Sunday, October 21, 2018

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा ( भाग 5 )


अभियांत्रिकी शिक्षण : दशा आणि दिशा ( भाग 5)

साधारण 1997-98 ची गोष्ट असेल. त्यावेळी दर बुधवारी टाइम्स ऑफ इंडिया मधील आसेन्ट या जॉब पुरवणीमध्ये सध्या मार्केटला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर साठी जॉब कुठं आहेत ते वाचायचो. बऱ्यापैकी जॉब हे पुण्यातील कंपन्या मध्ये असायचे पण खाली नोट लिहिलेली असायची की पुणे विद्यापीठाशिवाय इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी apply करू नये.खूपच टेंशन यायचं आम्हाला.
पुणे विद्यापीठाचा दराराच तसा होता. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयात प्रवेश मिळवणे म्हणजे गुलबकावलीचे फुल मिळवायसारखे अवघड असायचं. त्यात पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम म्हणजे  इतका अवघड असायचा की हायर  सेकंड क्लास मिळाला तरी पुरे असा असायचा. फर्स्ट क्लास म्हणजे सोनेपे सुहागा...
पण आज काय अवस्था आहे?  पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी हा फक्त आय टी मधील प्लेसमेंटसाठीच योग्य आहे कोअरसाठी तो चालतच नाही. त्यामूळे कोअर व्यवसाय पण ढासळत चालले आहेत.
ही अशी का अवस्था आली? 
2002 चा किस्सा सांगतो त्यावेळी मी बेंगलोरला होतो आणि एका होस्टेल मध्ये राहत होतो.तिथे बरेच एंजिनियरिंगचे विद्यार्थी राहत असत. त्यावेळी आम्हाला एक लक्षात आले की तिथं इंजिनीअरिंगला आरामात 90 टक्के मिळतात आणि परीक्षेच्या आधी अभ्यासासाठी जवळजवळ महिना स्टडी लिव्ह मिळते.
खरच रडू आलं मनातल्या मनात.
मार्कांचा फुगवटा आणण्याचं खर मोठं पाप हे दक्षिणेकडच्या विद्यापीठांनी केलं.
या फुगवट्या पुढं आपली विद्यार्थी कमी पडू लागले मग 2008 - 09 पासून आपल्याकडेपण मार्कांची खिरापत वाटायला सुरुवात झाली. बाजारात मागणी वाढली होती त्यामुळे मुलाना प्लेसमेंट मिळू लागल्या पुणे विद्यापीठाचा पॅटर्न इतर विद्यापीठाणी उचलायला सुरुवात केली.  मागणी इतकी वाढली होती की मुलांना खरंच काय येत यापेक्षा मार्क किती आहेत ते पहायला सुरुवात झाली अर्थात तो पहिला criteria होता आणि त्यामध्ये आपल्या कॉलेजमधील जास्तीत जास्त विद्यार्थी कसे राहतील यासाठी हातामधील मार्क्स हे अक्षरशः उधळायला सुरुवात झाली.प्रात्यक्षिक परीक्षेत काहीही येऊ किंवा न येवो भरमसाठ मार्क वाटायचा सपाटा सुरू झाला. प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करायचं नाही असा फतवा प्रत्यक्ष संस्थापकाकडून येऊ लागले. मग काय नापास करत नाहीत तर प्रात्यक्षिक कशाला करायची असा मुलांच्यात कल वाढू लागला आणि उगीच आपण काही करून कशाला वाईटपणा घ्यावा असं स्टाफ विचार करू लागला.आणि अशारितीने अभियांत्रिकी शिक्षणाचे बुरुज ढासलायला सुरवात झाली. पण बाजार जोरात होता आणि बाजारात सुबत्ता आली होती .
ज्यावेळी सुबत्ता येते तेव्हा आळस, बेफिकिरी आणि तडजोड या गोष्टी माणसामध्ये प्रवेश करतात. सुखाची रेलेचेल असल्यावर आपोआपच आळस अंगात येतो. अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी होते, आजचा दिवस तर व्यवस्थित गेला मग उद्याचं उद्या बघु अशी बेफिकिरी वाढीस लागते. पुढे कष्ट करायची इच्छा कमी होते मग तडजोडीला सुरुवात होते. शेवटी एक दिवस असा येतो कि तडजोडीनेही प्रश्न सुटत नाही मग आपण जागे होतो .आता आपल्याजवळ कामाचे कौशल्य राहिलेले नसते आणि मधल्या वेळेत जग पुढे गेलेले असते आता सुरु होते धावाधाव, ताणतणाव आणि वैताग.
अशातुन सुटका करायचे तर अंगी येते चापलुसी आणि कागदी घोडे नाचवणेची प्रवृत्ती, खोटेपणा आणि लांडी लबाडी. हळुहळू या खोटेपणा, चमचेगिरी  याला प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होते. हि प्रतिष्ठा अधिकृत करणेसाठी कागदपत्रे तयार केली जातात. रोज नवीन कागदे, नवीन नियम तयार करणेसाठी माणसांच्या झुंडी कामाला लागतात. कागदाला महत्व येते. कागदासाठी कागद ,कागदासाठी कागद. कागद जमायला लागतात, रद्दी वाढायला लागते. आता वेळ निघून गेलेली असते. हाती फक्त कागद उरतात. कौशल्याची किंमत कमी होते आणि कागद किती आहे ते पाहिले जाते. त्यामुळे आता फक्त कागदावरचे वाघ बनतात  आणि हे वाघ इतरांना कागदाची भीती घालण्यात आयुष्य घालवतात. 
आजच अभियांत्रिकी शिक्षण या वाघांच्या तावडीत सापडले आहे आणि ते सोडवलं पाहिजे.


चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.

No comments:

Post a Comment