Sunday, October 21, 2018

अभियांत्रिकी शिक्षण – दशा आणि दिशा ( भाग ६ )


**** रेडीमेड प्रोजेक्ट : अभियांत्रिकीला शिक्षणाला  लागलेला कर्करोग ****

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी करायची  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  प्रोजेक्ट. आतापर्यंत जे शिकले त्या ज्ञानाची खरी परीक्षा. हा प्रोजेक्ट स्वतः  करावं हे अपेक्षित असत पण थेअरीकडे जास्त लक्ष दिलेमुळे  प्रॅक्टिकलकडे दुर्लक्ष्य होते . त्यामुळे मिनी प्रोजेक्ट करतानाच  फे फे उडते ,मग  हा मेगा  प्रोजेक्ट करायचं म्हणजे पोटात भीतीचा गोळा येतो .त्यामुळे  हे  प्रोजेक्ट विकत घ्यायचं ठरतं आणि इंजिनियरिंगची तीन वर्षाची मेहनत आणि पैसे पाण्यात गेल्यातच जमा होते.
तीन वर्षात जवळजवळ प्रत्येकी सहा लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या चार पोरांच्या गटाने मिळून एक प्रोजेक्ट करायचा असतो म्हणजेच जवळजवळ चोवीस लाख रुपये खर्च करून  तयार केलेला गट जर वीस बावीस हजार रुपये घालुन जर प्रोजेक्ट विकत घेत असेल तर सगळे पैसे आणि मेहनत वाया गेलेसारखीच गोष्ट आहे
आम्ही गेली दोन वर्षे सर्वेक्षण केले आणि त्यातून निघालेले निष्कर्ष हे धक्कादायक आहेत.पुण्यामध्ये जर कात्रज हा केंद्रबिंदू मानून जर तीन किलोमीटरचे वर्तुळ काढले तर या वर्तुळात जवळजवळ १३२ प्रोजेक्ट विकणारे आहेत्त.  गेल्यावर्षी हा आकडा ८७ होता . जवळजवळ ४० ते ५० कोटी रुपयाचा व्यवसाय या एव्हढ्या भागात होतो. हे कशाचं द्योतक आहे?
कुठल्याही अभियांत्रिकी विद्यालयाच्या बाहेर जा, दहा ते बारा प्रोजेक्ट विक्याचे बोर्ड लागलेले असतात.काही प्रोजेक्टविक्यांची तर हिम्मत इतकी वाढलेली आहे  ते सरळ महाविद्यालयाच्या आत जाहिरात लावतात आणि काही तर प्रोजेक्ट लिस्ट तिच्या किमतीसह प्राचार्यांच्या नावे पाठवतात . किती मोठी शोकांतिका आहे?  यातील काही  प्रोजेक्ट विके महाविद्यालयात येउन फुकट गेस्ट लेक्चर घेतात किंवा अतिशय कमी दरात कार्यशाळा घेतात, वेगवेगळ्या कार्यक्रमाना प्रायोजकत्व देत असतात. या लोकांनीच  इंजिनियरिंगच्या दोन दिवसाच्या कार्यशाळेची फी मल्टीप्लेक्सच्या दोन तासाच्या  सिनेमाच्या तिकीटापेक्षा कमी करून ठेवली आहे .
यातील काही प्रोजेक्ट विके  त्या महाविद्यालायाचेच धडपडे विद्यार्थी असतात आणि त्यांचेविषयी शिक्षकांना आनंद वाटतो .त्यांना वाटत कि आपल्या विद्यार्थ्यांनी स्टार्ट अप केलाय यांना आपण मदत करू . पण ह्या विद्यार्थ्यांना मदत करून आपणच  आपल्या स्वतःच्या भविष्याला खड्ड्यात ढकलतो हे त्या बिचाऱ्यानाही कळत नाही .
बऱ्याच महाविद्यालयात शिक्षक हे प्रोजेक्ट साठी IEEE सारख्या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांचा वापर करायला सांगतात. प्रोजेक्ट संकल्पना  मागताना त्याबरोबर IEEE तीन तीन पेपर मागतात .पण त्या महाविद्यालयात ते पेपर डाऊनलोड करायची सोय नसते ,काय करायचं पोरांनी तरी?
काही मुलांना त्याची प्रात्याक्षिके व्यवस्थित करता येत नाहीत , मुलांची बौद्धिक कुवत काय आहे हे शिक्षकांना  पक्के माहित असतानासुद्धा त्यांचेकडून नाविन्यपूर्ण अशा प्रकल्पाची अपेक्षा करणे हे सुद्धा चुकीचे आहे. इतकी जर त्याची बुद्धिमत्ता असती तर ते आपल्या महाविद्यालयात आलेच कशासाठी  असते याचा विचार केला जातच नाही . यांचा आवाका ध्यानात न घेता त्यांना नवीन आयडिया साठी परत परत पाठवले जाते .
जर महाविद्यालय जुने असेल तर त्या विद्यार्थ्यांची वाटच लागते  आणेल तो प्रोजेक्ट एक तर झालाय किंवा यात काय नवीन अस म्हणून त्यांना परत पाठवलं जात. असं दोन महिने तंगवल्यावर शेवटी ते आणतील तो गप्प स्वीकार केल्याशिवाय पर्याय राहात नाही आणि त्या विद्यार्थ्याना त्यांच्या सिनियरनी याचा कानमंत्रच दिलेला असतो  त्यामुळे काही विद्यार्थी तर अगदी प्रीलीयाम सुरु होनेपुर्वीच मार्गदर्शकाची गाठ घेतात मग अगदी झक मारत त्यांनी आणलेल्या प्रोजेक्टला स्वीकारायला लागते .
काहींही झालं तरी प्रोजेक्टला मार्क किमान ९० टक्के द्यायचे असा फतवा काढलेला असतो त्यामुळे त्या मुलानी केलेला  सारा त्रास पोटात घालुन चांगले मार्क दिले जातात आणि केवळ या मार्कांच्या जीवावर टुकार मधल्या टुकार पोरालाही शेवटच्या वर्षी फर्स्ट क्लास मिळतो. आणि मग काय ? काहीही केलं तरी आपल कुणीही काहीही वाकड करू शकत नाही  हा संदेश त्यांच्याकडून त्यांचे
ज्यूनियरमध्ये पसरला जातो. मग वर्षभर प्रोजेक्ट करणेसाठी घासणाऱ्या मुलांच्यात आणि काहीही येत नाही पण विकत आणलेल्या मुलांच्या प्रोजेक्टसाठीच्या मार्कामध्ये दहा किंवा जास्तीत जास्त पंधरा मार्कांचा फरक असतो. मग स्वतः प्रोजेक्ट का करायचा? असा चुकीचा संदेश पसरला जातो.
बऱ्याचशा महाविद्यालयात प्रोजेक्ट लॅब असते पण या प्रोजेक्ट लॅब मध्ये काय करायचं हेच माहिती नसतं . चार टेबल आणि स्टूल ठेवली कि झाली प्रोजेक्ट लॅब.  प्रोजेक्ट करण्यासाठी एक दिवसाची सुट्टी पण असते मग या लॅब्सचा उद्देश काय हेच कळत नाही. फक्त एका लॅब्सच्या नावाची भर. बऱ्याच महाविद्यालयात सिम्युलेशनची सोफ्टवेअर नसतात पण प्रोजेक्टच सिम्युलेशन मागितलं जात आणि हे सिम्युलेशन सोफ्टवेअर पण शिकवलेलं नसतं आणि त्याविषयी शिक्षकानाही  माहिती नसते .
ज्या मुलांची प्लेसमेंट झालेली असते त्यांना प्रोजेक्टमध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. बरीच मुले गेट आणि GRE सारख्या परीक्षा करत असतात . बऱ्याच जणांना शेवटच्या वर्षाचा आनंद घ्यायचा असतो आणि अशा लोकांची संख्याच सध्या जास्त आहे. मग काय प्रोजेक्ट विकत घ्यायला उत येतो.
प्रत्येक विद्यालयात एखादा तरी शिक्षक असा  असतो कि त्याला असे वाटत असते कि मुलांनी त्यांचे प्रोजेक्ट स्वतः करावेत आणि मुलांना सर्व शिकवायचीसुद्धा त्याची  तयारी असते पण अशा शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून घेणे हे त्या महाविद्यालयातील हुशार मुलानासुद्धा कटकट वाटते. त्याचेकडे कुणीही जातच नाही . सर्वसाधारणपणे कमीत कमी त्रास देणारे,जास्त मार्क्स देणारे , काहीही न येणारे  आणि गोड बोलणारे मार्गदर्शक यांना प्रथम पसंती दिली जाते. त्यामुळे ज्या मुलांना मार्गदर्शक उरलेला  नाही  आणि आत्ता काहीच  पर्याय नाही अशी मुले नाईलाजाने या शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून निवडलतात किंवा त्यांचेवर लादले जातात. आणि असल्या टुकार मुलांना दोन तीन वर्षे  मार्गदर्शन केल्यावर त्या शिक्षकाचाही उत्साह मावळतो.
आजकाल तयार प्रोजेक्ट तर विकत घ्यायचं   सोडाच तर प्रोजेक्ट भाड्याने मिळण्याची सुद्धा सोय बऱ्याच ठिकाणी आहे . एकच प्रोजेक्ट तीनचार विद्यालयात फिरवला जातो आणि जर दोन वेगळ्या विद्यालयातील ग्रुपची प्रोजेक्ट एक्झामची  तारीख एकच पडली तर मग काय जी  धमालच उडते यावर एक सिनेमा आरामात होईल.
जर एका  मार्कासाठीसुद्धा परीक्षेत नेलेली चिट्ठी हि गुन्हा असेल तर  सहाशे मार्कासाठी विकत नेलेला प्रोजेक्ट हा सामुहिक गुन्हाच नाही का ? आणि हा गुन्ह्याकडे जाणूनबुजून केलेले दूर्लक्ष म्हणजे या गुन्ह्यात घेतलेला सहभागच नाही का ?
ह्या विषयावर जेव्हड लिहील तितक कमीच आहे . अभियांत्रिकी शिक्षणाचा जर दर्जा सुधारायचा असेल तर हा कर्करोग 
मुळापासून काढून टाकायला हवा. पण हा इतका पसरला आहे कि त्यासाठी प्रबळ अशी इच्छाशक्ती पाहिजे .
तुमची मते ऐकायला मला नक्कीच आवडेल.

चित्तरंजन महाजन .
डॉल्फिन लॅब्स,पुणे .
९७६३७१४८६०
आवडलं असेलच शेअर करा.

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा ( भाग 5 )


अभियांत्रिकी शिक्षण : दशा आणि दिशा ( भाग 5)

साधारण 1997-98 ची गोष्ट असेल. त्यावेळी दर बुधवारी टाइम्स ऑफ इंडिया मधील आसेन्ट या जॉब पुरवणीमध्ये सध्या मार्केटला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर साठी जॉब कुठं आहेत ते वाचायचो. बऱ्यापैकी जॉब हे पुण्यातील कंपन्या मध्ये असायचे पण खाली नोट लिहिलेली असायची की पुणे विद्यापीठाशिवाय इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी apply करू नये.खूपच टेंशन यायचं आम्हाला.
पुणे विद्यापीठाचा दराराच तसा होता. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयात प्रवेश मिळवणे म्हणजे गुलबकावलीचे फुल मिळवायसारखे अवघड असायचं. त्यात पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम म्हणजे  इतका अवघड असायचा की हायर  सेकंड क्लास मिळाला तरी पुरे असा असायचा. फर्स्ट क्लास म्हणजे सोनेपे सुहागा...
पण आज काय अवस्था आहे?  पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी हा फक्त आय टी मधील प्लेसमेंटसाठीच योग्य आहे कोअरसाठी तो चालतच नाही. त्यामूळे कोअर व्यवसाय पण ढासळत चालले आहेत.
ही अशी का अवस्था आली? 
2002 चा किस्सा सांगतो त्यावेळी मी बेंगलोरला होतो आणि एका होस्टेल मध्ये राहत होतो.तिथे बरेच एंजिनियरिंगचे विद्यार्थी राहत असत. त्यावेळी आम्हाला एक लक्षात आले की तिथं इंजिनीअरिंगला आरामात 90 टक्के मिळतात आणि परीक्षेच्या आधी अभ्यासासाठी जवळजवळ महिना स्टडी लिव्ह मिळते.
खरच रडू आलं मनातल्या मनात.
मार्कांचा फुगवटा आणण्याचं खर मोठं पाप हे दक्षिणेकडच्या विद्यापीठांनी केलं.
या फुगवट्या पुढं आपली विद्यार्थी कमी पडू लागले मग 2008 - 09 पासून आपल्याकडेपण मार्कांची खिरापत वाटायला सुरुवात झाली. बाजारात मागणी वाढली होती त्यामुळे मुलाना प्लेसमेंट मिळू लागल्या पुणे विद्यापीठाचा पॅटर्न इतर विद्यापीठाणी उचलायला सुरुवात केली.  मागणी इतकी वाढली होती की मुलांना खरंच काय येत यापेक्षा मार्क किती आहेत ते पहायला सुरुवात झाली अर्थात तो पहिला criteria होता आणि त्यामध्ये आपल्या कॉलेजमधील जास्तीत जास्त विद्यार्थी कसे राहतील यासाठी हातामधील मार्क्स हे अक्षरशः उधळायला सुरुवात झाली.प्रात्यक्षिक परीक्षेत काहीही येऊ किंवा न येवो भरमसाठ मार्क वाटायचा सपाटा सुरू झाला. प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करायचं नाही असा फतवा प्रत्यक्ष संस्थापकाकडून येऊ लागले. मग काय नापास करत नाहीत तर प्रात्यक्षिक कशाला करायची असा मुलांच्यात कल वाढू लागला आणि उगीच आपण काही करून कशाला वाईटपणा घ्यावा असं स्टाफ विचार करू लागला.आणि अशारितीने अभियांत्रिकी शिक्षणाचे बुरुज ढासलायला सुरवात झाली. पण बाजार जोरात होता आणि बाजारात सुबत्ता आली होती .
ज्यावेळी सुबत्ता येते तेव्हा आळस, बेफिकिरी आणि तडजोड या गोष्टी माणसामध्ये प्रवेश करतात. सुखाची रेलेचेल असल्यावर आपोआपच आळस अंगात येतो. अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी होते, आजचा दिवस तर व्यवस्थित गेला मग उद्याचं उद्या बघु अशी बेफिकिरी वाढीस लागते. पुढे कष्ट करायची इच्छा कमी होते मग तडजोडीला सुरुवात होते. शेवटी एक दिवस असा येतो कि तडजोडीनेही प्रश्न सुटत नाही मग आपण जागे होतो .आता आपल्याजवळ कामाचे कौशल्य राहिलेले नसते आणि मधल्या वेळेत जग पुढे गेलेले असते आता सुरु होते धावाधाव, ताणतणाव आणि वैताग.
अशातुन सुटका करायचे तर अंगी येते चापलुसी आणि कागदी घोडे नाचवणेची प्रवृत्ती, खोटेपणा आणि लांडी लबाडी. हळुहळू या खोटेपणा, चमचेगिरी  याला प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होते. हि प्रतिष्ठा अधिकृत करणेसाठी कागदपत्रे तयार केली जातात. रोज नवीन कागदे, नवीन नियम तयार करणेसाठी माणसांच्या झुंडी कामाला लागतात. कागदाला महत्व येते. कागदासाठी कागद ,कागदासाठी कागद. कागद जमायला लागतात, रद्दी वाढायला लागते. आता वेळ निघून गेलेली असते. हाती फक्त कागद उरतात. कौशल्याची किंमत कमी होते आणि कागद किती आहे ते पाहिले जाते. त्यामुळे आता फक्त कागदावरचे वाघ बनतात  आणि हे वाघ इतरांना कागदाची भीती घालण्यात आयुष्य घालवतात. 
आजच अभियांत्रिकी शिक्षण या वाघांच्या तावडीत सापडले आहे आणि ते सोडवलं पाहिजे.


चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा (भाग 4)



बरेच जण विचारत आहेत की ही अभियांत्रिकी शिक्षण सुधारण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत आणि त्यासाठी काय खर्च करावा लागेल ?
मित्रानो उत्तर खूप सोपं आहे, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची  अवस्था ही बाळासारखी झाली आहे.
आजकाल आपल्या बाळाला पटकन कुणी जवळ घेत नाही त्याच लाड करत नाही याचं मूळ कारण शोधून त्यावर उपाय केला पाहिजे.
झालंय अस की मधल्या काळात बाळाचं खूपच कोडकौतुक झालंय. त्या नादात त्याला पौष्टिक खायला घालायचं  आणि  मैदानावर खेळायला लावायचं विसरलो आहे. मुलखाच्या महाग कडबऱ्या आणि टुकार चिलिमिली सारखं सत्वहीन खान त्याला घातलं आहे .बाळ गुटगुटीत दिसण्यासाठी  पोषणमुल्य असणार जेवणाऐवजी त्याला डायरेक्ट वेगवेगळी  टॉनिक ,च्यवनप्राश यांचा मारा केला आहे तो इतका झाला आहे की त्याची पचनशक्ती कमी झाली आहे . त्याला भरपुर सूर्यप्रकाशात खेळण्याऐवजी बसल्याजागी व्हिडीओ गेम सारखे बैठे खेळ खेळायची सवय त्याला लागली आहे .पोटात काहीही नाही, त्याला चार घास घातले पाहिजेत. इतके दिवस त्याला कष्ट नको म्हणून त्याला डायरेक्ट सलाईनन अन्न पुरवठा सुरू केला होता तो बंद केला पाहिजे. 
 महत्त्वाच म्हणजे बाळ रोगट आणि कमकुवत झालं आहे हे स्वीकारा म्हणजे त्यावर उपाय करण सोपं होईल. इतके दिवस फिट असलेची सर्टिफिकेट देत होता ती आता चालणार नाहीत, परदेशी वैद्य चालणार नाहीत. उगीच मोठे महागडे डोस त्याला पेलवणार नाहीत.सगळयात पहिल्यादा त्याला बाहेर आणा त्याला स्वछ हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळुदे. तो सदृढ दिसावा म्हणून त्याच्या अंगावर बांधलेले शोभिवंत आणि गुबगुबीत आवरणे काढून टाका त्याचच  त्याला खूप ओझं झालं आहे .त्याच्याशी प्रेमानं बोला, त्याच्या पाठीवरून हात फिरवा.फारच घाबरला आहे ते.त्याच्याशी गप्पा मारून त्याची हिम्मत आणि आत्मविश्वास वाढवा. ते लगेच उभा राहून पळायला सुरुवात करील याची अपेक्षा  मनी बाळगू नका. सकस अन्नाचा डोस त्याला लगेच पचणार नाही म्हणून भांबावून जाऊ नका . हळूहळू प्रयत्न करून आपण या बाळाला परत निरोगी आणि सदृढ करू शकतो.एकदा हा सदृढ झाला की त्याची वाट तोच चालेल...तो नवीन वाटाही बनविल....यशाची उत्तुंग शिखरे त्याला खुणावू लागतील आणि तो तिकडे स्वतः ही जाईल आणि सोबत अनेकांना घेऊन जाईल. 


चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग 3)

 *** सडणारी बुद्धीमत्ता आणि नासणारी स्वप्ने  ***
सध्याच्या अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीचा  सगळ्यात मोठा दुष्पपरिणाम म्हणजे  मुलांची बुद्धी सडत आहे कारण बुद्धी विकासाच्या  वाचन ,चिंतJन, मंथन या ज्या पायऱ्या आहेत त्याच या शिक्षण पद्धतीने काढून टाकल्या आहेत आता केवळ जमलं तितकं वाचन आणि कुंथण या दोनच पायऱ्या आहेत. एका नावाजलेल्या विद्यापीठाने चालू केलेल्या ऑनलाइन objective प्रकारच्या अभिनव परीक्षा पद्धतीबद्दल तर काही बोलायलाच नको. या पद्धतीत तर चिंतन ,मनन याला फाटाच दिला आहे.
पक्का अभियंता घडणेसाठी त्याची अभ्यासाची पध्द्त ही      फुलपाखरांच्या सारखी असावी. फुलपाखरू जेव्हा अंड्यातून बाहेर येते तेव्हा त्याची सुरवंटा अवस्था असते या अवस्थेत ते खूपच खादाड असते खाण, खाणं आणि फक्त खाणं एव्हडाच त्याचा उदयोग असतो नंतर ते कोषावस्थेत जाते,बराच काळ ते कोषावस्थेत असते आणि एक दिवस ते कोषावस्थेतुन निघते आणि आपले रंगबिरंगी पंख फडकवत फिरू लागते.
त्याच प्रमाणे अभियंता हा ज्ञान पिपासू पाहिजे मिळालेल्या ज्ञानाचे त्याने चिंतन केलं पाहिजे आणि त्या चिंतनातून मिळालेले सार हे त्याला मिरवता आले पाहिजे.
आपल्याकडे वरील गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं निव्वल पुस्तकी ज्ञानावरच्या पदव्या या मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करू शकत नाहीत , आणि त्यांचे मनात शिक्षणाविषयी काहीही किंमत उरत नाही आणि एक प्रकारे चार पैशाच्या फायद्यासाठी एक मेंदू सडला जातो.
यापेक्षाही वाईट गोष्ट आहे ती म्हणजे त्या मुलांच्या पालकांची होणारी तगमग. आयुष्य शेतात xxxपर्यंत माती जाऊपर्यंत काम करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांकरी बांधवांची, आयुष्य खडतर गेलं पोरांच्या वाट्याला अस आयुष्य येऊ नये असा विचार करणाऱ्या अनेक पालकांची, पोराच्या शिक्षणासाठी शेताचा तुकडा विकणाऱ्या पालकांची, आयुष्य कचऱ्यागत गेलं आता पोरगं शिकून काहीतरी पांग फेडल अशा अनेक पालकांची स्वप्ने आता नासायला सुरुवात झाली आहे.
इंजिनिअरिंग म्हणजे आता विनोदास्पद गोष्ट झाली आहे. आधीच आपला अभ्यासक्रम हा दहा वर्षे मागं आहे असे बोंबलून उदयोग क्षेत्र सांगत आहे आता वेळीच जर यावर विचार नाही केला तर अजून दहा वर्षे मागे फेकले जाण्याचा धोका आहे.
आता प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयापुढे मुलांच्या ऍडमिशन ची खूपच मोठी समस्या उभी राहिली आहे. वाढलेली महाविद्यालयाची संख्या, बाजारातील कमी झालेली मागणी आणि यामुळे हुशार मुलांचा या शाखेकडील कमी होणारा कल यामुळे आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कॉलेज जगवण्यासाठी अक्षरशः बाबा पुता करून आणलेली मुले ...याना या शिक्षणात रसही नाही आणि त्यांचा तो वकुबही नाही अशा मुलाचा केलेला भरणा, मग त्या मुलांना पास करण्यासाठी करावी लागणारी केविलवाणी धडपड, त्यांच्यासाठी कमी करावे लागणारे अभ्यासक्रमातील आणि परीक्षेतील काठिण्य आणि त्यामुळे मुलांच्या गुणवत्तेत परत होणारी घट हे असं एक नवीनच दुष्टचक्र सुरू झालं आहे. One night इंजिनिअर ही नवीन संकल्पना आता उदयास आलेली आहे. मागील दोन परीक्षांचे पेपरचा जरी अभ्यास केला तरी स्कोअरिंग होईल अशी निघणारी प्रश्नपत्रिका ही कशाची द्योतक आहे? मग एव्हढ करायचं तर डायरेक्ट पदवीच हातात द्यायची.... अरे काय चाललंय काय? हे बदलता नाही का येणार ? आता केवळ पालकांचंच नांही तर या देशाच महासत्ता बनण्याचं स्वप्नच आता नासायला लागल आहे.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग -1)

सध्या अभियांत्रिकी विद्यालयाची अवस्था खूपच गंभीर होत चालली आहे. अचानकपणे अभियांत्रिकी शिक्षणाला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामुळे आलेल्या सुगीत हात धुवून घेण्यासाठी वाढलेली महाविद्यालयांची संख्या, त्यामध्ये गुणवत्ता न राखल्याने आता मोठा प्रश्न बनून उभी ठाकली आहेत.
बाजारात मागणी नसल्याने झपाट्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कमी होणारा कल यामुळे आता अनेक महाविद्यालये बंद पडत आहे आणि बऱ्याच महाविद्यालयात आता पटसंख्या कमी करून घेतली जात आहे.
अभियांत्रिकी विद्यालय बंद पडणे अजूनही आपल्याकडे गांभीर्याने घेतला जात नाही कारण आपल्याकडे लोकांना अस वाटत की ह्यामुळे फक्त संस्थापक आणि त्याचे शिक्षक यांचेपूरताच हा प्रश्न आहे  त्याचा आपल्याला काय फरक पडणार आहे असं जनतेला वाटतं पण खरंच या प्रश्नांची व्याप्ती इतकीच आहे का?
हा प्रश्न फक्त वर उल्लेख केलेल्या बाबीपुरता मर्यादित नाही तर सर्वसामान्य लोकावरही त्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. एक अभियांत्रिकी विद्यालयांमुळे आसपासच्या किमान दहा गावातील अर्थव्यवस्था बदलत असते . अनेक छोटे मोठे उद्योग त्यावर अवलंबुन असतात , शेकडो लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे कामधंदा मिळतो . ही अभियांत्रिकी विद्यालये म्हणजे एक प्रकारची अर्थव्यवस्थेतील चक्र आहेत. आणि आता ह्या चाकांची गती कमी होत आहे आणि काही ठिकाणी तर ही चाकं बंद पडली आहेत. याचे दुष्परिणाम  आता बऱ्याच ठिकाणी दिसायला लागले आहेत.

सगळ्यात मोठा धोका तर अभियांत्रिकी शिक्षणावरून लोकांचा उडणारा विश्वास हा अतिशय घातक आहे. व्हाट्स अप आणि मोबाइल घुसून  फालतू विषयात गुंग झालेल्या बथ्थड डोक्याना या विषयावर बोलायला वेळच नाही किंबहुना हा विषय समजून घेण्याची कुवतही नाही.  पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या विषयाकडे कमी होणारा कल हा आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाला किमान 25 वर्ष मागे घेऊन जाणार आहे.

विद्यार्थी संख्या घटलेने संस्थापक पगार देऊ शकत नाहीत , त्यामुळे राज्यात  बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची आंदोलन होत आहेत,  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत . गावोगावी अभियंते पडून आहेत त्यांचं आणि त्यांच्या बुद्धी च व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न  आहे. बऱ्याच ठिकाणी बांधलेल्या इमारतीच्या लाईटचे बिल भरण्याचीही कुवत संस्थापकाना राहिलेली नाही किंबहुना या अवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चरच करायचं काय ह्याच कोडं पडलं आहे काही ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा विचार चालू केला आहे आणि काही ठिकाणी सुरू झाल्याची आहेत.

आता याप्रश्नामध्ये सरकारही हतबल झालं आहे कारण या प्रश्नांची व्याप्ती खूपच वाढली आहे आणि गेल्या काही वर्षात अभियांत्रिकी शिक्षणात गुणवत्ता वाढवण्याचे केलेले प्रयत्न हे केवळ आणि केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या वृत्तीमुळे वाया गेलेले आहेत.
आता करत असणारे उपाययोजना ह्या दूरगामी विचार न करता तात्पुरत्या उपचारासाठीचे आहेत त्यामुळे त्याचे फायदे न दिसता तोटेच दिसत आहे....खरं सांगायच तर आपल्याकडे कुठलीही योजना तयार करताना प्लॅन B हा तयार पाहिजे पण तो तयार केला जात नाही.
या प्रश्नाचा तिढा तसा खूपच मोठा आहे आणि तो सुटावा यासाठी काय करता येईल यासाठी डॉल्फिन लॅब्स प्रयत्नशील आहे. अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातील आणि उद्योग क्षेत्रातील बरीच मंडळींचा सहवास डॉल्फिन लॅब्समध्ये मिळत असतो .यावर चिंतन आणि विचारमंथन होत असत.बरेच प्रयोग होत असतात. यावरून बऱ्याच गोष्टी मनात येत असतात.अभियांत्रिकी शिक्षण हे वाचल पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे.प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात आणि आपल्याला त्या दोन्ही बाजूला पाहिले पाहिजे.
या विषयावर तुमचे विचार जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
धन्यवाद.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860


 

Saturday, October 31, 2015

आपण सारेच सर्किट (भाग १)



कधी कधी मला इलेक्ट्रॉनिक्स पार्टसचे गुणधर्म आसपासच्या लोकामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये  दिसतात. फक्त पार्ट्सच नाही तर वेगवेगळे लोकांचे ,विद्यार्थ्यांचे  ग्रुप पाहिले तर ते सुद्धा एखाद्या सर्किट प्रमाणेच काम करत असतात अस दिसतं त्यावेळी अस वाटत कि हि दुनियाच सर्किट आहे.
आता हेच पहाना आपल्या आसपास काही अशी मुले असतात जी सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात, अभ्यासातही हुशार असतात. गॅदरिंगमध्ये असतात. हि मुले कायम टोळक्यात असतात. टोळक्याचे नेतृत्व करत असतात. यांच्या मनात सतत नवनवीन कल्पना घोळत असतात. सतत काहीना काहीतरी नवीन करत असतात. ह्यांचे मित्र साऱ्या कॉलेजभर असतात.अर्थात यांची संख्या खुपच कमी असते आणि खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी इंजिनियरिंगला लायक असतात. हे एसी सोअर्स असतात.
काही मुले असतात ती फक्त अभ्यास करत असतात.फक्त पाठांतर करणे आणि मार्क्स पाडणे हेच याचं ध्येय असत. हि मुले थेअरी मध्ये हुशार असतात पण प्रॅक्टिकलमध्ये मार खातात. हि कुणात मिसळणार नाहीत. दंगा करणार नाहीत. मोजकी अशी मित्र मंडळी असतात. अभ्यासाशिवाय इतर गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. पुढच पाठ आणि मागचं सपाट असा हा प्रकार असतो  हे डीसी सोअर्स असतात.
काही मुले अभ्यासात चालढकल करतात ,कुठलीही गोष्ट वेळेवर करत नाहीत, थोडी माठच असतात हि आणि गबाळी सुद्धा. पण हि कधी उलट बोलत नाहीत. जे आहे ते जमेल तेव्हढ करतात. हि रेझिस्टर असतात.
      काही मुले उद्दामपणे अभ्यास करत नाहीत ,कुणाच ऐकत नाहीत. भडक कपडे घालणे, गाडीवरून बोंबलत फिरणे याशिवाय दुसर काही करत नाही. अभ्यास सोडुन इतर गोष्टी मध्ये यांना इंटरेस्ट असतो. याचं शिक्षणात लक्ष्य नसत.कोनाविशावी कोमेंट पास करणे. उद्दामपणे बोलणे हे यांचे वैशिष्ट असते. बऱ्याचवेळा हि मुले स्वत:च्या इच्छेविरुद्ध इंजिनियरिंगला आलेली असतात.हि मुले इंडक्टर असतात
      सगळी काम वेळच्यावेळी करनारी मुले हि कॅपॅसिटर असता .हि अभ्यासात तशी हुशार नसतात पण सांगितलेले ऐकतात आणि आज्ञाधारक असतात.एखादी गोष्ट सांगितली तर त्यांना समजते लवकर आणि पटते सुध्दा. ठीकठाक कपडे घालतात.

काही मुले हि डायोड असतात त्यांचे एकच ध्येय असतात इतर कुठल्याही गोष्टी मध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो.त्यांना काहीतरी बनायचं असत आणि ते त्यासाठी अभ्यास मनापासून करतात. त्यांना त्यांचे ध्येयापासुन दुर केलं तर ती सैरभैर होतात. हळव्या मनाची हि मुले असतात.
काही मुले हि ट्रांझिस्टर असतात . बोटभर ऐकल कि ते हातभार करून सांगनेत त्यांचा हातखंडा असतो अर्थात त्यातहि दोन प्रकार असतात. एक जे चांगल असेल ते वाढवुन सांगेल. दुसरा चांगल असेल ते किती  वाईट  असे रंगवुन सांगेल.
आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे काही कार्टी अशी असतात कि त्यांच्यामध्ये खुपच क्षमता असते  पण त्यांची त्यांना जाणीव नसते , त्यांना ती करून द्यावी लागते. हि एस. सी. आर. असतात . आता एस.सी.आर. हा ट्रिगर करायच्यासाठी दोन तंत्र वापरतात. एक तर व्ही.बी.ओ. वाढवा नाहीतर ट्रिगर द्या. मग अशा मुलाकडून एखादे काम करून घ्यायचे असेल तर त्यांना रागाचा डोस द्या नाहीतर त्याच्या जवळच्या एखाद्या मित्राला बोलवा आणि त्याचे कौतुक करा तो लगेच ते काम करेल. या मध्ये तो मित्र हा डायकची भूमिका पार पडेल. सबळ आणि दुर्बळ यांचा मिलाफ करून एखादे मोठे काम करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

-    चित्तरंजन महाजन
-    डा. डॉल्फिन लब्स , पुणे
-    Dearengineers.blogspot.com

-     

Saturday, October 24, 2015

इलेक्ट्रोनिक्स आणि मानसशास्त्र

कोणत्याही बदलाला सामोरे जाताना माणसाच मन हे चार स्थिती मधुन जात असत. विरोध (oppose) , राग (anger), वाटाघाट (negotiation) आणि  स्वीकार (accept).
आपण शिक्षक आहोत म्हणुन आपल्या पेशासंबंधी उदाहरण घेऊ.
समजा एक शिक्षक  विद्यार्थ्यांना सांगतात कि रविवारी सकाळी जादा तास घ्यायचा आहे सर्वांनी आठ वाजता या. सगळे विद्यार्थी एका सुरात ओरडतात.नको. कारण कोणत्याही बदलाला विरोध करणे हा माणसाचा स्वभाव आहे. किबहुना विरोध करणे हे माणसाच्या रक्तातच  आहे. कारण या गुणधर्मामूळेच तर माणसाच्या रक्तात विषाणु घुसल्याबरोबर प्रतिकारशक्ती त्या विषाणुना  विरोध करते.
मग शिक्षक परत एकदा म्हणत यायलाच पाहिजे.  मग विद्यार्थी मनाच्या दुसऱ्या स्थितीत जातात .ते चिडतात मग मनातल्या मनात शिव्या घालतात. या शिक्षकांना काही काम नाही.....,फालतू मध्ये सेम वाया घालवतात आणि शेवटी जादा तास घेतात.......,वगैरे,वगैरे...मग विद्यार्थी तिसऱ्या स्थिती मध्ये जातात. ते म्हनु लागतात. सार मग अस करू या का? आठ ऐवजी नऊला येवूया का ? अथवा तीन तासाऐवजी दोन तास घ्या  
............अशा प्रकारे वाटाघाटी सुरु होतात . आणि शेवटी वेळ ठरते आणि सारे येतात.

आता याचा इलेक्ट्रोनिक्सशी संबध कसा? मित्रानो यासाठी आपण लक्षात घेउया सेरीज रेसोनंस सर्किट. या सर्किट मध्ये रेझिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे सेरीज मध्ये जोडलेले असतात. आता याठिकाणी आपण सोअर्स म्हणजे शिक्षकांची रविवारी येण्याची कल्पना. लगेच यामधील रेझिस्टर हा विरोध करतो. परत एकदा शिक्षक म्हणतात यायला पाहिजे.त्यावेळी कॅपॅसिटरच्या मुळे टोकाची भूमिका घेतली जाते म्हणजेच राग येतो तोपर्यंत कॅपॅसिटर हा चार्ज व्हायला लागतो. शिक्षक म्हणतात यायलाच पाहिजे,यायलाच पाहिजे म्हणजेच ते वारंवार सांगु लागतात  त्याबरोबर कॅपॅसिटर आणि इंडक्टर  मध्ये आंदोलन व्हयला लागत म्हणजेच वाटाघाटी सुरु होतात .शेवटी XL=XC होतो आणि काय हि कटकट आहे असा थोडासा विरोध मनात ठेवून शेवटी मुले रविवारी सकाळी क्लासला येतात.