Tuesday, November 13, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग १६ )



***  पाश्च्यात्य शिक्षणपद्धतीचा वाढतोय भाव , अभ्यास नाही देवा मला पाव ***
आजकाल इंटरनेटच्या जमान्यामुळे जग जवळ येत चालल आहे . क्लिकसरशी शेजारच्या देशात डोकावून पाहता येत . पाश्चात्य देशामधील शिक्षणक्षेत्रामध्ये काय चालल आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून लगेच कळतं. यामधूनच नवनवीन संकल्पना आपल्या अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीमध्ये वरचेवर चर्चेत येत आहेत.  पाश्च्यात संकल्पनांना भुलून त्यावर खोलवर विचार न करता आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पहिल्यांदा श्रेय घेण्याच्या नादात व्यवस्थितपणे अभ्यास न करता घाईघाईने रुजवायचा प्रयत्न करून त्याची व्यवस्थितपणे वाट  लावण्यामध्ये आपण पटाईत झालो आहोत .
ज्या देशातील शिक्षण पद्धतीचे आपण गोडवे गातो आणि ती शिक्षण पद्धती राबवण्याचा प्रयत्न करतो त्या देशाच्या शिक्षण पद्धतीचा पहिल्यांदा  मुलभूत अभ्यास करायला पाहिजे आणि मग राबवली पाहिजे पण आपल्याकडे असं होत नाही . आपल्याकडे अमेरिकन/ जर्मन शिक्षण पद्धतीचा उदोउदो होतो पण या  शिक्षण पद्धती अशा मुलासाठी तयार केलेल्या आहेत जी मुल वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांची मत मांडतात आणि त्यांना तिथूनच विचार स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे धडे मिळालेले असतात आणि ते पाळले जातात. तुम्ही स्वतः करा (Do It Yourself ) या संस्कुतीमध्ये वाढलेल्या या मुलाना लहानपणापासूनच स्वत:ची गोष्ट स्वत: करायची सवय असते. Yes I Can हा यांचा मंत्र असतो . कुठल्याही समस्येवर स्वत: समाधान शोधण्याच त्यांना बाळकडू मिळालेलं असत . वयाच्या अठरा वर्षापर्यंत हे स्वयंभू होतात. कष्टाला आणि स्वावलंबीपणाला दिलेला सन्मान यामुळे ती लवकरच मिळवती होतात. त्यांना जबाबदारी उचलायला शिकवलेलं असत आणि मिळणाऱ्या अपयाशाच पण जबाबदारी ते दुसऱ्यावर टाकत नाहीत. कामाच्या वेळेस काम हे त्यांच्यात भिनलेले असत. आणि सर्वात महत्वाच त्यांना काय करायचं हे त्यांना ठाऊक असत.  
  याउलट आमच्याकडे अजूनही  पोरग अठरा वर्षाच होउन  इंजिनियरिंगला आल तरी त्याचे वडील म्हणतात अजूनही लहान आहे. लहान असताना त्याला काय कळतय असं म्हणून स्वातंत्र्य दिल जात नाही . प्रत्येक गोष्ट करणेसाठी ती आज्ञेची वाट पाहतात, स्वत: जबाबदारी पेलायला ती इतकी समर्थ नाही आहेत . आपल्यापुढे ते ताडमाड दिसतात म्हणून त्यांची बौद्धिक कुवत जास्त आहे अस नाही . Whats App  आणि फेसबुक वर timepass करतात याचा अर्थ ते टेक्निकली खुपच पुढे आहेत आणि त्यांची आकलन शक्ती जास्त आहे असं नाही . आयुष्यातील अनेक निर्णय ते सल्ला घेउनच करतात. मला हे जमेल का अशी शंका  त्यांच्या मनात प्रत्येक वेळी येते. लोक काय म्हणतील याची भीती त्यांच्या मनात लहानपनापासून घातलेली असतात . कोणताही  धाडस करायला  हे तयार नसतात आणि जबाबदारीची त्यांना जाणीवच नसते (अर्थात हा आपला राष्ट्रीय प्रश्न आहे ).
अशा अनेक बाबी आहेत ज्यांचा विचार आपण करत नाही आणि तो न केल्याने बऱ्याच पाश्यात्य शिक्षण पद्धती आपल्याकडे फेल गेलेल्या आहेत आणि जाणार आहेत . याचा अर्थ आपली मुले कुठल्याही बाबतीत कमी आहेत अस मला अजिबात वाटत नाही . फक्त आपल्या मुलांची जडणघडण, आपली संस्कृती  हि वेगळ्या पद्धतीची आहे आणि याचे काही फायदेहि आहेत . त्यामुळे याचा विचार करूनच शैक्षणिक धोरणं आखली पाहिजेत . 

पटल असेल तर शेअर करा, विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment