Sunday, December 23, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३३ )

*** अडाणी शहाणे आणि शिकलेले अडाणी ***

प्रसंग एक : १९९७ साल . घरात आत्तीन दिलेला जुना शटरचा टीव्ही. बारा वर्ष वापरून( कि ताबलून ?) जुना झालेला म्हणुन स्वत:साठी नवीन घेताना हा जुना काय करायचा म्हणून भावावर केलेला उपकार. त्याला घरी आणला पण चित्र काही व्यवस्थित यायचं नाही. मी इंजिनियरिंगला दुसऱ्या वर्षाला होतो. वडिलानी सांगितले बघ काय होतंय ते खोलून. म्हटलं मला काय त्यातलं अजून येत नाही. बाप सटकल. म्हणालं तुला कशाला झक मारायला इलेक्ट्रोनिक्सला घातलाय काय? मी म्हणालो असल काय आम्हाला शिकवलेलं नाही. बाप परत चिडल. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये बघतोय तर बाप एच. ओ. डी. केबिनजवळ . विचार केला हि काय बला झाली पण विचारायची टाप नव्हती. एच. ओ. डी. आमचा राजा माणूस डी.डी.शहा सर. वडिलांनी विचारलं कि आम्ही एव्हड कष्ट करून हाडाची काड करून पोराला शिकवतोय आणि त्याला साधा टीव्ही रिपेअर करता येत नाही. काय शिकवताय तुम्ही त्याला? सरांची माझ्या वडिलांची समजूत घालता घालता पुरेवाट झाली. शेवटी वडलांनी सांगितलं कि पोराला बडवा , मारा, पुरा मी काही तुम्हाला विचारणार नाही पण माझ्या पोराला काय आल नाही तर मात्र चप्पल घेऊन येणार.
प्रसंग दुसरा: २०१२ साल .मी शिक्षक. विद्यार्थी नियमित येत नाही , प्रॅक्तीकलला बसत नाही, तासाला बसायचं सोडून कॉलेजच्या आवारात बोंबलत फिरत असतो म्हणून त्याचे वडिलांना फोन केला. कॉलेजन जबरदस्तीन आमच्यावर लादलेलं कर्तव्य . सांगायला गेलो तर ते डायरेक्ट म्हणाले कि काही सांगू नका मला सगळ माहिती आहे मी पण एका इंजिनियरिंग कॉलेजचा व्हाइस प्रिन्सिपल आहे. काही फरक पडत नाही. डोक्यावर हात मारून घेतला आणि कानाला खडा लावून घेतला.
मला वाटत वरींल दोन प्रसंग बऱ्याच जणांनी थोड्याफार फरकांनी अनुभवले असतील .
आजचा पालक शिकलेला( कि हुकलेला?) आहे. मोठ्या कष्टांनी त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिक्षण दिल आहे आणि त्यांनी सुद्धा खूपच कष्ट केले . शिक्षणासाठी खूपच हाल अपेष्टा भोगल्या . एक वेळच्या अन्नाला पण मोताद झालेले असतानापण त्यांनी शिक्षण घेतलं . आज जे सुख ते भोगत आहेत ते केवळ शिक्षणाच्याच ताकदीवर. पण स्वत:ला कष्ट करायला लागले ती वेळ आपल्या मुलावर येउ नये म्हणून हाच पालक मुलांचे अपार लाड करत आहे आणि त्याला मेहनत करण्यापासून परावृत्त करत आहे हि दुर्दैवाचीच गोष्ट आहे.
आज हि जी अभियांत्रिकी शिक्षणाच्या वेळ आली आहे त्याला पालक पण जबाबदार आहे . अभियांत्रिकी शिक्षण यंत्रणेचा पालक हा पण अतिशय महत्वाचा घटक आहे हे पालक विसरत चालला आहे . चार पैसे फेकून शिक्षण विकत घेता येत नाही तर त्याबरोबर पोरानं पण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या अभ्यासाची जबाबदारी पालकाची पण असते हेच तो विसरत चालला आहे . पैसे देतोय तर हे सगळ काम कॉलेजने केलं पाहिजे अस त्याला वाटत आहे . सहा महिन्यातून एकदा होणाऱ्या पालक मिटींगला यायला यांना वेळ नाही. पोरांना शिक्षा करायची तर परत अडचण , प्रात्यक्शिकाला नाही बसवायचा तरी प्रोब्लेम , त्यांना रागवायचं तरी प्रॉब्लेम. त्याला काही बोलायचं तरी प्रोब्लेम ....काय करायचं कॉलेजने. दगडानच जर छिन्नी मारून घ्यायला नकार दिला तर शिल्पकार काय डोंबल करणार. मग मूर्ती घडवणेसाठी लागणारे कष्ट घेण्यापेक्षा लाल रंग माखला कि झालं. हेच सगळीकडे चालू आहेत. स्वत:ला पोरग ऐकत नाही मग शिक्षकांनी काय करायच?. त्याचेजवळ काय जादूची छडी आहे काय ? हा पालकांनी पण विचार केला पाहिजे.
कधी कधी अस वाटत कि शिकलेल्या पालकांनी स्वत: जेव्हड त्यांचे मुलाचं नुकसान करत आहे तेव्हड त्याचे दुश्मन पण वाईट चिंतत नसतील .आज शिक्षणाची किंमत यांनीच ठेवली नाही. यांचेपेक्षा अडाणी आणि कमी शिकलेले बाप बरे होते.
शेतकरी पालक पिक लावलेवर दर दोन दिवसाने रानाकड जाऊन मशागत करतो. नोकरदार पालक रोज संध्याकाळी खर्चाचा अंदाज घेतो. व्यावसायिक पालक तर क्षणाक्षणाला फायदा तोट्याचा अंदाज घेत असतो . प्रत्येकाला आपल्या गुंतवणुकीची काळजी आहे. मग स्वत:च पोरग शिकतंय , ती पण एक गुंतवणूकच आहे हे कसं यांना कळत नाही . एव्हडी मोठी गुंतवणूक केली आहे तर तर त्याच्या प्रगतीचा महिन्यातून एकदा कॉलेजमध्ये जाउन अंदाज घेता येत नाही काय ?
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment