Sunday, March 15, 2020

अर्जुन आठवावा , अर्जुन साठवावा , मनी बाळगावा , सदा चिंतावा .....

आयुष्यात कधीतरी बिकट अवस्था येते. सगळ काही असून नसल्यासारखं होत . नोकरी जाते , व्यवसायात मार बसतो, नातेवाईक दुरावतात, ज्यांची लायकी नाही अशांचे पाय धरायची वेळ येते. मन अगदी खचून जात . काय करावं हेच कळत नाही अशावेळी मी एकच गोष्ट करतो. डोळे मिटतो आणि अर्जुनाचा वनवासाचा काळ आठवतो. मनाला खूपच धीर येतो. आज मी आजूबाजूला जेव्हा पाहतो तेव्हा अभियांत्रिकी शिक्षणाला आलेल्या मंदीमुळे सैरभैर झालेले शिक्षक मित्र पाहतो , नोकऱ्या नसल्यामुळे फिरणारे विद्यार्थी पाहतो त्यावेळी खुपच वाईट वाटत. म्हणून महाभारतातील एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट ज्यावर जास्त कोण बोलत नाही आणि जी मला नित्य प्रेरणा देते ती सांगतो.
युधिष्टिर द्यूतात हारलेमुळे पांडवांना वनवास भोगावा लागला. पांडव वनवासात असतानाच्या काळाचा विचार केला तर असं दिसून येत कि वनवासात असताना अर्जुन टिवल्या बावल्या करत बसला नाही. त्याच्या भावाच्यामुळे हि परिस्थिती आली म्हणून तो त्याला दुषणे देत बसला नाही किंवा दैवाला दोष देत रडत किंवा कुढत बसला नाही . सार संपल म्हणून रडत बसला नाही . या वनवासाच्या काळात त्याने स्वत:ला सतत काहीतरी शिकण्यात गुंतवून ठेवले. . नित्य नवीन साधना करीत राहिला. स्वत:च्या कौशल्यात तो नित्य वाढ करत राहिला. या काळात तो त्याचे वडील इंद्र याच्याकडून शस्त्रविद्या शिकला त्यांच्याकडून त्याने वज्र मिळवले , ब्रहस्पती ऋषीकडून त्याने युध्दशास्त्राचे धडे त्याने गिरवले. शिवाकडून त्याने पाशुपती अस्त्र शिकून घेतले. त्याने कुबेर, यम आणि वरूण यांना त्याने प्रसन्न करून घेतले आणि त्यांचेकडून त्यांची अस्त्रे मिळवली. चित्रसेन गन्धर्व जो संगीत आणि नृत्यात निपुण होता त्याचेकडून तो नाच सुद्धा शिकला.
अज्ञातवासाचा एक वर्षाचा काळ अर्जुनासाठीचा सर्वात दु:खद होता , त्याची सर्वात कठिण आणि कठोर मानसिक परीक्षा परीक्षा बघणारा होता. विचार करा, हा अर्जुन जो देवांच्या राजाचा मुलगा ,साक्षात भगवान कृष्णाचा अतिशय जिवलग मित्र. ज्याच्या धनुष्याच्या केवळ टणत्काराने शत्रूचे धाबे दणाणले जायचे. ज्याला पूर्ण पुरुष मानले जायचे अशा अर्जुनाला स्वत:ची ओळख लपवून साडी नेसून , केसं वाढवून , हातात काकणे घालून , राजकुमारी उत्तरेला नाच शिकावण्यासाठी ब्रहन्नडा बनून रहायला लागले. अशा या अवस्थेत ज्या ज्या वेळी त्याच्या पुढे द्रौपदी येत असणार त्या त्या वेळी त्याच्या मनाला काय यातना होत याची कल्पना सुद्धा करवत नाही. विराट पुत्राच्या बढाया ऐकताना आणि त्याच्याकडून अपमान होत असताना त्याला काय वाटले असेल? आयुष्य संपवून टाकावे अशी इच्छा त्याच्याही मनात त्यावेळी कित्येक वेळा आली असेल.
कसे काढले असतील त्याने ते दिवस? तेही त्याची काहीही चूक नसताना. कधी याचा विचार केला का ? पण अर्जुनाने सगळे भोगले कारण त्याचा स्वत:वर विश्वास होता. स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास होता.त्याला माहित होते हे वनवासाचे दिवस पाहता पाहता संपतील आणि परत त्याला संधी मिळणार आहे. त्याला त्याच्या धनुष्यावर विश्वास होता . त्यामुळे तो वनवासाच्या दिवसात सुद्धा भावी लढाईची तयारी करत होता. आणि पुढचा इतिहास सर्वाना ज्ञातच आहे.
मित्रानो, सध्या अभियांत्रिकी शिक्षणावर हि जी ओढवून घेतलेली मंदी आलेली आहे.( हि ओढवून घेतलेली मंदी म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी माझा यापूर्वीचा अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील मंदी हा लेख वाचावा) त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी घडायला लागल्या आहेत. अशावेळी मन स्थिर ठेवण्याची गरज आहे. कुणालाही दुषणे न देता स्वत:ला आणि विद्यार्थ्यांना घडवणेसाठी झोकून द्यायला हवं आहे . बऱ्याच शाखांना विद्यार्थी संख्या खूपच कमी झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा तणाव निर्माण होत आहे. त्यांचेपुढेही मंदीचे भूत नाचू लागले आहे. त्यामुळे त्यांनाही मानसिक आधार देण्याची खूपच गरज आहे. हि मंदी आहे हि कौशल्य कमी झालेमुळेची आहे. त्यामुळे रोज वेळ काढून नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हि वेळ काही अजून जास्त राहणार नाही . पण पुढच्या येणाऱ्या काळासाठी स्वत:ला तयार केल पाहिजे. अंधारानंतर परत पहाट हि होतच असते हे विसरून चालणार नाही .
म्हणून म्हणतो ....
अर्जुन आठवावा , अर्जुन साठवावा ,
मनी बाळगावा , सदा चिंतावा ......
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
www.dolphinlabs.in
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment