Wednesday, October 31, 2018

अभियांत्रिकी शिक्षण : दशा आणि दिशा (भाग ९)

अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम – चिंतेचा विषय
अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम बनवणे हा एक वेगळाच सोहोळा असतो. बदलते तंत्रज्ञान, बदलती व्यावसायिक धोरणे , नवीन व्यावसायिक गरजा आणि मागणी याचा अंदाज घेऊन असा अभ्यासक्रम बनवायचा कि ज्यामुळे भावी अभियंत्यामध्ये योग्य ते कौशल्य निर्मिती होईल या साठी दर तीन किंवा चार वर्षांनी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रम मंडळाची बैठक होत असते . या बैठकीत अभ्यासक्रम ठरवला जातो.
अभ्यासक्रम बदलताना नक्की करतात काय? बहुंताश वेळा विषयाची नाव बदलली जातात . जुन्या अभ्यासक्रमातील एखादा काढून टाकलेल्या विषयाचं नवीन अभ्यासक्रमात पुनरुत्थान केल जात. किंवा पहिल्या सत्रातील विषय दुसऱ्या सत्रात / दुसऱ्या वर्षात घुसवायचा झाला. अगदीच झाल तर एखादा नवीन विषय अभ्यासक्रमात घुसवायचा झाला अभ्यासक्रम तयार. हा नवीन विषय घुसवताना त्या विषयाची पूर्वतयारी काय लागेल? त्याची पार्श्वभूमीची तयारी त्या पूर्वीच्या अभ्यासक्रमात झाली का ? याची काळजी काळजी घेतली जात नाही. परदेशातील किंवा देशातील एखाद्या विद्यापिठाचा अभ्यासक्रम जसाच्या तसा उचलला जातो. त्या विषयाचा खरच त्या अभ्यासक्रमासाठी उपयोग आहे का याची खात्री सुद्धा बऱ्याचवेळा करून घेतली जात नाही.
यापेक्षाही घातक म्हणजे प्रकार म्हणजे जे विषय विद्यार्थ्यांना अवघड जातात त्या विषयातील अवघड भाग काढून टाकणे यामध्ये शक्यतो गणिती भागाचा बळी दिला जातो. त्यातील डिझाईनचा भाग काढून टाकला जातो . प्रोग्रामिंग चा भाग काढून टाकला जातो आणि अशा रीतीने त्याविषयाची काठीण्य पातळी कमी केली जातात. काही विषय शक्य झाले तर थेअरीमधून काढून त्याला प्रॅक्टिकल मध्ये टाकायचं आणि तरीही तो विषय झेपत नसेल तर त्याला टर्म वर्कला ठेवायचं . “ C प्रोग्रामिंग” सारख्या विषयावर हि पाळी येते. कधीकधी मला भीती वाटते कि गणित हा विषयच अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमातून काढून टाकतील काय ? विनोदाचा भाग सोडा पण मेटलर्जी , DSP , SOM , TOM, DOS, TOS या विषयातील गणित काढून टाकले तर काय उरेल ते सांगण्याची गरज नाही .
अभ्यासक्रम हा अभियांत्रिकीचा पाया नाही तर तो अभियांत्रिकीचा ढाचा आहे आणि तो गांभीर्याने घेण्याचा भाग आहे . कधीतरी वेळ मिळाला तर एक प्रयोग करून बघा. तुम्ही शिकवत असलेल्या शाखेच्या तीन वर्षाचा अभ्यासक्रम घ्या . एका बोर्डवर तीन वर्षातील सर्व विषयाची नावे लिहून काढा . त्या विषयाखाली शक्य झाले तर त्या विषयातील धड्यांची नावे लिहा . एक बसण्यासाठी योग्य आसन घ्या आणि त्या बोर्डवरील लिहिलेले सर्व नजरेच्या टप्प्यात येईल असं बसा आणि बघा कशाचा कशाला काय ताळमेळ लागतो का? अजून जर खोलात जायचं असेल तर तो अभ्यासक्रमातील मुद्दे बघा . सगळ्यात मोठा विनोद तुम्हाला दिसेल . आमच्या अभियांत्रीकी शाखेच्या आराखडा असा आहे कि त्याला आड आणि बुडच नाही . अमिबा जसा आकार बदलतो तसा आपला अभ्यासक्रमाच स्वरूप आहे याला निश्चित असा आकारच नाही.
आता सगळ्यात महत्वाच आहे ते अभ्यासक्रमाच आरेखन व्यवस्थित केल पाहिजे. अभ्यासक्रम असा पाहिजे कि त्या अभ्यासावर व्यवसाय उभे राहतील ... व्यवसायाच्या गरजेवर अभ्यासक्रम तयार केला तर त्याला काहीही स्वरूप राहणार नाही.
आपले विचार ऐकायला नक्कीच आवडेल .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment