Tuesday, December 11, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २९ )


*** इंडस्ट्री व्हिजीट: औद्योगिक भेट कि मनोरंजन सहली ***

गेल्या महिन्यात रायगडावर ट्रेकिंगला गेलो होतो . रात्रीचे नऊ वाजता धापा टाकत एक ग्रुप रायगडावर आला. पायरी मार्गाने आलेमुळे दमला होता. त्या ग्रुपमध्ये काही मुली होत्या त्या रडत होत्या. चौकशी केली तर तो ग्रुप धुळ्याकडील एका इंजिनियरिंग कॉलेजच्या कॉम्पुटर डिपार्टमेंटचा होता .अधिक चौकशी केली तर कळलं कि ते इंडस्ट्री व्हिजीट द्यायला पुण्याला आले होते .एकदोन कंपन्या पाहिल्या आणि मग फिरायला म्हणून रायगडावर हा ग्रुप आला होता. कुणाला रायगड विषयी जास्त माहिती नाही आणि रायगड चढायचा म्हणजे हजारच्यावर पायऱ्या चढायला लागतात याविषयी काहीही माहिती नाही. इतक्या उशिरा परत फिरायची सोय नाही. इतक्या पायऱ्या चढायची सवय नसल्यामुळे त्या मुली अगदी मेटाकुटीला आलेल्या होत्या. त्यांची अवस्था खराब झाली होती . त्यांनी होळीच्या माळावर आलेवर त्यांनी  मटकन बसकण मारली आणि आता त्या हलायला ही तयार नव्हत्या, त्यांच्या अंगात ते त्राणही उरलं नव्हतं . शिक्षक कोण आहेत ते पाहिलं तर अजूनही मिसरूड व्यवस्थित न भरलेले शिक्षक पाहिल्यावरच कल्पना आली. कसलीही माहिती नाही आणि इंडस्ट्री व्हिजीटच्या नावाखाली उत्साहाच्या भरात हे रायगडला आले होते .डोकं सटकल होत पण काय बोलणार?
इंडस्ट्री व्हिजीट हि मुलं जे शिकतात ते ज्ञान व्यवसायात कुठं वापरतात? यावर कोणते उद्योग चालतात?
कोणते उत्पादन तयार होतं? उद्योगाच इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं? त्या उद्योगातील उद्योजक ,तेथील मॅनेजर ,वर्कर ,तिथं वापरली जाणारी मशिनरी  याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून असते. पण या इंडस्ट्री व्हिजीटच रुपांतर पर्यटन सहलीत कधी झालं हे कळलंच नाही . या इंडस्ट्री व्हिजीटला मार्क्सपण ठेवले आहेत त्यामुळे घेणे गरजेचे. पण निव्वळ इंडस्ट्री व्हिजीट करायची म्हणजे मूलंपण येत नाहीत. मग काय एकदोन उद्योगांना भेटी आणि त्याबरोबर भरपूर पर्यटन असा सुवर्णमध्य साधला गेला आहे . काही संस्थांनी तर या इंडस्ट्री व्हिजीटच भांडवल  विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी केला आहे तर काही संस्थानी या इंडस्ट्री व्हिजीटचा उपयोग पैसे सुरु कमावण्यासाठी केला आहे . उद्योग भेटीसाठी हे विद्यार्थी काश्मीरपासून ते कन्याकुमारीला जातात. अशा उद्योग भेटी घडवून आणणारे एजंट आणि एजन्सी सुरु झाल्या आहेत . वेगवेगळी पॅकेजेस तयार होत आहेत. या उद्योग भेटीमधून खरंच काय साध्य होतं ?
बऱ्याच वेळा या इंडस्ट्री व्हिजीटच्या नावाखाली केवळ टाइमपास केला जातो. इतर वेळी चांगल्या ट्रेनिंगसाठी पैसे भरताना तोंड मुरडणारी मुलं या इंडस्ट्री व्हिजीटसाठी पैसे आणायला काहीही खळखळ करत नाहीत. इंडस्ट्री व्हिजीट आहे म्हणून पालकही मुकाटपणे पैसे देतात विचार करतात जावुदे तेव्हडीच पोराची हौस. पण या सगळ्या गोष्टीमुळे इंडस्ट्री व्हिजीटच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे हे कुणीही लक्षात घेत का नाही?
इंडस्ट्री व्हिजीटसाठी घरापासून हजारो मैल जायची खरंच गरज आहे काय ? इतकं दूर ज्या उद्योगाला मुल भेट द्यायला जातात तिथं असं काय बनतं जे आपल्या भागात बनत नाही. असं काय वेगळपण आहे त्या उद्योगात कि तिथ गेलेवरच शिकायला मिळेल?  याचा विचारच केला जात नाही. बरं जात असताना तिथल्या वातावरणाचा , हवामानाचा , अनुकूल वेळचा ,धोक्याचा पण अभ्यास केला जात नाही त्यामुळे उद्भवणाऱ्या संकटाचा अंदाज येत नाही आणि दुर्घटना घडत असतात.
याचा अर्थ उद्योगांना भेटी देऊ नये असा होत नाही त्या अतिशय गरजेच्या आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या उद्योगभेटी या अतिशय महत्वाच्या आहेत. हे उद्योगाची जागा म्हणजे एक त्यांचेसाठी मंदिरं आणि उद्योग क्षेत्रे (MIDC) त्यांचेसाठी खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहेत असं मी मानतो. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्याला सोल्डरिंगचा वास , मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना फ्लोअरवरचा ऑईलचा गोडसर वास , आय. टी. ,कॉम्पुटरच्या विद्यार्थ्यांना टिपिकल आय टी कंपनीत येणारा वास हे उदबत्ती आणि धुपासारखे वाटले पाहिजेत आणि त्याची त्यांना आवड लागली पाहिजे. त्यांनी सतत नवनवीन उद्योगांना भेटी दिल्या पाहिजेत. पण या भेटी देताना ज्ञानार्जन हा एकच उद्देश असेल याची काळजी घेतली पाहिजे.


पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment