Thursday, December 6, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २७ )

कोण्या एका गावात एक भजीवाला होता . त्याच्या हातच्या भजीच्या चवीची पंचक्रोशीमध्ये ख्याती पसरली होती . खूपच चांगला व्यवसाय चालला होता. छान हॉटेल बांधलं होत आणि मजेत संसार चालला होता. त्याचा मुलगाही हुशार होता म्हणून त्याला त्याने खूप शिकवायचं ठरवलं होत . पदवीपर्यत तालुक्याच्या ठिकाणी शिकल्यावर त्याला एका चांगल्या हायफाय मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये घातलं. पोरग दर आठवड्याला गावी आलं कि तो बापाला नवीन नवीन गोष्टी सांगायचा. बाप पण कौतूकान ऐकायचा. एक दिवस पोरानं जगाच्या बाजारात मंदी येणार आहे आणि कॉस्ट कटिंग केल पाहिजे असं काहीतरी वाचलं. तो काळजीत पडला. रविवारी घरी आलेवर गंभीरपणे म्हणाला कि बाबा मंदी येणार आहे म्हणून आपण कॉस्ट कटिंग केली पाहिजे. वडिलांना काही कळेना पण येव्हड शिक्षण घेतलेलं पोरग सांगतय तर काहीतरी वेगळ होणार असं त्याला वाटलं . भांबावला तो. पोरग जास्त वाचायला लागलं आणि कॉस्ट कटिंगवर अक्कल पाजळू लागलं. बापाला काय सुचेना त्याच्या डोक्यात मंदी आणि मंदीनंतर काय होणार या चिंतेने तो घाबरू लागला . पोराचे सल्ले ऐकू लागला. 
पगाराचे पैसे वाचवण्यासाठी त्याने हॉटेलमधील हाताखालची माणसं कमी केली.लाईट बिल वाचावयाच्या नादात हॉटेलवरील रोषणाई कमी केली. माल कमी दर्जाचा वापरायला सुरु केली. रोजच्या पेक्षा भजी कमी करायला सुरुवात झाली. प्लेटा गेल्या,कागद आले. दिवसभर मंदी येणार या चिंतेच्या तणावाने चेहऱ्यावरचे हसू मावळले. त्यामुळे वागण्यात चीड चीडपणा यायला लागला परिणामी गिऱ्हाईक तुटू लागले. त्यामुळे परत तणाव परत कॉस्ट कटिंग.. हळूहळू हॉटेलची कळा गेली . त्याचा फायदा घेउन दुसर हॉटेल शेजारी उभं राहिलं.याच सारं गिऱ्हाईक तिकड जाऊ लागल,धंदा बसत गेला आणि एक दिवस मंदी दारात आली त्यान हॉटेल बंद केलं. पोराला म्हणाला बरं झालं तुला शिकायला पाठवला म्हणून मंदी येणार ते आधीच कळल तु शिकला नसता तर खूपच वाईट झालं असत . म्हणून पोराला शाबासकी देऊन त्याच्या हुशारीची तारीफ सगळ्यांना सांगत फिरू लागला. 
सध्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अवस्थेची कारणे वरच्या गोष्टीत आढळून येईल. बऱ्याच व्यवस्थापनाने या मंदीचा धसका घेतला आहे त्यातच अतिशहाणे लोक त्यांना सल्ले देत आहेत, काहीजण स्वत:च्या डोक्याने कोस्ट कटिंग करायला सुरुवात केली आहे. पण या सगळ्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे आणि परत त्याचा विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होत आहे. हे चक्र गेले चारपाच वर्ष चालू आहे. आता तर सगळीकडे हतबलता आली आहे. गुणवत्ता वाढवण्यासाठी पैसे खर्च करायच्या ऐवजी मानांकने मिळवण्याठी पैसे उधळायला सुरुवात झाली आहे. आता या मानांकनामधील फोलपणा सगळ्यांच्या लक्षात येउ लागला आहे . किती दिवस त्या मानांकनाच्या जीवावर जोगवा मागायचा हे आता कळल पाहिजे. रोगी जेव्हा अतिदक्षता विभागात असतो त्यावेळी त्याच्यावरचा खर्च वाचवायचा नसतो तर त्याला वाचावयाच असत. हे सोपं सूत्र विचारात घेतलं पाहिजे.
हि खरी वेळ आहे काम करायची , विद्यार्थ्यासाठी कष्ट घ्यायची. त्यांचेसाठी नवीन योजना राबवण्याची. शिकत असलेला विद्यार्थी कसाही असो त्याविषयी कुरकुर न करता त्याला शिकवण्यासाठी तळमळ जागवण्याची . प्रत्येक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षकांना विश्वासात घेतलं पाहिजे. नवीन विद्यार्थी केंद्रित योजना आखायला पाहिजेत . त्या आखताना दुधात मिठाचे खडे टाकणारे वेळीच बाजूला केले पाहिजेत. शिक्षकांनीही ठरवलं पाहिजे कि येणारी तीन वर्ष जे काहीही होईल ते कष्ट करू आणि असे विद्यार्थी घडवू कि त्यानंतर अॅडमिशनसाठी भिकाऱ्यासारखे गावोगावी कुठल्या क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये फिरायची वेळ येणार नाही. शेवटी काहीही असो जर गुणवत्ता असेल तर विद्यार्थी जगाच्या कुठल्याही टोकाकडून तुमच्याकडे येईल ... अगदी झक मारत . 
एक गोष्ट आयुष्याने शिकवली आहे कि विहीर हि दुष्काळातच खणायची असते. जर पाणी लागलं तर ते पाणी कायमस्वरूपी मिळेल आणि जरी नाही लागले तरी आपल्या प्रयत्नामुळे ती इतकी खोल गेलेली असेल कि एका पावसात आयुष्यभर पुरेल इतक पाणी साठेल.
पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.com या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment