Sunday, November 25, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २२ )


***  संशोधन - फुकटचे लुटा धन   ***


अभियांत्रिकी शिक्षणामध्ये संशोधन हा एक कळीचा मुद्दा आहे.  प्रत्येक सत्रामध्ये एक नोटीस निघते त्यामध्ये शिक्षकांना सांगितले जाते कि तुम्ही एक तरी पेपर तुमचा प्रकाशित करा किंवा तुमचे संशोधन साठीचे प्रपोजल तयार करा . या संशोधनाच्या जबरदस्तीची आधी चीड यायची पण आता एक मोठा विनोदच वाटतो . संशोधन हे कधीही जबरदस्तीने किंवा आमिष देउन करता येत नाही त्याला तसा पिंड असावा लागतो . सगळ्याच शिक्षकांना संशोधन जमेल असे नाही किंवा एखादया शिक्षकांना खूपच चांगल शिकवता येत म्हणून त्यांना संशोधन करता येईलच अस नाही.  मुळात एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून संशोधनाची अट ठेवण हेच चुकीच आहे, कारण त्यासाठी विद्यापी आहेत . अभियांत्रिकी महाविद्यालयाची मांडणी हि अतिकुशल मनुष्यबळ निर्माण करणेसाठी झालेली आहे. त्यामुळे तेथील संशोधनासाठी लागणाऱ्या  साधनसामग्री उपलब्धतेवर मर्यादा येतात . तिथून जास्तीतजास्त एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनाची निर्मितीची अपेक्षा ठेवणे काही गैर नाही. पण संशोधन म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली .
मुळात संशोधनासाठी शिक्षकावर जबरदस्ती करण्यापूर्वी संशोधन करण्यासाठीच लागणारे प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची क्षमता संस्थेमध्ये आहे का? हे पाहिलं पाहिजे . बऱ्याच संस्थेत नामांकित जर्नल उपलब्ध नसतात , उपकरणे तर सांगायला नको पदवीच्या अभ्यासक्रमासाठी लागणारी उपकरणे ती सुद्धा माफक म्हणजे जेव्हडी लागतील तेव्हडीच कार्य करणारी  असतात . इंटरनेट वापरायच तर बऱ्याच साईट या बंद केलेल्या असतात . नेटचा स्पीड हा कासवाला लाजवेल असा असतो. लायब्ररी मध्ये संदर्भ ग्रंथ हे अभ्यासक्रमासाठी लागणारेच असतात . मग अशा मोडक्या तलवारी देउन संशोधनाच्या महासंग्रामासाठी शिक्षकाना पाठवणे हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.
बऱ्याच ठिकाणी संशोधनासाठी प्रपोझल पाठवताना पी.एच.डी. पाहिजे अशी अट असते . मग जबरदस्तीने एखाद्या जुनियरला को. पी. आय. करून त्याच्या बोकांडी ते काम टाकल जात. अनेक ठिकाणी  पी.आय.हे व्यवस्थापनात अडकून पडलेले असतात त्यामुळे ते काहीच काम करत नाहीत  मग या को . पी. आय . ची अवस्था खूपच वाईट होते . काही वेळा शिक्षक उगाच कटकट नको म्हणून कसतरी कुठूनतरी कॉपी पेस्ट करुनं प्रपोजल पाठवतात अर्थात ते सिलेक्ट होणार नाही अशी त्यांची खात्री असते  आणि अस प्रपोजल जेव्हा त्यांच्या दुर्दैवाने निवडले जाते मग का्य मजा सांगायची  महाराजा... एखादी छोटी कथाच होइल त्यावर ....
बर तो रिसर्च पूर्ण करून तर काय फायदा फक्त अप्रयालवर दोनचार मार्क मिळतात . पूर्ण केलेबद्दल एक पगारवाढ पण मिळत नाही . मिळालेल्या पैशात संस्थेसाठी उपकरणे खरेदी होतात , लायब्ररीसाठी पुस्तके खरेदी होतात , रिसर्च बाबतीत बोम्बाबोम्बच असते कारण बर्याचदा मिळालेले पैसे पुरत नाहीत , काहिवेला संस्था पैसे काढून घेते/ वेळेत देत नाही .  मग खोट्या बिलासाठी धावाधाव होते . काही पी. आय. मात्र बिलंदर असतात  बी.इ. किंवा एम.. च्या विद्यार्थ्याला पैसे घालायला लावुन त्यांचेकडून प्रोजेक्ट करून घेतात आणि पैसे स्वत: लाटतात.
कुठल्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात जे रिसर्च प्रोजेक्ट झाले आहेत कधी वेळ मिळाला तर अवश्य बघा . त्याच मॉडल आहे का ते बघा . ते चालू आहे का ते बघा आणि त्या मॉडेलचा काय उपयोग होतो ते पहा ते वापरात आहे का ते पहा आणि खरच त्या संशोधन निधीचा वापर करुन काहीतरी संशोधन झाल आहे की फ़क्त काही कागद तयार झाली आहेत का ते पहा ... तुमच्या पदरी  फ़क्त निराशाच येइल .

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या  dearengineers.blogspot.com या ब्लॉगला भेट द्या

शेअर करा , विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment