Friday, December 7, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २८ )

*** विझलेली स्वप्ने आणि हरवलेले शिक्षण ***

अभियांत्रिकीच्या सध्या आलेल्या अवस्थेचा अभ्यास करत असताना धक्कादायक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे  विद्यार्थ्यांना ते जे शिक्षण घेतात ते काय आहे? ते  कशासाठी आहे? हेच माहित नाही. आश्चर्य वाटलं ना ? पण खरंच हे सत्य आहे. विद्यार्थ्यांना हेच माहित नाही कि इंजिनियरिंग शिकायचं म्हणजे नक्की काय शिकायचं ?
त्यांना एकच माहिती आहे कि घोकून पेपरमध्ये मार्क्स मिळवायचे , प्रॅक्टिकलला मार्क्स शिक्षक देतातच. किबहुना त्यांचा तो हक्कच आहे . फर्स्टक्लास मिळवायचा आणि  मस्तपैकी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिलेक्ट व्हायचं ,मिळेल त्या कंपनीत घुसायच. बाकी कुठला विषय? त्यात काय आहे ? तो कशाशी खातात याचे त्यांना काहीही घेणे देणे नाही. नोकरी मिळाली बस झालं. समजा नाही मिळाली प्लेसमेंट तर मग काय ? मग करा कुठलातरी कोर्स मिळतोय जॉब. याबाबत त्यांचे सिनियर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत असतातच. काहीही नाही झालं कि मग घरचा व्यवसाय/धंदा  आहेच.
लाखो रुपये देउन जे विषय शिकायचे आहेत त्या विषयासाठी रफ नोटबुक वापरण्याच्या त्यांच्या  दलिंदर मनोवृत्तीवरून अभियांत्रिकी शिक्षणाचं अवमूल्यन विद्यार्थ्याच्या मनात किती खाली झाल आहे हे कळून येत. वीस ,पंचवीस हजार रुपयाचा फोन बाळगणारा विद्यार्थी जेव्हा दोन/तीन  रुपयाच युझ आणि थ्रो पेन वर्गात नोट्स लिहून घ्यायला वापरतो त्यावेळी तो शिकत असणाऱ्या ज्ञानाला काय किंमत देतो हे लक्षात येऊन तळपायाची आग अगदी मस्तकात जाते. पहिल्या लेक्चरला नियमाने उशीर करताना त्यांना काहीही वाटत नाही अगदी कॉलेजच्या शेजारी राहणारी मुलेहि वेळेवर येत नाहीत. ऐंशी टक्के पेक्षा जास्त हजेरी असणारी मुले हि फक्त हजेरी पुस्तकातच असतात. बऱ्याच महाविद्यालयातील विद्यार्थी हे क्लास टेस्ट आणि सराव परीक्षेच्यावेळी काहीही अभ्यास न करता येतात. उत्तरपत्रिका कोऱ्याच देतात. दोन तासाच्या सराव परीक्षेला अर्धा तासही बसायची त्यांची इच्छा नसते आणि बळजबरीने बसवले तर निवांत डोकं बाकावर ठेवून निर्लज्यपणे झोपण्यापर्यंत मजल या विद्यार्थ्यांची गेली आहे . शिक्षकपण कशाला डोक्याला कटकट म्हणून सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करतात .
सगळ्यात दु:खाची गोष्ट म्हणजे आमच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यापुढे आदर्श नाहीत,गेल्या काही वर्षापासून ते घडलेच नाहीत. आदर्श हा संघर्षातून घडतो पण सामाजिक आणि शैक्षणिकक्षेत्रात आजकाल  कामाचा  संघर्ष इतका कमी केला आहे आणि बिनकामाचा संघर्ष इतका वाढवला आहे  कि त्यामुळे सगळ वातावरण बुळचट ,किरकिरं आणि कटकटीच  झाल आहे.  चमच्याने भरवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यामध्ये संघर्ष करायची वृत्तीच निघून गेली आहे. यांचे आदर्श म्हणजे म्हंजे सिनेअभिनेते किवा एखादा खेळाडू . जी काही थोडीफार आय.आय.टी. आणि परदेशातील इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांची उदाहरणे आहेत  ती पण ज्यांनी अभियांत्रिकी  शिक्षण अर्धवट सोडून स्वबळावर अस्तित्व निर्माण केले आहेत त्यांची . गेल्या कित्येक वर्षामध्ये अभियांत्रिकीचा महत्व सांगणारा एकही चमचमता तारा बनलाच नाही . जे काही घडले ते पाट्या टाकणारे हाय टेक क्लार्कस.
विद्यार्थी स्वप्न बघायची विसरूनच गेलेले आहेत . जी काही डोळ्यापुढे आहेत ती चायना मालाप्रमाणे फुटकळ आहेत आणि किती काळ त्यांच्या मनात राहतील याची शाश्वती नाही. अफाट अस स्वप्न पाहावं आणि ऊर फुटेस्तोपर्यंत त्याचा  पाठलाग करावा अशी धमक आता यांच्यात उरलेली नाही. थोड्या थोड्या कारणाने अस्वस्थ होणारी हि पिढी कुठल्याही विषयात खोल जायला तयार नाही.
का झालं हे असं? साधारणतः वीस ते पंचवीस वर्षापूर्वी बस थांब्यावर  उभा राहिलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी हा शंभर पोरामध्ये ओळखून यायचा. त्याच्या वागण्यामध्ये एक attitude दिसायची. आजचं  शिक्षण हे पदवी देत आहे पण attitude घडवायला कमी पडत आहे. मुलामधील अभियंता जागवणेऐवजी पदवीचा कागद देत आहेत . पैसे देऊन पदवी विकत घेता येईल पण ही attitude कुठून आणायची?
आता खरी गरज आहे यांचेपुढे आदर्श निर्माण करणेची. त्यांचेमध्ये attitude जागविणेची , त्यांच्या डोळ्यात नवीन स्वप्ने भरायची ,ते इतक्या सहज पणे होणार  नाही पण त्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत.

पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

1 comment:

  1. Sahi kaha, lekin iske liye syllabus restructuring ki zaroorat hai,practical aspects include karne ki zaroorat hai

    ReplyDelete