Tuesday, December 25, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३४ )

*** सुकनारं टॅलेंट आणि आटणार हार्डवर्क ***

मन्सूर खुदबुद्दिन सुतार माझा सहावीतील मित्र. दारूच्या आहारी जावून गेला हे ज्यावेळी मी ऐकल त्यावेळी मन चरकल. पाचवी आणि सहावीतील माझा जानी दोस्त. अवांतर वाचनाची पुस्तके ,वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक, वायरी , बॅटरीचे सेल,वायरी , बॅटरीचे बल्ब, डी.सी. मोटारी , टेपरेकॉर्डरची कॅसेट , वेगवेगळ्या आकाराची नट,बोल्टस असल्या गोष्टीमध्ये दोघानाही इंटरेस्ट. दप्तर अशा गोष्टीने भरलेल असायचं. कधीतरी आमच्या एखाद्या शिक्षकांना लहर आली तर ते म्हणायचे महाजन आणि मन्सूर आणा तुमची जादूची पोतडी पुढं. झालं मग आमच्या दप्तरांच छान पैकी डिसेक्शन व्हायचं.
मन्सूरला अभ्यासापेक्षा काहीतरी बनवण्यात खूपच इंटरेस्ट असायचा. त्यात त्याच्या वडिलांच वेल्डिंगच दुकानं मग काय गाड्यांचे वगैरे पार्टस बघायला मिळायचे आणि आमच्या कल्पनेची विमाने पुऱ्या ब्रम्हांडात भ्रमण करून यायची. त्यामुळे त्याचेबरोबर खुपच मजा यायची . पण एकच प्रॉब्लेम होता स्वारीला अभ्यासाचा खूपच कंटाळा. त्यामुळे गृहपाठ , परीक्षा गोष्टीत खूपच मागे होता . त्यामुळे छड्या वगैरे ठरलेलं असायच आणि मार्क्स पण पडायचे नाहीत. पण त्याचा विचार न करता त्याचं कल्पनेचं विमान सुसाट सुटलेलं असायचं आणि त्याच्या मागे बसायला मलाही आवडायचं. सातवीनंतर मी दुसऱ्या शाळेत गेलो. मग हळूहळू संपर्क तुटत गेला . कधी कधी त्याचेबरोबर भेट व्हायची नंतर पूर्ण संपर्क तुटला. तो काही जास्त शिकला नाही. लवकरच त्याने मशिनरी वगैरे दुरुस्तीची कामे घ्यायला सुरुवात केली होती. त्यात त्याचा चांगला जम बसला होता असं कळलं होतं. मनात खूप इच्छा असायची त्याला भेटायची पण गेली कित्येक वर्ष भेटच झाली नाही. आणि आता हि बातमी जेव्हा ऐकली तेव्हा खूपच वाईट वाटले.
मला वाटते आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अशा गोष्टीचा अनुभव घेतला असेल. आपल्या वर्गात शिकणारी,आसपासची बरीच हरहुन्नरी मुले नंतर योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने वाया गेलेली तुम्हाला दिसतील. अशी मुले अभियांत्रिकी शिकत असतानाही आपल्याला भेटतात. यांची दुनिया वेगळी असते आणि त्यात डोकावण्यासाठी कुणाला वेळ नसतो. खऱ्या अर्थाने हि मुले टॅलेंटेड असतात पण हि मार्कांच्या पट्टीत कधीच बसत नाहीत. यांच मन असत कल्पनांनी भरलेल आणि तीच त्यांची ताकद असते. मन कल्पनेत वावरत असलेने यांना व्यवहार जमत नाही. त्यांच्या कल्पनेचा वेग आणि या जगाची चाल यांचेमध्ये खूपच फरक असतो.तसच अभियांत्रिकीचा बनलेला पुस्तकी अभ्यास त्यांना पेलत नाही कारण हा अभ्यासक्रम कल्पनांना वाव देत नाही तो टॅलेंटला वाव देणेसाठी नाही तर हार्डवर्क मोजण्यासाठी केलेला आहे . त्यामुळे हळूहळू यांच्या मनात डिप्रेशन येत, तासाला बसत नाहीत , दांड्या मारतात आणि हळूहळू व्यसनाचे आहारी जाताना दिसतात.
हि बाब फक्त विद्यार्थ्याबाबतच घडते असं नाही तर आपल्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये काही शिक्षकाबाबतही घडत असते . काही शिक्षक असतात हुशार . सतत ते काहीना नवीन काही तरी करत असतात . त्यांना प्रयोग करणे आवडते. त्यांना पी. एच. डी. वगैरे कागदामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. पण त्यांना वाव दिला जात नाही किबहुना त्यांना वाव देण्याची कोणती विशेष व्यवस्था आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केलेली आढळून येत नाही. अशा व्यक्तींना कुजवन्यातच धन्यता मानली जाते. त्यामुळे अशा शिक्षकांचाही नंतर शिकवण्यातील रस निघुन जात आहे .
टॅलेंट आणि हार्डवर्क या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीत असणे हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे. आमच्याकडे हार्डवर्कला अतिशय महत्व दिलेलं आहे आणि त्यामुळे टॅलेंट सुकून जात आहे.
टॅलेंट म्हणजे झरा आणि हार्डवर्क म्हणजे भरलेल्या टाक्या. टॅलेंटनं हार्डवर्क करायचच नसत त्याला मुक्त सोडायचं असत . मुक्तपणे. या झऱ्याच पाणी उपसायच असत .त्याच्या कल्पनेवर काम करायला हार्डवर्क करणारी माणसे लावायची असतात. पण आमच्याकडे या झऱ्याभोवती कठडे केले जातात आणि यांच्या विहिरी बनवतात लागेल तेव्हा पाणी हापसतात आणि त्यांची तुलना साठवलेल्या पाण्याबरोबर करून परत त्याच विहिरीची टिंगल करतात. आता हळूहळू सगळीकडेच दुष्काळ पडत चालला आहे. हार्डवर्कपण आटत चालल्या आहेत. आता परत टॅलेंटला शोधून त्यांना जपलं पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्याची हार्डवर्क बरोबर व्यवस्थित सांगड घातली पाहिजे .नाहीतर भवितव्य अवघड आहे .


No comments:

Post a Comment