Sunday, March 15, 2020

सॉरी शक्तिमान

आपण सगळ्यांनी शक्तिमान हि मालिका पाहिली असेलच. या शक्तिमान मालिकेने एक मंत्र दिला आणि वयाच्या चाळिशीनंतर सगळ्यांनी त्या मंत्राचा उपयोग करायलाच हवा आणि तो मंत्र आहे "सॉरी शक्तिमान ".
दैनंदिन जीवनात या मंत्राचा वापर करा आणि पहा आणि आपल्या आयुष्यात किती बदल होईल.सर्व साधारणपणे चाळीशी नंतर सर्वांनी एक पातळी गाठलेली असते. घरात, मित्र मंडळीत, समाजात एक स्थान निर्माण केलेले असते.आणि हे सर्व करत असताना बऱ्याच बऱ्यावाईट अनुभवाचा सामना केलेला असतो त्यामुळे थोडासा कडवटपणा आणि थोडासा अहंकार मनामध्ये आलेला असतोच शिवाय स्वतः विषयी एक रास्त अभिमान पण मनात जागृत झालेला असतो.
अशावेळी कधीकधी संभाषण करताना लहान मोठ्या चुका होतात,भांडणं होतात,अबोला वाढतो आपली जरी चूक असली तरी मन माफी मागायला तयार होत नाही आणि कधी कधी तुम्ही जरी बरोबर असला तरी पुढचा माफी मागत नाही.मग मनात राग राहतो , धुसफूस वाढते,चिडचिड वाढते.
मित्रानो अशावेळी "सॉरी शक्तिमान" हा मंत्र वापरा. हा मंत्र तुमची चूक असेल अशावेळी पण वापरा आणि पुढच्याची चूक असेल अशावेळी पण वापरा.हा मंत्र तुम्ही लहान मुलांपासून सर्वांच्या साठी वापरता येतो .फक्त हा मंत्र कसा वापरायचा याची पद्धत आहे.
समजा तुमच्या हातून चूक झाली लगेच चेहऱ्यावर हास्य आणा आणि म्हणा "सॉरी शक्तीमान" पुढचा नक्कीच हसुन तुम्हाला माफ करेल समजा जरी नाही हसला तरी आपल्याला काही फरक पडत नाही कारण चूक आपली असते.
समजा चूक पुढच्याची आहे आणि तो ऐकत नाही अशावेळी पण म्हणा " सॉरी शक्तिमान" आणि यावेळी मात्र पुढचं वाक्य मनातल्या मनात म्हणा "काशीत जा" आणि निघा तिथुन.
मित्रांनो ,आतापर्यंत तुम्हाला मनाच्या शांतीचे महत्व कळून चुकले असेल.आपण आयुष्य भर आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. कितीतरी पैसे घालवतो, कुठे कुठे फिरतो, पण आनंद हा फुकट असतो हेच आपल्याला लक्षात येत नाही. जर मन शांत असेल तर त्यावर आनंदाचे तरंग नक्कीच उमटतील. तरी हा मंत्र वापरायला सुरुवात करा आणि आपले आयुष्य आनंदी करा.
धन्यवाद.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

No comments:

Post a Comment