Sunday, March 15, 2020

इंजिनियरिंग वरची हरवलेली श्रद्धा

नुकतंच लग्न झालं होतं. बायकोला घेऊन गेलो होतो शिखरशिंगणापूरला , कुलस्वामीच्या दर्शनाला. रांगेत उभा राहिलो तोपर्यंत काही पुजारी मागे लागले अभिषेक करा म्हणून. अभिषेक करण्या चा दर विचारल्यावर सांगितलं की ग्रुपमध्ये केल्यास 5१/- आणि स्पेशल केल्यास 501/-. खिशात पैसे खुळखुळत होते म्हणून 501 रुपयात स्पेशल करायचा ठरवलं. मनात जरा गर्वपण वाटत होता. गाभाऱ्यात उभा राहिलो. पुजाऱ्याने थोडी वाट पाहायला सांगितले. ग्रुपने अभिषेक चालू होता.कुठली कुठली गावाकडची माणसं ,बायका कलकल करत अभिषेक करत होते. भटजी काय मंत्र म्हणत होते काही कळत नव्हतं आणि व्यवस्थित ऐकू पण येत नव्हतं. भटजी मध्येच काय कळण्यासारखं सांगायचा लोक तसं करायचे .सगळा गोंधळ चालला होता .वाटलं माणसं काही सुधारणार नाहीत. मनातल्या मनात त्यांच्या गावंढळ पणाला हसत त्यांचे निरीक्षण करत होतो आणि अचानक मनात एक विचार आला आणि माझीच मला लाज वाटायला लागली. तो पुजारी काय मंत्र म्हणत होता हे त्यालातरी कळत होतं का हे माहिती नाही पण त्याने पाणी घाला, पिंड धुवा, फुले वाहा हे सांगत असताना तमाम सूचना लोकं ज्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने पाळत होते मला नक्की खात्री वाटली की तो पिंडीचा स्पर्श त्यांच्या मनात नक्कीच एक विश्वास निर्माण करत होता.त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असं त्यांना विश्वास देत होता.त्यांना सांगत होता की तो त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्या डोळ्यात जी भक्ती दिसत होती असे वाटत होतं की तो पिंडीचा दगड साक्षात कैलासराणा बनला आहे आणि त्यांना आश्वस्त करत आहे.
मला लाज वाटली. भरपुर शिकलो, चांगला पैसा आहे. बायकोसोबत स्पेशल पूजा करतोय महागातला महाग हार घेतला आहे पण माझ्या मनात खरंच श्रद्धा आहे का? प्रामाणिकपणें मनातुन उत्तर आलं नाही.अभिषेक झाला पण मन शांत व्हायच्याऐवजी अशांत झालं.मनातून महादेवाची माफी मागून घरी आलो. दरवर्षी जातो पण एक कुलाचार म्हणून . श्रध्दा म्हणून नाही.खरच कितीतरी श्रद्धेची मोठी ताकद मी गमावुन बसलो होतो.
पण हीच श्रद्धा मात्र इंजिनियरिंगविषयी कायम आहे. आज जेव्हा मी काही इंजिनियरिंग विषयी करतो त्यावेळी लोक हसतात. पण मी त्याची फिकीर नाही करत कारण मला माझा महादेव त्यात दिसतो आणि त्यावर माझी अफाट श्रद्धा आहे.कधी कधी अस वाटत की इंजिनिअर हे पण महादेवाचच नाव आहे. "मी इंजिनिअर आहे" हे वाक्य तर मला गायत्री मंत्रासारखा वाटत.आयुष्यातल्या प्रत्येक संकटाच्या क्षणी मी इंजिनिअर आहे आणि मी काहीही करू शकतो हे वाक्य मनाशी उच्चारला की संकटांशी लढण्यासाठी हजार हत्तीचं बळ अंगात येत.
माझा विश्वास आहे जर विद्यार्थ्यांच्या मनात इंजिनियरिंग विषयी श्रद्धा निर्माण करता आली तर नक्कीच इंजिनियरिंगचे माहात्म्य परत वाढेल.
पण ही श्रद्धा निर्माण करायचं सामर्थ्य हे कुठल्याही संस्थेच्या इमारतीत नाही, त्या इमारतीभोवतीच्या रम्य परिसरात नाही, त्या संस्थेला भेटी देणाऱ्या सेलेब्रिटीत नाही, त्या इमारतीमध्ये असणाऱ्या वाय फाय मध्ये नाही,मोठं मोठ्या पदवी घेतलेल्या शिक्षकात नाही, मोठं मोठ्या नामांकित परदेशी विद्यापीठाबरोबर केलेल्या करारात नाही.
ही श्रध्दा निर्माण करण्याचा सामर्थ्य फक्त आणि फक्त इंजिनियरिंग वर श्रद्धा असणाऱ्या शिक्षकात आहे.मग त्याची पदवी कोणतीही असो.कारण देऊळ कितीही शोभिवंत बांधा, मूर्ती सोन्याची घडवा किंवा दगडाची ,अगदी मातीची जरी असली तरी पण त्यामध्ये देवपण आणण्याचं सामर्थ्य फक्त त्या देवावर अफाट श्रद्धा असणाऱ्या पुजाऱ्यातच असत. आता असे पुजारी शोधण्याची गरज आहे . हा लेख वाचणाऱ्यांनी स्वतः ला विचारण्याची गरज आहे की खरंच तुमची इंजिनिअरिंगवर श्रध्दा आहे का? तुमची जर श्रध्दा असेल तर तुम्हाला नक्कीच इंजिनियरिंगला स्कोप दिसेल.
* चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स , पुणे

No comments:

Post a Comment