Monday, December 17, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३० )

*** देवपण हरवलेले शिक्षण ***
एका गावात एक श्रीमंत राहात होता . त्याला देव पहायचा होता . त्यासाठी तो खूप साधुना , संताना , बुवांना भेटला. वाटेल तितका पैसा द्यायला तयार होता. पण देव दाखवणारे भेटत नव्हते . शेवटी एकाने सांगितले कि अमुक एक साधू आहेत ते दाखवतील. तो साधूला भेटला.साधूने देव दाखवायचं कबूल केल आणि वेळ पाहून त्याला त्यादिवशी सकाळी बोलावलं.
सकाळी उठून तो गेला. साधुमहाराजांच्या काखेत झोळी होती. त्यांनी त्याच्या खांद्याला अडकवली आणि न बोलता त्यांचे मागे यायची खूण केली. झोळी थोडी जडच होती. मुकाट्याने तोही त्यांचेमागे चालू लागला. बराच वेळ ते चालत एका डोंगराचे पायथ्याशी आले. साधु महाराजांनी डोंगर चढायला सुरुवात केली. याचे जवळ झोळी असलेने तो दमला त्याने हळूच झोळीत पाहिले तर चार विटा होत्या . त्याने साधुमहाराजची गयावया केल्याबर साधू महाराजांनी एक विट टाकायला परवानगी दिली. वजन थोडे हलके झाले. थोड्यावेळाने परत दम लागायला सुरवात झाली . आता साधू महाराज परवानगी देईनात. मग त्याने वाद घालायला सुरुवात केली. मग शेवटी साधू महाराजांनी परवानगी दिली. मग त्याने दुसरी विट टाकली.मग परत थोड्यावेळाने हळूच तिसरी विट टाकली . त्याची हि विट साधूमहाराजाने पाहिली होती पण ते काही बोलले नाहीत. ते शांत पणे चालत होते . आता तो निर्ढावलेला होता. त्याने चौथी विट साधुसमोर फेकून दिली. वजन हलके झाले होते.
आता ते डोंगराच्या माथ्यावर आले होते . त्याने साधुमहाराजांना विचारले देव दाखवा. साधू महाराज हसू लागले. म्हणाले मी कुठून आता दाखवू . तु टाकलेले विटा या मी पंधरा साधना करून सिद्ध केल्या होत्या. त्या विटावरच देवच अवतरण होणार होत . आता मी काही करू शकत नाही. श्रीमंत रडू लागला . मग त्याने साधूला वचन मागितले कि या झालेल्या प्रकारावर ते काहीही बोलणार नाहीत.
मग खाली आलेवर श्रीमंताने सांगायला सुरुवात केली कि त्याला देव भेटला. कुणी साधूला विचारले कि साधू फक्त मंद स्मित करायचे.
वरीलप्रमाणे आमच्या अभियांत्रिकीमध्ये घडते आहे. अभियंता बनायचे म्हणून विद्यार्थी महाविद्यालयात येतात. पण प्रत्येक वर्षी अभ्यास करायचा सोडतात. शेवटी रडत बसतात काहीही येत नाही. हातात फक्त पदवीचा कागद येतो . अर्थात इथे तप:साधना करणारे साधुपण खूपच कमी राहिलेले आहेत आणि कस लावणारे ज्ञानाचे डोंगर पण संपलेले आहेत .इथ फक्त संधीसाधुची भरमार होत आहे . आता खरी गरज आहे खऱ्या साधूंची पण हे साधू शोधणार कसे कारण ते देव दाखण्याची पदवी गळ्यात घेउन थोडेच फिरतात. आणि त्यांना ओळखणारे पण राहिलेले नाहीत.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment