Friday, November 30, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २४ )


***  शिकनं हार्ड करणार सॉफ्ट स्कील ट्रेनिंग  ***
आजकाल अभियांत्रिकीच्या प्रत्येक महाविद्यालयात या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगच्या भुताने धुमाकूळ माजवला आहे. प्रत्येक महाविद्यालयात आजकाल हा परवलीचा शब्द झाला आहे . देशाच्या भावी अभियंत्याच्या अंगी कौशल्यनिर्मिती करणे ऐवजी त्याला झकपक राहणे आणि फाडफाड इंग्लिश बोलणे याला खूपच महत्व आल आहे. मान्य आहे या गोष्टीही महत्वाच्या आहेत पण त्याला किती महत्व द्याव यालाही मर्यादा आहेत. बऱ्याच ठिकाणी तर प्रात्यक्षीकापेक्षाहि सॉफ्ट स्कील  ट्रेनिंगच्या तासाला जास्त महत्व आल आहे.
या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या चाचण्या , वेगवेगळी प्रशिक्षणे विद्यार्थ्यांच्या माथी मारली जात आहेत. काही ठिकाणी या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगच्या नावावर पैसे उकळले जात आहेत. शहरी मुलांची मने या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगसाठी थोडीफार तयार झालेली असतात पण जी ग्रामीण मुले असतात त्यांची खूपच कुचंबणा होते. कित्यकांचा तर या सॉफ्ट स्कील ट्रेनिंगच्या भडीमारामुळे आत्मविश्वास कमी होतो तर काहींच्या मनात आयुष्यभरासाठीचा न्यूनगंड निर्माण होत आहे.
विद्यार्थ्यांना विषय समजला तर त्यांची त्या विषयातील गोडी वाढेल. परिणामी त्यांना त्या विषयाच्या प्रात्यक्षिकामध्ये रुची वाढेल . ते वेगवेगळे प्रयोग करतील , त्यामुळे त्यांचे कौशल्यात वाढ होईल आणि जर  विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढले तर आपोआपच त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांच्या देहबोलीत आपोआपच बदल होईल. हे साध सोप सूत्र लक्षात घेतले पाहिजे.


अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला हार्ड स्कील आल पाहिजे म्हणजे त्याला कामाच ज्ञान पाहिजे पण ते न पाहता त्याच सॉफ्ट स्कील पाहणारे एच. आर.  म्हणजे खर तर धन्य मानलं पाहिजे  अर्थात त्यांनाही अभियांत्रिकीचा विद्यार्थी हा अभियांत्रिकी कामासाठी नको तर हाय टेक कारकुनी कामासाठी  पाहिजे असतो . त्यामुळे कारकून निवडीचे निकष इथे लागले आहेत हेच कुणाच्या लक्षात येत नाही. Aptitude test म्हणजे नैसर्गिक कल चाचणी होय आणि या चाचण्या पार करणेसाठी सुद्धा प्रशिक्षण देणारे बाजारात आले आहेत. अशान नैसर्गिक कल बदलणार आहे का ?  देहबोली हि प्रत्येक देशाप्रमाणे बदलते. ती त्या देशाची संस्कृतीवर अवलंबून असते आणि काहीही येत नसताना जाणूनबुजून देहबोलीच्या सहाय्याने आव आणायला लावणे म्हणजे शुद्ध फसवणूक नाही का? ज्या ग्रुप डिस्कशन चा एव्हडा उदोउदो केला जातो ,आपल्या मुलांना काम करायला जायचं आहे कि तोंड पाटीलकी करायला ? खरंच कशाचा कशाला ताळमेळ नाही.
आजकाल हसॉफ्ट स्कील ट्रेनिंगची एक मोठी बाजारपेठच उदयास आलेली आहे.दर वर्षी बाजारात वेगवेगळे हे सॉफ्टस्कील गुरु नवनवीन फंडे बाजारात आणतात. ठीक आहे व्यवस्थापना  च्या विद्यार्थ्यांना हे आवश्यक आहे आणि त्यांचेसाठी हे उत्तमच आहे पण अभियान्त्रिकीच्या विद्यार्थ्यांनाहीयाची थोडीफार गरज आहे पण याचा अतिरेक हा टाळला पाहिजे . यामध्ये पैसे तर वाया जात आहेच पण त्याबरोबर विद्यार्थ्यांचा अनमोल वेळही.
अभियंत्याला यंत्राशी खेळ करायला शिकवायचं सोडून हि पोपटपंची आणि जगण मेंगळट करायला शिकवणाऱ्या या सॉफ्ट ट्रेनिंगच खूळ कधी निघणार आहे हे देव जाणे ?

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.com या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .

चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०


No comments:

Post a Comment