Monday, November 19, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २१ )


***  प्रशिक्षण कार्यक्रमाची ऐशीतैशी  ***

शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. त्या क्षेत्रात काम करत असणाऱ्या तज्ञ लोकांची तसेच इतर इच्छुक लोकांची  ओळख व्हावी हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश असतो. बरेच कार्यक्रम विद्यापीठे किंवा वेगेवेगळ्या  शिक्षण समित्या, सरकारी संस्था  प्रायोजित करतात . अगदी एक दिवसापासून एक महिन्याचे प्रशिक्षण देशातील विविध महाविद्यालयात सुरूच असतात. प्रशिक्षण कार्यक्रम घेतले कि naac किंवा nba मध्ये मार्क्स मिळतात त्यामुळे बरेच महाविद्यालये हि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात ,त्यांना हे करणे निकडीच असत.
पण प्रत्यक्षात  अतिशय कमी शिक्षक या कार्यक्रमाला उत्सुक असतात. त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शिक्षकं मिळत नाहीत . जर प्रोग्राम ए.आंय.सी.टी.इ. किंवा टी. क्यूप खाली नसेल तर विचारायलाच नको  अक्षरशः बाबा पुता करून रजिस्ट्रेशन मिळवावी लागतात किंवा मग बी.ई. च्या किंवा एम.ई च्या विद्यार्थ्याना बकरे बनवावे लागते .बऱ्याच वेळेला प्रशिक्षण कार्यक्रमाचे निमित्ताने शिक्षक सुट्ट्या घेत असतात. बरीच लोकं आपल्या गावापासून दूर नोकरी करत असतात. जर त्यांचे गावी किंवा गावाच्या आसपास असणाऱ्या महाविद्यालयात जर प्रशिक्षण कार्यक्रम असेल तर अगदी ओळख काढून, सेटिंग लावून नाव नोंदणी केली जाते . एव्हढं करुनहि काही महाभाग पूर्ण कार्यक्रम अटेंड करतच नाहीत. फक्त सकाळी जायचं सही करायची नाश्ता खायचा परत जायचं आणि मग डायरेक्ट जेवायलाच यायचं किंवा दुसऱ्या दिवशी परत तोंड दाखवायला जायचं . आणि ओळख असेल तर काय जायची पण गरज नाही सर्टिफिकेट अगदी  घरपोच मिळत . काही ठिकाणी प्रत्येक मोड्यूलला हजेरी घेतली जाते पण तिथेही एखादा सही करणेसाठीहि तयार केला जातो . अशी अवस्था आहे प्रशिक्षण कार्यक्रमाची.
याला अपवाद काही कार्यक्रम तर असे असतात कि शिक्षकांनी या कार्यक्रमात प्रशिक्षण  घेतले तर त्यासाठी वेगळी वेतनवाढ वगैरेसारखी आमिष पण असतात अर्थात या कार्यक्रमाना मिळणारा प्रतिसाद चांगला असतो.

यात शिक्षकांची पण जास्त चूक आहे असं वाटत नाही. वेगवेगळे आणलेले तज्ञ त्यांच्या विषयात विद्वान असतात पण त्यांच्या सर्वांच्या विषयात सुसूत्रता नसते . बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या तोंडून  तेच तेच  ऐकायला लागते . प्रात्यक्षिकांना फाटा दिलेला असतो . पॉवर पोइंट प्रेसेंटेशनवर बडबड चालु असते. अगदी चार वर्षांनी जर तो तज्ञ बोलावला तरी तीच पी.पी.टी. आणि तेच एकसुरी व्याख्यान ....वैताग येतो. बर त्यांनी जर प्रात्यक्षिक घ्यायची म्हटलं तर त्यामानाने पैसे मंजूर होत नाहीत त्यामुळे त्यानाही ते शक्य नसते. लागणारी सोफ्टवेअर पायरेटेड असतात , व्यवस्थित चालत नाहीत असे बरेच प्रश्न आहेत . काही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तर एकमेकाशी संबंध नसलेले विषय कोंबून कोंबून भरलेले असतात. अगदी एक ना धड भाराभर चिंध्या अस कार्यक्रमाच स्वरूप असत.  त्यामुळे कुठल्याही विषयाला खोलपर्यंत हात घालता येत नाही . विषयाला सुरुवात होते आणि वेळ संपतो. गेल्या दहा पंधरा वर्षात नवीन दमाचे आणि नवीन विषयावर बोलणारे तज्ञ तयार झालेलेच नाहीत आणि तयार होउ पण दिलेले नाही त्यामुळे तज्ञ लोकांची वाणवा निर्माण झाली आहे. मिळणारे मानधन हे तुटपुंजे आहे त्यामुळे इंडस्ट्रीतील अनुभवी  लोक जास्त तयार नसतात.   
शिक्षकाना प्रशिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे.बदलत्या काळानुसार झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञानाची त्यांना माहिती होणे हे अतिशय गरजेचे आहे . शिक्षक होणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्यभरासाठी विद्यार्थी बनण्याचे  घेतेलेले व्रत असते. पण आजकाल बरेच  शिक्षक विसरले, प्राचार्यही विसरले आणि संस्थाहि विसरल्या. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर बंधने आली. त्यामुळे प्रशिक्षणासाठी शिक्षक मिळेनात. कॉलेज परवानगी देत नाही आणि स्वत:हून प्रशिक्षणासाठी पैसे भरायची इच्छा नाही आणि काही ठिकाणी ऐपतही नाही अशी अवस्था झाली.
आजकाल तर हि प्रशिक्षणे म्हणजे कागदी घोडी झाली आहेत आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट विकण्याचा धंदा. आणि यामुळेच प्रशिक्षणाचा दर्जाही खालावला आहे . हि सर्टिफिकेटस म्हणजे केवळ फाईलला कागद लावण्याचा नुसता उपद्याप झाला आहे.


यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या  dearengineers.blogspot.com या ब्लॉगला भेट द्या


शेअर करा , विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment