच्या शिक्षणासाठी स्वत:च्या शिक्षणाला मुरड घातली कधीकधी सासरचा मार खावून भावाच्या शिक्षणासाठी चोरून दागिने मोडले आणि त्याचबरोबर हे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्यानी पण ते शिक्षण घ्यायच्या साठी किती दिव्य केल असेल. कित्येकांनी दिवस रात्र मजुरी केली , कित्येकजण उपाशीपोटी , अर्धपोटी झोपली. यांच्या कथा सांगितल्या तरी त्यावर अफाट सिनेमे आणि कितीतरी मालिका होतील.
हे सगळ करत असताना त्यांचा एकच विश्वास होता कि केवळ हे शिक्षणच आपलं आयुष्य बदलणार आहे , हे शिक्षणच आपल्याला गरिबीतून बाहेर काढणार आहे , हे शिक्षणच आपल्याला मानसन्मान मिळवून देणार आहे. त्यामुळे या अभियांत्रिकी शिक्षणाला खूपच सन्मान होता. लोकांना त्त्याची किंमत होती. त्यामुळे हे शिक्षण घ्यायच्यासाठी खूपच ढोर मेहनत करायला लागते हे सर्वांनाच मान्य होत आणि ती मेहनत प्रत्येकजण घ्यायचा.
याउलट आजच चित्र . शिक्षण अगदी दारात आलंय , घरची परिस्थिती सुधारली आहे. मागितलेली वस्तूच नाव घ्या बाप लगेच आणून देतय, हे जेव्हा नजरेसमोर येत तेव्हा आजची हि पिढी खूपच भाग्यवान समजली पाहिजे. घराजवळच कॉलेज, कॉलेजमध्ये गेल्यानंतर लगेच मिळालेली गाडी , हातात अँड्रोइड फोन आणि बरंच .काही पालक म्हणजे अल्लाउद्दीनचा जीन झाले आहेत.
मग आज या अभियांत्रिकी शिक्षणाचं का हसं होतय? याला कारण एकच आहे कि पालकाकडे पैसे आले पण विद्यार्थ्याकडे मेहनत, जिद्द ,स्वप्न आणि विश्वास हे नाही. त्याच्या मनात या शिक्षणाचे महत्व राहिलेलं नाही. या शिक्षणाविषयी आदर राहिलेला नाही. पालक कराव म्हणून पोराला इंजिनियर करायला लागले आहे आणि पोर पण बाप घालतय म्हणून अभियांत्रिकी शिक्षण करत आहे. अभियांत्रिकी शिक्षण का घेतोय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना काय शिकायचं ? त्या विषयाच महत्व काय या विषयी विद्यार्थी आणि त्यांचे पालक बेफिकीर आहेत. केवळ हेच कारण आहे अभियांत्रिकी शिक्षण तळाला जायचं.
अभियांत्रिकी शिक्षण हि एक गुंतवणूक आहे हेच लोकांना कळत नाही .या गुंतवणूकीची जोपासना कशी करायची याची जाणीव नाही. ज्यावेळी व्यावसायीकरण होत त्यावेळी गुणवत्ता वाढीस लागते पण ती केव्हा? जर ग्राहक जागरूक असेल तर अन्यथा नाही. आपल्याकडे तसच झाल आहे . जर हा ग्राहक जागरूक झाला तर अभियांत्रिकी शिक्षणाला परत महत्व नक्कीच येईल हा मला विश्वास आहे.
त्यामुळे हि लेखमाला हि अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी नाही तर त्यांच्या पालकासाठी पण आहे. विद्यार्थी कुठल्याही महाविद्यालयात शिकत असु दे , आजकाल कुठलही अगदी गाव पातळीवरच जरी अभियांत्रिकी महाविद्यालय घेतलं तरी त्याच्यामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पुरेपूर सोयी असतात पण त्या विद्यार्थांनी व्यवस्थितपणे कशा वापराव्या आणि चार वर्षात कस वागावं , राहावं कस शिकाव या बद्दल या लेखमालिकेतून मार्गदर्शन केल जाईल . कधी मी कठोर शब्द वापरले आणि कुणाला राग आला तर केवळ मी हे अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रेमापोटी लिहित आहे हे समजून घ्या.
अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो हि प्रार्थना.
कृपया शेअर करा ......
धन्यवाद .
या पूर्वीची लेखमाला वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन .
९७६३७१४८६
www.dolphinlabs.in

Monday, February 25, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग 35 )

*** शिक्षण संस्थाची समाजाशी तुटलेली नाळ ***
तुम्हाला एक वर्षाची करायची तजवीज करायची असेल तर बी पेरा, दहा वर्षाची करायची असेल तर पैसे पेरा आणि कायम स्वरुपाची करायची असेल तर माणसे पेरा – अनामिक लेखक.
जानेवारी महिना सुरु झाला कि सगळी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्र निकेतनं खडबडून जागी होतात. सर्वाना वेध लागतात अॅडमिशनचे. मग काय नवनवीन कल्पनांना ऊत येतो . कुणी मेळावे घेतो, कुणी शिबिरे घेतो, कुणी स्पर्धा घेतो तर कुणी कसली कसली ऑलिम्पियाड घेतो. या सर्वामागे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयाची जाहिरात करणे हाच हेतू असतो. मग यासाठी वेगवेगळे क्लास , शिक्षण संस्था यांना हाताशी धरले जाते . क्लास वाले , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्था पण आता हुशार झाले आहेत . वाहणाऱ्या गंगेत हात कसा धुवुन घ्यायचा हे त्यांना पण कळल आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि महाविद्यालयात असणाऱ्या शिक्षकाविषयी असणारा त्यांच्या मनातील आदर कमी झाला आहे . यामध्येपण सेटिंग, कमिशन वगैरेसारख्या गोष्टी आता यायला लागल्या आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयांची आणि तंत्र निकेतनांची संख्या वाढली आहे त्यामुळे या गोष्टी आता नाकारता येत नाहीत. पण एक नवीन आणि चुकीचा पायंडा पडत चालला आहे जो घातक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे म्हणून त्यांचेपुढे जे चित्र रंगवले जाते किंवा त्यांचेपुढे जे वायदे केले जातात त्यावर भुलून जे अॅडमिशन घेतात त्यांचा नंतर अनुभव चांगला नसतो. यामुळे काही महाविद्यालयांना ज्या ठिकाणाहून अॅडमिशन झाली होती त्या भागात परत तोंड दाखवता येत नाही .
अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतन मालकीची असणाऱ्या बऱ्याच शिक्षण संस्थांची माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालयेपण आहेत . पण हि विद्यालयात शिकणारी मुले संस्थेच्याच तंत्रनिकेतन मध्ये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश करत नसतील तर त्या संस्थेच कुठेतरी नक्कीच चुकत आहे . सातारामधील एका बलाढ्य अशा शिक्षण संस्थेला त्यांच्या तंत्रनिकेतनला किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुरेसे विद्यार्थी मिळत नसतील आणि त्यांना जण विद्यार्थी मिळवण्यासाठी भटकायला लागत असेल तर परिस्थिती खरीच विचार करण्यासारखी आहे. त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे जर संस्थेच्याच तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी जर संस्थेच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात येत नाहीत याचा अर्थ काय काढायचा हे प्रत्येकांनी ठरवलं पाहिजे.
आपला विद्यार्थी हीच मोठी जाहिरात आहे हेच सगळे जण विसरून गेले आहेत . विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याचं सामाजिक भान जागृत करून त्यांना समाजाशी जोडणं हेही महत्वाचं आहे याची जाणीव कुणालाही नाही . जर या विद्यार्थ्यांना समाजाशी जोडत गेलो तरच एक अखंड साखळी तयार होईल आणि त्या महाविद्यालयाची समाजात किंमत वाढेल हे सोपं गणित आहे. पंचवीस वर्षापेक्षाही जास्त अनुभव असणाऱ्या महाविद्यालयांची अवस्था हि आज खूपच वाईट आहे. त्यांचा अभ्यास केला तर असे दिसून येईल कि मध्यंतरीच्या काळात ते समाजापासून तुटले गेलेले आहेत.
आता परत महाविद्यालयांनी विचार केला पाहिजे आणि आहेत त्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून असे कार्यक्रम राबवले पाहिजे कि ज्यामध्ये समाजाचा फायदा होईल . एक निरंतन अशी ज्ञानदानाची प्रक्रिया राबवली पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यामध्ये त्या महाविद्यालयाची छाप पडली पाहिजे. कुठ रक्तदान शिबिरे घेणे, वाहतूक नियंत्रण करणे हि कामे महाविद्यालयाच्या जाहिरातीसाठी करणेपेक्षा शेती, शिक्षण, संरक्षण आणि आरोग्य यासाठी उपयोगी अस कमीत कमी खर्चाच्या तंत्रज्ञान निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण संस्थांनी आता समाजाशी जुळवून घेतलं पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०