Monday, November 5, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा ( भाग -१४ )



*** आय. आय. टी.च खूळ - दुखण्याच मूळ  ***
आमच्या अभियांत्रिकीमध्ये आय. आय. टी. एक मोठं प्रस्थ आहे . आय. आय. टी. देशाची एक अभिमानाची गोष्ट आहे  पण नकळतपणे आय. आय. टी. च्या पावलावर पावुल ठेवण्याच्या नादात आपलं अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्र दिशा हरवून जात आहे.
आय. आय. टी. म्हणजे अभियांत्रिकीचा मानबिंदू. जवळ जवळ साठ वर्षाची उज्वल परंपरा असणाऱ्या या संस्थेविषयी प्रत्येक देशवासियांना अभिमान आहे. तेथील शिक्षक , विद्यार्थी, त्याचं संशोधन आणि त्याची शिक्षण पद्धती याविषयी गारुड प्रत्येकाच्या मनात आहे. याविषयी शंकाच नाही.
पण एखाद्या गोष्टीचे अभिमान वाटणे ठीक आहे काही प्रमाणात अनुकरण करणेही ठीक आहे पण प्रत्येक बाबतीत बाबावाक्य प्रमाणाम या प्रमाणे आय. आय. टी. प्रमाणम म्हणण्यामुळे आमचे नुकसान होत आहे.

आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याची गुणवत्ता काय असते ? आय. आय. टी. त जायचं स्वप्न पाहणारा विद्यार्थी जवळजवळ आठवीपासून आय. आय. टी. च्या बारावीनंतरच्या प्रवेशपरीक्षेसाठी झोकुन देत असतो . (परवा तर एकजण सांगत होता कि त्यान त्याच्या  मुलाला आय. आय. टी. च्या प्रवेश परीक्षेच्या तयारी साठीच्या क्लास ला घातलं आहे माझ्या डोक्यात शिट्ट्या वाजल्या माझ्या पाचवीच्या पोराच्या वर्गात शिकणार पोरग अजून त्याला शेंबूड काढता येत नाही त्याच्यासाठी सुद्धा क्लास आपल्या पुण्यनगरीत निघाले आहेत ). १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेपेक्षाही त्याला ती प्रवेश परीक्षा देवून पास होउन तो आय. आय. टी. मध्ये प्रवेश घेत असतो म्हणजे अखंड देशातील पहिल्या पंधरा हजार विद्यार्थ्यामध्ये तो असतो. आय. आय. टी. मध्ये काय शिकवतात ? कसं शिकवतात यावर एक पुस्तकच होईल.तर अशा गुणवत्तेच्या मुलांना शिकवण्यासाठी असणाऱ्यांना सोयी आणि सुविधा काय असतील याचा विचार करावा.
आता थोड आपल्या मुलांच्याकडे बघा. या मुलांनी आठवीपर्यंत परीक्षा दिलेली नाही. नववी मधून कसतरी दहावीत ढकललं आहे .दहावीत आणि बारावीत हातातील मार्कांच्या जीवावर मिळालेली भरघोस मार्क घेउन मिळत आहे मग काहींही शिकवायचं तर टाका अभियांत्रिकीला अशा मनोवृत्तीने आलेलं किंवा किमान इंजिनियर बनून आपलं पोट तरी भरील अस विचार करून टाकलेलं  पोट्ट . करा तुलना .आता यापुढे जावून त्याला शिकवणारे शिक्षक , शिक्षण पद्धती , त्याला मिळणारे शैक्षणिक सुविधा आणि याचीही तुलना करा.
आय. आय. टी.मधून पी.एच. डी. करून आलेल्या बऱ्याच शिक्षकांना मी आय. आय. टी. ची आणि इतर ठिकाणच्या शिक्षणपद्धतीची तुलना करताना मी पाहिलं आहे आणि त्या धर्तीवर ती पद्धत राबवताना पाहिलं आहे पण त्यांच्या या पद्धतीचा इतर लोकावर काय परिणाम होतो याचा विचार केला पाहिजे. आय. आय. टी.चे अनुकरण करणेचे नादात इतर बरेच प्रश्न उभा राहात आहेत  ज्याकडे कुणाचही लक्ष जात नाही शिक्षणतज्ञांनी यावर काम सुरु केल पाहिजे .
आय. आय. टी.तील तज्ञ लोकांनीही या विषयावर काम करायला हरकत नाही. गुलाब आणि झेंडू दोघांनाही वाढवण्याची पद्धत वेगळी असते  हे सोपं तत्व आता विचारात घेतलं पाहिजे.
सगळ्यात  महत्वाच म्हणजे आय. आय. टी. ने  त्यांच्या ग्लॅमरचा फायदा घेऊन तयार केलेले नवीन प्रोगामची भुरळ पाडून पैसे गोळा करायचे धंदे बंद करावेत. कारण त्यांच्या प्रोग्राम राबवायला बऱ्याच गोष्टीची कमतरता असते . बऱ्याच ठिकाणच्या लॅब्स या तशाच पडून आहेत . आमच्या विद्यार्थ्याना खरेच याचा पूर्णपणे फायदा होत नाही . त्यांचेसाठी एकदोन दिवसाचे ऐवजी निरंतर शिक्षण प्रणालीचा वापर करता येईल का हे पाहिलं पाहिजे.  आमच्या या साध्या विद्यार्थ्यांना  मी माठ म्हणत नाही कारण हि मुलहि काही कमी नाहीत आणि आमचे शिक्षकही काही कमी नाहीत  यांना जमत असेल  तर  त्यांच्या कुवतीनुसार योग्य मार्गदर्शन करावी हि हात जोडुन विनंती आहे.
माझी सर्वाना एक नम्र विनंती आहे कि आय. आय. टी.च्या धर्तीवर आपल्या शिक्षण पद्धती मध्ये प्रयोग करत असताना मुलांचा ,शिक्षकांचा आणि त्यांना मिळत असणाऱ्या सुविधांचा विचार करून प्रयोग करावेत . आता खरी गरज आहे त्यांचेतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय करता येईल यावर ठोस कार्यक्रम तयार करण्याची . या विषयावर आपण नंतर खोलवर बोलणार आहेच .

याविषयावर आपली मते ऐकण्यास आनंद होईल .

चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment