Thursday, December 6, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २५ )

*** थोड डॉल्फिन लॅब्सविषयी ***
अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राविषयी लिहिण्यासारखं बरंच आहे आणि ते चालुच राहिल कारण तो इतक्यात संपण्यासारखा विषय नाही. पण बऱ्याच लोकांना माझेबद्दल आणि डॉल्फिन लॅब्स बद्दल जिज्ञासा आहे तर थोडी त्याविषयी माहिती देतो. 
मित्रानो ,२००६ साली मी चुकून शिक्षणक्षेत्रात आलो . त्यापूर्वी मी उद्योगक्षेत्रात काम करत होतो . तसा मी इलेक्ट्रोनिक्स शाखेचा विद्यार्थी आहे पण मला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या शाखेशी निगडीत डिझाईनविषयक काम केल त्यामुळे त्या शाखेविषयी बरीच माहिती झाली. त्यावेळी एम्बेडेड सिस्टममध्ये काम चालत असलेने कॉम्पुटर प्रोग्रामिंग आणि कर्नेल डेव्हलपमेंटचा अनुभव आला. अशा रीतीने अभियांत्रिकीच्या पाचही शाखामधून कामाचा बऱ्यापैकी अनुभव घेतला होता. 
या क्षेत्रात आलो त्यावेळेसच जाणवलं होत कि इथं काहीतरी चुकत आहे. माझेपरीन मी त्यावेळी सहकाऱ्यांशी,वरिष्ठांशी या विषयावर चर्चा करायला सुरवात केली पण त्यावेळी बाजाराला तेजी यायला सुरवात झाली होती त्यामुळे कुणालाही चर्चा करायला रस नव्हता. याकाळात मी स्वत: बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतला . माझी टिंगलटवाळी ,कुरघोडी,उपहास, अपमान हे करणारेही हि खूपच जण होते . उद्योग क्षेत्रातून आलेला माणूस म्हणजे समुद्रातला मासा जर विहिरीत चुकून आला तर त्याची काय अवस्था होते ती मी अनुभवली. या शिक्षणक्षेत्रामध्ये बरेच चांगले लोक भेटले ...तसं मुळात कुणीही वाईट नसत पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत नाही. चांगला मंत्र समजला. त्यामुळे मित्रही वाढत गेले. सगळ्याच शाखेत रस असलेने सगळ्या शाखामधील शिक्षकांशी संबंध वाढत गेले.
हळूहळू कळत गेलं कि कुणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सगळे एका प्रवाहाचा भाग आहेत त्यामुळे त्यानाही प्रवाहाप्रमाणे वाहत राहणे भाग आहे. मनाला एक शांती मिळाली. मग या शिक्षणक्षेत्रावरच प्रयोग करायला सुरुवात केली. बरेच चांगले आणि स्वत: ओढवून घेऊन वाईट अनुभव घेतले . त्यातून बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. 
अशातच २०१२ साली एक विद्यार्थी मला म्हणाला, सर,काहीतरी काम द्या नोकरी मिळत नाही. तसा तो साधारण विद्यार्थी होता . गणेश कळंबे त्याचं नाव. त्यावेळी त्याचेसाठी काहीतरी कराव म्हणून त्याला माझे घरी काही पार्टस होते त्यातून थोडं सर्किट बनवायचं काम दिल. थोडे दिवस रुळला त्याला काम मिळाल . मग दुसरा आला त्याच नाव शैलेश आडनाव विसरलो. तो थोडे दिवस होता. अर्थात हे काम म्हणजे पदरचे पैसे घालणच होत. नंतर त्यालाही जॉब मिळाला . आज गणेश कळंबे सिमेन्स मध्ये आर. अँड डी. इंजिनियर आहे. अतिशय सामान्य विद्यार्थी पण त्याला मार्ग मिळाला . शैलेशही पण आज चांगल्या मोठ्या पदावर आहे . हि कदाचित डॉल्फिन लॅब्सची सुरुवात होती. डॉल्फिन लॅब्सवर लिहायचं म्हणजे कादंबरी होईल. लवकरच डॉल्फिन लॅब्सची गोष्ट या नावाने त्यावरील लेखन प्रसिद्ध करण्याचा माझा मनोदय आहे.
