Sunday, May 24, 2020

ओन लाईन ...बिन लाईन

रवा पोस्ट टाकली होती, " केवळ ऑन लाइन लेक्चर घेऊन निव्वळ विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तयार करून आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करत नाही का?
बऱ्याच जणांनी रिप्लाय दिले , धन्यवाद.
ही पोस्ट टाकण्यामागे माझी एक इच्छा होती की यावर विचार मंथन व्हावे आणि त्यामधून काही तरी नवीन मार्ग निघावा.
आपण नेहमी म्हणतो की मुलांचे प्रॅक्टिकल ज्ञान कमी आहे. इंडस्ट्रीच पण तेच मत आहे.आपल्याकडे मार्कस मिळवायला मुले कमी पडत नाहीत. कमी पडतात ते प्रॅक्टिकल ज्ञानाला. हे सर्वांनाच माहिती आहे.अस असताना देखील आपण नेहमीच थेअरीवर भर देऊन मोकळे होतो. कारण प्रॅक्टिकलचे मार्क्स हे आपल्या हातांत असतात. इंजिनिअरिंगमध्ये सध्या प्रॅक्टिकलचा संबंध हा शंकरपाळीतल्या शंकरसारखा झाला आहे . ही एक प्रकारची फसवणूकच नाही का?
आता ही सगळ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची दुसरी सेमिस्टर आहे. यानंतर BE ची मुले डायरेक्ट बाहेर पडणार आहेत. ही वेळ आहे ती खूपच संवेदनशील आहे. या करोनामुळे जूननंतर मार्केट कसे असणार आहे ते सांगता येत नाही किंबहुना पुढची दोन वर्ष कशी असतील हे कुणीही सांगू शकत नाही.त्यामुळे आता भले थेअरीला मार्क्स कमी पडली तर चालतील पण प्रॅक्टिकल त्यांना जमण गरजेचं आहे.
बऱ्याच लोकांना वाटत की आम्ही सिम्युलेशन करून दाखवू. सिम्युलेशन करून पाहायला मर्यादा असतात. इंजिनिअरिंग हे पंचेंद्रियाने शिकायचं असते. जस जशे खडू फळा शिक्षण पद्धतीचे अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातून मह्त्व कमी व्हायला लागले तसतसे शिक्षण शिक्षकाच्या हातून आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जायला सुरुवात झाली आहे.
प्रत्येक वेळी आपण पाश्चात्य पध्दतीचा विचार आपल्या शिक्षणात करायला पाहतो पण आपल्या विद्यार्थ्यांची जडणघडण ही वेगळी आहे.स्वतः शिकणे आणि त्याची जबाबदारी घेणे हे त्यांना जमत नाही. आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट ही हाताने शिकवायला लागते हे सत्य आहे.
आज जर आम्ही ई लर्निंगचा उदो उदो करायला लागलो तर उद्याची अवस्था वाईट होईल .450 रु ला कोर्स मिळतात ऑन लाईन . आजकाल कंपन्या शैक्षणिक पात्रता पाहण्या ऐवजी काय येत हे पाहतात .जर प्रॅक्टिकल मिळणार नसेल आणि जर सिम्युलेशनच करायची तर इंजिनिअररिंग कॉलेजला जायचं कशाला? उद्या लोकं त्याचाही विचार करायला लागतील. या विषयात मला खोलात जायची इच्छा नाही.
बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची रेंज मुलाना मिळत नाही. बऱ्याच कॉलेजना ऑन line ट्रेनिंग देणं जमत नाही . मुलं मानसिक सैरभैर झाली आहेत. त्यांना आता गरज असणार आहे शिक्षकांची. त्यांना प्रॅक्टिकली कस स्ट्रॉंग करता येईल हे पाहिलं पाहिजे.
शेवटी किती झालं तरी विद्यापीठला ऑन line लेक्चर मुलांनी केलं आणि त्यांचा अभ्यासक्रम संपला अस आपण सांगू शकत नाही आणि ते विद्यापीठ पण म्हणू शकत नाही. लेक्चर ही घ्यावीच लागणार आहेत.मग ही कुतर ओढ कशाला करायची .
सध्या करोनाच्या साथीमुळे सारं जग थांबलं आहे.सर्वाना हा खरच छान वेळ मिळाला आहे त्यांनी तो knowledge अपग्रेड करण्यासाठी वापरावा.आपल्या स्वतः साठी विद्यार्थ्यासाठी ,संस्थेसाठी आपण इतर काय शिकू शकतो, काय माहिती मिळवू शकतो ते पाहावं अस मला वाटतं. इतका काळ आपण एका चाकोरीबद्ध आयुष्यात जगलो आता वेळ मिळाला आहे तर सर्वांनी स्वतः ला अपग्रेड करावं असं मला वाटत.
जर त्यातूनही लेक्चर घ्यायची तर विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात काय संधी आहेत. सध्याच नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि आपण शिकवत असलेल्या विषयाची त्यासाठी काय गरज आहे याची माहिती द्या.
तुमची मते अवश्य मांडा.

करोना..... कुछ तो करो ना.

ज्यावेळी संकटे येतात त्यावेळीसच केवळ माणसाचीच नाही तर समाजाची खरी परीक्षा होते. कठीण परिस्थितीत समाज कसा सामोरा जातो त्यावरून त्याची सामाजिक , मानसिक , वैचारिक पातळी दिसून येते.
प्रसंग १ :गेल्या पावसाळ्यात महाराष्ट्रात पुराने थैमान घातले होते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खूपच अवस्था बिकट झाली होती. गावेच्या गावे पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडली होती. लोक बाहेर पडायला काही नाही म्हणून घरातच आणि काहीतर घरावर अडकली होती. काय करायचं हेच कळत नव्हत , नावा ,होड्या अपुर्या होत्या त्यामुळे लोकांना बाहेर काढता येत नव्हत. सगळीकडे हतबलता आली होती. कधी कधी विचार करतो कि हतबलता कशानं आली होती तर आम्ही शिकलेली लोक विचार करायाची क्षमता गमावून बसलो आहोत आणि आम्हाला काहीही स्वत: करायची इच्छा नाही आम्ही फक्त बघे झालो आहोत. इतक पाणी आल असताना आम्ही आमच डोक गमावून बसलो . एक दोन कमी शिकलेल्या माणसांनी अक्षरशः मोठ्या काहीलीचा वापर करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले पण आम्ही आमची बुद्धी लावू शकलो नाही. सांगली आणि कोल्हापूर भागात डझनाने इंजिनियरिंग कॉलेजेस आहेत आणि त्यात शिकणारी हजारो पोर . प्रत्येक कोलेजला वर्कशोप आहे पण आमची बुद्धी चालली नाही कि मुलांचा वापर करून पत्रे वगैरे जोडून पटकन काही नावा बनवाव्या. किंवा मुलांच्या लक्षात आल नाही कि आपल्या आसपास हजारो प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्यांचा वापर करून एखादा तराफा बनवावा. त्यावेळी मी दोन इंजीनियारिग कोलेजला संपर्क केला पण त्याचं म्हणन पडल कि हे आपल काम काम नाही. खर तर जाहिरात करायची मोठी संधीपण होती.
प्रसंग २: सध्या करोनाने धुमाकूळ घातला आहे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लागणारी सुरक्षाप्रणाली खूपच तुटपुंजी आहे. त्यात चीनमधून आम्हाला आयात करायची इतकी सवय लागली आहे कि आम्ही आमच्या देशात पर्यायच उभे करू दिले नाही . चीनची वस्तू स्वस्त आणि आमची वस्तू महाग का ? यावर कधी पर्यायच शोधला नाही. नोकर बनवण्याच्या नादात आम्ही मुलांच्या विचारशक्तीला वावच दिला नाही . आज आमच्याकडे वेनटीलेटरचा तुटवडा पडू शकतो त्याला पर्याय शोधण्याची गरज आहे .आजच लोकसत्ताला आल आहे त्याप्रमाणे बऱ्याच वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा आहे त्यावर विचार मंथन व्हायची गरज आहे पण यावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही. यावेळीपण काही ठिकाणी संपर्क केला पण काहीही रिस्पोंस नाही.
आज आपल्या इंजिनियरनी भरलेल्या देशात आपत्तींना कस तोंड द्यायचं हेच कळत नाही . प्रत्येक गोष्टीसाठी हाय टेक पर्याय शिकवल्यामुळे या मुलांना आसपासच्या गोष्टीपासून एखादी गोष्ट कशी बनवायची हेच कळत नाही. आपले विद्यार्थी हेच आपल भविष्य आहे हे कुणी लक्ष्यातच घेत नाही. नशीब अजून करोना आटोक्यात आहे पण पुढच्या क्षणाला काय वाढुन ठेवलं आहे हे सांगता येत नाही . तरी ज्यांना मनापासून वाटत कि आपण आपल्या देशासाठी कांही करू शकतो त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या साधनाचा वापर करून काय करता येईल हे शोधल पाहिजे. अनलिमिटेड इंटरनेट पॅकचा खऱ्या अर्थाने वापर करायची वेळ आली आहे .
नक्कीच कुणाला काहीतरी सापडेल . उगा अफवा फोरवर्ड करण्यापेक्षा आणि अफवा वाचत बसण्यापेक्षा , चघळत बसण्यापेक्षा काहीतरी धीराच्या गोष्टी शोधा आणि त्या पसरवा. लोक अखेर आशेवरच जगतात. कालच परभणीच्या एका मुलाने केलेलं व्हेन्तिलेटरच मॉडेल पाहिलं . तस ते मॉडेल खूपच प्राथमीक अवस्थेत आहे पण तरीही त्याला सलाम केला पाहिजे . त्याने केलेल्या मॉडेल मुळे कितीतरी लोकांना उत्साह आला. सध्या मी एका ग्रुपच्या सोबत आहे त्यांनी पण त्याचं डिझाईन पूर्ण करत आणल आहे. दोन तीन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
माझी सर्व अभियंत्याना विनंती आहे. कुणीतरी काहीतरी करील यावर बसू नका .प्रत्येकाने काहीतरी हातभार लावावा . कुठेतरी सुरुवात केलींच पाहिजे कदाचित यातून नवीन संधी तयार होतो.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

Sunday, March 15, 2020

***** स्वत: ओढवून घेतलेली गरिबी. *****“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “ (भाग ४)

***** स्वत: ओढवून घेतलेली गरिबी. *****
“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “ (भाग ४)
प्रसंग पहिला : अशाच एका कॉलेजाला भेट द्यायला गेलो होतो. संस्थेचे डायरेक्टर त्यावेळी संस्था ऑफिसला होते. आधीची थोडी ओळख होतीच .म्हटलं चला भेटावं. भेटायला गेलो डायरेक्टरसाहेबांच्या पुढे काही माणस उभी होती आणि समोर एक चेक पडला होता त्यावरून ते हुज्जत घालत होते कि इतकं बिल कस झालं . जवळपास सोळा मिनिटे यावर विचारमंथन झाल आणि त्या चेकवर नंतर सही करतो म्हणून त्या माणसाना बाहेर पाठवल. सहज चेकवर नजर पडली . चेक होता फक्त १६० रुपयाचा. खूपच वाईट वाटले . जवळजवळ बत्तीस वर्षाचा इतिहास असणाऱ्या संस्थेच्या डायरेक्टरवर १६० रुपयाचा चेकवर सही करायला लागणे आणि ती सही करताना सोळा मिनिट वाया घालवायला लागणे यासारखी वाईट गोष्ट नव्हती.
थोडा वेळ गेला मग डायरेक्टर साहेब बोलायला लागले. काय सांगू सर ,एके काळी आमच्या इथे डोनेशन चालत होत पण आता अॅडमिशन होत नाहीत. लोकांचे पगार सहा सात महिने झाले आहेत थकले आहेत. गेले चार पाच वर्ष झाले हे असेच चालले आहे. मी विचारले मग मॅनेजमेंटच पुढ काय प्लानिंग आहे. ते म्हणाले काय आता या वर्षी एक कोटी दहा लाख रुपये खर्चून नॅशनल लेव्हलच खेळाच मैदान तयार केल आहे. क्षणभर डोक भंडावलं. म्हटल विद्यार्थ्यासाठी मग ट्रेनिंग च कस काय ? लगेच रडायला सुरुवात … काय सांगायचं सर , हा सगळा खेड्याचा भाग . सगळे गरीब विद्यार्थी . पैसे देत नाहीत . आहो कॉलेजची फी भरत नाहीत. ते ट्रेनिंग काय करणार ?
*******
प्रसंग दुसरा : असच एका कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी बोलणी करायला बोलावल होत . कॉलेज तस शहरापासून दूरच होत. कॉलेज मधून डिपार्टमेंटकडे चाललो. लंच ब्रेक होता . कट्ट्यावर , जिन्यात ,पायऱ्यावर मुले निवांत बसली होती. प्रत्येकाच्या हातात अन्द्रोइड फोन होता . निवांतपणे whats app वर चाटिंग वगैरे चालू होत. कुणालाही कुणाकडे बघायला वेळ नव्हता, अगदी तंद्री लागली होती.
एच. ओ. डी. ना भेटलो . एच. ओ. डी. नी सागितलं कि त्यांना मुलांच्या प्रोजेक्टसाठी वर्कशोप पाहिजे. म्हटल काही काळजी करू नका आपल्या ट्रेनिंग नंतर त्यांना प्रोजेक्ट करायला नक्की जमेल . एच. ओ. डी. म्हणाले पण आमच्या मुलांना प्रोग्रामिंग येत नाही. मी म्हणालो हरकत नाही सर या वर्कशोप नंतर त्यांना प्रोग्रामिंग सुद्धा जमेल . एच. ओ. डी. ना त्यांच्या मुलाविषयी विश्वास होता त्यामुळे ते परत म्हणले आमच्या मुलांना अजून पार्टसची नावे पण माहित नाहित . आता आमचा आमच्या ट्रेनिंग वर विश्वास होता म्हणून मी म्हणालो काही काळजी नको मुल त्यांचा प्रोजेक्ट ते स्वत: करतील . मग म्हणाले ठीक आहे पण तुमची वर्कशॉपची फी जरा जास्तच आहे . आता मला यांच्यासमोर काय बोलाव कळेना. ते म्हणाले आहो आताच आमच्या मुलाकडून इंडस्ट्री व्हिजीट गोव्याला जाणार आहे चार दिवसासाठी म्हणून पैसे घेतले आहेत. आता पुढच्या आठवड्यात गॅदरिंग आहे त्याचा पण खर्च आहे सध्या त्यामध्ये पोर गुंतली असल्याने आपल्याला या आठवड्यात वर्कशॉप घेता येणार नाही . वास्तविक पाहता त्या मुलांनी इंडस्ट्री व्हिजीट साठी जितके पैसे भरले होते त्याच्या पंधरा टक्के इतकीच फी मी तीन दिवसाच्या वर्कशोप साठी मागितली होती.
काय करायचं ? आणि लगेच पुढच पेटंट वाक्य सुरु झाल आमची पोर गरीब आहेत .हा सगळा खेड्याचा भाग . सगळे गरीब विद्यार्थी . पैसे देत नाहीत . आहो कॉलेजची फी भरत नाहीत. ते ट्रेनिंग काय करणार ?
*****
आता मात्र माझी थोडी सटकली. आणि दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट घडली. मी म्हणलो सर, हि गरीब पोर तुम्ही कॉलेजला घेताच कशाला ? हि पोर खरीच गरीब आहेत का ? पंधरा हजार रुपयाचा मोबाईल फोन वापणारी मुले हि गरीब कशी म्हणायची. आणि असली हि दलीन्द्री पोर तुम्ही किती काळ सांभाळणार आहात . हि पोर गरीब नाहीत तर त्यांना माहित आहे कि आज तुम्हाला त्यांची गरज आहे . हे चित्र बनवलं कुणी.? हि पोर पण इतकी डोक्यावर बसली आहेत कि वर्गात लेक्चरला बसत नाहीत , प्रॅक्टिकलला येत नाहीत . सबमिशन करत नाहीत . इतकी माजली आहेत . आपल्याला हि किंमत पण देत नाहीत. कशीबशी पास होतात . प्रॅक्टिकल आणि टर्म वर्कला आपणच मार्क देतो ना . यांना ट्रेनिंगसाठी पैसे नाहीत मग यांची प्लेसमेंट कशी होणार ? प्लेसमेंट नाही तर कॉलेजच नाव कस उजळणार . त्याशिवाय पैसे देणारी चांगली मुले कशी येणार ? हि मुल गरीब नाहीत तर आपली मानसिकता गरीब झाली आहे. इंजिनियरिंगच्या मुलांना ज्याचं प्रॅक्टिकल ज्ञान चांगल आहे त्यांना जॉब हे आहेतच . भारतातच नव्हे तर जगभर जॉब आहेत. पण आम्ही आमची मानसिकता बदलली पाहिजे . आम्ही आता आमचे विचार बदलले पाहिजेत . आपल्याला या असल्या गरिबांची किळस आली पाहिजे . आपल्या कॉलेजला चांगले विद्यार्थी यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .
आता संस्थेन पण ठरवलं पाहिजे कि आपल्याकडे डोनेशन देणारी पोर आली पाहिजेत त्यासाठी काय कराव ? शिक्षकांनी पण विचार केला पाहिजे कि आपल्याला सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळाला पाहिजे आणि तो पण प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला. हे स्वप्न रंजन नाही हे शक्य आहे. आमच्या पुण्यातच एक कॉलेज अस होत कि २०१० पर्यंत त्या कॉलेजला टुकार मानण्यात येत होत पण त्यांनी ठरवलं आता बदलायचं, आता त्यांची जवळजवळ चार कॉलेज आहेत . डबल इनटेक , फुल अॅडमिशन विथ डोनेशन. अर्थातच हे करण्यासाठी चार ते पाच वर्षाचच प्लानिंग केल पाहिजे आणि त्याबरोबरच कष्ट करन्याबरोबरच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवली पाहिजे .
आता गरज आहे ही गरीब विचारसरणी बदलण्याची कारण ही जर बदलली नाही तर अवघड आहे....खूपच अवघड आहे.
मॅनेजमेंटच पण आणि शिक्षकांचं पण.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

***** खानदानी शफाखाना आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र *****“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “- भाग १

***** खानदानी शफाखाना आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र *****
“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “- प्रस्तावना
दर शनिवारी बायको पोराला घेऊन घरातच टी. व्ही.वर पिक्चर बघायचा नेहमीचा प्रोग्राम . केबल किंवा डिश नाही . इंटरनेट कनेक्शन आहे आणि अमेझोन प्राईमची मेंबरशिप घेतली आहे . जवळ जवळ बऱ्यापैकी पिक्चर बघून झाले आहेत . आता काय बघायचं तेव्हढ्यात “खानदानी शफाखाना” दिसला म्हटल चला आज “खानदानी शफाखाना” बघू तर बायको म्हणाली चांगला नाही तो पिक्चर. म्हटलं काय झाल. म्हणाली रिव्यू वाचला आहे त्या विषयावरचा आहे. म्हटलं कुठल्या विषयावरचा आहे. आता मात्र बायकोने डोळे मोठे केले आणि मग आपण विचार बदलला आणि मस्तपैकी (गपगार ) कुंग फु पांडा पाहिला .
काल मात्र बायको आणि पोट्ट चार दिवसासाठी गावी गेलेची संधी साधली आणि बघून टाकला. खूप मोठा साक्षात्कार झाला. “गुप्तरोग” याला समाजाने बदनाम केल्यामुळे या विषयावर कुणीही बोलत नाही. त्याला चांगल मानल जात नाही . त्यामुळे त्यावर योग्य उपचार होत नाहीत . यावर उपचार करणेसाठी चांगली औषधे बाजारात उपलब्ध आहेत . तज्ञ लोक आहेत पण रोगाची लाज वाटल्याने लोक भोंदू बाबाकडे , रस्त्याकडच्या हकीमाकडे जातात . काहीजण इतरांचं ऐकून, किंवा काहीतरी वाचून स्वत: प्रयोग करत बसतात , काहीतर अंगावरच काढतात मग हळूहळू रोग गंभीर होत जातो. त्यावर एकाच उपाय म्हणजे या विषयावर बोलले पाहिजे . म्हणून चित्रपटाची नायिका “ बात तो कर लो “ हे अभियान सुरु करते . आणि त्यावर समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रिया यावर बेतलेला अतिशय छान सिनेमा . खर तर सर्वांनी पाहिला पाहिजे पण काही विषय आम्ही बदनाम केलेले आहेत आणि त्यांचे तोटे आज समाज भोगत आहे .
आज आमची अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राची पण अवस्था तशीच झाली आहे . लाखो कुटुंबाचा हा अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्ररुपी आधारपुरुष त्याला “गुप्तरोग” झालेला आहे . सध्या व्हेन्तिलेटरवर आहे पण याविषयावर कुणीही बोलायला तयार नाही. प्रत्येकजण त्याला लपवत आहे. तो खंगत चालला आहे . त्याला वाचवण अवघड नाही पण त्याच्यावर योग्य औषधोपचार झाले पाहिजे. त्याला केवळ जगवून चालणार नाही तर त्याला सक्षम बनवलं पाहिजे . तुम्ही त्याच्यावर जितकं बोलायचं टाळाल तितकं त्याची परीस्थिती गंभीर होत जाणार आहे . तरी याविषयावर सर्वांनी बोलल तरच यावर काहीतरी उपाय निघेल.
कुणीही काहीही बोलत नाही त्यामुळे सध्या इतके प्रयोग चालले आहेत कि हे क्षेत्र खिळखीळ होत चालल आहे . ए.आय.सी. टी.चे प्रयोग , डी.टी. ई. चे प्रयोग,आय. आय. टी. चे प्रयोग , संस्थापकांचे प्रयोग , त्यांनी नेमलेल्या स्पेशल डायरेक्टरचे प्रयोग , प्राचार्यांचे प्रयोग , एच. ओ. डी.चे प्रयोग , टी. आणि पी. चे प्रयोग , शिक्षकांचे प्रयोग . प्रयोग ,प्रयोग आंणी प्रयोग.
प्रत्येकाच्या मनात हा रोगी वाचावा हि सदभावना(?) आहे . पण या सगळ्याच्यामध्ये समन्वय नाही त्यामुळे देशी , विदेशी , परदेशी , हकिमी निम हकिमी , याचबरोबर यज्ञ कर्मे पण सुरु झाली आहेत . अजून काही काळाने वशीकरण ,विदवेषन ,उच्चाटन यासारखी लिंबू गंडादोराा या सारख्यया काळ्या जादूचे प्रयोग सुरु होतील . काही ठिकाणी सुरु झालेले पण आहेत . याविषयावर सविस्तर बोलेनच .
गेले दोन तीन महिने मी लिहिण बंद केल होत पण हा सिनेमा पाहून मला प्रेरणा मिळाली आहे आणि “अभियांत्रिकी शिक्षण- बात तो करलो “ हि नवीन लेखमाला सुरु करीत आहे . मागील “अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा” आणि “ अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर “ या लेख मालीकाना दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाप्रमाणे या “अभियांत्रिकी शिक्षण- बात तो करलो “ मालीकेला पण तुमचे प्रेम मिळावे अशी . माझी प्रार्थना .
वाचा , प्रतिक्रिया अवश्य द्या .
शेअर करा .... हे सर्वासाठी आहे
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०.
या पूर्वीचे लेख वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या .

आर्डीनो प्रोग्रामिंगचे ज्ञान: काळाची गरज.

आर्डीनो प्रोग्रामिंगचे ज्ञान: काळाची गरज.
*********************************
आजकाल आर्डीनोची ओळख ही पाचवी ते अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र या सर्वांना होत आहे.काही विद्यापीठानी तर अभियांत्रिकीच्या काही शाखांच्या अभ्यासक्रमात आर्डीनोचा समावेश केला आहे.
भारत सरकार पुरस्कृत अटल टिंकरिंग लॅब मूळे पाचवी सहावीची मुलेपण उत्कृष्टपणे आर्डीनोचा वापर करून छान प्रोजेक्ट्स बनवत आहेत.मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी आर्डीनोइतका सोपा प्लॅटफॉर्म नाही.
आर्डीनो काय आहे?
बऱ्याच जणांना वाटते त्याप्रमाणे आर्डीनो हा काही मायक्रोकंट्रोलर नाही. आर्डीनो म्हटलं की तीन गोष्टी येतात .
1. ऍटमेल कंपनीचे वेगवेगळे मायक्रोकंट्रोलर वापरून तयार केलेलं वेगवेगळे बोर्ड: यामध्ये आर्डीनो उनो, मायक्रो,नॅनो, लिलिपॅड असे अनेक बोर्ड आहेत.तुमच्या गरजेनुसार तुम्ही बोर्ड निवडू शकता.
2. आर्डीनो नावाचा प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म:- मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम लिहिण्यासाठी आर्डीनो इतका सोपा प्लॅटफॉर्म नाही. अजिबात क्लीष्टता नसलेला आणि कमीत कमी बटणं असलेला हा प्लॅटफॉर्म आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यात असलेल्या लायब्ररी. यामध्ये असणाऱ्या लायब्ररीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर,मेमरी, अक्चुएटर,डिस्प्ले, कम्युनिकेशन प्रोटोकॉल यांच्या लायब्ररी चा वापर करून मोठमोठे प्रोजेक्ट अतिशय कमीत कमी वेळेत पूर्ण करता येतात.
3. आर्डीनोवर काम करणाऱ्या लोकांची कम्युनिटी- आर्डीनो वर काम करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.हे लोक हौशी असल्याने उत्साहाने काम करत असतात ,नवीन नवीन लायब्ररी तयार करतात,प्रोजेक्ट्स करून सर्वांना त्याचे कोड शेअर करतात त्याच बरोबर तुम्हाला कुठं अडलं तर मदत ही करतात.आज आर्डीनो बेस्ड प्रोजेक्ट टाकलं तर हजारो प्रोजेक्ट मिळतात.
आर्डीनो हा प्लॅटफॉर्म लहान मुलाना प्रोग्रामिंगचे ज्ञान देण्यासाठी बनवला होता पण त्याच्या सोपेपणा आणि सुटसुटीतपणा लोकांना इतका भावला की लोकांनी त्याला डोक्यावर घेतला. आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या मायक्रोकंट्रोलरसाठी आर्डीनोमध्ये वापरले जाणाऱ्या तंत्रधारित प्रोग्रामिंग वापरायला सुरवात झाली आहे. ज्याप्रमाणे पायथॉन सर्वव्यापी झालं आहे त्याप्रमाणे भविष्यात आर्डीनो सदृश प्लॅटफॉर्म मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग साठी वापरले जाणार आहेत.त्यामुळे आर्डीनो प्रोग्रामिंगचे ज्ञान असणे आता गरजेचे झाले आहे.
या आर्डीनो विषयी खूपच गैरसमज पसरले आहेत त्याविषयी:-* आर्डीनो हा industry अप्लिकेशन साठी वापरता येत नाही-
-आर्डीनो बोर्ड हा जरी डायरेक्ट अप्लिकेशन मध्ये वापरता येत नसला तरी आर्डीनो बोर्ड आणि आय डी इ च्या साहाय्याने प्रोटो टाईप तयार केल्यावर तो प्रोग्राम केलेला आय सी आपण अँप्लिकेशन मध्ये वापरू शकतो.( आर्डीनो हा लहान मुलांचा प्लॅटफॉर्म आहे हे माझं स्वतः च मत होतं पण पेकेजिंग, आटोमेशन सारख्या काही इंडस्ट्री अप्लिकेशनमध्ये त्याचा वापर जसा च्या तसा केलेला जेव्हा मी पाहिले आहे त्यावेळेपासून आर्डीनो विषयी आदर माझ्या मनात निर्माण झाला)
* आर्डीनोचा उपयोग मेकॅनिकल, सिव्हिल या इलेक्ट्रॉनिकसतरेतर ब्रॅंचना काय उपयोग आहे?
- आर्डीनो हा मेकॅनिकल ,सिव्हिल,प्रोडवशन, आटोमोबाईल या सारख्या शाखेच्या विद्यार्थ्यांना एक प्रकारचे वरदान आहे.इलेक्ट्रॉनिकस आणि प्रोग्रामिंग याविषयी नावड निर्माण झालेने या शाखांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोजेक्ट चे आटोमेशन करता येत नाही.या शाखांच्या विद्यार्थ्यांना हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक जादूची कांडीच आहे.
* आर्डीनोचा वापर खर्चिक आहे.
- अजिबात नाही.आर्डीनो हा ओपन सॉर्स प्लॅटफॉर्म आहे.याचे हार्डवेअर बोर्ड इतर बोर्डाच्या मानाने खूपच स्वस्त आहेत.आर्डीनो आय डी ई पण पूर्णपणे फुकट आहे,याच्या अपडेट्स पण फुकट मिळतात.
* आर्डीनो शिकून काय फायदा?
- आर्डीनो ने वापरलेली प्रोग्रामिंग तंत्र एकदम सोपे आहे आणि त्या तंत्राचा वापर आता बऱ्याच मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग मध्ये करायला सुरुवात झाली आहे. जसा की pinguino हा PIC मायक्रोकंट्रोलर साठी, energia हा launch pad बोर्ड साठी, open plc हा plc प्रोग्रामिंग साठी असे बरेच प्लॅटफॉर्म बाजारात यायला लागले आहेत त्यामुळे आर्डीनो चा अभ्यास हा अभियांत्रिकी च्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना गरजेचा बनला आहे.
* अशा या आर्डीनो च्या ट्रेनिंग साठी डॉल्फिन लॅबसने ब्रँच निहाय वेगवेगळे प्रोग्राम तयार केलेले आहेत. हँडस ऑन प्रोग्रामिंग ही डॉल्फिन लॅबसचे खासियत आहे. डॉल्फिन लॅब्स कोणत्याही प्रकारचे रेडिमेड प्रोजेक्ट विकत नाही किंवा प्रोजेक्ट तयार करून देत नाही. ट्रेनिंग झालेवर त्यांच्या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन लागले तर कोणताही आकार लावत नाही.
तरी तुमच्या शाखेच्या विद्यार्थ्यांना आर्डीनो चे ट्रेनिंग द्यायला अवश्य संपर्क करा.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स
9763714860

सॉरी शक्तिमान

आपण सगळ्यांनी शक्तिमान हि मालिका पाहिली असेलच. या शक्तिमान मालिकेने एक मंत्र दिला आणि वयाच्या चाळिशीनंतर सगळ्यांनी त्या मंत्राचा उपयोग करायलाच हवा आणि तो मंत्र आहे "सॉरी शक्तिमान ".
दैनंदिन जीवनात या मंत्राचा वापर करा आणि पहा आणि आपल्या आयुष्यात किती बदल होईल.सर्व साधारणपणे चाळीशी नंतर सर्वांनी एक पातळी गाठलेली असते. घरात, मित्र मंडळीत, समाजात एक स्थान निर्माण केलेले असते.आणि हे सर्व करत असताना बऱ्याच बऱ्यावाईट अनुभवाचा सामना केलेला असतो त्यामुळे थोडासा कडवटपणा आणि थोडासा अहंकार मनामध्ये आलेला असतोच शिवाय स्वतः विषयी एक रास्त अभिमान पण मनात जागृत झालेला असतो.
अशावेळी कधीकधी संभाषण करताना लहान मोठ्या चुका होतात,भांडणं होतात,अबोला वाढतो आपली जरी चूक असली तरी मन माफी मागायला तयार होत नाही आणि कधी कधी तुम्ही जरी बरोबर असला तरी पुढचा माफी मागत नाही.मग मनात राग राहतो , धुसफूस वाढते,चिडचिड वाढते.
मित्रानो अशावेळी "सॉरी शक्तिमान" हा मंत्र वापरा. हा मंत्र तुमची चूक असेल अशावेळी पण वापरा आणि पुढच्याची चूक असेल अशावेळी पण वापरा.हा मंत्र तुम्ही लहान मुलांपासून सर्वांच्या साठी वापरता येतो .फक्त हा मंत्र कसा वापरायचा याची पद्धत आहे.
समजा तुमच्या हातून चूक झाली लगेच चेहऱ्यावर हास्य आणा आणि म्हणा "सॉरी शक्तीमान" पुढचा नक्कीच हसुन तुम्हाला माफ करेल समजा जरी नाही हसला तरी आपल्याला काही फरक पडत नाही कारण चूक आपली असते.
समजा चूक पुढच्याची आहे आणि तो ऐकत नाही अशावेळी पण म्हणा " सॉरी शक्तिमान" आणि यावेळी मात्र पुढचं वाक्य मनातल्या मनात म्हणा "काशीत जा" आणि निघा तिथुन.
मित्रांनो ,आतापर्यंत तुम्हाला मनाच्या शांतीचे महत्व कळून चुकले असेल.आपण आयुष्य भर आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. कितीतरी पैसे घालवतो, कुठे कुठे फिरतो, पण आनंद हा फुकट असतो हेच आपल्याला लक्षात येत नाही. जर मन शांत असेल तर त्यावर आनंदाचे तरंग नक्कीच उमटतील. तरी हा मंत्र वापरायला सुरुवात करा आणि आपले आयुष्य आनंदी करा.
धन्यवाद.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

इंजिनियरिंग वरची हरवलेली श्रद्धा

नुकतंच लग्न झालं होतं. बायकोला घेऊन गेलो होतो शिखरशिंगणापूरला , कुलस्वामीच्या दर्शनाला. रांगेत उभा राहिलो तोपर्यंत काही पुजारी मागे लागले अभिषेक करा म्हणून. अभिषेक करण्या चा दर विचारल्यावर सांगितलं की ग्रुपमध्ये केल्यास 5१/- आणि स्पेशल केल्यास 501/-. खिशात पैसे खुळखुळत होते म्हणून 501 रुपयात स्पेशल करायचा ठरवलं. मनात जरा गर्वपण वाटत होता. गाभाऱ्यात उभा राहिलो. पुजाऱ्याने थोडी वाट पाहायला सांगितले. ग्रुपने अभिषेक चालू होता.कुठली कुठली गावाकडची माणसं ,बायका कलकल करत अभिषेक करत होते. भटजी काय मंत्र म्हणत होते काही कळत नव्हतं आणि व्यवस्थित ऐकू पण येत नव्हतं. भटजी मध्येच काय कळण्यासारखं सांगायचा लोक तसं करायचे .सगळा गोंधळ चालला होता .वाटलं माणसं काही सुधारणार नाहीत. मनातल्या मनात त्यांच्या गावंढळ पणाला हसत त्यांचे निरीक्षण करत होतो आणि अचानक मनात एक विचार आला आणि माझीच मला लाज वाटायला लागली. तो पुजारी काय मंत्र म्हणत होता हे त्यालातरी कळत होतं का हे माहिती नाही पण त्याने पाणी घाला, पिंड धुवा, फुले वाहा हे सांगत असताना तमाम सूचना लोकं ज्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने पाळत होते मला नक्की खात्री वाटली की तो पिंडीचा स्पर्श त्यांच्या मनात नक्कीच एक विश्वास निर्माण करत होता.त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असं त्यांना विश्वास देत होता.त्यांना सांगत होता की तो त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्या डोळ्यात जी भक्ती दिसत होती असे वाटत होतं की तो पिंडीचा दगड साक्षात कैलासराणा बनला आहे आणि त्यांना आश्वस्त करत आहे.
मला लाज वाटली. भरपुर शिकलो, चांगला पैसा आहे. बायकोसोबत स्पेशल पूजा करतोय महागातला महाग हार घेतला आहे पण माझ्या मनात खरंच श्रद्धा आहे का? प्रामाणिकपणें मनातुन उत्तर आलं नाही.अभिषेक झाला पण मन शांत व्हायच्याऐवजी अशांत झालं.मनातून महादेवाची माफी मागून घरी आलो. दरवर्षी जातो पण एक कुलाचार म्हणून . श्रध्दा म्हणून नाही.खरच कितीतरी श्रद्धेची मोठी ताकद मी गमावुन बसलो होतो.
पण हीच श्रद्धा मात्र इंजिनियरिंगविषयी कायम आहे. आज जेव्हा मी काही इंजिनियरिंग विषयी करतो त्यावेळी लोक हसतात. पण मी त्याची फिकीर नाही करत कारण मला माझा महादेव त्यात दिसतो आणि त्यावर माझी अफाट श्रद्धा आहे.कधी कधी अस वाटत की इंजिनिअर हे पण महादेवाचच नाव आहे. "मी इंजिनिअर आहे" हे वाक्य तर मला गायत्री मंत्रासारखा वाटत.आयुष्यातल्या प्रत्येक संकटाच्या क्षणी मी इंजिनिअर आहे आणि मी काहीही करू शकतो हे वाक्य मनाशी उच्चारला की संकटांशी लढण्यासाठी हजार हत्तीचं बळ अंगात येत.
माझा विश्वास आहे जर विद्यार्थ्यांच्या मनात इंजिनियरिंग विषयी श्रद्धा निर्माण करता आली तर नक्कीच इंजिनियरिंगचे माहात्म्य परत वाढेल.
पण ही श्रद्धा निर्माण करायचं सामर्थ्य हे कुठल्याही संस्थेच्या इमारतीत नाही, त्या इमारतीभोवतीच्या रम्य परिसरात नाही, त्या संस्थेला भेटी देणाऱ्या सेलेब्रिटीत नाही, त्या इमारतीमध्ये असणाऱ्या वाय फाय मध्ये नाही,मोठं मोठ्या पदवी घेतलेल्या शिक्षकात नाही, मोठं मोठ्या नामांकित परदेशी विद्यापीठाबरोबर केलेल्या करारात नाही.
ही श्रध्दा निर्माण करण्याचा सामर्थ्य फक्त आणि फक्त इंजिनियरिंग वर श्रद्धा असणाऱ्या शिक्षकात आहे.मग त्याची पदवी कोणतीही असो.कारण देऊळ कितीही शोभिवंत बांधा, मूर्ती सोन्याची घडवा किंवा दगडाची ,अगदी मातीची जरी असली तरी पण त्यामध्ये देवपण आणण्याचं सामर्थ्य फक्त त्या देवावर अफाट श्रद्धा असणाऱ्या पुजाऱ्यातच असत. आता असे पुजारी शोधण्याची गरज आहे . हा लेख वाचणाऱ्यांनी स्वतः ला विचारण्याची गरज आहे की खरंच तुमची इंजिनिअरिंगवर श्रध्दा आहे का? तुमची जर श्रध्दा असेल तर तुम्हाला नक्कीच इंजिनियरिंगला स्कोप दिसेल.
* चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स , पुणे