Sunday, November 4, 2018

अभियांत्रिकी शिक्षण : दशा आणि दिशा (भाग १२)


*** बौद्धिक संपदा आणि शिक्षणक्षेत्राची बौद्धिक दिवाळखोरी ***

मागे "थ्री इडीयट" नावाचा एक इडीयट सिनेमा आला होता. या चित्रपटाने अभियान्त्रीकी शिक्षणाविषयीच्या अनेक भंकस कल्पनांना जन्म दिला. त्याविषयी मी नंतर लिहिणारच आहे पण पेटंट या शब्दाला खरे ग्लॅमर आणले ते या सिनेमाने . विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये पेटंट विषयी खरी जागृती आणली ती या सिनेमाने आणि हा अतिशय चांगला विषय गांभीर्याने न हाताळल्यामुळे त्याचं हसं केलं शिक्षण क्षेत्राने.

पेटंट म्हणजे काय ?
पेटंट एक अधिकार आहे जो एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही एकदम नवीन सेवा, तांत्रिक, प्रक्रिया, उत्पादन किंवा डिझाईनसाठी दिला  जातो. ज्यामुळे कोणीही त्याची नक्कल तयार करू शकत नाही. पेटेंट एक असा अधिकार आहे, जो मिळाल्यानंतर ती  व्यक्ती किंवा संस्था ज्या  उत्पादनाचा शोध करते किंवा बनवते  त्या उत्पादनाला बनवण्याचा एकाधिकार प्राप्त करते.
जर पेटेंट मिळालेल्या व्यक्तीऐवजी इतर कोणी व्यक्ती किंवा संस्था याच उत्पादनाला बनवते, तर ते बेकायदेशीर मानले जाते आणि जर पेटेंट मिळालेल्या व्यक्तीने त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवल्यास पेटेंटचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण जर कोणी या उत्पादनाला बनवू इच्छित असेल तर त्याला पेटेंट मिळालेल्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून परवानगी घ्यावी लागेल आणि त्याला रॉयल्टी देणे गरजेचे आहे.
आता वर्ल्ड ट्रेड संघटनेने पेटेंट लागू राहण्याचा कालावधी २० वर्ष केला आहे, जो पहिले प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा होता.
( सौजन्य  : https://www.inmarathi.com/everything-you-need-to-know-about-patent-and-its-registration/)
 पेटंट फाईल केल्याबद्दल शिक्षकाला काय मिळते ? एखाद्या शिक्षकाने पेटंट फाईल केलं तर किंवा त्याला ते पेटंट मिळालं तर त्याबद्दल त्याला काय फायदा मिळेल याविषयी काहीही नियमच केलेले नाहीत .  जवळजवळ सर्व  ठिकाणी या पेटंटसाठी सगळे पैसे शिक्षकच भरतो किंवा विद्यार्थी भरतात आणि त्याचं नाव मिरवत महाविद्यालय. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याकडे या चार पाच वर्षात जेव्हडे शैक्षणिक संस्थांनी ( आय आय टी आणि काही शासकीय शैक्षणिक संस्था सोडून) पेटंट फाईल केले त्यातील ९८ टक्के कल्पना या पेटंट मिळण्याच्या लायकीच्याच नाहीत . किबहुना पेटंट कशाचं करायचं हेच माहित नाही .या पेटंटची खरी लायकी आमच्या शिक्षण क्षेत्राने घालवली आहे . आमच्याकडे एखादी चांगली कल्पना आली कि त्याची व्यवस्थितपणे तिची कशी वाट लावायची यांच्या तज्ञांची काहींही कमतरता नाही.
मागे एका संस्थेने पेटंटच्या बाबतीत कळसच केला. फायनल इयरचे सारे  प्रोजेक्ट पेटंटसाठी फाईल केले आणि  ते फाईल करताना त्यामध्ये  त्या ग्रुपमधील विद्यार्थ्यांची नावे, मार्गदर्शकाचे नाव, त्यातच शिक्षकाची नाव आणि हेड ऑफ डिपार्टमेंटच नाव ओघानेच . म्हणजेच खिचडी पकी सबमे बटी. काही न करता दहा दहा पेटंट नावावर . अरे चाललय काय ? बर ते पेटंट ची लायकी काय ? ते परीक्षेत टिकणार आहे का ? पण काय आहे आपल्या देशात पेटंटच्या परीक्षेसाठी परीक्षकच नाहीत. त्यामुळे पाच पाच वर्षे या पेटंटच मूल्यमापन होतंच नाही मग काय तोपर्यत मिळतं मिरवायला. बर झालच मूल्यमापन  आणि नाही मिळाले पेटंट तर मग ... आहेत पुढची फाईल केलेली . आणि हि गोष्ट बऱ्याच चाणाक्ष लोकांनी आणि संस्थांनी हेरली आहे.. आणि त्यांचे नावावर पेटंटची संख्या वाढतच आहे वाढतच आहे . या पेटंटच असं तर कॉपीराईटविषयी असेच प्रयोग होत आहेत. मग अशा प्रकारे फाईल केलेल्या लोकांना या पेटंटच खर महत्व माहीतच नाही. नावावर लागलेली दहाबारा पेटंटची नावे मिरवताना त्यांच्या मनात खर तर या पेटंट विषयाप्रती सन्मानच नसतो.
आता तर काय या ज्याप्रमाणे प्रोजेक्टविके झालेले आहेत त्याप्रमाणे पेटंट फाईल करून देणारे एजंट पण बाजारात फिरत आहेत . बल्क पेटंट फाईल करण्यास सूट देत आहेत. नवीन योजना आणत आहेत आणि हे खुपच घातक आहे. कारण बौद्धिक संपदा हि अत्युच्च संपदा आहे आणि तिचा मान जर नाही राखला तर आपण बुद्धीचं महत्व सांगू शकणार नाही.
आपल्याकडे फार्मसी, केमिकल आणि काही प्रमाणात मेकॅॅनिकल शिक्षण आणि उद्योगक्षेत्र सोडलं तर  पेटंट विषयी व्यवस्थित जागृती झालेली नाही. एखाद्याने पेटंट फाईल केल तर त्या पेटंटला व्यवहारात कस आणायचं हेच माहित नाही आणि याविषयी मार्गदर्शन करणारा नाही. जर स्वत: बाजारात आणलं तर त्याच्यात थोडासा बदल करून पुढच्या दहा दिवसात त्याचेपेक्षा अव्वल प्रॉडक्ट बाजारात येईल आणि त्याला कसा आळा घालायचा याबद्दल कायदे नाहीत . जर  न्यायालयात गेलो तर आपली न्यायालये निवांतपणा विषयी प्रसिद्ध आहेत . निकाल लागुपर्यत किती वर्षे जातील याची खात्री नाही . कोर्टबाजी करणे इतपत आपल्याजवळ वेळ आणि पैसा असला पाहिजे आणि तो कितीजणांजवळ आहे..


                                                
 आपली  मते ऐकायला नक्कीच आवडेल . शेअर करा.


चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment