Thursday, November 15, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग १७ )

*** थेअरीकडे लक्ष, प्रात्यक्षिकाकडे दुर्लक्ष ***
प्रात्यक्षिकं हा अभियांत्रीकी शिक्षणाचा श्वास आहे. विद्यार्थ्याला जे पुस्तकी ज्ञान शिकवले जाते त्याचा स्वानुभव मिळावा यासाठी प्रात्यक्षिकांना अभियांत्रिकी शिक्षणात खूप महत्व आहे. प्रात्यक्षिक केल्यावर त्याची माहिती ,निरीक्षण आणि अनुमान लिहीणेसाठी जर्नल ( याला प्रयोगवही म्हणु) असतात. या प्रात्यक्षिकावर परीक्षाही घेतली जाते .प्रत्येक सत्रात किमान तीन,चार विषयांना प्रात्यक्षिक परीक्षा असतात .
पण आजकाल या अतिशय महत्वाच्या अशा प्रात्यक्षिकाविषयी अवस्था काय आहे? बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनाच प्रात्यक्षिक करताना येत नाही त्यामुळे बाजारात कमीत कमी डोक लावून प्रात्यक्षिक करण्याचे रेडीमेड किट्स करणारे तयार झालेले आहेत आणि अशा किट्सला पसंती मिळू लागली आहे . याबरोबरच काही विद्यापीठात तर ती किट्स अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांनीच पुरस्कृत करण्याचे घाणेरडे धंदे सुरु केलेले आहेत . बऱ्याचशा महाविद्यालयात तर छापील जर्नल दिले जाते . विद्यार्थ्यांनी काहींही लिहायचं नाही फक्त रीडिंग भरायची , असतील तर एक दोन गणित करायची झालं जर्नल. हि गणितं सुद्धा मुले स्वत: करत नाहीत . कुणीही प्रात्यक्षिकं गंभीरपणे करत नाहीत. ९० % मुलांना झालेल्या प्रात्यक्षिकाच अनुमान (conclusion) स्वतःच्या मनाने लिहिता येत नाही . प्रात्यक्षिकाच्या दोन तासाच्या वेळात विद्यार्थी आणि शिक्षक काय करतात हाच एक संशोधनाचा विषय आहे. बहुतांश वेळा पहिल्या अर्ध्या तासात प्रात्यक्षिक संपतात, बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनी एकदा समजाऊन सांगितलं कि विद्यार्थ्यांनी स्वत: करून पहाण अपेक्षित असत पण विद्यार्थी काही करत नाहीत . थोड पाहिल्यासारख करतात आणि मग निवांतपणे उरलेल्या वेळात जर्नल लिहितात, इतर असाईनमेंट्स सोडवतात, मोबाईलवर whats app वर चाटिंग करत बसतात. जास्तच झाल तर कुठले कुठले फॉर्म भरत बसतात.
शिक्षकांच्या बाबतीत एकदा सगळ समजावून सांगितलं कि त्यांची जबाबदारी संपते मग जर्नल तपासणे किंवा आजकाल बरेच कागदी घोडे नाचवणे चालू आहे त्यांची पूर्तता करणेच ते काम करतात. मागे सांगितल्याप्रमाणे ९५ टक्के निकाल लावायचाच आहे मग काय पोरांना येउ दे किंवा नाही हे सगळ शिक्षकाच्या बोकांडी असत, काहीही झालं तरी ७०% च्यावर मार्क्स मिळतात विद्यार्थ्यानाही हे माहित झालं आहे त्यामुळे ते निवांत असतात. कित्येक महाविद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षेवेळी असणाऱ्या तोंडी परीक्षेसाठीसुद्धा प्रश्नावली तयार करणेस शिक्षकांना सांगितले जाते अगदी उत्तरासकट आणि त्याची कॉपी विद्यार्थ्यांना द्यायची जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे. अर्थात हि तोंडी परीक्षा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक जमलं नाही तर त्याला पास करण्यासाठीची एक औपचरिकता असते पण त्यामध्येही विद्यार्थी बोलत नाहीत. अक्षरशः त्यांना त्याविषयाला असणाऱ्या सहापैकी तीन धड्याची सुद्धा नावे सांगता येत नाहीत .( कळकळीने शिकवलेल्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत काही येत नाही, ते तोंडसुद्धा उघडत नाहीत तेव्हा शिक्षकाच्या मनाची होणारी घालमेल ज्यावेळी हे विद्यार्थी शिक्षक होतात तेव्हाच त्यांना कळते. शिक्षक झालेवरच कळत कि टुकार मुलालासुद्धा पास करणेसाठी शिक्षक किती धडपडतात आणि याची त्या मुलांना माहितीही नसते )
ज्यांना साधे प्रात्यक्षिक धडपणे करता येत नाही तो व्यवसाय कुठून उभारणार ? व्यवसायच जर उभे राहिले नाहीत तर नोकऱ्या कुठून मिळणार ? आणि नोकऱ्याच नाहीत तर अभियांत्रिकी महाविद्यालये कशी चालणार? हे एक साधे सोपे गणित आमच्या सो कोल्ड शिक्षणतज्ञांना कळले नाही हे आमच्या देशाचे दुर्दैव आहे.
शेअर करा , आपले विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment