Friday, November 16, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग २० )



***  प्लेसमेंटचा भूल भुलैया  ***

मागे एकदा दहा वर्षापूर्वी माझा एक मित्र HR होता ,आताही आहे त्याला मी एक प्रश्न विचारला कि काय रे बाबा तुम्ही एखाद्या आय टी कंपनीसाठी विद्यार्थी निवडता तेव्हा साठ टक्के पेक्षा जास्त असे का निवडता ?. म्हणजे साठ टक्केपेक्षा कमी मार्क असणारी मुल लायक नाहीत अस म्हणायचं आहे का तुला? उलट या मुलापेक्षा मी असे कितीतरी विद्यार्थी पाहतो ज्यांना मार्क्स नाहीत पण त्यांचेमध्ये जास्त संशोधकता , नवनिर्मिती करणेची क्षमता जास्त असते मग त्यांना का घेत नाही?
 त्यावेळी त्याने मला उत्तर दिले कि, हे बघा सर, आम्हाला त्यांचे मार्कांशी काय घेणे देणे नसते . ज्या अर्थी ती फर्स्ट क्लास मिळवतात किंवा डीस्टिंगशन मिळवतात याचा अर्थ त्यांची एका जागेला बसुन काम करायची क्षमता जास्त आहे , त्याच बरोबर ती जास्त विचार न करता आज्ञेनुसार मुकाट काम करू शकतात , दिलेलं काम ती वेळेत करतील आणि त्यासाठी रात्र दिवस ते एक करतील हेच आम्ही बघतो. त्यांना चांगला पगार द्या काम खलास . याउलट  गोष्ट या कमी मार्क्सवाल्याची हे इतर गोष्टीत बरेच पुढे असतील पण हि जास्तच डोकं लावतात ,यांच्यात शिस्तशीरपणा कमी असतो म्हणून यांना टर्म वर्क आणि प्रॅक्तीकलला मार्क्स कमी मिळतात आणि निव्वळ थेअरीच्या मार्कावर फर्स्ट क्लास मिळत नाही . त्यामुळे आम्हाला लगेच कळत कि आमच्यासाठी लायक आहे कि नाही . बाकी आम्हाला त्याच्या  विषयाच्या ज्ञानाबद्दल काही घेणदेण नसत. मी अवाक् झालो.
परवा परत मला माझ्या एच आर  मित्राशी बोलण्याचा संबध आला त्याला मी विचारलं काय सध्या कस काय चालू आहे. तो म्हणाला सध्या कंडीशन जरा वाईट आहे. आम्हाला मुलं निवडताना अडचण येते कारण आता मुलांची गुणवत्ता खूपच ढासळत चालली आहे . मग तुम्ही काय करता ? माझा भाबडा प्रश्न . सोपं आहे, आता काय करायचं ज्यांची लायकी नाही अशा मुलांना निवडायचं मग काय यांना माहिती असते कि हा जॉब गेला कि त्यांना कुणी विचारणार नाही त्यामुळे ती जीव तोडून काम करतात . कारण आम्हाला त्यांना ते जे शिकलेत याविषयी काहीही घेण देण नसत. फक्त यांना काम अस द्याव लागत ज्यातून त्यांना डोकं वर करायला वेळ मिळणार नाही . झालं डोक्यात शिट्ट्या ...म्हणजे हे असं झाल कि काही माणस शेअर मार्केट मध्ये मार्केट वर जाताना पण पैसे काढतात आणि खाली जाताना पण . पडलं तरी नाक वर.
आता बघा, वेगवेगळे संस्थेत अनेक मुलं प्लेस होतात पण ते जिथ प्लेस होतात त्यांना तेच काम मिळत का जे ते शिकले?  तुम्हाला आश्चर्याची गोष्ट दिसेल कि  आय टीवाला आयटीत ,कॉम्पुटरवाला आय टीत, इलेक्ट्रॉनिक्सवाला आयटीत, इलेक्ट्रिकलवाला आयटीत , मेकनिकलवाला आयटीत आता तर सिविलवाले पण आयटीत जायची स्वप्न पाहतात आणि जायला सुरुवात झाली आहे. मग काय झाल त्यांच्या शिक्षणाचं ? कशाला एव्हढा वेळ आणि पैसा  घालवला. यामुळे आपल्या समाजाच आणि पर्यायानं देशाच पण खुप नुकसान होत आहे. आम्हाला वाटत कि पोर परदेशात जाऊन आम्हाला परदेशी चलन देतात पण जर तुम्ही तुलना केली कि त्या चलनाचा आम्ही खूपच मोठा मोबदला देत आहोत.  आमच्या पिढीचा बौद्धिक ऱ्हास होत आहे . मार्गदर्शन करणारी मागची अभ्यासू पीढी  संपत चालली आहे. मधली पिढीची अवस्था वर सांगितलेप्रमाणे . आता पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शकच नाहीत त्यांचे परिणाम आम्ही पहात आहेच.  
आहो, आम्ही आमची वासर फोडली  आणि अजूनही फोडत आहोत हो बैल करण्यासाठी ..... कायमस्वरूपी वांझोटी केली आणि करत आहोत  आणि वर टिर्या बडवून कौतुक करून सांगतो आहे पण वंश वाढवायला वळू लागतात. आता बसलोय दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघत.

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या  dearengineers.blogspot.com या ब्लॉगला भेट द्या


शेअर करा , विचार मांडा.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment