Friday, November 16, 2018

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग -19)

चहाविक्या अभियांत्रिकीचा विद्यार्थी ,चहा विकणारा शिक्षक आणि याच्यापुढे जावून पगार वेळेवर मिळत नाही म्हणून आंदोलन केलं म्हणून संस्थेमधून काढून टाकल्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या पदव्या जाळणारा अभियांत्रिकीचा शिक्षक ...... येत्या काही काळात अजुन काय बघायला मिळणार याचा काही अंदाज नाही.   काय दिवस आले हे  अभियांत्रिकी शिक्षणावर ? काही काळापूर्वी सरदारजीवर विनोद ऐकायला मिळायचे तसेच आता अभियंत्यावर ऐकायला मिळतील आणि तशी सुरुवातही झाली आहे .
सम्राज्ञीन काही झाल तरी सिंहासन सोडायचं नसत ती जर खाली उतरून आली कि लोक तिच्या पदराला हात  घालायला कमी करत नाहीत . गुलबकावलीची  फुलं जर गटाराच्या कडेन उगवायला सुरुवात झाली तर जनावरे सुद्धा त्याला विचारत नाहीत. अगदी तशीच अवस्था अभियान्त्रीकीवर शिक्षण क्षेत्रावार आली आहे. सोन्याचा घास मातीमोल भावात मिळाल्यावर भिकारीपण माजले आणि मग सुरु झाला ओरबाडून घ्यायचा खेळ ... पोट भरलं झाल कि कचऱ्यात टाका .... कशाला कशाला मेळ नाही . दुष्काळात एरंडाला पण भाव येतो तसा वाढप्याना पण भाव आला ... मागणी वाढली मग भेसळ सुरु झाली ...हळूहळू  बाळ कुपोषित व्हायला लागली .. मग त्यांना कुणी विचारेना ...त्यांच्यात आता झुंजायचं बळ उरेना ... मग आता काय  ? जीण पोसलं तिच्याच पदराला हात.... अरे कुठ तरी थांबा आता ... ज्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रावर  आपल्या देशाच भवितव्य आहे त्याचा  असा अपमान आणि अवहेलना नका करू . तुम्ही भाळला खोट्या स्वप्नांना , तुम्ही फसला खोट्या झगमटाला . अरे त्या पदवीच्या कागदाला  जीवनसागराची नौका बनवायच्याऐवजी मनामध्ये अभियंता जागवला असता तर हि वेळच आली नसती हा सागर चालत पार केला असता . पण अभियंता जागवण  खरंच एव्हड सोपं आहे का ? राजानो पदवी मिळाली म्हणून अभियंता होत नसत त्यासाठी हवी घोर तपश्चर्या. आणि अभियंता कधीही हारत नसतो...तो कधीही थकत नसतो. कितीही संकटे येउ द्या तो रडत नसतो.
बाहेर पडा अभियंत्याविषयीच्या भ्रामक कल्पनामधून , परत जाणून घ्या  अभियंता कुणाला म्हणायचं ? त्याच कर्म काय आहे ? आणि त्याची कर्तव्ये काय आहेत ?
अभियंता निर्मिती करतो......तो ब्राम्हस्वरूप आहे .
अभियंता पालन करतो .....तो विष्णू स्वरूप आहे .
अभियंता पुन: निर्मितीसाठी नाश करतो ...तो शिवस्वरूप आहे ..
नित्य नवीन आव्हानांचा सामना करणे हेच त्याचे कर्म आहे आणि जगाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणे हेच त्याचे कर्म आहे .
वाचा ...परत वाचा , मनाला विचार तुम्ही खरच अभियंता आहात काय ?
मग आतापर्यंत शिकला ते काय होत ?
.
.
मी अभियंता आहे याचा मला अभिमान आहे.
विक्रमादित्य 

No comments:

Post a Comment