Sunday, October 21, 2018

अभियांत्रिकी शिक्षण – दशा आणि दिशा ( भाग ६ )


**** रेडीमेड प्रोजेक्ट : अभियांत्रिकीला शिक्षणाला  लागलेला कर्करोग ****

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी करायची  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  प्रोजेक्ट. आतापर्यंत जे शिकले त्या ज्ञानाची खरी परीक्षा. हा प्रोजेक्ट स्वतः  करावं हे अपेक्षित असत पण थेअरीकडे जास्त लक्ष दिलेमुळे  प्रॅक्टिकलकडे दुर्लक्ष्य होते . त्यामुळे मिनी प्रोजेक्ट करतानाच  फे फे उडते ,मग  हा मेगा  प्रोजेक्ट करायचं म्हणजे पोटात भीतीचा गोळा येतो .त्यामुळे  हे  प्रोजेक्ट विकत घ्यायचं ठरतं आणि इंजिनियरिंगची तीन वर्षाची मेहनत आणि पैसे पाण्यात गेल्यातच जमा होते.
तीन वर्षात जवळजवळ प्रत्येकी सहा लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या चार पोरांच्या गटाने मिळून एक प्रोजेक्ट करायचा असतो म्हणजेच जवळजवळ चोवीस लाख रुपये खर्च करून  तयार केलेला गट जर वीस बावीस हजार रुपये घालुन जर प्रोजेक्ट विकत घेत असेल तर सगळे पैसे आणि मेहनत वाया गेलेसारखीच गोष्ट आहे
आम्ही गेली दोन वर्षे सर्वेक्षण केले आणि त्यातून निघालेले निष्कर्ष हे धक्कादायक आहेत.पुण्यामध्ये जर कात्रज हा केंद्रबिंदू मानून जर तीन किलोमीटरचे वर्तुळ काढले तर या वर्तुळात जवळजवळ १३२ प्रोजेक्ट विकणारे आहेत्त.  गेल्यावर्षी हा आकडा ८७ होता . जवळजवळ ४० ते ५० कोटी रुपयाचा व्यवसाय या एव्हढ्या भागात होतो. हे कशाचं द्योतक आहे?
कुठल्याही अभियांत्रिकी विद्यालयाच्या बाहेर जा, दहा ते बारा प्रोजेक्ट विक्याचे बोर्ड लागलेले असतात.काही प्रोजेक्टविक्यांची तर हिम्मत इतकी वाढलेली आहे  ते सरळ महाविद्यालयाच्या आत जाहिरात लावतात आणि काही तर प्रोजेक्ट लिस्ट तिच्या किमतीसह प्राचार्यांच्या नावे पाठवतात . किती मोठी शोकांतिका आहे?  यातील काही  प्रोजेक्ट विके महाविद्यालयात येउन फुकट गेस्ट लेक्चर घेतात किंवा अतिशय कमी दरात कार्यशाळा घेतात, वेगवेगळ्या कार्यक्रमाना प्रायोजकत्व देत असतात. या लोकांनीच  इंजिनियरिंगच्या दोन दिवसाच्या कार्यशाळेची फी मल्टीप्लेक्सच्या दोन तासाच्या  सिनेमाच्या तिकीटापेक्षा कमी करून ठेवली आहे .
यातील काही प्रोजेक्ट विके  त्या महाविद्यालायाचेच धडपडे विद्यार्थी असतात आणि त्यांचेविषयी शिक्षकांना आनंद वाटतो .त्यांना वाटत कि आपल्या विद्यार्थ्यांनी स्टार्ट अप केलाय यांना आपण मदत करू . पण ह्या विद्यार्थ्यांना मदत करून आपणच  आपल्या स्वतःच्या भविष्याला खड्ड्यात ढकलतो हे त्या बिचाऱ्यानाही कळत नाही .
बऱ्याच महाविद्यालयात शिक्षक हे प्रोजेक्ट साठी IEEE सारख्या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांचा वापर करायला सांगतात. प्रोजेक्ट संकल्पना  मागताना त्याबरोबर IEEE तीन तीन पेपर मागतात .पण त्या महाविद्यालयात ते पेपर डाऊनलोड करायची सोय नसते ,काय करायचं पोरांनी तरी?
काही मुलांना त्याची प्रात्याक्षिके व्यवस्थित करता येत नाहीत , मुलांची बौद्धिक कुवत काय आहे हे शिक्षकांना  पक्के माहित असतानासुद्धा त्यांचेकडून नाविन्यपूर्ण अशा प्रकल्पाची अपेक्षा करणे हे सुद्धा चुकीचे आहे. इतकी जर त्याची बुद्धिमत्ता असती तर ते आपल्या महाविद्यालयात आलेच कशासाठी  असते याचा विचार केला जातच नाही . यांचा आवाका ध्यानात न घेता त्यांना नवीन आयडिया साठी परत परत पाठवले जाते .
जर महाविद्यालय जुने असेल तर त्या विद्यार्थ्यांची वाटच लागते  आणेल तो प्रोजेक्ट एक तर झालाय किंवा यात काय नवीन अस म्हणून त्यांना परत पाठवलं जात. असं दोन महिने तंगवल्यावर शेवटी ते आणतील तो गप्प स्वीकार केल्याशिवाय पर्याय राहात नाही आणि त्या विद्यार्थ्याना त्यांच्या सिनियरनी याचा कानमंत्रच दिलेला असतो  त्यामुळे काही विद्यार्थी तर अगदी प्रीलीयाम सुरु होनेपुर्वीच मार्गदर्शकाची गाठ घेतात मग अगदी झक मारत त्यांनी आणलेल्या प्रोजेक्टला स्वीकारायला लागते .
काहींही झालं तरी प्रोजेक्टला मार्क किमान ९० टक्के द्यायचे असा फतवा काढलेला असतो त्यामुळे त्या मुलानी केलेला  सारा त्रास पोटात घालुन चांगले मार्क दिले जातात आणि केवळ या मार्कांच्या जीवावर टुकार मधल्या टुकार पोरालाही शेवटच्या वर्षी फर्स्ट क्लास मिळतो. आणि मग काय ? काहीही केलं तरी आपल कुणीही काहीही वाकड करू शकत नाही  हा संदेश त्यांच्याकडून त्यांचे
ज्यूनियरमध्ये पसरला जातो. मग वर्षभर प्रोजेक्ट करणेसाठी घासणाऱ्या मुलांच्यात आणि काहीही येत नाही पण विकत आणलेल्या मुलांच्या प्रोजेक्टसाठीच्या मार्कामध्ये दहा किंवा जास्तीत जास्त पंधरा मार्कांचा फरक असतो. मग स्वतः प्रोजेक्ट का करायचा? असा चुकीचा संदेश पसरला जातो.
बऱ्याचशा महाविद्यालयात प्रोजेक्ट लॅब असते पण या प्रोजेक्ट लॅब मध्ये काय करायचं हेच माहिती नसतं . चार टेबल आणि स्टूल ठेवली कि झाली प्रोजेक्ट लॅब.  प्रोजेक्ट करण्यासाठी एक दिवसाची सुट्टी पण असते मग या लॅब्सचा उद्देश काय हेच कळत नाही. फक्त एका लॅब्सच्या नावाची भर. बऱ्याच महाविद्यालयात सिम्युलेशनची सोफ्टवेअर नसतात पण प्रोजेक्टच सिम्युलेशन मागितलं जात आणि हे सिम्युलेशन सोफ्टवेअर पण शिकवलेलं नसतं आणि त्याविषयी शिक्षकानाही  माहिती नसते .
ज्या मुलांची प्लेसमेंट झालेली असते त्यांना प्रोजेक्टमध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. बरीच मुले गेट आणि GRE सारख्या परीक्षा करत असतात . बऱ्याच जणांना शेवटच्या वर्षाचा आनंद घ्यायचा असतो आणि अशा लोकांची संख्याच सध्या जास्त आहे. मग काय प्रोजेक्ट विकत घ्यायला उत येतो.
प्रत्येक विद्यालयात एखादा तरी शिक्षक असा  असतो कि त्याला असे वाटत असते कि मुलांनी त्यांचे प्रोजेक्ट स्वतः करावेत आणि मुलांना सर्व शिकवायचीसुद्धा त्याची  तयारी असते पण अशा शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून घेणे हे त्या महाविद्यालयातील हुशार मुलानासुद्धा कटकट वाटते. त्याचेकडे कुणीही जातच नाही . सर्वसाधारणपणे कमीत कमी त्रास देणारे,जास्त मार्क्स देणारे , काहीही न येणारे  आणि गोड बोलणारे मार्गदर्शक यांना प्रथम पसंती दिली जाते. त्यामुळे ज्या मुलांना मार्गदर्शक उरलेला  नाही  आणि आत्ता काहीच  पर्याय नाही अशी मुले नाईलाजाने या शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून निवडलतात किंवा त्यांचेवर लादले जातात. आणि असल्या टुकार मुलांना दोन तीन वर्षे  मार्गदर्शन केल्यावर त्या शिक्षकाचाही उत्साह मावळतो.
आजकाल तयार प्रोजेक्ट तर विकत घ्यायचं   सोडाच तर प्रोजेक्ट भाड्याने मिळण्याची सुद्धा सोय बऱ्याच ठिकाणी आहे . एकच प्रोजेक्ट तीनचार विद्यालयात फिरवला जातो आणि जर दोन वेगळ्या विद्यालयातील ग्रुपची प्रोजेक्ट एक्झामची  तारीख एकच पडली तर मग काय जी  धमालच उडते यावर एक सिनेमा आरामात होईल.
जर एका  मार्कासाठीसुद्धा परीक्षेत नेलेली चिट्ठी हि गुन्हा असेल तर  सहाशे मार्कासाठी विकत नेलेला प्रोजेक्ट हा सामुहिक गुन्हाच नाही का ? आणि हा गुन्ह्याकडे जाणूनबुजून केलेले दूर्लक्ष म्हणजे या गुन्ह्यात घेतलेला सहभागच नाही का ?
ह्या विषयावर जेव्हड लिहील तितक कमीच आहे . अभियांत्रिकी शिक्षणाचा जर दर्जा सुधारायचा असेल तर हा कर्करोग 
मुळापासून काढून टाकायला हवा. पण हा इतका पसरला आहे कि त्यासाठी प्रबळ अशी इच्छाशक्ती पाहिजे .
तुमची मते ऐकायला मला नक्कीच आवडेल.

चित्तरंजन महाजन .
डॉल्फिन लॅब्स,पुणे .
९७६३७१४८६०
आवडलं असेलच शेअर करा.

No comments:

Post a Comment