हळूहळू शिक्षक या शब्दाच्या जबाबदारीची जाणीव होउ लागली . शिक्षक या शब्दाला मान देउन डॉल्फिन लॅब्सने बरेच उपक्रम हाती घेतले . जर एखादी गोष्ट मी करु शकत नाही तर त्या गोष्टीची जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही या गोष्टीच भान आलं. कुठलाही विद्यार्थी टुकार नसतो हे कळल.कितीतरी वाया गेलेले विद्यार्थी डॉल्फिन लॅब्समध्ये आले आणि मार्गाला लागले. काही विध्यार्थ्यांना उद्योगात रस होता त्यानाही डॉल्फिन लॅब्सने मदत केली. जवळ जवळ एकवीस उद्योगाची सुरवात डॉल्फिन लॅब्समध्ये झाली. जवळ जवळ अकरा पेटंटच्या मागे डॉल्फिन लॅब्सचा खारीचा वाटा आहे.डॉल्फिन लॅब्समध्ये जो आला तो मोकळ्या मनाने कधीच परत गेला नाही आणि यापेक्षाही पुढे जावून मी म्हणेन कि जे डॉल्फिन लॅब्समध्ये आले ते डॉल्फिन लॅब्सचेच झाले.
डॉल्फिन लॅब्समध्ये तिसरी पासून अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या शाखेचे विद्यार्थी येत असतात.डॉल्फिन लॅब्सचा मेंबर जो आठवीत आहे तो सुद्धा बी. इ. फायनल इयरच्या तोडीचा प्रोजेक्ट एकटा करू शकतो.याला कारण आम्ही शिकवण्याची एक वेगळी पद्धत विकसित केली आहे . या पद्धतीवरच आधारित आम्ही वर्क शॉप्स ,ट्रेनिंग प्रोग्रामस आणि इंटर्नशिप प्रोग्रामस घेत असतो.डॉल्फिन लाब्सच्य इंटर्नशिप प्रोग्रामला तर महाराष्ट्रातील वेगेवेगळ्या जिल्हातील विद्यार्थी येत असतात. 
आता पर्यंतच्या पर्यंतच्या प्रवासात विविध प्रकारची माणसे , विद्यार्थी भेटले. हौशे , गवशे आणि नवशे भेटले. स्वत:च काम झाल कि परत शिंतोडे फेकणारे भेटले. कामापुरत गोड बोलून फसवणारे हि बरेच भेटले. शिक्षकी पेशाला काळिमा असणारेही भेटले. पण चांगली माणस इतकी भेटली कि त्यापुढे हि लोक नगण्य झाली. 
सध्या मी पूर्णवेळ अभियांत्रिकी शिक्षणप्रसारासाठी काम करत आहे. अलीकडे मी जे काही लिहित आहे त्याला एका तपाच्या अनुभवाची आणि प्रयोगाची जोड आहे आणि तोही क्रियाशील अनुभव. डॉल्फिन लॅब्स हि खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी शिक्षणावर प्रयोग करणारी एकमेव लॅब्स आहे . अभियांत्रिकी क्षेत्र हे वाचल पाहिजे आणि त्यासाठी मी डॉल्फिन लॅब्सच्या माध्यमातून काम करत आहे. डॉल्फिन लॅब्सची सध्याची भूमिका काय आहे त्याविषयी मी एक वाचलेली लहान गोष्ट सांगतो.
जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी चोचीने पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न करत असते. ते पाहून एक कावळा तिला म्हणतो कि तू कितीही प्रयत्न केलेस तरी हि आग विझणार नाही.अशा वेळी ती चिमणी म्हणते कि या जळलेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझे नाव ‘आग’ लावणार्यात नाही तर आग विझावणार्यात येईल. डॉल्फिन लॅब्सची भूमिका हे या चिमणीची आहे.
सुदैवाने आपल्या अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रात लागलेली आग अजूनही भडकलेली नाही त्यामुळे प्रयत्न केला तर नक्की विझेल आणि अभियांत्रिकी शिक्षणाला परत सोन्याचे दिवस नक्की येतील. डॉल्फिन लॅब्स सर्वाना मदत करायला तयार आहे आणि सर्वांच डॉल्फिन लॅब्समध्ये स्वागत आहे .
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment